शिक्षणयात्री नरेंद्र गौतम
नरेंद्र गौतम यांचा समाजसहभागाचा ‘खर्रा’ पॅटर्न!
नरेंद्र गौतम हे उच्च विद्या विभूषित शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्रा केंद्र भानपूर( ता.जि.गोंदीया) या शाळेत पदवीधर प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या शाळेची स्थापना १९५५ मध्ये झालेली असून शाळेची एकूण पटसंख्या १५३ व शिक्षक संख्या सहा आहे. शिक्षकांची इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक समस्यावर मात करता येऊ शकते आणि शाळेचा विकास साधता येतो. मात्र स्वतःच्या कामासोबतच पालकांना विश्वासात घेणे गरजेचे असते. या विचारांनी नरेंद्र गौतम यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यांनी पाहिले की या शाळेतील विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती साधारण होती मात्र हे विद्यार्थी खेळात निपूण होते.
सन २०१८-१९ मध्ये इयत्ता पाचवीचे अकरा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले. नियमित अध्यापन,सराव आणि अनुधावन यामुळे त्यातून दहा विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. त्यातील दोन विद्यार्थ्यांची शासकीय विद्यानिकेतन केळापूरसाठी निवडही झाली. प्रयत्नातील सातत्यामुळे प्रगतीचा हा आलेख पुढेही कायम राहिला. २०१९-२० मध्ये पाचवीचे बारा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले त्यातून दहा उत्तीर्ण होऊन चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. २०२०-२१ मध्ये आणखी वेळ देऊन सराव घेतल्याने पाचवीचे चौदा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले, त्यातून बारा उत्तीर्ण आणि सहा शिष्यवृत्ती धारक ठरले. २०२२-२३ मध्ये पाचवीचे एकोणावीस विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले व सर्व पास झाले. त्यातून सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. २०२३-२४ मध्ये पाचवीचे अकरा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले आणि उत्तीर्ण झाले. आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. एकूण विचार केला असता आजपर्यंत नरेंद्र नथुलाल गौतम यांचे चाळीस विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. डायटने दिलेल्या भेटीदरम्यान अध्ययन स्तर तपासणीमध्ये पंच्यान्नव टक्के विद्यार्थ्यांना वाचन , गणित क्रिया येतात असे दिसून आले.
शैक्षणिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर, शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा तयारी, स्थलांतर थांबवणे, चित्र, नाट्य, संगीत, क्रीडा यात विद्यार्थ्यांची उत्कृष्ठ तयारी, नाविण्यपूर्ण परीपाठ यामुळे विद्यार्थी शाळेत रमून जातात.
सांस्कृतिक उपक्रमातही गौतम सर अग्रेसर आहेत. लेझीम, कबड्डी या खेळासोबत स्नेहसंमेलन, माजी विद्यार्थी मेळावा, शैक्षणिक सहल असे उपक्रम ते त्यांच्या शाळेत सहकारी शिक्षकांच्या मदतीने राबवतात. यावर्षी शाळेची शैक्षणिक सहल रमण विज्ञान केंद्र नागपूर येथे काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासाचा नाविन्यपूर्ण अनुभवही देण्यात आला.
लोकसहभागाशिवाय शाळेचा संपूर्ण कायापालट होऊ शकत नाही.मात्र शाळेला लोकसहभाग मिळत नव्हता. मग शिक्षकांनीच स्वतःच्या वतीने दोन संगणक शाळेला दान दिले. हे पाहून लोकांनी सुद्धा या कामात हातभार लावला. सत्तावन्न हजाराची देणगी दिली. त्यातून झेरॉक्स मशीन व प्रिंटर घेण्यात आले. गोंदिया येथील दानशूर व्यक्ती हिम्मतभाई राठोड यांनी शाळेला पंचवीस हजार रुपये किंमतीचे जलशुद्धीकरण यंत्र दान केले.
२०२१-२२ मध्ये गुजराथी समाज चॅरीटेबल ट्रस्ट कडून बाहेरच्या वाड्यावस्त्यावरून येत असलेल्या सव्वीस विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आले. त्यामुळे आदीवासी मुलींना शाळेत येणे सोपे झाले. कोविडकाळात तौफिकभाई मेनन यांनी सर्व विद्यार्थ्यांना बालवाचन अंकलिपी वाटप केली. नरेंद्र गौतम आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी दानशूर लोकांचे पाठबळ मिळवले.
२०२२-२३ श्री. अंजली कौशिक यांनी विद्यार्थ्यांना साठ रेनकोट दिले. एकोडीचे युनुसभाई शेख यांनी शाळेला कपाट दिले.अदानी फाऊंडेशन तिरोरा कडून नवोदय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सोळा मार्गदर्शक पुस्तिकांचे वाटप केले. २०२२-२३ मध्ये शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक लक्ष तेवीस हजार लोकवर्गणी जमा झाली. शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायतीने देखील पेव्हर ब्लॉक, प्रोजेक्टर, लॅपटॉप व शौचालय बांधकाम करुन दिले.
बौद्धिक विकासासोबतच सर्जनात्मकशीलतेला साह्यभूत होणाऱ्या उपक्रमातही विद्यार्थी सहभाग मिळवत सुंदर परसबागेची निर्मिती आणि वृक्षारोपण यामुळे शाळेच्या रूपात चैतन्य वाढीस लागले.
पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक असलेल्या नरेंद्र गौतम सरांच्या या कामामुळे शाळेतील पटसंख्येतही लक्षणीय सुधारणा झाली. २०१९-२० मध्ये पटसंख्या ८१ वरून ९३ वर पोहचली. पुढीलवर्षी ती १०३ वर गेली आणि त्यापुढील वर्षी ११२ झाली. २०२२-२३ मध्ये विद्यार्थी पटसंख्या १३० वर पोहचली तर गेल्या वर्षी १४०. यावर्षी शाळेची विद्यार्थी पटसंख्या १५३ झाली आहे. पटसंख्येच्या या चढत्या आलेखाला उत्तम अध्यापन, परीक्षेतील यश आणि समाज सहभाग कारणीभूत ठरला आहे. त्याला शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाची जोड दिली आहे.
मागील दोन वर्षापासून शाळेत दहा दिवसाच्या उन्हाळी शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते. त्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलावून अनेक विषयांवर मार्गदर्शनाचा लाभ मिळवून दिला आहे. इतर उपक्रमात नियमित हॅण्डवॉशचा वापर करणे, मोठ्यांना आदरयुक्त बोलणे अशा उपक्रमांचाही समावेश आहे.
अंतरंग आणि बहिरंग सुंदर असल्यामुळें २३-२४ व २०२४-२५ या दोन्ही वर्षी मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा उपक्रमात गोंदिया तालुक्यातून खर्रा शाळेने प्रथम क्रमांक मिळवला.सारथी प्रकल्पांतर्गत शाहू महाराज या विषयावरील निबंध स्पर्धेत सुद्धा विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.
~~
( लेखक नामांकित साहित्यिक आणि शिक्षक आहेत)
नरेंद्र नत्थुलाल गौतम-9923511339
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा