□ गाव चिरंतन आहे. ___________________डॉ. कैलास दौंड (अप्र)
□ गाव चिरंतन आहे.
___________________डॉ. कैलास दौंड ________________________________
काळाच्या लाटा येती , गावाच्या भाळावरती ।
गावपणाला येते जाते, ओली- सुकीशी माणूस भरती॥
लोकवस्तीच्या रूपाने अस्तित्वात असणारा गाव तगधरू आहे. आता मोडेल, संपेल,उदासपणे ओस पडेल, केवळ खुणा उरतील असे वाटत असतांनाच कुठेतरी त्याला पालवी फुटत असते. कात टाकून गाव नवे रूप घेत असते. एकुणच काय तर गाव कमालीचे तग धरू आहे. म्हणूनच गावाला शेकडो वर्षाचा इतिहास असतो. त्याची पूर्वीची नावे वेगळी असतात, काळानुरूप गाव नवी नावे सुद्धा धारण करते. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे गावाला कधीकधी त्याची जागा बदलावी लागते. अशा कठीण काळातही गाव आपले आधीचे नाव आणि आधीचे जगणे विसरत नाही. काळाचे आणि बदलाचे अनेक आघात झाले तरीही गाव जिवंत राहण्याचा प्रयत्न करत राहते. गावाच्या लेखी ते जणू अपरिहार्य असते. गाव जमीन, डोंगर, घरे, रस्ते, शाळा इत्यादींनी बणलेले असले तरी ते जैविक दृष्ट्या आणि सेंद्रीय दृष्ट्याही एकसंघ असते. गाव किती छोटे आहे किंवा किती मोठे आहे या गोष्टी सवयीने गावकर्यांस फार सतावत नाहीत. थोडक्यात गाव ही एक मानसिकता आहे. प्रत्येकाच्या मनामनात बर्या वाईट कारणांनी तसेच गत आठवणींनी गाव सचेतन असतो.
कधी कधी शांततेत नांदणार्या गावावर अचानकपणे संकटे येतात. येतात कसली? कोसळतात म्हणा हवे तर. मग गाव क्षणभर भांबावते. दुष्काळ, अवर्षण, रोगराई, नापिकी तर कधीकधी अतिवृष्टी, पूर, भूकंप अशी एक ना अनेक संकटे. ..त्यांची तितकीच अनेक रूपे. धडकी भरवणारी. अशा कठीण संकटात गावाच्या सहनशीलतेचा कस लागतो. गावाला नैसर्गिक संकटे सवयीची नसली तरी नवी नाहीत. आता मात्र दिवसेंदिवस ती अधिकच तीव्र होत चालली आहेत. माणसाला ती अगदी झेपेनाशी झाली आहेत. काल परवा डोंगर कोसळून उद्ध्वस्त झालेले माळीण गाव असो की या पावसाळ्यातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जीवघेणी पूर परिस्थिती असो. किती धडकी भरवणारी ही संकटे. माणसाला अगदी गोठवून टाकतात. नैसर्गिक संकटांना मानवी वर्तन अधिक धारदार बनवते.
मानव निर्मित संकटे जणू अंगावर चालून येत आहेत. त्यामुळे नैसर्गिक संकटाची तीव्रता अनेक पटींनी वाढत आहे. धरणांच्या भिंतीना अकाली पाझर फुटले आहेत. त्याखालील गावांना पुरते भेवपान लागलेले असते. नदीपात्रातील अतिक्रमणे, वृक्षतोड, खाणकामे, नैसर्गिक जलप्रवाहावरील अतिक्रमणे याबाबी संकटांना निमंत्रण देणार्या ठरतात. त्यामुळे संकटाची तीव्रता इतकी वाढते की माणूस हतबल होण्याशिवाय काहीही करू शकत नाही. मुंबई, पुण्यासारख्या महानगरात एकदिवसाच्या पावसाने साधणारे पाणी धडकी भरवणारे असते.
एकीकडे अतिवृष्टीमुळे जीवन जलमय झाल्याचे हृदयद्रावक दृष्य दिसत असतांनाच मराठवाडय़ातील पाचवीलाच पुजलेल्या दुष्काळाचे
भयावह चित्र समोर उभे राहते. ऐन पावसाळ्यातही त्यांना पाण्यासाठी टँकरची वाट पहावी लागते . ते पाहतांना मला माझ्याच कवितेतील - 'दूर कोसळे पाऊस । वाहतात नदी नाले,
आणि पिण्यासाठी इथे । पाणी मिळेनासे झाले. '
या ओळी आठवतात. संकट नाही असे वर्ष अभावानेच वाट्याला येते. संकटे येतच राहतात. जणू सवयीचीही होतात ती. जेव्हा त्यांची तीव्रता माणसाच्या सहनशक्ती पलिकडे जाते तेव्हा इतर भागातील माणसे मदतीला धावून येतात. माणुसकी जिवंत आहे , ती संकट काळात माणसांना स्वस्थ बसू देत नाही. ती गावाइतकीच तगधरू आहे. गाव आणि माणुसकी यांचे अतुट नाते आहे. माणसे गावागावातून आणि शहराशहरातून संकटकाळी धाऊन येतात.
पाखरांनी हंगाम संपल्यावर दूरदेशी निघून जावे आणि पुन्हा हंगामाच्या वेळी परतावं तशी माणसांची गावातून ये जा सुरू आहे.माणसांनी शेतीला आणि पशूपालनाला सुरूवात केली आणि ग्रामसंस्कृती वाढीस लागली. स्वसंरक्षणाच्या गरजेमुळे गावे एकसंघ राहीली. बदलत्या काळानुसार आणि वाढत्या लोकसंख्येच्या परिणामामुळे आणि लहरी निसर्गामूळे गावे स्वयंपूर्ण राहणे अशक्य झाले. उपजीविकेसाठी गाव सोडून जाणे ही माणसाची अपरिहार्य गरज बणली . तरी उपजीविका भागल्यानंतर पुन्हा गावात येण्याची आदीम ओढ माणसांच्यात जिवंत राहीली आहे. गावच्या माणसांना सततच गाव आपला वाटत राहतो. हे गावच्या गावपणाचे यश आहे. उपजीविकेसाठी गावाबाहेर गेलेले लोक गावाच्या आठवणी सांभाळून असतात, कधी काळी प्रसंगपरत्वे त्या उफाळून येतात. जेव्हा नदीवर धरणे बांधली गेली तेव्हा त्या धरणांच्या जलाशयात अनेक गावे विस्थापित होतात. दुष्काळात धरणाचा पाणीसाठा कमी झाला की मग मंदिराचे आणि घरादारांचे अवशेष दिसू लागतात. लोक पुन्हा एकदा पुर्वीच्या गावाच्या आठवणीत गुंततात. गावावरील आत्मियतेपोटी काही लोक गावाचे नाव आडनावाशी मुद्दामहून जोडून घेतात. जी माणसे गाव सोडतात त्यांना मूळ गावाचे नाव अनेकदा सांगत रहावे लागते.
गाव काळानुसार बदलत जाते. मात्र हे बदल योग्यच असतात असे मात्र नाही.यातील काही बदल गावाने स्वीकारलेले असतात. तर काही बदल मुखंडांनी लादलेले असतात. त्या त्या बदलाची पार्श्वभूमी पाहणे रंजक ठरेल. गावाच्या रूपात देखील बदल झालेले आपणास पहावयास मिळतात. या बदलांकडे नजर टाकली तर या बदलाचा कार्यकारणभाव भाव लक्षात येतो.
पूर्वी एकसंघ आणि गावकुसात असणारी लोकवस्ती आता बदलली आहे. गाव शेतीच्या आणि पशूपालनाच्या सोईसाठी वस्त्या वस्त्यात विभागले आहे. त्यामुळे शेती आणि इतर कामासाठी अधिक वेळ देणे माणसाला शक्य झाले. शिवाय मोकळी हवा आणि पुरेशी जागा मिळण्याची शक्यता वाढली. मात्र रोज एकमेकांना दिसणारी माणसे सहज भेटेनासी झाली. तरी लग्नकार्य, सप्ते, जत्रा-यात्रा , निवडणुका यांनी माणसांना जोडून ठेवले. प्रसंगाप्रसंगानेच लोक एकत्र येऊ लागले. मात्र आपला गाव, आपली माणसे हा बंध टिकून राहीला आहे.
प्राचीन आणि मध्ययुगीन पीकपद्धती पेक्षा आजची पीकपद्धती अमुलाग्र बदललेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या शेती व्यवस्थेत आणि मशागत, उत्पादन या बाबतीत जणू क्रांतीच झाली आहे. ही हरितक्रांती गावाशिवारातून अनुभवावयास मिळते आहे. कृषिविद्यापिठातील संशोधने शेतात पोहोचली आहेत. नवनवे प्रयोग होत आहेत. बैलांच्याच आधाराने होणारी शेती आताशा बहुतांश यंत्राधारीत झाली आहे. शेतीतील या बदलामुळे खेड्यातील माणसांचे राहणीमान बदलले आहे. मात्र अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि त्यांच्या अभावग्रस्त जगण्याचे दशावतार संपले आहेत असे म्हणणे धाडसाचे ठरेल. तिथे काहीतरी भरीव आणि उभारी देणारे कार्य करण्यासाठी संधी आहे. भूमिपुत्रांखेरीज हे कोण करणार?
गाव बदलत असताना गावातील जीवनशैली देखील हळूहळू बदलत गेली. पूर्वी ताप, सर्दी, खोकला, कांजण्या, फ्लू सारख्या आजारात गावात उपलब्ध होणारी झाडपाला आणि परीसरात असणारी गावरान औषधी वापरली जात असे. अशी औषधे माहिती असणारी एक लोकवैद्यक परंपराच अस्तित्वात होती. हात, पाय मुरगळणे किंवा मोडणे यावरही गावातच पारंपरिक पद्धतीने उपचार होत. बाळांतपणे घरीच होत. कधीकधी योग्य उपचार न मिळाल्याने विपरतही घडे पण त्याचे प्रमाण कमी असे.
आज आधुनिक वैद्यकिय साधन सुविधा गावापर्यंत पोहचल्या आहेत. त्यामुळे लसीकरण वेळेत होऊ लागल्याने आरोग्य आणि आयुर्मान वाढीस लागले आहे. माता बाल संगोपन ही संकल्पना गावात रुजली आहे. दवाखाने आणि गरजू यांचे नाते तयार झाले आहे. हे घडत असतांना बुजुर्ग , पारंपरिक वैद्य यांनी जपलेली लोकवैद्यक परंपरा अडगळीत जात आहे.
अपुरा आणि अनियमित पाऊस, बदलते हवामान, सिंचन सुविधांचा अभाव , विजेचा अपुरा व अनियमित पुरवठा आणि अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने शेती करणार्या आणि विशेषतः कोरडवाहू शेती करणाऱ्यांचे शेतीत भागत नाही. त्यामुळे सतत अभावांचा सामना करावा लागतो. सतत तडजोडीत आणि ओढग्रस्तीत जगावे लागते. अशी कष्टाची आणि कमी उत्पन्नाची शेती करण्यापेक्षा नोकरी मिळाली तर उत्तम अशी भावना गावकर्यात बळावणे सहाजिकच होते. गावातील तरूण पिढी उच्चशिक्षित होऊन स्वतःला सिद्ध करत नोकरी आणि व्यवसाय करत आहेत. गावातील नोकरीला लागणारांचे कौतुक बुजूर्गांना वाटते ते याच कारणांमुळे!
तर गावातील काही तरूण स्वतःहून व्यवसाय करू पाहतात. काही त्या निमित्ताने शहराला जवळ करत आहेत. अभावांशी सामना करण्याच्या वाटा चोखाळत आहेत. नवी पिढी नवी स्वप्ने घेऊन उत्साहाने समोर येते आहे.
गावात आता शहराचे फिल येत आहे. वीज, पाणी, शिक्षण, स्वयंपाकाचा गॅस, आरोग्य, रस्ते , इंटरनेट इत्यादी गावातच उपलब्ध असल्याने गाव आणि शहर यांत वर्दळीचा सोडून फारसा फरक राहिल्याचे जाणवत नाही. अशात गावाची ओळख आणि वेगळेपण काय तर गावातील माणसांची मानसिकता आणि शेती. या दोन्हीही गोष्टी गावाला गाव म्हणून समृद्ध करतात. गावातील सणवार, उत्सव, जत्रा-यात्रा, लोकाचार यांचे जुने स्वरूप काळानुरूप बदलले असले तरी ती गावाची ओळख आहे.
गावात काही माणसे खूप मायाळू आणि काळजीवाहू असतात. स्वतःची आणि स्वतःच्या कुटूंबाची काळजी करता करताच सबंध गावाचीही काळजी करत राहतात. अशाच काही माणसांना गाव जागवावे वाटते. त्यासाठी ते धडपडताहेत. त्यांच्या धडपडीचा आदर्श अनेक गावे समोर ठेवत प्रयत्न करत आहेत. प्रत्येक गावात अशा वृत्तीची माणसे असतातच; कधी त्यांचा आवाज मुखर असतो तर कधी क्षीण. त्या आवाजाला ज्या गावात चांगला प्रतिसाद मिळतो तेथे माणूसपणाने गाव जागवले जाते. अधिक चांगल्यात परावर्तित केले जाते. ज्या गावात तो आवाज हवेत विरला जातो ते गाव संवेदनशील होण्याची मागणी करत राहते. वेदना जागवण्यासाठी संवेदना जागवायला हवीच, नाही का?
गेल्या एप्रिल महिन्यात संगमनेर तालुक्यातील घारगाव जवळील बोरबन या गावी गेलो होतो. तेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाळा व गावकऱ्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षात गावातील लोकांनी शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या तिथे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचा पुनर्शोध घेतला होता. आधीच्या पिढीतील शिक्षक दिवंगत झालेले होते. मधल्या व अलिकडच्या काळातील शिक्षक होते. या सर्वाना आवर्जून आणि आग्रहाने बोलावून घ्यायला गावकरी विसरले नव्हते. त्यामुळेच दिवंगत असणाऱ्या शिक्षकांच्या कुटूंबातीलही कुणी ना कुणी कार्यक्रमाला उपस्थित होते. गावकऱ्यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली होती. नियोजनही छान होते. शाळेच्या सन्मानार्थ एवढा मोठा उत्सव साजरा होणार म्हणून सद्ध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांनी याच दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन ठेवले होते.या बोरबन गावातील शाळेत तीस बत्तीस वर्षापूर्वी आमचे नाना म्हणजे वडील शिक्षक होते. त्यामुळे गावकर्यांनी खूप आग्रहाने त्यांना बोलावले होते. त्यामुळे त्यांच्या सोबत तेथे गेलो होतो. म्हणून मला हा सोहळा अनुभवता आला. शाळेच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने सारे गाव एक झालेले प्रथमच अनुभवत होतो. गावातील उद्योग, व्यवसाय आणि नोकरी निमित्ताने बाहेरगावी असणारी सर्व तरूण, प्रौढ माणसे गावी आली होती. एकुणच खूप उत्साहाचे वातावरण होते. स्वच्छ आणि सुंदर रस्ते नजरेत भरत होते. गावाला लागूनच नदी होती. तिच्यात थोडे पाणी होते. लागूनच एक उंचच उंच अगदी गावाच्या अंगावर आल्यासारखा डोंगर होता आणि मध्यावर वसले होते ते बोरबन गाव. गावची शेती फुललेली आणि फळलेली होती. माणसांची मनेही अकृत्रिम उत्साहाने प्रफुल्लित झालेली दिसत होती. 'बोरबन' नंदनवन भासत होते. पूर्वी या गावात बोरींचे बन असेल म्हणून असेल गावाचे नाव बोरबन. प्रथमतः शाळेतील भूतपूर्व शिक्षकांचे गावातील लोक स्वागत करत. मग त्या त्या शिक्षकांना ओळखणारे लोक त्यांच्या जवळ येऊन गप्पा गोष्टी करत. तब्येतीची विचारपूस करत. तत्यांना ओट्यावर बसवत होते. या सायंकाळी मी तिथल्या नदीपात्रात फिरून आलो. कितीतरी वेळ ते निर्मळ पाणी, धिरोदात्त डोंगर आणि सुपिक शेती न्याहळत राहीलो. नजरेत साठवत राहीलो.
काही वेळाने सर्व शिक्षक वृंदांना फेटे बांधले गेले. या सर्वाना गावच्या हनुमान मंदिरापासून तर जिल्हा परिषद शाळेपर्यंत बँड गजरात मिरवणुकीने घेऊन आले. मग पाठोपाठ गावकरी आबालवृद्ध समोरील मैदानावर येऊन बसले. कार्यक्रमाला सुरूवात झाली. गावाच्या वतीने दोघा तिघांनी काही आठवणींना उजाळा देणारी भाषणे केली. शिक्षकांनीही थोडक्यात मनोगते व्यक्त केली. येथेही शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गावातील तरूणांनी शाळेला भेटवस्तू दिल्या. त्यानंतर शाळेचे स्नेहसंमेलन सुरू झाले. एक गाव गावाच्या जडणघडणीत सहभागी झालेल्या शिक्षकांचा एवढा आत्मिय गौरव करतांना पाहून समाधान वाटले.
रात्री निघायला आम्हाला उशिर झाला. वडिलांचा त्या काळचा एक विद्यार्थी आणि सद्ध्या नामांकित शिक्षक असलेल्या प्रकाश गाडेकरने आम्हाला मुक्कामाला थांबण्याचा खूप आग्रह केला. जेवणाचाही खूप आग्रह झाला. मग तेथे जेवण करूनच आम्ही निघालो. जेवताना गप्पा सुरूच होत्या. त्यातुन वेगवेगळ्या गोष्टी कळत होत्या. अख्ख्या गावात एकही व्यक्ती पत्ते खेळत नाही. ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट समजली. प्रत्येकाच्या शेतात भाजीपाला पिकवला जातोच. जो तो आपापल्या कामात गढलेला असल्याने गावातील जवळपास प्रत्येकाच्या घरी एकतरी चारचाकी वाहन आहे. जितकी सुपिक शेती तितकीच सुजाण येथिल माणसे !हे बोरबन महाराष्ट्रातील पहिले हागणदारीमुक्त गाव आहे. नासिक पुणे महामार्गावरील घारगाव जवळील हे गाव पाहुन गावपण म्हणजे काय याचा वस्तुपाठ अनुभवायला मिळाला.
गाव तो गावच मग तो विदर्भातील असो, मराठवाड्यातील असो की पश्चिम महाराष्ट्रातील असो किंवा खानदेश नाहीतर कोकणातील असो गावपण जपण्याचा प्रयत्न करणाराच असतो. काळानुसार आलेल्या बदलांची गावाचं रूपडं देखील बदललय. आणखी येणारा काळ त्याला बदलवणार आहे हे ही सहाजिकच आहे. माणसाचं माणूसपण अम्लान रहावे एवढीच एक माफक अपेक्षा धरणे आपल्या हाती आहे. अशाच विचारात असतांना . सायंकाळी एखादा शेतकरी शेळ्या किंवा गाई घेऊन गावात रानातून परततांना दिसतो तेव्हा गावाच्या चिरंतन असण्याची खूण पटते. ग्रामगीतेतील ओळी सहजच ओठावर येतात -
'गाव हा विश्वाचा नकाशा
गावावरून देशाची परीक्षा
गावचि भंगता अवदशा
येईल देशा.' (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज)
हा इशारा समजून गावाविषयी कृतज्ञ असायला नको का?
~~~~~~~
~~~~~~~
डाॅ. कैलास दौंड
मु. सोनोशी पो. कोरडगाव
ता. पाथर्डी जि.अहमदनगर
पीन : ४१४१०२
आपण फारच छान मांडणी केली .
उत्तर द्याहटवा