बालकथा #मला नको मोरपीस
बालकथा • मला नको मोराचे पीस आज शारदा शाळेतून आली तीच मोठ्या खुशीत. दप्तर वगैरे घरात ठेवलं आणि ती आईकडे वळली. “ आई, आज मी शाळेत मोराचे पीस बघितलं. माझ्या मैत्रिणीने आणलं होतं. अग किती सुंदर होतं म्हणून सांगू तुला ते! आई कुठे भेटतात गं मोराची पिसं? मला पण एखादं मिळालं ना, मी खूप जपून ठेवील. गालावरून फिरवलं की इतकं मऊ लागतं की बापरे!” शारदा मोठ्या आनंदाने व कौतुकाने सांगत होती. वडीलही घरी आल्यावर तिने त्यांनाही हेच सांगीतलं. खरंच होतं तिचं. मोराचे पीस कोणाला बरे आवडत नाही ! सगळ्यांनाच ते आकर्षित करतं. हवाहवसं वाटतं. लहानग्या शारदाला मोरपीस फार आवडायचे. पांढरी काडी, तिच्या दोन्ही बाजूला रंगछटा बदलणारे धाग्यासारखे फुटवे ,त्यावरील छोटे छोटे रोम आणि त्या मोरपीसाचे खास आकर्षण असलेला त्यावरील डोळा हे सारेच वैभव किती सुंदर! मैत्रिणीच्या पुस्तकातील मोरपीस हातात घेऊन तिने स्वतःच्या गालावर फिरवले तेव्हा तिला त्याच्या मऊशार स्पर्शाने गुदगुल्या झाल्या. मात्र लगेचच मैत्रीणीने तिच्याकडील मोरपीस परत मागितले. ...