बालकथा #मला नको मोरपीस
बालकथा
• मला नको मोराचे पीस
आज शारदा शाळेतून आली तीच मोठ्या खुशीत. दप्तर वगैरे घरात ठेवलं आणि ती आईकडे वळली. “ आई, आज मी शाळेत मोराचे पीस बघितलं. माझ्या मैत्रिणीने आणलं होतं. अग किती सुंदर होतं म्हणून सांगू तुला ते! आई कुठे भेटतात गं मोराची पिसं? मला पण एखादं मिळालं ना, मी खूप जपून ठेवील. गालावरून फिरवलं की इतकं मऊ लागतं की बापरे!” शारदा मोठ्या आनंदाने व कौतुकाने सांगत होती.
वडीलही घरी आल्यावर तिने त्यांनाही हेच सांगीतलं. खरंच होतं तिचं. मोराचे पीस कोणाला बरे आवडत नाही ! सगळ्यांनाच ते आकर्षित करतं. हवाहवसं वाटतं.
लहानग्या शारदाला मोरपीस फार आवडायचे. पांढरी काडी, तिच्या दोन्ही बाजूला रंगछटा बदलणारे धाग्यासारखे फुटवे ,त्यावरील छोटे छोटे रोम आणि त्या मोरपीसाचे खास आकर्षण असलेला त्यावरील डोळा हे सारेच वैभव किती सुंदर! मैत्रिणीच्या पुस्तकातील मोरपीस हातात घेऊन तिने स्वतःच्या गालावर फिरवले तेव्हा तिला त्याच्या मऊशार स्पर्शाने गुदगुल्या झाल्या. मात्र लगेचच मैत्रीणीने तिच्याकडील मोरपीस परत मागितले. शारदाच्या मनात आले,'आपल्यालाही एखादे मोरपीस असायला हवे होते.' त्यामुळेच तर ती घरी आल्या आल्या आई-वडिलांना मोरपिसाविषयी सांगत होती.
“तुझ्यासाठी पण नक्की आपण एखादं मोरपीस कुठून तरी मिळवू.” आई-बाबा म्हणाले.
मध्ये बरेच दिवस गेले आणि शारदा खेरीज इतरांच्या लक्षातहीही गोष्ट राहीली नाही. पुढे मार्च महिना आला. सकाळची शाळा सुरू झाली. दुपारी सुट्ट्या असत. त्यांच्या गावापासून जवळच असलेल्या मढी या गावात रंगपंचमीला मोठी यात्रा भरे. दूरवरून लोक या यात्रेसाठी येतात. खूप दुकानेही येतात. आधीचीही दुकाने असतात. त्यामुळे यात्रेत खूप गर्दी देखील असते. तरीही लोक आनंदासाठी आणि आपल्या वर्षभराच्या कामाचा शीण हलका करण्यासाठी यात्रेला जात असतात. “परवा आपणा सर्वांना मढी येथे यात्रेला जायचे आहे.” बाबांनी संध्याकाळी जेवताना विषय काढला. त्याला सर्वांनी होकार दिला. शारदा तर आनंदूनच गेली. कधी एकदाचा परवा उजडतो असे तिला झाले. यात्रेत मोरपीस मिळाले तर आपण नक्की घेऊ असे तिच्या मनात आले.
एकदाचा परवा उजेडला. रंगपंचमीचा दिवस होता तो. शारदाच्या शाळेला सुट्टीच होती. आई-बाबा पण घरीच होते. यात्रेला जाण्याचा त्यांचा बेत नक्की होता. न्याहरी वगैरे उरकल्यावर ते घरून निघाले आणि एका बसने तासाभरात मढी येथे पोहोचले.
एका टेकडीवर सुंदर दिसणारे श्रीकानिफनाथांचे मंदिर होते. खूप लोक दर्शनासाठी रांगेला लागलेले दिसत होते. जवळ गेल्यावर तरी गर्दी जास्तच वाटू लागली. अवतीभवती असणाऱ्या दुकानांच्या रांगेतून माणसांचा जणू पूरच वाहत होता. सगळेच उत्साही आणि आनंदी दिसत होते. एकूणच वातावरण कुणाच्याही मनाला प्रसन्नता देईल असेच होते. छोटी शारदा आणि तिचे आईबाबा देखील त्याला अपवाद नव्हते.
शारदा तिच्या ,आई-बाबांच्या बरोबर चालता चालता आजूबाजूंच्या दुकानात ठेवलेल्या वस्तूंकडेही पाहत होती. काही दुकानात मोरपीसाचे गुच्छ, गोलाकार शोपीस,मोरपीसाचे झाडू ठेवलेले पाहून शारदा खूपच खुश झाली.
