भावनांचा जाणकार शिक्षक : संतोष जायभाये.

भावनांचा जाणकार शिक्षक : संतोष जायभाये.



पुणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १०० मध्ये शिक्षक म्हणून सेवेत असलेले संतोष बाळासाहेब जायभाये हे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत.त्यांनी शिक्षणशास्रात घेतलेल्या उच्च शिक्षणाचे उपयोजन वर्गात अध्यापनात केले. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांची अपेक्षित प्रगती मिळू शकली. पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या अभ्यासक्रमापेक्षा थोडे अधिक आपल्या विद्यार्थ्यांना देता येईल का? याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि त्यामध्ये ते यशस्वी ही होतात. त्यासाठी त्यांना उपयोगी पडते ते विद्यार्थ्यांच्या भावनांचे व्यवस्थापन.

       संतोष जायभाये यांनी त्यांच्या सेवेची सुरुवात सप्टेंबर २००० पासून पुणे मनपा शाळा मुलांची शाळा क्र.२१ मधून केली. त्यानंतर त्यांनी बदली झाल्याने मुलांची शाळा क्रमांक ७५ व  मुलांची शाळा क्रमांक ९५ मध्ये अध्यापन कार्य केले. आता ते मनपा शाळा क्रमांक १०० (मुलांची) गाडीतळ, हडपसर पुणे येथे सेवारत आहेत. ते पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गांना शिकवत असतात यावर्षी त्यांच्याकडे इयत्ता दुसरीचा सेमी इंग्रजी माध्यमाचा वर्ग आहे.

             आपल्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावनेचा अंदाज घेऊन शिकवणारा शिक्षक म्हणून जायभाये सरांचा उल्लेख करता येईल. ते सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रयोगशील असतात. शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली की, 

सर्वात प्रथम वर्गातील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण कौटुंबिक माहितीची ते  नोंद करून घेतात. त्यावरून विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक वातावरणाची कल्पना येते. मग त्यांचे भावविश्व थोडेबहू समजायला मदत होते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भावना या भिन्नभिन्न असतात, त्यांच्याशी हितगुज करून त्यांचे मित्र बनवून अध्यापन केले की मुले मोकळी बोलू लागतात. त्यांना खात्री पटते की शिक्षक आपल्याला समजून घेतात. शिक्षकांनी सांगितलेले मुले समजावून घेऊ लागतात. आपल्या शंका आणि अडचणीवर शिक्षकांकडून उपाय शोधला. एक प्रकारे मानसिक आधार आणि आपलेपणा शिक्षकांबद्दल त्यांच्यात निर्माण होतो याचा संतोष जायभाये सर सतत अनुभव घेत असतात. 

        आजच्या आधुनिक जगामध्ये माणूस फक्त यंत्र व पैसा यांच्या मागे लागल्यामुळे भावना हाताळण्याचे तंत्र विसरून गेला आहे जणू , आपल्या भावनांचे नियंत्रण करून इतरांच्या भावनांचा आदर करण्याचे व स्वत्वाची जाणीव,  आत्मसन्मान निर्माण करण्याचे कौशल्य नकळतपणे सर विद्यार्थ्यांना शिकवतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे  खोटे बोलणे जवळपास बंदच झाले व वर्गातील विद्यार्थ्यांचे आपसातील सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले. या प्रयोगांमुळे विद्यार्थी उपस्थिती नियमित राहू लागली. शाळा व  शिक्षकांविषयी गोडी निर्माण झाली व विद्यार्थी आवडीने शिकू लागले. 

      विद्यार्थ्यांना समाजात वावरताना प्रत्येक गोष्ट मिळेलच असे नाही; त्यामुळे विविध प्रकारच्या शालेय स्पर्धांचे आयोजन करून हार झाल्यावर काय करावे? हे प्रात्यक्षिकातून शिकवले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नकार पचवण्याची ताकद निर्माण झाली. ते विविध स्पर्धांबरोबरच विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण देतात.

      इयत्ता दुसरीसाठी त्यांनी इंग्रजी व्याकरण हा उपक्रम सुरू केला. त्यांना व्याकरणाची वेगळी वही करून त्यामध्ये उपपदे, वाक्याचे भाग , शब्दयोगी अव्यय, कृतीदर्शक शब्द, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, छोटी छोटी इंग्रजी वाक्ये अनेक उदाहरणे देऊन व सराव घेऊन  शिकवले. हा उपक्रम यशस्वी ठरला.  या इयत्ता दुसरीच्या मुलांना जमेल हे जमेल का? अशी त्यांच्या मनातील शंकेला यशस्वीतेने मात दिली. हे विद्यार्थी  सध्या उत्तम प्रकारे विद्यार्थी इंग्रजी व्याकरणावर आधारित प्रश्नाची उत्तरे देतात. छोटी छोटी वाक्ये बोलतात. व्याकरण हे व्याकरण म्हणून न शिकवता उपयोजित पद्धतीने शिकवले की विद्यार्थ्यांना आनंददायी वाटते.

       विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता जर वाढवली तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच वाढते या जायभाये सरांच्या विश्वासामूळे इयत्ता दुसरीच्या वर्गातील त्यांचे विद्यार्थी हातच्याची बेरीज, वजाबाकी, दोन अंकी संख्येचे गुणाकार सहजतेने करतात.

   ‘कवी -लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रेरीत करतात . दरवर्षी विद्यार्थ्यांना सामाजिक संस्थांकडून व वैयक्तिक रूपात देणगी मिळवून त्यातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप जायभाये सर करतात.एकदा तर सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मल्टिप्लेक्स मध्ये चित्रपट पाहण्याची संधीही उपलब्ध करून दिली. 

      जामभाये सर तंत्रस्नेही असल्यामुळे लॅपटॉप, टीव्ही, ई लर्निंग, इंटरनेटच्या इ.चा अध्यापनात वापर करतात .त्यामुळे मुले घटक प्रत्यक्ष पाहू व ऐकू लागले. त्यामुळे अध्ययनाची गोडी व विद्यार्थ्यांची समज वाढली. राखी पौर्णिमेला विद्यार्थ्यांकडून राख्या बनवून  स सैनिकांना  पाठवण्याचा उपक्रम दरवर्षी ते घेतात. विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांचा पाया तयार व्हावा यासाठी  पूर्वतयारी करून घेतात. विद्यार्थ्यांना  वैयक्तिक समुपदेशनही ते करतात.

          संतोष जायभाये यांनी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या पुस्तकाचे लेखन केले असून भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत.प्रसिद्ध साहित्यिक उत्तम बंडू तुपे लिखीत ' झुलवा ' या नाटकात, झी मराठी वरील ' अल्टी पल्टी ' या मालिकेत अभिनयही केला . ' जांभूळ ' या मराठी चित्रपटाची पटकथा लेखन व त्यात भूमिकाही केली आहे . लक्ष्मण देशपांडे यांच्या ‘वऱ्हाड निघालय लंडनला ‘ ते त्यांनी पाचशेहून अधिक एकपात्री प्रयोग केलेत. त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी काही संस्थांनी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे . शिक्षकांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणात ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी होतात.


~~

( लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)

डॉ ‌कैलास दौंड 9850608611

संतोष जायभाये -7498804714




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर