शिक्षणयात्री : स्पर्धा परीक्षांच्या जादुगार : जयश्री पलांडे

स्पर्धा परीक्षांच्या जादुगार : जयश्री पलांडे

 पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीची जिल्हा परिषद शाळा ही महाराष्ट्रातील एक नावाजलेली शाळा आहे. सहाजिकच येथील सर्व‌ शिक्षकही समर्पित भावनेने आणि विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करतात. याच शाळेत सौ. जयश्री सुनिल पलांडे या सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. प्रारंभी भांबोरा ता.कर्जत जि. अहिल्यानगर येथे काही काळ सेवा केल्यावर पुणे जिल्ह्यातील धामारी ता. शिरूर येथे आणि २०१८ पासून त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. सुरूवातीपासूनच उपक्रमशील आणि अध्यापन कुशल असणाऱ्या जयश्री मॅडमनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा येथेही ठसा उमटवला. त्यांच्याकडे आतापर्यंत धामारी आणि वाबळेवाडी येथे इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीचा वर्ग चार वेळा आला. एकूण ९३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत. २०२०-२१ मध्ये कोरोना काळात त्यांनी घेतलेली इयत्ता पाचवीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी लक्षवेधी ठरली. वर्गातील ५० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ४२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यापैकी ६ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत होते.
      वाबळेवाडीच्या शाळेत त्यांच्याकडे दोन वेळा आठवीचा वर्ग आला. त्याला त्यांनी संधीत बदलवले. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल उंचावण्यासाठी त्यांनी अध्यापनातून संकल्पना स्पष्ट करणे, नियमितपणे सराव घेणे, त्रुटींचे पुनर्भरण करणे, प्रश्नपत्रिका सोडून घेणे अशा पद्धतीने सातत्य ठेवल्यामुळे इयत्ता आठवीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल २०२२ मध्ये नव्वद टक्के लागून २८विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले तर चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले. प्रयत्नातील सातत्यामुळे २०२३ वर्गातील ४१ विद्यार्थ्यांपैकी ३५विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले, हा एक विक्रमच होता. त्यापैकी ५ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत देखील आले होते . ग्रामीण विभागातून राज्यात तिसरा आलेला रूत्विज सावंत हा पलांडे मॅडमचाच विद्यार्थी.
   NMMS परीक्षा ही इयत्ता आठवी साठी असलेली महत्त्वाची परीक्षा. ही उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना चांगली स्कॉलरशिप मिळते. तिचा उपयोग शिक्षण घेतांना सुविधा मिळवण्यासाठी होतो. शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच मॅडमनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून NMMS परीक्षेची वर्गाची तयारी करून घेतली. या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून ६१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. सारथी शिष्यवृत्तीसाठीही १४ विद्यार्थी पात्र झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शासनाकडून ४१,९७,६०९ रुपये इतकी रक्कम मिळेल. यात आणखी एक विशेष म्हणजे इयत्ता तिसरी मधून शाळा सोडलेला ओंकार देवकुळे नावाचा विद्यार्थी वयोगटानुसार इयत्ता सहावी मध्ये दाखल झाला. त्या विद्यार्थ्याला सुद्धा इयत्ता आठवी मध्ये ही शिष्यवृत्ती मिळाली. सातत्यपूर्ण प्रयत्न, नियमितपणे सराव, संकल्पनांचे सुस्पष्टीकरण, अविरत नाविन्यपूर्ण अध्यापन यामुळे हे यश मिळवणे शक्य होत असल्याचे त्या सांगतात.
 विद्यार्थ्यांना प्रेरणा देत स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी बक्षीस ठेवले. इयत्ता इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरुवातीला आव्हान दिले की, जर ८४ टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा तुमचाच विक्रम तुम्ही आणखी उंचावला तर तुम्हाला खास बक्षीस देण्यात येईल. याचा परिणाम म्हणून जो तो गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यासाठी मन लावून अभ्यास करू लागला. खरोखर तो विक्रम विद्यार्थ्यांनी मोडला आणि, ८५ टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. बोलल्याप्रमाणे वर्गशिक्षका म्हणून जयश्री पलांडे मॅडमनी प्रत्येक विद्यार्थ्याला साडेपाचशे रुपये किमतीची स्कूल बॅग बक्षीस म्हणून दिली. NMMS आणि शिष्यवृत्ती मध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही भेट त्यांनी दिली. त्यासाठी २०९०० रु स्वतः खर्च केले.
          अशा स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी दररोज शालेय वेळेपेक्षा अधिकचे किमान तीन तास , शनिवार - रविवार आणि दिवाळीची सुट्टी नाही. केवळ महत्त्वाचे चार-पाच दिवस सुट्टी घ्यायची. हे सगळे आनंदाने , आत्मिक तळमळीने आणि स्वयंस्फूर्तीने करावयाचे हा जयश्री मॅडमचा परीपाठ. त्याला मिळणारी विद्यार्थ्यांची साथ आणि मग मिळणारे यश नक्कीच आनंद आणि कार्याचे समाधान देणारे! हे आपले वैशिष्ट्यपूर्ण काम करत असतांनाच शाळेत राबवल्या जाणाऱ्या सर्व सामुहिक उपक्रमातही त्या सहभागी होतात. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी आतापर्यंत त्यांच्या सात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीला चालना देण्यासाठी केलेला 'उद्योजकतेची मानसिकता' या उपक्रमांतर्गत प्रकल्प निर्मिती स्पर्धेमध्ये 'शेतकऱ्यांचा मित्र' हा त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट गेल्या वर्षी मध्ये राज्यात प्रथम आला .महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्राविण्य आणि गणित प्रज्ञा या दोन्ही परीक्षेत देखील त्यांच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली. MTS परीक्षा २०२४ मध्ये देखील आठवीचे आठ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले. २०२४ मध्ये पुणे जि.प.च्या वतीने 'जिल्हा शिक्षक' पुरस्कार’ देऊन त्यांच्या कार्याला गौरविण्यात आले आहे. तर शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कारही त्यांना सहा वेळा मिळालेला आहे.गणित, इंग्रजी, विज्ञान ऑलिम्पियाड मध्ये यावर्षी त्यांच्या वर्गातील नऊ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवलेले आहेत.
~
( लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)
 जयश्री पलांडे ( 9767022086)






   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर