आनंददायी उपक्रमांची : समडोळी शाळा

        आनंददायी उपक्रमांची : समडोळी शाळा

 ‘हाती घेऊ तडीस नेऊ’ हे ब्रीद असलेली सांगली जिल्हा परिषदेची शाळा नं 2 समडोळी ही शाळा मुख्याध्यापक कृष्णात विष्णू पाटोळे यांच्या उपक्रमशीलतेमूळे लौकिकास पात्र ठरली आहे. म्हणूनच सांगली शहर आणि परिसरातून या शाळेत पहिली आणि चौथीत प्रत्येकी दोन आणि तिसरी , चौथीच्या वर्गात प्रत्येकी पाच मुलींचे प्रवेश समडोळी शाळा नंबर २ मध्ये झालेले आहेत. ही मुलींची शाळा सर्वांची हवीहवीशी झाली आहे.
      ‘ इंग्रजी शब्द सांगून हजेरी’ या उपक्रमाने दररोज अध्यापनाची सुरुवात होते. प्रत्येक गुरुवारी ‘इंग्लिश डे आणि पालेभाजी भाकरी डे’ साजरे केले जातात. या दिवशी सर्व विद्यार्थी आपसात आणि शाळेतील शिक्षकांसोबत इंग्रजी भाषेतच संभाषण करतात. या दिवशी प्रत्येकाच्या डब्यामध्ये पालेभाजी आणि भाकरी ही अनिवार्यपणे असते.
       वर्गात तळफलकावर व्हाईट बोर्ड बसविले आहेत त्यावर दुपारच्या सुट्टीत मुली मुक्तपणे गणिते सोडवितात गणिताची भीती न बाळगता अब्जापर्यंतच्या संख्येवरील गणिती क्रिया करतात.शाळेत लोकशाही मूल्याची रुजवणूक करण्यासाठी व स्वयंशिस्तीसाठी शाळेतील मुलींची प्रत्यक्ष निवडणूक घेऊन त्यातून अष्टप्रधान मंडळ निवडले जाते. त्यांचे स्वतंत्र लेटरहेड देखील तयार केले जाते. विद्यार्थी शाळाप्रमुखाचा शिक्काही असतोच. त्याचा क्षेत्रभेट, पत्रव्यवहासाठी वापर केला जातो.  
    वाचन लेखन विषयक उपक्रम : विद्यार्थ्यांना मुक्त आणि सर्जनशील लेखनाची सवय लागावी यासाठी त्यांना
    कथा, कविता, प्रसंगवर्णन यांचे लेखन करण्यासाठी प्रेरणा दिली जाते. वाचनाची सवय अखंडितपणे जोपासण्यासाठी दर शनिवारी विद्यार्थी आवडीचे पुस्तक वाचनालयातून वाचायला घेतात व वाचून त्यावर चर्चा करतात. याचा परिणाम म्हणून औदुंबराच्या सदानंद साहित्य संमेलनात आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या संमेलनात शाळेतील मुलींनी स्वरचित कथा, कविता सादर केल्या आहेत. याच शाळेत इ. चौथीत शिकत असताना श्रावणी पाटील या मुलीचा ‘आजीनं सांगितलेल्या गोष्टी’ हा कथासंग्रह मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षण संचालक नामदेव माळी यांच्या मार्गदर्शनाने प्रकाशित झालेला आहे.
     श्रवणाशिवाय भाषेचा विकास होत नसल्याने आजी आजोबांकडून रोज परिपाठावेळी गोष्ट सांगितली जाते. ‘गोष्ट ऐकू, समृद्ध होऊ’ या उपक्रमातुन भाषिक विकासात मदत होते. दर उन्हाळी सुट्टीत विविध उपक्रमांचे आयोजन असते. त्यामध्ये खेळीयाड, मार्गदर्शनवर्ग, लाठीकाठी, झांज , लेझीम प्रात्यक्षिके यावर्षीच्या उन्हाळी सुट्टीत पाचहजार सीडबॉल निर्मिती करून डोंगरावर पहिल्या शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ या उपक्रमांतर्गत डोंगरावर शाळा भरवली , वृक्षारोपण केले, सीड बॉल ठेवले, डोंगरावर बसून परिसरातली चित्रे रेखाटली. असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाळा विद्यार्थ्यांची आवडती न बनली तरच नवल!
       या शाळेचे वेगळेपण म्हणजे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेच्या इमारतीला दिलेले राजवाड्याचे रूप. राजवाडयातील प्रत्येक खांबातून,चित्रातून,नक्षीकामातून विविध विषयाचे ज्ञान सहजच मिळते. शाळेतील मुलीं डायरीलेखन करतात.
 पस्तीस मराठी शब्दांचे लेखन आणि आठ प्रकारचे संख्या वाचन हा गुणवत्ता समृद्ध करणारा उपक्रम उपयुक्त ठरतो आहे.
      इंग्रजी शब्दसंपत्ती वाढीसाठी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला ‘क्वीन ऑफ इंग्लिश’ गणिताची राणी, जोडाक्षराची राणी असे सोपे पण अध्ययन पूरक स्पर्धात्मक उपक्रम सातत्याने घेतले जातात. मुलाखत तंत्राचा सुयोग्य वापर करत विद्यार्थीनी लोककलावंतांची मुलाखत घेऊन महाराष्ट्राच्या परंपरेची ओळख करून घेतील अशी संधी दिली जाते. हळदीकुंकवाच्या वेळी वाण म्हणून मुलींनी आईला पत्र लिहिली आणि त्याला आईने उत्तर दिले; हा अभिव्यक्तीचा अनोखा उपक्रम अबोल मुलींना बोलके करणारा ठरला. ‘शेतशिवार ते मॉल’ असा प्रवास. नर्सरी, बीजकेंद्र, शेतकरी लेखकांशी गप्पा, दूधकेंद्र भेट असे विद्यार्थ्यांनींचे अभ्यासदौरे आयोजित केले जातात.
       कला दर्पण - स्नेहसंमेलन ,पाठयपुस्तकातील कथा, कविता यांचे नाट्य आणि नृत्य यासह सादरीकरण , संपूर्ण निवेदन, प्रस्ताविक, दीपप्रज्वलन, आभार , पाहुण्यांसोबतचा स्टेजवरील वावर, त्यांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण या सर्व भूमिका फक्त विद्यार्थीनीच पार पाडतात.
       ‘कुतूहल शब्द’ - परिपाठ फलकावर रोज एक नवीन शब्द लिहिला जातो. त्यावर मुली घरी चर्चा करून उत्तरे देतात. ‘जिज्ञासा पेटी’ - मुलींना पडणारे चिकित्सक प्रश्न पेटीत टाकले जातात. त्याची उत्तरे मुलीचं शोधतात. नाही सापडली तर शिक्षकांची मदत घेतात.
          स्वयं अध्ययन करत, स्पर्धा परीक्षेसाठी घोकंपटीला फाटा देत सहज कृतीतून , गटपद्धती, प्रश्नानिर्मितीतून ताणतणाव विरहित अध्ययन अध्यापन या शाळेत केले जाते. विद्यार्थीनी पहाटेच्या वेळी उठून , शिक्षकांना मिस कॉल देऊन स्वयं अध्ययनाला सुरूवात करण्याचा शिरस्ता बाळगतात.
      ‌सांगली जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या गुणवत्ता शोध परीक्षेत पहिली ते दुसरीच्या आणि चौथीच्या गुणवत्ता शोध परीक्षेत यंदा पाच मुली गुणवत्ता 
 चमकल्या , तसेच वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक, इंग्रजी कवितागायन स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक,गायन स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रीडा स्पर्धेत केंद्रास्तरावर यश शाळेने मिळवले.पल्लवी चव्हाण हिने नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आणि भूमी देवर्षीने ही जिल्हास्तरावर पदक मिळविले आहे. या सर्व उपक्रमांसाठी पाटोळे सरांना विद्यार्थी व सर्व शिक्षकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद असतो.
~~~~
(लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)
कृष्णात विष्णू पाटोळे -9975186295.









    


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर