शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर
विद्यार्थ्यांच्या जाणिवा समृद्ध करणाऱ्या: कीर्ती काळमेघ-वनकर.
कीर्ती काळमेघ-वनकर या शिवाजी शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्राच्या अध्यापिका आहेत. नांदगाव खंडेश्वर सारख्या यवतमाळ ते अमरावती दरम्यान असणाऱ्या ग्रामीण भागात काम करत असताना त्यांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबद्दल अनेक अडचणी आणि समस्या आढळून आल्या. हे विद्यार्थी सामाजिक भान, कुटूंबातील सदस्यांना समजावून घेण्याची कुवत, परीसराचे आणि निसर्गाचे आकलन, व्यसनाचे दुष्परिणाम इत्यादी बाबतीत सजग नसल्याचे त्यांना आढळून आले.त्यावर त्यांनी त्यांच्या परीने उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. ‘इच्छा तिथे मार्ग’ या सूत्राने त्यांनी विद्यार्थ्यांच्या जाणिवा विकसित करण्याचा मार्ग शोधला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास, वाचन आणि डोळस समाज निरीक्षण याच्या अभावामुळे अनेक साधारण वाटणाऱ्या गोष्टी देखील माहिती नसतात. अनेकांना तर दहावी पास होऊन देखील नीटनेटके लिहिता वाचता येतही नसते. काही मुले तर कॉलेजमध्ये येऊन खर्रा(तंबाखू) खाऊन थुंकतांना नजरेस पडले. या मुलांना निसर्गाविषयी देखील फारशी जाणीव नाही.हे पाहून कीर्ती काळमेघ-वनकर या शिक्षिका अस्वस्थ झाल्या आणि त्यातून जाणीव नावाचा प्रकल्प आकारास आला.
या प्रकल्पांतर्गत त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम शाळेत घ्यायला सुरुवात केली. एकदा त्यांनी सर्व मुलांना आई-वडिलांविषयी बोलायला सांगितले. आपल्या आई वडिलांविषयी सांगतांना त्यांना जणू आईवडील नव्यानेच कळत असल्याचे दिसले. वृक्षाविषयी प्रेम वाढावे, निसर्गाशी सजगतेने नाते जोडावे या भावनेतून रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी विद्यार्थ्यांकडून झाडांना राखी बांधण्याचा उपक्रम घेतला. जी झाडे उन्हा पावसात आपले रक्षण करतात, त्याच्या प्रती कृतज्ञता म्हणून ‘एक राखी कृतज्ञतेची’ या नावाने हा उपक्रम घेण्यात येतो. ज्या झाडाला किंवा रोपट्याला विद्यार्थ्यांनी राखी बांधली त्या झाडाच्या रक्षणाची जबाबदारी त्यास दिली जाते. यासोबतच दरवर्षी वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थास ‘ एक झाड तुमच्या नावे’ उपक्रमात एक लावले जाते व त्याच्या संवर्धनाची जबाबदारी दिली जाते.
जाणीव अंतर्गत असाही एक उपक्रम घेतला जातो की, तो पुस्तकाबद्दल असतो. दरवर्षी आपली जुनी पुस्तके अनेक विद्यार्थी रद्दीत विकतात. त्याच वेळी काही विद्यार्थी असे असतात की, त्यांच्याकडे पुस्तके विकत घेण्यास पैसे नसतात. हा विरोधाभास दूर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये अंतर्गत स्नेहभाव निर्माण होण्यासाठी आपल्याकडील पुस्तके रद्दीत न विकता ती जतन करून गरजू विद्यार्थ्यांना द्यायची. दरवर्षी या पुस्तकाच्या जाणिवेतून अनेक गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यास सुरुवात झाली. पहिल्या वर्षी या उपक्रमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही; फक्त दोनच विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. मग आणखी जाणीव जागृती केली आणि दुसऱ्या वर्षी तब्बल पंधरा विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला. नंतर विद्यार्थी स्वतःहून आपली पुस्तके जाणीव उपक्रमासाठी कीर्ती काळमेघ वनकर मॅडम यांच्याकडे जमा करू लागले. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी एखाद्या गोष्टीची जाणीव करून दिली तर विद्यार्थी स्वतःहून पुढे येतात हा त्यांचा अनुभव आहे.
२०२१ या वर्षा पासुन १२ जानेवारी रोजी युवा दिनाच्या औचित्याने सामाजिक आणि कौटुंबिक जाण ठेवणारी प्रतिज्ञा विद्यार्थी व सहकाऱ्यांना जाणीव उपक्रमांतर्गत दिली जाते. कळत नकळतपणे त्यातून कुटूंबातील स्नेहभाव दृढ व्हायला मदत होते.
दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून ते राजमाता जिजाऊ जयंती पर्यंत, युवक दिवसापर्यंत तीन ते बारा जानेवारी या कालावधीत आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजातीलच आणि समाजाला ज्यांच्या कामामुळे प्रेरणा मिळते अशा ‘जिजाऊ सावित्रीच्या’ कामाला अधोरेखित करून रोज एक सावित्री रोज एक जिजाऊ असा दशरात्रौत्सव राबविण्यात येतो. यातून समाजाप्रती निष्ठा ठेऊन कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान होतो आणि अनेकांना त्यातून प्रेरणा मिळण्याची शक्यता निर्माण होते.
नागपूरमध्ये फुटपाथवरील मुलांसाठी फुटपाथ शाळा चालायची . तिथे राहायचं कसं, खायचं कसं, रोज अंघोळ करायची, रोज दात स्वच्छ करायचे हे सगळं त्या मुलांना काही सामाजिक जाणीव असणारे नागरिक शिकवायचे त्यात कीर्ती वनकर सहभागी झाल्या. त्यांना त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस याच विद्यार्थ्यासोबत फुटपाथवर साजरा केला.
या वर्षी त्यांची बदली शिवाजी विज्ञान महाविद्यालय,नागपूर या ठिकाणी झाली. इथले विद्यार्थी बऱ्यापैकी सधन कुटुंबातून आलेले आहेत. त्यामुळे पुस्तकाच्या देवाणघेवाणीचा उपक्रम आपल्या महाविद्यालयापुरता न ठेवता तो इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्याचा त्या विचार करत आहेत. संवेदनशील मनाच्या असणाऱ्या काळमेघ वनकर स्वतः विज्ञानाच्या शिक्षिका असून ललित लेखन देखील करतात. त्यांचा कथासंग्रह आणि कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
समाजभान देणाऱ्या विषयावर व्याख्याने त्या देत असतात. त्या उत्तम सूत्रसंचालिका आहेत.आपल्या सेवेच्या विहीत कामासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला सहाय्यभूत ठरणारे अधिकचे काम स्वयंप्रेरणेने करणाऱ्या काळमेघ वनकर मॅडम अनेक पुरस्कांनी सन्मानित झालेल्या आहेत. नेहरू युवा सन्मान, महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवारत्न पुरस्कार आदींचा त्यात समावेश आहे.
~~~
( लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)
कीर्ती काळमेघ वनकर 9503213607
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा