अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू
अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू
चेंबूर इथे १९५७ पासून दिमाखदारपणे मराठी माध्यमाची शाळा म्हणून चेंबूर उपनगरातील चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा अनेक पिढ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करत आहे. श्रीमती. स्पृहा सुरेश इंदू ह्या बारावी, डी.एड अशी अर्हता धारण करून १९९८ मध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून शाळेच्या सेवेत रुजू झाल्या. आज पर्यंतच्या २६ वर्षात त्यांनी शिक्षिका म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
सन २००५ पर्यंत या शाळेत विद्यार्थी संख्या भरभरून असे. नंतर मराठी माध्यमाच्या शाळांना मुंबईसारख्या महानगरात घरघर लागली. पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वाढू लागल्याने विद्यार्थी संख्या हळूहळू कमी होऊ लागली. स्पृहा यांनी विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मदतीने वस्त्यावस्त्या मधील शाळाबाह्य बालके शोधून त्यांना शाळेत प्रवेशित केले. मराठी माध्यमाचे म्हणजेच मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व त्यांनी वस्तीतील घरोघरी जाऊन पालकांना समजावले. याची दखल ‘मिड डे’ ह्या इंग्रजी दैनिकाने घेतली होती.
आतापर्यंतच्या त्यांच्या अध्यापनाच्या प्रवासात त्यांनी वर्गातील २७ दिव्यांग विद्यार्थ्यांना यशस्वी अध्यापन केलेले आहे. सर्वसमावेशीत वर्ग घेत असताना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आत्मनिर्भरता, सक्षमीकरण, त्यांच्या आत्मसन्मानावर काम केले. या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘माझ्या वर्गातील राजहंस’ ह्या पुस्तकात दिव्यांग विद्यार्थ्यांची यशोगाथा स्पृहा सुरेश इंदू यांनी रेखाटली आहे.
शिक्षिकेने अनेक नवोपक्रम राबविले आहेत. सृजनू आनंदे, माझा उद्यमी वर्ग, माझा वर्ग सुदृढ वर्ग, वाचू आनंदे, Let’s explore English, कुटुंब रंगलय वाचनात असे अनेक नवोपक्रम दरवर्षी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबवले. राष्ट्रीयस्तर व जिल्हास्तरावर या नवोपक्रमांना पारितोषिके मिळाली आहेत. वर्गात विविध कृती, उपक्रम घेताना त्यामध्ये जाणीवपूर्वक मुलगे, मुली समानता, मूल्यशिक्षण आणि सुसंस्कार रुजतील या दृष्टीने सजगतेने प्रयत्न करतात. शासनाने निर्धारित केलेला पाठ्यक्रम पूर्ण करण्यासोबतच विद्यार्थ्यांची सामाजिक, सुदृढ भावनिक, मानसिक जडणघडण व्हावी यासाठी शिक्षणाच्या आधुनिक व अभिनव अध्यापन पद्धती, विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान, नवनव्या साधनांचा शिक्षणामध्ये आत्मविश्वासाने त्या वापर करतात. स्पृहा इंदू या पुढाकार घेऊन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे अपना सहकारी बँक इथे कुमार बचत खाते उघडण्यासाठी सर्व प्रक्रिया पार करून देतात. बँकेतील व्यवहार विद्यार्थ्यांना व पालकांना त्या शिकवतात. त्यामुळे आज कितीतरी विद्यार्थ्यांचे स्वत: बचत खाते आहेत.
२०२० आणि २०२१ मधील कोवीड काळात बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणविभागाच्या ‘शाळा बंद पण शिक्षण सुरु’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमात स्पृहा इंदू यांनी इंग्रजी, गणित, परिसर, कार्यानुभव, चित्रकला, खेळू करू शिकू असे अनेक विषयांचे ऑनलाईन अध्यापन केले. राज्यस्तरीय ऑनलाईन इयत्ता तिसरी आणि चौथीसाठी सर्वाधिक तासिका घेणाऱ्या शिक्षिका त्या ठरल्या. त्यांनी कोव्हीड कालावधीत इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यी, शिक्षक व पालकांसाठी समुपदेशन केंद्र चालवले. Spurha Indu ह्या नावाने युट्युबवर १९००हून अधिक शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करून या माध्यमातून येणारे आर्थिक उत्पन्न त्या समर्पण भावनेने शाळेला अर्पण करत आहेत.
कोव्हीड कालावधीत पाठ्यपुस्तकांची छपाई झालेली नव्हती अशावेळी इयत्ता पहिली ते चौथी सर्व विषयांचे फ्लिपबुक तयार करून त्यांनी एक पर्याय निर्माण केला.कोवीड काळात वर्गातील सहा विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हते. स्पृहा बाईनी स्वयंसेवी संस्थेकडून सहा विद्यार्थ्यांना मोबाईल आणि १९ विद्यार्थ्यांना मोबाईल नेट सोय करून दिली.
त्यांनी वर्तमानपत्रातून आणि भारतीय शिक्षण, जीवन शिक्षण मधून शैक्षणिक लेख लिहिले. टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य तयार करण्यात त्या पारंगत आहेत. त्या आजवर भरपूर शैक्षणिक साहित्याची निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्यांचे प्राथमिक विभागातील विद्यार्थी सुद्धा विविध शैक्षणिक साहित्य स्वत: तयार करतात.
काही प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये त्या दीर्घ सुट्टीच्या कालावधीत विनामूल्य वस्तीसुधार प्रकल्प अंतर्गत संस्कार वर्ग,कार्यानुभव, चित्रकलेच्या कार्यशाळा सातत्याने घेत आहेत. त्यांची दिव्यांग विद्यार्थिनी कु. काका कांबळेचा ‘जिद्धीच्या जोरावर’ हा व्हिडिओ G- 20 मध्ये समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्य यांनी प्रदर्शित केला.
दरवर्षी स्पृहा इंदू ह्या शाळेतील महिला पालकांचे संघटन करून तीन ते चार गट मंगळागौर स्पर्धा, शासनाच्या महाकुंभ फुगडी स्पर्धेसाठी तयार करून महिला पालकांच्या कलागुणांना वाव देण्यात पुढाकार घेतात.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० अन्वये पायाभूत स्तर राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती सदस्य, इयत्ता तिसरी ते पाचवी परिसर अभ्यास विषय अभ्यासक्रम निर्मिती तज्ञ सदस्य, अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण विकसन समितीत तज्ञ मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे यांचे त्यांना कायम प्रोत्साहन असते. स्पृहा इंदू यांना शैक्षणिक कार्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ आणि महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार २०२३ तसेच विविध संस्थाकडून शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
~~~
(लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत)
लेखक : 9850608611
स्पृहा सुरेश इंदू - 99696 66519
खुप खुप अभिनंदन मॅडम,आपल्या कार्याला सलाम
उत्तर द्याहटवा