"आई , बाबा , मला ते मोरपीस घ्यायचय!" ती आनंदून म्हणाली.
शारदाच्या बोलण्यामुळे तिच्या आई-बाबांनी देखील दुकानाकडे बघायला सुरुवात केली. त्यांनीही वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करून ठेवलेले दुकानातील मोराच्या पिसांचे गुच्छ पाहिले
"आता फक्त पाहून घे , घरी जायच्या वेळेला आपण मोरपीस घेऊन जाऊ." आई म्हणाली.
मग सर्वांनी मंदिर आणि अवतीभवती फेरफटका मारल्यावर जेवण करण्यासाठी म्हणून मंदिराच्या बाजूला असणाऱ्या आंबेराईतील एका झाडाखाली जाण्याचे ठरवले. जवळपासच्या सर्वच झाडाखाली यात्रेसाठी आलेले इतरही अनेक लोक बसलेले होते. "इथल्या एवढ्या दुकानांमध्ये इतकी मोरपीसं कुठून येतात बाबा?, इथले लोक मोर पाळतात का?" शारदाने तिच्या मनात आलेल्या शंका विचारल्या.
" छान प्रश्न पडलेयत तुला. जेवण झालं की मग तुला तुझ्या प्रश्नांचीचे उत्तरे देतो." वडील म्हणाले.
जेवण झाल्यावर वडील म्हणाले, " पक्ष्यांचा राजा कोण?"
"मोर" शारदा म्हणाली.
" आभाळात ढग दाटून आले की, किती सुंदर पिसारा फुलवून नाचतो हो मोर!" आई उत्स्फूर्तपणे उद्गारली.
" तेच तर सांगतोय मी.." वडील म्हणाले.
"सांगा ना बाबा." शारदा अधीर होत म्हणाली.
वडील सांगू लागले, " पिसारा फुलवून नाचतांना किंवा रानावनात हिंडताना इतर पक्ष्यांसारखा मोराचाही एखाददुसरा पंख गळून पडत असेल. स्वाभाविक आहे ते. पण दुकानातीलइतक्या मोठ्या प्रमाणात मोरपीस पाहून मला तर काळजी वाटू लागली आहे."
"कशाबद्दल बाबा?" शारदाने विचारले.
" अगं , काही लोक डोंगरदऱ्यात मोरांची पीसासाठी शिकार असणार आणि नंतर त्याची पिसे काढून या दुकानदारांना विकत असणार!, मोराच्या शिकारीच्या काही बातम्या मी वृत्तपत्रात वाचलेल्या आहेत."वडील म्हणाले.
" बापरे...!" शारदा भितीयुक्त आश्चर्याने म्हणाली.
नंतर बराच वेळ अबोल होती ती. बाबाने सांगितलेली माहिती ऐकून खट्टू झाली होती ती.पक्ष्यांच्या राजाची होत असलेली शिकार तिला अस्वस्थ करत होती.
" चला आता, काही खरेदी करू आणि परतीच्या प्रवासाला लागू." आई म्हणाली.
झाडाखालून पुन्हा यात्रेत आल्यावर त्यांनी शारदाच्या आवडीची मिठाई घेतली. पुढे जातांना एका दुकानापुढे थांबून वडीलांनी शारदाला विचारले,
"शारदा, या दुकानातील मोरपीसांचा एक गुच्छ निवड बरे तुझ्यासाठी विकत घ्यायला."
" बाबा, मला नको मोरपीस." शारदा म्हणाली.
" का बरे ?" आईने विचारले.
"आपण मोरपीस विकत घेतले तर हे लोक आणखी मोरपीस दुकानात ठेवतील. त्यासाठी शिकारी जंगलातील आणखी मोरांची शिकार करतील. पक्ष्यांचा राजा संकटात येईल." शारदाच्या या उत्तराने तिचे आई-वडील दोघेही सुखावले.
"शाबास बेटा ! " आईवडील उद्गारले.
“कदाचित पुढच्या वर्षी फायबर पासून बनवलेली कृत्रिम मोरपीसही यात्रेत विकायला येऊ शकतात. हवेच तर आपण ती घेऊ.” वडील पुष्टी जोडायला विसरले नाहीत.
~~~~
डॉ.कैलास दौंड
मु.सोनोशी पो.कोरडगाव ता.पाथर्डी
जि.अहमदनगर 414102
kailasdaund@gmail.com
Mo.9850608611
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा