कार्यमग्न शिक्षक : लक्ष्मीकांत ईडलवार
कार्यमग्न शिक्षक : लक्ष्मीकांत ईडलवार
लक्ष्मीकांत एकनाथराव ईडलवार हे उपक्रमशील शिक्षक नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकडी ता.राहाता जि. अहिल्यानगर या शाळेत नुकतेच बदलून आलेले आहेत. या आधीच्या गोर्डैवस्ती , चांगदेव नगर आणि राहुरी तालुक्यातील रामपूर ,जामखेड मधील नायगाव येथील शाळेत त्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामूळे त्यांचा लौकिक आहे. विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवून त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवला आहे.
विद्यार्थ्यांना वाचनाची संधी उपलब्ध करण्यासाठी इडलवार सरांनी फिरते बालवाचनालय सुरू केले. फिरते म्हणजे शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना आवडेल तिथे हे वाचनालय नेता येत असे. मधल्या सुट्टीत शाळेच्या मैदानावर मोठ्या छत्रीखाली चार ते सहा खुर्च्या ठेवून तेथे सावलीत बसून विद्यार्थी अवांतर पुस्तकांचे व शालेय अभ्यासाचे वाचन करतात. या आगळ्यावेगळ्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली, भूतदयेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संस्कार घडावा यासाठी त्यांनी ‘पक्ष्यांची खानावळ’ सुरू केली. पक्ष्यांसाठी ही मोफत होती. विद्यार्थ्यांनी पक्ष्यांना पिण्यासाठी शाळेच्या आवारात पाण्याची सोय केली, विद्यार्थी पक्ष्यांसाठी धान्यही आणत. सेल्फी विथ सक्सेस, एक कुटुंब एक कुंडी, PEE ACTIVITY, मी ज्ञानी होणार, कवींची भेट- नायगावहून थेट, सेल्फी पॉइंट, फॅन्सि ड्रेस स्पर्धा, प्राचीन युद्धकला, लेझीम यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी शाळेत राबविले आहेत. या उपक्रमाचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचा परिचय होण्यास मदत झाली. क्रीडा प्रकारांबद्दल आकर्षण निर्माण झाले. आपल्याला काहीतरी येत आहे याचा आत्मविश्वास निर्माण झाला. या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासावर सुद्धा दिसून आला. विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये येणाऱ्या अडचणींना उपक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न लक्ष्मीकांत ईडलवार सर करतात. विद्यार्थ्यांचे मूलभूत संबोध स्पष्ट होण्यासाठी व अधिकच्या सरावासाठी विविध शैक्षणिक पीडीएफ आणि शैक्षणिक विडियोंची निर्मिती देखील त्यांनी केली आहे.
आपल्या उपक्रमशीलतेचा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील इतरही विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आहेत. कोरोना कालावधीत SCERT पुणे यांच्या ‘शिकू आनंदे’ या उपक्रमात राज्यस्तरीय तज्ञ म्हणून काही घटकाचे सादरीकरण त्यांनी केले. ‘जीवन शिक्षण’ मासिकातून त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांच्या शाळेतील विद्यार्थी संख्या चौऱ्याहत्तर असून ते
इयत्ता पहिली व तिसरी वर्गाला सर्व विषय शिकवत आहेत. वर्गातील उपस्थितीची टक्केवारी नेहमीच 95% च्या पुढे असते.
पालकांचे सहकार्य : 2019मध्ये बदलीने लक्ष्मीकांत सरांना जामखेड तालुक्यातील नायगाव शाळा मिळाली. इथे बोलक्या भिंती करण्यासाठी लोकांनी जवळपास पस्तीस हजार रुपये जमा करून दिले. त्यातून शाळेचे बाह्यांग एकदम सुंदर झाले. त्याचबरोबर वाचनालयासाठी लागणाऱ्या खुर्च्या,चप्पल स्टॅन्ड ,पडदे ,कुंड्या, रोपे ,मुरूम अशा बऱ्याच गोष्टींसाठी पालक व ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.
2019 ते 24 या दरम्यान त्यांना महेंद्र लव्हाळे, रामदास राजगिरवाड, विक्रम डोळे सारखे गुणी सहकारी लाभले. दरवर्षी त्यांच्या शाळेतील पाच ते सहा विद्यार्थी अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धेत राज्यस्तरावर सहभागी होत असतात. जिल्हास्तर विविध गुणदर्शन स्पर्धेतही त्यांच्या शाळेतील विद्यार्थी तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. नायगाव शाळेमध्ये राष्ट्रीय सणाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीताच्या लेझीमनृत्य सादरीकरणाला ग्रामस्थाकडून जवळपास दहा हजारांपर्यंत बक्षीस मिळे. त्यातून शाळेच्या भौतिक सुविधा निर्माण केल्या.
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी गावातील मर्दानी आखाडा चालवणाऱ्या पालकांच्या मदतीने लाठीकाठी,दांडपट्टा फिरवणे,तलवार व भाला चालवणे यांसारख्या प्राचीन,शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात इडलवार सरांनी पुढाकार घेतला.
ग्रामपंचायतीची सहकार्याने हँडवॉश स्टेशन, रनिंग वॉटर, पाण्याची टाकी, साऊंड सिस्टीम, वॉटर फिल्टर शाळेला मिळाले.
एकूण सतरा वर्षाच्या सेवेमध्ये त्यांच्या नाविण्यपूर्ण कामामुळे त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. शासनाच्या दीक्षा पोर्टलवर , एक भारत श्रेष्ठ भारत, समग्र शिक्षा यांसारख्या वेब पोर्टलवर त्यांचे शैक्षणिक विडियो प्रसिद्ध झालेले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून त्यांच्या शैक्षणिक लेखांना प्रसिद्धी मिळालेली आहे.
राज्य स्तरावरील ‘ करूया मैत्री गणिताशी, इयत्ता चौथी कार्यपुस्तिकेच्या निर्मिती गटात आणि SCERT पुणे मार्फत सुरू असलेल्या आभासी वर्ग मध्ये राज्यतज्ञ म्हणून त्यांचा सहभाग आहे. शिक्षकांसाठीच्या नवोपक्रम स्पर्धेतही जिल्ह्यातून राज्यस्तरासाठी त्यांची निवड झाली. शिक्षणाची वारी या विभागीय उपक्रमात शिक्षक राहुल लिमकर सरांसोबत स्टॉल मांडणी व सादरीकरण करत इडलवार यांनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. मिपा औरंगाबाद संस्थेने NEP 2020 वेबीनार सत्राचे विडियो एडिटिंग करण्यासाठी त्यांची राज्य तंत्रस्नेही शिक्षक म्हणून निवड केली होती.
प्राथमिक शाळेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून लोकसहभागातून शाळा डिजिटल करत अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ते करतात.शिक्षकांसाठीच्या विविध प्रशिक्षणात सहभाग व तज्ञ मार्गदर्शक म्हणून विविधस्थरावर त्यांनी काम केलेले आहे. शालेय शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्यच्या वतीने प्राथमिक विभागात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लक्ष्मीकांत ईडलवार यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक पुरस्काराने 2022-23 मध्ये गौरवण्यात आले.
~~~
(लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)
( लक्ष्मीकांत इडलवार -9975035046)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा