'गावा गावाशी जागवा '
गाव : नवे रंग, नव्या जखमा
डाॅ. कैलास दौंड
गावच्या सुपिक मातीला आता नापिकीचे बहर येतांना दिसू लागले आहेत. पहिल्या पावसानंतर येणारा मृदगंध रोमारोमात चैतन्य भरवण्या ऐवजी रोगराईला साद घालत आहे. मात्र तरीही गावातील अस्सल सर्जनाची ओढ काही संपलेली नाही. बदलत्या काळात जग बदलत असतांना गाव बदलणे अगदीच सहाजिकच होते. बदल हा तर सृष्टीचा नियमच त्याला अव्हेरून कसे चालेल. मात्र या बदलाला व्यक्तिगत स्वार्थ, नियोजनशून्यता आणि दूरदृष्टीचा अभाव याची कुसंगत लाभल्याने गावाच्या नव्या रंगात नव्या जखमांचे दर्शन सहजच घडू लागले आहे . नवनिर्मितीचा लोभस रंग कायमच माणसाला खुणावत आलेला आहे. उगीचच भाबडेपणाने ' जुने ते सोने' उगाळणे योग्य नसले तरी या गाव बदलांचा मागोवा घेणे हे नव्या पिढीला भान येण्यासाठी आवश्यकच असते.
गाव बदलत असतांना आधी बदलल्या त्या गावच्या वाटा. गावात येणारे पाणंद रस्ते एक बैलगाडी धावू शकेल एवढ्या किंवा त्याहून थोड्या अधिक रूंदीचे असत. या रस्त्याच्या दुतर्फा शेर, बिलाईत, सीताफळ, शेवरी अशी झाडे वाढलेली असत. त्यावरून गुळवेली सारख्या वेली थेट शेंड्यापासून बुडखाकडे लोंबलेल्या असत. अधूनमधून चिंच, आंबा, बोर,भोकर, जांभुळ अशा मोठ्या झाडांनी रस्त्याकडेची ताटी अधिक गर्द केलेली असे. त्यामुळे तिन्ही ऋतूत रस्त्यावर कमी अधिक सावली असे. रस्त्याकडेची झाडे - झुडूपे, त्यात अनाहूतपणे वाढणारे गवत, या सगळ्यांच्या सहवासात रहिवासाला आलेले उंदीर, खार,घूस, मुंगुस, ससा , सरडे , साप असे प्राणी देखील असत. याखेरीज चिमण्या, कावळे, साळूंक्या, भारद्वाज, सुतार, कोतवाल इत्यादी नानाविध पक्ष्यांची रेलचेल असे. अनेक किटक असत, मधमाशा , गांधिलमाशा असत. गावाची खास शेतीनिष्ठ असल्याची ओळख या रस्त्याने गावात येतांना- जातांना सहजच होत असे. गावातुन शेतात जाणारे रस्ते, नदीकाठ आणि मोठे बांध देखील अशीच जैवविविधता टिकवून असलेले होते.
गाव बदलाचा पहिला फटका बसला तो या वाटांना. 'कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ' या म्हणी प्रमाणे ज्या वाटांनी सुधारणा आत गावात आल्या त्या सुधारणांनी ती वाटच खाऊन टाकली. गावात वाहने येण्यासाठी रस्ता रूंद झाला. आपोआप त्याकडेची जैवविविधता नष्ट झाली. रस्ते रूंद, मोकळे आणि सरळ झाले. अडचण ठरणारी झाडे तोडली गेली. शेतात जाणार्या रस्त्याचीही हीच गत झाली. जागतिकीकरण आणि बाजारीकरणाची गरज म्हणून अधिक जागेची गरज भासू लागली. त्यामुळे मोठ्या बांधाचा आकार आपोआप निमुळता होत गेला. बांधाचा आकार आकसत असतांना बांधावरील झाडांना नख लावण्यात आले. प्रथमतः त्याच्या फांद्या तोडण्यात आल्या. नंतर ते स्वतःच कसे वाळून जाईल याची व्यवस्था करण्यात आली. जर अपरिहार्यच असेल तर ते झाडं सरळ वर आकाशाकडे तोंड करून कसे निघेल याकडे लक्ष पुरवण्यात आले. त्यामुळे पूर्वी खेड्यात दिसणारी झाडी आता लक्ष वेधून घेत नाही. गावातील झाडी बदलली आहे. रस्ते, नदीकाठ आणि मोठे बांध या ठिकाणची जैवविविधता जवळपास संपल्यात जमा झाली आहे.
नदीकाठ बदलल्याने गावच्या नदीला बदलावे लागले. दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पावसामुळे नदीला येणारा पूर दुर्मिळ झाला. काही लोकांनी पाण्याच्या शोधात (किंवा हव्यासापोटी ) थेट नदीपात्रातच विहिरी खोदल्या. काहींनी अतिक्रमण करत शेतीचे बांध नदीत ढकलले. परीणाम म्हणून नद्या अरुंद झाल्या. किरकोळ खर्च भागवण्यासाठी झाडे तोडण्यात शेतकरीही मागे नव्हते. अर्थातच अवर्षनाची चलती असल्याने पूर येण्याचा संबंध नव्हताच. मग पाऊस आल्यास पाणी सांभाळून ठेवावे म्हणून जलसंधारणाची , बांधबंदीस्तीची गरज वाटू लागली. सरकारच्या मदतीला काही स्वयंसेवी संस्था आल्या. व्यक्तीगत स्वार्थासाठी नदीतील वाळू काढून घेतली गेली.नद्या वाटेल तशा उकरून थेट खडकाला लावण्यात आल्या. नदीचं रूपडं एकदम बदलुन गेलं. तिला मातकट नाल्याचे स्वरूप लाभले. नदीपात्रातील शेरणी सारख्या वनस्पती नाहीशा झाल्या. नदीला खडकापर्यत पोहचवण्याचा काही फायदा होतो की नाही समजणे अवघड होते. एकुणच जाहिरातीत वास्तव हरवले होते. एकुणच नदीचं रूप शुष्क आणि भयावह दिसू लागले. या नदीला कधी पूर्वीचे वाहते रूप येईल की नाही या बद्दल मन साशंक झालं. कधीकधी चार वर्षातून एखादेवेळी पडणारा दणक्या पाऊस बांध फोडून मार्ग काढतो. तरी नदी नदी वाटतच नाही. एकिकडे बाटलीबंद पाणी पिणारे मुठभर लोक आणि दुसरीकडे नितळ , शुद्ध पाण्याला पारखे असणारे अनेक लोक असं हे द्वंद्व काहीकेल्या संपत नाही.
हे द्वंद्व माती आणि पाण्यासोबतच रोजच्या जगण्यालाही भिडलयं. घर, दुकान, शाळा, दवाखाने काहीच त्यातुन सुटले नाही. बदलत्या काळात माणसांनी आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या किंवा सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी आर्थिक झळ सोसण्याची तयारी ठेवली. सहाजिकच पावसाळी मशरूम (कुत्र्याच्या छत्र्या) उगवावेत तशा मध्यम लोकवस्तीच्या गावात अशा शाळा सुरू होऊ लागल्या. संस्कार देणार्या आणि सर्वांसाठी खुल्या असलेल्या गावातील जुन्या शाळा डळमळीत होऊ लागल्या. मात्र इथल्या शिक्षकांनी कंबर कसली. लोकवर्गणी मिळवून शाळांना डिजिटल लुक दिला. संगणकाचा वापर सुरू केला. शाळांना रंगरंगोटी केली. सहाजिकच गावची शाळा बदलली. काही ठिकाणी हा बदल लवकर स्विकारला गेला. मागणी तसा पुरवठा तत्वाने सेमी इंग्रजी माध्यम गावोगावी अवतरले. तर काही ठिकाणी सेमी इंग्रजी माध्यम बंद होऊन पून्हा मातृभाषेतून शिक्षण सुरू झाले. सहशालेय उपक्रमांची संख्या कमी झाली. पुस्तकी ज्ञानाला महत्त्व देणारे शाळा हे केंद्र ठरले आहे. अधिकाधिक मार्क्स पडणे हा हुशारीचा निकष बणत असल्याचे भयावह चित्र समोर उभे राहिले . सदवर्तनाचे मूल्यमापन कागदावर कुठेच दिसेना झाले. ' पोथी पढी पढी,जग मे भया न पंडीत कोय । ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडीत होय ॥' या कबीर वचनाचा वापर फक्त क्वचित बोलण्यापुरताच सुरू राहीला.
'या कोवळ्या कळ्यांमाजी
लपले ज्ञानेश्वर, रवींद्र, शिवाजी
विकसता प्रगटतील समाजी
शेकडो महापुरुष. '
हा राष्ट्रसंतांचा विचार ज्यांच्या पचनी पडला त्यांनी मूल्य शिक्षणाकडे मोर्चा वळवला आहे. खेड्यातील शाळेत मूल्यांची रूजवण आणि उगवण चांगली होईल अशी स्थिती होती. जीवनाचे शिक्षण देणाऱ्या या शाळा जीवन शिक्षण मंदिर या नावानेच ओळखल्या जात. आता विद्यार्थ्यांना 'कोवळ्या कळ्या' समजायला पालकही तयार नाहीत. रोबो सारखी हुशार लेकरे बहुतेकांना हवी आहेत. त्यामुळे या कोवळ्या कळ्यांवर अकाली प्रौढत्व लादले गेलेले आहे. सहाजिकच त्या विकसित होऊन, समाजात शेकडो महापुरुष निर्माण होण्याची वाट पाहणे हे दिवास्वप्न ठरत आहे. गावातल्या शाळांना येणारा कॉर्पोरेट लुक, गावच्या शाळेचे वेगळेपण हरवणारा आहे. मात्र हा बदल कुणी जबरदस्तीने लादलेला नाही हे विशेष!
जगण्याला भिडणारे सगळेच पदर बदलत असतांना सण, उत्सवांनी देखील आपले अस्सल रूप दडवून नवे गैरसणांचे रूप धारण करणे पसंत केले आहे . दिवाळी, दसरा, नागपंचमी, पोळा, गणेशोत्सव, शिमगा अशा गावातील साऱ्याच सणांचे स्वरूप बदललेय. दिवाळी सारखा सण एक दिवसाचा झाला तर इतर काही सण काही तासापुरतेच सण वाटतात. सणाला जोडुन असणारे माणसांना जोडणारे असे भाव कमी झाले आहेत. शिमग्यातील बोंबाबोंब आणि अश्लील शिव्यांची लाखोली देखील कमी झाली ही चांगली बाब आहे. बैलांची संख्या कमी झाल्याने आता गावात लवकरच ट्रॅकरचा किंवा माणसांचा पोळा भरेल अशी स्थिती आहे. मोबाईल फोन सारख्या अत्याधुनिक साधनांमुळे महिलांचा सासर माहेरातील संवाद सुलभ आणि सततचा झाल्यामुळे नागपंचमी सारख्या सणाला लेकीची माहेराची ओढ पूर्वी इतकी तीव्र राहिलेली नाही. त्यामुळे हा सणही त्याचे सांस्कृतिक अस्तित्व टाकुन देण्याच्या बेतात आहे. निसर्गाला बिलगुन येणारे सण आताशा काहीसे अलिप्त होत येत आहेत. नाही म्हणायला दिंड्या, पालख्या आपले अस्तित्व टिकवून आहेत.
जत्रा यात्रा देखील बदलल्यात. पूर्वी कावडीचे पाणी आणण्यासाठी दोन ते तीन दिवस जात. आता काही तासात ते येते आहे. आता गावाबाहेर पडणे नित्याचेच झाल्याने गोदाकाठी मुक्काम करणे अनावश्यक ठरले आहे. यात्रेतील शेरणी, आरती , पालखी अशा प्रसंगात लोक स्वतःच अधिक गर्दी होणार नाही याची काळजी घेत असल्याचे दिसते. पूर्वीचा हौशी हंगामा आता तोंडदेखलेपणाचा होऊन अधिक ओळख त्याला अधिक बिदागी अशा स्वरूपाचा झाला आहे. यात्रेची वर्गणी म्होरके मनाला येईल तितकी वाढवत आणि खर्च करत असल्याने लोक त्रस्त असतात पण दैवताच्या यात्रेची वर्गणी असल्याने पोटाला चिमटा घेऊन ती देण्याकडेच गावकर्यांचा कल असतो. मात्र एखाद्याच्या अविचारीपणाने या पैशाचा अपव्यय होतांना दिसला की मन खट्टू होते. बाजारीकरणाने गावोगावी बाजार आणि जत्रा यांची रेलचेल असल्याने गावच्या यात्रेचे आकर्षण देखील काहीसे कमी झालेले आहे.
गावातील कुटूंबाचे स्वरूप बदलुन आताशा काही दिवस झालेत. कुटुंबे लवकर विभक्त होताहेत. त्यामुळे आर्थिक जबाबदारी वाढीस लागते अशी एक भावना आहे. घरातील वृद्धांना सांभाळणे खेड्यात महत्त्वाचे समजत असले तरी अनेक ठिकाणी आई एकात आणि वडील दुसर्या लेकात, किंवा मुलगा शहरात आणि आई वडील गावात, कधीकधी आई किंवा वडील एकेकटेच गावात असे दृष्य दिसते. जागोजाग कुटुंबे छोटी व एकसंधपणा हरवलेली दिसतात. मात्र आपल्या गरजा भागवू शकतील इतपत ती सावध झालेली आहेत. विभक्त कुटूंब पद्धतीमुळे नात्यांची गुंफण बर्यापैकी सैल झालेली आहे. अनेक आई वडील अगतिक असलेले, मुलाबाळांच्या भवितव्याबाबत साशंक असलेले, चिंताक्रांत असलेले बघावयास मिळतात. नाही म्हणायला सरकारी योजनेचे लाभ ज्यांना मिळालेत त्यांनी विहिरी, घरे, कांदाचाळी, गोठे, फळबाग अशा आर्थिक सहकार्य असलेल्या योजनांमुळे कुटूंबाला स्थैर्य दिलेले दिसते. पूर्वी सारखी काड, सरमाड, उसाचे पाचट यांनी शाकारलेली घरे आज सहसा कुठे नजरेस यायची नाहीत. अगदी टिनाच्या पत्र्याची घरेही कमीच आहेत. एक दुसर्याच्या मदतीला जाणारी कुटुंबे आहेत नाही असे नाही. परंतू ज्यांनी आपल्याला मदत केली त्यालाच मदत करण्याचे गणित पुष्कळदा त्यामागे असते. ताकावालीलाच ताक देण्याचा हा प्रघात रूढ झालाय.
गावातील माणसामाणसातील संबंधाचे स्वरूप बदललेय. निस्वार्थ भावना कमी कमी होत आहे. फायदा असेल तरच माणसाला जीव लावला जातो. नात्यातील जवळीकतेच्या बाबतीतही असेच घडते आहे. याच खेड्यात पूर्वी चुलत, मावस, मामे, आत्ये अशा संबंधातील नात्यात आपुलकी होती. यापेक्षा दूरच्या नात्यांचीही एकमेकांना माहिती असे. ओळखी असत. लग्न, मृत्यू, आजारपण अशा प्रसंगी ये जा असे. आता गावात मोबाईल टॉवर आलेत, प्रवासाची साधने आलीत. पूर्वी सायकल सुद्धा दुर्मिळ असणार्या लोकांच्या दारासमोर मोटारसायकल उभी आहे. तरी नात्यांचे तळे हळूहळू आटत चाललेले दिसते. या पार्श्वभूमीवर नाती जपणाऱ्या माणसांचे खूप खूप अप्रूप वाटू लागले आहे. एकेकाळी शेतकरी म्हणजे खूप आतिथ्यशील ,येणार्या जाणार्या वाटसरूंना पाणी देणारा, भूकेलेल्यांना खाऊ घालणारा असाच सगळ्यांच्या मनात असायचा. आज मात्र वाटसरूच्याच निरागसतेची आणि निर्मळतेची खात्री देता येत नसल्याने शेतकरी सावध झाला असल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. त्याच्या दातृत्वाचा फुकट फायदा घेण्याऐवजी त्याच्या कष्टाची किंमत करायला शिकले पाहीजे. अशी शेतकरी पुत्रांची भावना बणली आहे. अर्थात हे कालोचितच आहे. शिक्षण मिळाले पण रोजगार मिळाला नाही. वाढती बेकारी गावात फिरते आहे.
गावात शेजारच्या लोकांशी शेताचे बांध किंवा गुरे ढोरे यामुळे कधीकधी वाद होत. अबोला धरला जाई. भावकीतील मानापानावरूनही कधी कधी वाद होत. मात्र गावातील चार लोक ते मिटवण्याचे प्रयत्न करत. संकट काळात लोक आधारासाठी उभे राहत. आता जर शेजाऱ्यांशी भांडण किंवा वाद झाला तर ते लवकर मिटत नाही. त्याला प्रतिष्ठेचा विषय बनवले जाते. क्वचित कधीकधी राजकिय रंग देण्याचेही प्रकार घडतात. एकुणच माणसे खूप सावध झालीत. कुणाच्या उपयोगी पडायचे असले तरी हजारदा विचार करतील. कधीकधी विनाकारण
जातीपातीत ठेचकाळतील.
कौटुंबिक कार्यक्रमाचे स्वरूप बदलले आहे. प्रतिष्ठेसाठी खर्च करण्याचे प्रकारही घडत असल्याचे दिसतात. तर समारंभ कमी खर्चात पार पाडावेत असा विचारही जोर धरतो आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यातील लोकांचा सहभाग वाढतो आहे. गेटकेन नावाची कमी खर्चाची आणि एकाच दिवसात सर्व विधी पार पाडणारी विवाह पद्धती लोकांनी गरज म्हणून स्विकारली आहे. पूर्वीच्या सारखी एकमेकांच्या कार्यात स्वतःहून काम करू लागण्याची रीत अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. सहाजिकच व्यावसायिक केटर्स गाव खेड्यात पोहोचले आहेत. गरज म्हणून गावातील मध्यमवर्गीय शहरातील किंवा निमशहरातील मंगल कार्यालयात विवाह विधी आयोजित करणे पसंत करतात. माणसाला माणसाची किंमत कळण्याचे हे दिवस आहेत.
एकिकडे गाव आणि शहर यामधील भेद संपत चाललाय. आणि दुसरीकडे शहराचे आकर्षण वाढतेच आहे. आपण या खेड्यातील माणसांपेक्षा कोणीतरी वेगळे आहोत. आपण त्यांच्यापेक्षा अधिक सुविधा असलेले जीवन जगणार. अशी गावच्या मुखंडांची धारणा बणली आहे. गावचे कारभारीच गावात राहणे कमीपणाचे समजू लागलेत. ते तालुक्याच्या गावी राहणे पसंत करतात. शहरातून गाव हाकणे त्यांना प्रतिष्ठेचे वाटते. ते गावात येतात ते फक्त ठेकेदार बणुन. रस्त्याची, गटारांची, पाणीपुरवठ्याची व अशी अन्य कामे ते स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेऊन करतात. किंवा ज्यांनी ते काम घेतले आहे त्यांच्या कानाला लागुन करून घेतात. त्यातच गावा विषयी उत्कट प्रीती भावना असणारे लोकही शहराकडे धावल्यामुळे गावामध्ये असुविधा आणि गैरसोईंचे रान माजले. जे गावातुन पुढे गेले त्यांनी गावाकडे शक्यतो पाहिलेच नाही. ग्रामगीतेने गावाच्या दुर्दशेची कारण मीमांसा करतांना हे आवर्जुन नोंदवले आहे.
'जे जे गावी शहाणे झाले
शक्तीयुक्तींनी पुढे निघाले.
ते सर्व शहराकडे धावले
म्हणोनी माजले रान येथे.'
मात्र समजून घेईल तो माणूस कसला!उत्तरोत्तर बेफिकीरी वाढते आहे, मनाला अस्वस्थ करते आहे.
हल्ली ज्याला त्याला शहराचे आणि तिथल्या जीवन पद्धतीचे आकर्षण. त्या नादात गावातच शहरीकरण घुसले. जणू 'खेड्याकडे चला' हा मंत्र शहराने ऐकुन तेच खेड्याकडे निघाले. घरे, रस्ते, दुकाने, टपऱ्या, गाड्या असे बरेच काही गावात आले. आता शहरी बकालपण गावाच्या वेशीवर आहे. त्याचे स्वागत करायचे की त्याला अव्हेरायचे? हे ठरवण्याची वेळ आली आहे. 'हात फिरे तेथे लक्ष्मी वसे' ही ग्रामजीवनाची गुरुकिल्ली. शहराच्या आकर्षणापेक्षा आपले गावच त्याहुन सुंदर बनवणे शक्य आहे. त्या दिशेने गावाची शक्ती वळवण्याचे आव्हान गावासमोर आहे. राष्ट्रसंतांनी तर हा सल्ला खूप आधीच दिलेला आहे.
'हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे
हे सूत्र ध्यानी ठेवोनी खरे
आपुले ग्रामची करावे गोजिरे
शहराहुनी.'
आता याच गावाची सवय या पिढीला झाली आहे. त्यांना आधीचा गाव कसा होता हे माहिती नाही. त्याबद्दल जाणून घ्यायला ते उत्सुकही नाहीत. आहे या गावाशी जुळवून घेणे आणि त्यातुन उभे राहणे ही त्याची धडपड. गावात बदल करणे, स्वच्छता राखणे, पाणी पुरवठ्याची सोय करणे, पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन करणे, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा अद्यावत करणे या गोष्टी महत्त्वाच्या खऱ्या परंतू गावातल्या नव्या पिढ्यांना व्यक्तिगत स्वार्थ्याने घेरले आहे. प्रत्येकाला आपापला स्वतंत्रपणे विकास करावयाचा आहे. माणसांची स्वप्ने बदललीत. ती फक्त त्याच्या पुरतीच मर्यादीत झालीत. एकमेकांच्या विकासाला साह्यभूत झाल्या खेरीज गावचा विकास होणार नाही हे तो समजून घेत नाही. एकुणच नव नव्या बदलासोबतच आता गावातील माणूस देखील बदल्यातच जमा आहे. गावाच्या नव्या चकचकीत रूपासोबतच नव्या जखमाही भळभळत आहेत. अशा स्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रामोन्नतीचा विचार कृतीतून गावातील पिढीसमोर ठेवणे हे आव्हानात्मक काम आहे. तो विचार अंगीकारल्या शिवाय ग्रामोन्नतीचा दिवा प्रज्वलित होणार नाही.
'गावा गावाशी जागवा
भेदभाव हा समूळ मिटवा
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा
दास तुकड्या म्हणे.'
~~~~~~~
~~~~~~~
डाॅ. कैलास दौंड
मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी
जि.अहमदनगर पीन 414102
kailasdaund@gmail.com
9850608611

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा