□ गाव चिरंतन आहे. ___________________डॉ. कैलास दौंड ________________________________ काळाच्या लाटा येती , गावाच्या भाळावरती । गावपणाला येते जाते, ओली- सुकीशी माणूस भरती॥ लोकवस्तीच्या रूपाने अस्तित्वात असणारा गाव तगधरू आहे. आता मोडेल, संपेल,उदासपणे ओस पडेल, केवळ खुणा उरतील असे वाटत असतांनाच कुठेतरी त्याला पालवी फुटत असते. कात टाकून गाव नवे रूप घेत असते. एकुणच काय तर गाव कमालीचे तग धरू आहे. म्हणूनच गावाला शेकडो वर्षाचा इतिहास असतो. त्याची पूर्वीची नावे वेगळी असतात, काळानुरूप गाव नवी नावे सुद्धा धारण करते. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे गावाला कधीकधी त्याची जागा बदलावी लागते. अशा कठीण काळातही गाव आपले आधीचे नाव आणि आधीचे जगणे विसरत नाही. काळाचे आणि बदलाचे अनेक आघात झाले तरीही गाव जिवंत राहण्याचा प्रयत्न करत राहते. गावाच्या लेखी ते जणू अपरिहार्य असते. गाव जमीन, डोंगर, घरे, रस्ते, शाळा इत्यादींनी बणलेले असले तरी ते जैविक दृष्ट्या आणि सेंद्रीय दृष्ट्याही एकसंघ असते. ...