एक कविता
कर्मविरा. ..
कर्मवीरा,तू निघालास तेव्हा
इथं काळोखाचं रान दाटलं होतं,
माणसाचं मन उभं फाटलं होतं,
काट्याकुट्याचं बन जागोजाग भेटत होतं ..
मग तुच घेतलीस हाती 'कुऱ्हाड'
आणि
साफसुफ केलीस ही पुरातन काटेवनं.
घोर काळोखाला घातलास तू
लख्ख उजेडाचा अभिषेक
धुवून काढलीस माणसाची मनं.
कफल्लक दरिद्रीनारायणाला
तू इतकं मोठ्ठं केलसं-
मानवतेचं रोपटं त्याच्या हातात दिलस.
परदेशातील शिक्षणाचेही राहीले नाही अप्रूप
कर्मवीरा, किती केलसं हे खूप खूप. .!
तू सागरापरी आईची माया
तू नभापरी बापाची छाया
तू उडणाऱ्या पंखातलं बळ
तू विषमते विरूद्धची उत्कट कळ,
तू दिलीस विद्येला गती
माणसाला मती अन् कष्टाला नीती.
त्यासाठी तू चाकागत भिरभिरलास
पायाखालचा रस्ता कधी संपला नाही
म्हणूनच तू उभारलेल्या माणसाचा
माथा कधी झुकला नाही
नव्या युगाच्या भगीरथा. ..
तुमच्या ध्येयापुढे झुकविल्या माना
विद्वानांनी अन् धुरीनांनी
इथल्या शिक्षण व्यवस्थेच्या मुळाशीच
आण्णा, तुम्ही झालात खत पाणी!
####
डाॅ. कैलास रायभान दौंड
मु. सोनोशी पो. कोरडगाव
ता. पाथर्डी जि. अहमदनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा