गाव : ऊब आणि धग (लेखांक पाचवा डिसेंबर १८ साठी) ● गावाच्या नदीचे अवखळ पाणी पाऊसपाण्याची काळजी आणि आगोठ साधल्यावर होणारा आनंद ही शेतकर्यांच्या सुखाची चरमसीमा. सारे दरवर्षी घडणारेच, सवयीचे आणि अंगवळणी पडलेलेही पण तितकेच नवीन वाटणारेही! पाऊस पडो की न पडो तरी नक्षत्रे आणि त्यांना लाभलेली वाहने यावरून पर्जन्याच्या रूपाचे अंदाज लावण्यातही शेतकर्यांच्या हात कोणी धरणार नाही. पाऊसपाण्यानं शिवार भिजावा , धरत्रीला अभिषेक घडावा, त्या अभिषेकाच्या अगणित जलधारांचे जलौघ बणून प्रवाही व्हावेत. त्यांचे खळाळ राना-शिवारात निनादावेत नि त्या वाहत्या पाण्याच्या चाहुलीने रानावनातील जीव आपापली तृष्णा शमवण्यासाठी नदीवर येवोत. नदीच्या काठावर लोकवस्ती वाढीस लागो, माणसांचे जीवन सुखकर होवो एक नवी संस्कृती उदकाचेनी मिसे वाढीस लागो. असा आशीर्वाद देण्यासाठी कोणी भाग्यवंत लाभला नाही तरी गावाला हे सारं द्यायला निसर्ग काही थांबला नाही. त्याच्याशी एकरूप होऊन जगणार्या शेतकर्यांची भाषा त्यालाच नाही तर आणखी कोणाला कळणार! गावाला बराचसा डोंगर आहे. त्या डोंगराला गावाच्या बाजूने उतार आहे. काही झाडेही या...