उपक्रमांचे रोल मॉडेल : जरेवाडी शाळा



   उपक्रमांचे रोल मॉडेल : जरेवाडी शाळा 

   
      बीड जिल्हा परीषदेची पाटोदा तालुक्यातील जरेवाडी शाळा यशस्वी उपक्रमांचे रोल मॉडेल बनली आहे. शिक्षकांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे, समर्पण भावनेने कार्य करण्याने आणि समाजसहभागाने या शाळेने राज्याचे लक्ष‌ वेधून घेण्याचे काम केले . बीड जिल्ह्यात तर जिल्हा परिषद शाळांमध्ये मिशन जरेवाडी नावाने अभियानच सुरू झालेले आहे. या शाळेचे मुख्याध्यापक संदीप पवार यांना शाळेच्या प्रगतीचे रहस्य विचारले असता - ‘मी नव्हे तर आम्ही ‘ हे त्यांनी आवर्जून सांगत सर्व शिक्षक नियोजनपूर्वक समूहभावनेने काम करत असल्यामुळेच जरेवाडी शाळेने आपले यशस्वीवीतेचे शिखर कायम राखले असल्याचे सांगितले.
      १९९५ या वर्षामध्ये अवघी २४ पटसंख्या आणि एक शिक्षक , चौथीपर्यंतच्या वर्गाला एकच खोली असणाऱ्या शाळेचे रूपांतर आज तब्बल ८०३ विद्यार्थी संख्या, पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग आणि २० शिक्षक, २० वर्गखोल्या असलेल्या शाळेत झाले आहे. जरेवाडी गावाची लोकसंख्या पाहीली तर ती अवघी चारशेच्या आसपास आहे. गावाच्या लोकसंख्येच्या दुप्पट विद्यार्थीसंख्या गावातल्या शाळेत असणे ही गोष्ट निश्चितच जिल्हा परिषद शाळांसाठी गौरवास्पद आहे. काय आहे नेमके या शाळेमध्ये!
       जरेवाडी शाळेत प्रत्येक वर्गाच्या दोन दोन तुकड्या असून जून २०१० पासून सेमी इंग्रजी माध्यम स्वीकारून सन २०१५ पासून सर्वच वर्ग हे सेमी इंग्रजी माध्यमाचे करण्यात आलेले आहेत. गुणवत्ता आणि दर्जा राखत उपक्रमशीलता जोपासल्यामूळे या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी आसपासच्या सुमारे ५२ ते ५५ गावातून विद्यार्थी येतात. जागेचा प्रश्न समाजसहभागातून शाळेने सोडवला. त्यामुळे खेळाचे मैदान, डिजिटल हॉल आणि प्रयोगशाळा उभी राहिली.
  समाज सहभागातून शाळेने उभारलेल्या निधीतून शाळा विकासाची कामे पूर्ण झाली. वर्गखोल्या, वृक्षारोपण, पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर, मैदानात ब्लॉक्स,डिजिटल शैक्षणिक साहित्य, प्रत्येक वर्गात अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही, एलसीडी प्रोजेक्टर आणि १० कॉम्प्युटरने सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, प्रयोगशाळा, सौरऊर्जा पॅनल, खगोलशास्त्र क्लब, कलादालन, वर्गामध्ये साऊंड सिस्टिम आणि सीसीटीव्ही कॅमेरा,आकर्षक रंगरंगोटी, बोलक्या भिंती अशी कामे केलीत. शाळेतील माजी विद्यार्थ्यीही शाळेला वस्तूरूपाने मदत करत असतात.
        आजपर्यंत पाचशेहून अधिक विद्यार्थी स्कॉलरशिपधारक तर २२ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नवोदय प्रवेशासाठी निवड झालेली आहे. NMMS व स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जरेवाडी शाळा अग्रेसर असते. शासकीय चित्रकला परीक्षा, क्रीडा स्पर्धा, राज्य विज्ञान प्रदर्शन, विभागीय नाट्यस्पर्धा, निबंध स्पर्धा, स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात जरेवाडी शाळेचा कायम सहभाग असतो.महत्त्वाचे म्हणजे गावातील व्यसनमुक्ती करण्यासाठी शाळेला यश मिळालेले आहे.
     गत पंधरा वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरामध्ये ‘ज्ञानवर्धिनी’ हे हस्तलिखित प्रकाशित केले जाते. जरेवाडीतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांचे काव्यसंग्रह, गुणवत्ता विकास सराव परीक्षा, सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा, प्रज्ञाशोध परीक्षा, राष्ट्रीय सणानिमित्ताने कोण होईल ज्ञानवंत? ,गणित समृद्धी उपक्रम,गोष्ट विज्ञानाची, नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र अशा उपक्रमामुळे जरेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली जाते. हस्तकला विकासासाठी कलादालन,म्युझिक स्टुडिओ, विज्ञान ग्रंथालय, योगाभ्यास, कन्या सुरक्षा, ग्रेट भेट, जरेवाडी कट्टा माध्यातून अनेक मान्यवरांच्या मुलाखतीही विद्यार्थी घेतात, कथाकथन, चित्र रेखाटन, रंगभरण, वार्षिक हस्तकला प्रदर्शन, अशा शाळास्तरावरील उपक्रमासोबतच शासनाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग नेहमीच उल्लेखनीय असतो.
     प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शाळासिद्धी, स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धा, स्वच्छ गाव सुंदर गाव, हागणदारीमुक्त गाव, शिक्षणाची वारी सारख्या शासकीय उपक्रमांमध्ये शाळा अग्रेसर असते. 
      जरेवाडी गावातील जवळपास ऐंशी टक्के पालकांचे ऊसतोडणीसाठी दरवर्षी स्थलांतर होते. परंतु शाळेच्या नियोजनामुळे गेल्या बावीस वर्षात एकाही विद्यार्थ्यांचे कारखान्यावर स्थलांतर झाले नाही. अथवा एकाही विद्यार्थ्याने मध्येच शाळा सोडलेली नाही. या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या माध्यमातून सोय उपलब्ध करून स्थलांतराच्या समस्येवर मात केली आहे.
      जरेवाडी शाळेचा संगीतमय परिपाठ वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध गुणवैशिष्ट्यांमुळे राज्यभरातील तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक लोकांनी शाळेला शनिवारी भेट दिली आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ व शिक्षक पालक संघ सतत प्रयत्नशील असतो.
   नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षक आणि विद्यार्थी करतात.शाळेत तुकडी निहाय व्हाट्सअप ग्रुप स्थापन केलेले असून त्या माध्यमातून दैनंदिन अभ्यास विद्यार्थी करतात, आवश्यकतेनुसार ऑनलाईन तासिकाही घेतल्या जातात. वर्च्युअल ट्रिप्स देखील काढल्या जातात.
स्व.विठ्ठल सुतार, यमुनाताई बडे, लक्ष्मण सोनवणे, गोविंद कदम या आधीच्या मुख्याध्यापकांनी देखील तळमळीने काम केलेले आहे. सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांच्या एकत्रित सहकार्यातून जरेवाडी शाळेस साने गुरुजी स्वच्छ सुंदर प्राथमिक शाळा स्पर्धा प्रथम पुरस्कार(२००६ - ०७),
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा (२०२३-२४) अंतर्गत जिल्ह्यात प्रथम आणि विभागात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक.भारत सरकारचा उपक्रम स्वच्छ विद्यालय पुरस्कार( २०२१-२२ )इत्यादी सन्मान प्राप्त झाले आहेत.मुख्याध्यापक संदीप पवार हे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत.
~~~
( लेखक प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षक आहेत.)

संदीप पवार -9421348431



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर