काठी जीवंत झाली

काठी जिवंत झाली



डॉ.कैलास दौंड। kailasdaund@gmail.com भ्र.ध्व.9850608611
         प्रो. सदाशिव शंकरन नामांकित वनस्पती शास्त्रज्ञ होते. त्यांचा सर्वाधिक वेळ वनस्पतींच्या सहवासात व संशोधनात जात असे. ते जगभरातील महत्त्वाच्या अशा अनेक जंगलात जाऊन व संशोधनासाठी राहुन आलेले होते. नव्यानेच दिसणार्‍या वनस्पतींच्या प्रजातींचे त्यांना खूप कुतूहल असे. या कुतुहलातूनच त्यांनी आजवर जवळपास पन्नास वनस्पतींचा शोध लावला होता. या वनस्पतींचे विशेष नोंदवले होते.त्यातील काही वनस्पती औषधी गुणधर्म असणाऱ्याही होत्या. त्यांच्या या मौलिक संशोधनाचा देशविदेशात गौरव करण्यात आला होता. वनस्पती विषयक संशोधनपर लेख असणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून त्यांचे वनस्पती संशोधनाचे लेख नेहमीच प्रसिद्ध होत असत. अर्थातच संशोधक म्हणून त्यांचा मोठा दबदबा होता. नव्या संशोधकांना देखील त्यांचे कायमच मार्गदर्शन असे. त्यामुळे ते नव्या व जुन्या सर्वच संशोधकात प्रिय होते. वयाने जरी ते थकलेले होते तरी संशोधनासाठी एखाद्या जंगलात जायचे म्हटले की त्यांच्यात जणू तारुण्य संचरे.
              प्रो. आकाशानंद पोकळे नावाचे प्राणीशास्रज्ञ त्यांचे जीवलग मित्र होते. एकेकाळी दोघांनी सोबतच आफ्रिकेच्या जंगलातील जैवविविधते संदर्भाने महत्त्वाचे संशोधन केले होते. जरी त्यांचे संशोधनाचे विषय वेगवेगळे होते तरी ते परस्परांना पुरक ठरतील असेही होते. कारण वनस्पती संशोधन करावयाचे तर जंगलात जाणे अपरिहार्य होते. प्राणी देखील मुख्यत्वे जंगलातच असल्याने प्रो. सदाशिव शंकरन आणि प्रो. आकाशानंद पोकळे यांची चांगलीच मैत्री झाली होती. वाढत्या वयामुळे प्रो. आकाशानंद पोकळे यांनी संशोधन जवळपास थांबवलेच होते. मात्र त्यांना आफ्रिकेतील आदिवासी सहाय्यकाने सांगितलेला प्राणी शोधता आला नव्हता. कित्येकदा तर तो प्राणी काल्पनिक असावा असेही त्यांच्या मनात येई. त्या प्राण्यांचे वर्णन तिकडील वन्य जमातीच्या लोकगीतातून येई. आपल्याकडे जशी परीसाची कल्पना आहे तशीच तिकडे त्या प्राण्याची कल्पना असावी असे त्यांना वाटे. फरक इतकाच होता की परीस फायद्याचा होता तर हा प्राणी विषारी होता. हिवाळ्याचे दिवस होते. सकाळची मस्त कोवळी उन्हे पडली होती . आज प्रो. सदाशिव शंकरन यांचा जंगलात जाऊन संशोधन करण्याचा मुड होता. तसे त्यांच्या घराभोवती देखील त्यांनी जंगल बनवले होते. इतर वेळी ते या जंगलातच गढलेले असत. येथून वीस किलोमीटर अंतरावर दगडाईचे जंगल होते. त्या जंगलात असणाऱ्या देवतेच्या मंदीरामुळे जंगलाला याच नावाने ओळखले जाते.
      आपल्या मोटारसायकलवरून ते जंगलात जायला निघाले. अर्ध्या रस्त्यात आल्यावर आपली काठी आपण सोबत घेतली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण पुन्हा मागे जाण्याऐवजी ते तसेच पुढे गेले. या जंगलात आढळणार्‍या दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींच्या शोधात ते अनेकदा येथे येत असत. जंगलात जिथपर्यंत रस्ता होता तेथे त्यांनी गाडी लावली आणि खांद्याला अडकवलेली पिशवी घेऊन त्यांनी जंगलात प्रवेश केला. येथे त्यांना उग्र वासाच्या किटकभक्षी वनस्पती शोधायच्या होत्या. त्यासाठी ते जंगलातील ओढ्याकडे गेले. तेथे बर्‍यापैकी दलदल होती. आसपास झाडेही खूप होती. जंगलातील प्राण्यांसाठी जणू ओढा पाणवठाच होता. अनेक प्राण्यांच्या पावलांचे ठसे या दलदलीत उमटलेले होते. ओढ्याकाठच्या झुडूपात आपल्याला किटकभक्षी वनस्पती नक्कीच मिळू शकतील असे वाटल्याने त्यांनी तिकडे आपला मोर्चा वळवला. तिकडे जातांना दलदलीत पडलेली एक पांढरी काठी त्यांच्या नजरेस पडली. ही वेताची काठी असावी आणि एखाद्या शिकार्‍याकडून ती येथे पडली असावी असे त्यांना वाटले. त्यांनी खाली वाकून तीला उचलण्यासाठी हात लावला तर त्यांना क्षणभर तो स्पर्श कमालीचा मऊ आणि विचित्र वाटला. आता त्यांना आधाराला काठी मिळाल्याने बरे वाटले. नेहमी वापरायला देखील ही काठी चांगली आहे अशी त्यांची भावना झाली.
     पाच सहा तास शोधाशोध करून काही टिपणे आणि काही फोटोग्राफ्स घेऊन प्रो. सदाशिव शंकरन परतीच्या प्रवासाला निघाले. मोटारसायकल जवळ आल्यावर त्यांनी गाडीला काठी बांधली आणि घराकडे प्रवास सुरू केला. एव्हाना सायंकाळ झाली होती. घराजवळ येताच तजेलदार झाडाझुडूपांना पाहून त्यांना समाधान वाटले. गाडी लावून त्यांनी बागेत फेरफटका मारला. हातात जंगलात मिळालेली काठी होतीच. एक दोन ठिकाणी काठी जमिनीत रूतते आहे असे त्यांना जाणवले पण माती ओली असल्यामुळे हे झाले असावे असे त्यांना वाटले. घराच्या दाराशी काठी उभी करून त्यांनी घरात प्रवेश केला. थोडावेळ थांबुन जेवण उरकले. आता जंगलात घेतलेल्या नोंदीच्या आणि प्रकाशचित्रांच्या अभ्यासात गढून गेले. आता ते थेट सकाळीच बाहेर पडणार हे नक्कीच होते.
         दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर फिरण्यासाठी म्हणून ते घराबाहेर पडले. हातात धरण्यासाठी काल जंगलातून आणलेली काठी त्यांनी घराच्या दारात पाहीली पण ती तेथे कुठेच दिसेना. त्यांना विशेष वाटले. काहीवेळ शोध घेतल्यावर ते तसेच चालायला लागले. घराभोवतीच्या झाडाझुडूपातुन चालत असतांना एके ठिकाणी त्यांना ती काठी तेथे पडलेली दिसली. ही काठी इकडे कोणी टाकली असावी? हा प्रश्न त्यांच्या मनात चमकुन गेला. मग त्यांनी खाली वाकून काठीला हात लावला तर तसाच कालच्या सारखा मऊशार आणि विचित्र अनुभव आला. ती काठी टेकवत टेकवत ते फिरायला जाऊन आले. त्यांच्या आधीच्या काठीपेक्षा ही काठी मऊ आणि टणक असल्याने प्रो. सदाशिव शंकरन यांना ती खूप आवडली होती हेच खरे.    
           फिरून आल्यावर नाष्टा आणि त्यानंतर वाचन असा प्रो. सदाशिव शंकरन यांचा शिरस्ता होता. आता मात्र त्यांनी ती काठी घराच्या दारात ठेवण्याऐवजी घरात आणून थेट त्यांच्या खुर्ची शेजारीच उभी करून ठेवली होती. घरात त्यांच्या पत्नीने हौस म्हणून काही कबुतरे पाळलेली होती. त्यांचीही घरात ये जा असे. कबुतरांनी दिलेली अंडी त्यांच्या पत्नीने घरातच एका कोपर्‍यात खास जागा करून ठेवले होते. प्रो. सदाशिव शंकरन वाचनात गढून गेल्यामुळे त्यांचा आजचा दिवस घरातच गेला. सायंकाळचा फेरफटका मारायचे देखील ते विसरून गेले आणि रात्री उशिरा जेवण करून ते झोपी गेले. त्यांना थेट पहाटे चार वाजताच जाग आली. प्रथमतः त्यांचे लक्ष खूर्चीजवळ ठेवलेल्या काठीकडे गेले. तर तेथे काठी दिसली नाही. त्यांना आश्चर्य वाटले. मग त्यांनी पलंगावरूनच इकडे तिकडे काठी शोधायला सुरूवात केली. तर त्यांना पलंगा शेजारी जमिनीवर पडलेली काठी दिसली. त्यांनी बारकाईनं पाहिले तर काठी एखाद्या सरपटणार्‍या प्राण्या सारखी पुढे पुढे सरपटत होती. मात्र हे सरपटणे सापासारखे नागमोडी नव्हते तर अगदीच सरळपणे होते. हा विचित्र प्रकार ते आयुष्यात प्रथमच अनुभवत असल्याने त्यांना भिती वाटली. तरी आणखी पुढे काय घडते? हे पाहण्यासाठी ते तसेच पडून राहीले. ती काठी सरपटत जाऊन थेट कबुतराच्या अंड्याजवळ गेली. काय आश्चर्य! काठीचे समोरचे टोक अजगराच्या जबड्याप्रमाणे उघडले गेले. प्रो. सदाशिव शंकरन यांच्या अंगावर भितीने काटा उभा राहिला. एरवी या काठीला तोंड आहे हे सांगुनही कुणालाही पटले नसते. आणि इथेतर ही काठी अंडे फस्त करते होती. आता ही काठी म्हणजे एखादा सजीव असावा याची त्यांना खात्री झाली.
अशा महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना प्रो. आकाशानंद पोकळे यांची आठवण झाली नसती तरच नवल! त्यांनी आकाशानंद पोकळे यांना मोबाईल फोन लावला. व काठीच्या या चमत्कारिक प्रकाराबद्दल माहीती दिली. पोकळेंनी ते ताबडतोब हा प्रकार पाहण्यासाठी घरी येत असल्याचे सांगितले. फोनवरील बोलण्याच्या आवाजाने काठीचा जबडा मिटला गेला. आता या काठीला तोंड आहे असे देखील दिसत नव्हते. काठी तशीच जमीनीवर पडून राहीली. आता या काठीला हात लावावा की नाही या बद्दल त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. सुमारे तासाभरात प्रो. आकाशानंद पोकळे हे प्रो. सदाशिव शंकरन यांच्या घरी पोहोचले. घरात आल्यावर त्यांनी प्रथमतः ती काठी बारकाईने पाहिली. भिंगाच्या सहाय्याने तिचे निरीक्षण केले आणि आनंदाने टाळी वाजवत म्हणाले, " अखेर सापडलाच!"
"कोण सापडला? " प्रो. सदाशिव शंकरन यांनी विचारले.
"कोण म्हणजे आफ्रिकेच्या जंगलात आढळणारा दुर्मिळ विषारी प्राणी सापडला! " आता आश्चर्यचकित होण्याची वेळ प्रो. सदाशिव शंकरन यांचीच होती.
यापूर्वी प्रो. आकाशानंद पोकळे यांनी केवळ या प्राण्यांबद्दल आदिवासींच्या लोकगीतातून ऐकले होते. काल्पनिक वाटणारा प्राणी ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते. हा प्राणी धोक्याची चाहुल लागताच लाकडागत टणक होतो. त्याच अवस्थेत तो दहा दहा तास राहू शकतो. हा निशाचर प्राणी असुन अत्यंत विषारी आहे. हे त्यांनी ऐकलेले होते. मात्र याच्या विषाचे मानवासाठी काही औषधात रूपांतर करता येणे शक्य असल्याचे त्यांना वाटून गेले. आयुष्यभर ज्याच्या शोधात वणवण केली तो प्राणी आपल्या मित्रामुळे सहजच मिळाला होता. प्रो. आकाशानंद पोकळे यांना आपल्या देशातील जैवविविधतेचा आणि मित्रांचा अभिमान वाटला.
   या काठी सारख्या उपयोगी प्राण्याला मी 'शंकरनची काठी' हे नाव देणार असल्याचे सांगून प्रो. आकाशानंद पोकळे ती काठी घेऊन निघून गेले. त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत चांगलीच दुपार झाली होती. जरावेळाने त्यांनी राष्ट्रीय दुर्मिळ प्राणी संशोधन संस्थेतील शास्रज्ञांशी फोनवर संपर्क साधला. तेथील टीम ऊद्या सकाळी पोहचणार होती. तो पर्यंत 'काळजी घ्या.' सांगायला संस्थेतील शास्त्रज्ञ विसरले नाहीत. रात्री देखील त्यांनी या काठी सदृश्य प्राण्याचे खूप वेळ निरीक्षण केले. आंतरजालावर त्याचे फोटो टाकून माहिती शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे काहीच सापडले नाही. रात्री प्रो. आकाशानंद पोकळे ती काठी आपल्या जवळच घेऊन झोपले.
  दुसर्‍या दिवशी दुपारी राष्ट्रीय दुर्मिळ प्राणी संशोधन संस्थेच्या शास्रज्ञांची टीम आली. त्यांनी चौकशी केली असता समजले की अजून प्रो. आकाशानंद पोकळे झोपेतून उठलेले नाहीत. मग राष्ट्रीय दुर्मिळ प्राणी संशोधन संस्थेतील शास्रज्ञांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला तर आतील दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. प्रो. आकाशानंद पोकळे हे एकदम निस्तेज होऊन पलंगावर पडलेले होते. त्यांच्या शेजारीच ती काठी पडलेली होती. काठीचा रंग थोडासा लालसर वाटत होता.
"अरेरे! शेवटी भिती होती तेच घडले. " पथकाचे प्रमुख म्हणाले.
मग पथकाने प्रो. आकाशानंद पोकळे यांच्या शरीराची पाहणी केली. त्यांच्या शरीरावर कुठलाही व्रण किंवा खूण आढळून आली नाही. याचा अर्थ त्या काठी सदृश्य प्राण्याने कसलीही इजा न करता प्रो. आकाशानंद पोकळे यांच्या शरीरातील सर्व रक्त शोषून घेतले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू घडून आला होता. प्रो. आकाशानंद पोकळे यांच्या पत्नीला हे समजताच त्या मोठ्याने आक्रोश करायला लागल्या. त्या आवाजाने त्यांनी पाळलेल्या जंगली कोंबड्यांनी कलकलाट करायला सुरूवात केली. या वेळी तो काठी सदृश्य प्राणी किंचित हलतो आहे असे पथकातील एकाजणाला वाटले. आता झटपट पंचनामा करून राष्ट्रीय दुर्मिळ प्राणी संशोधन संस्थेतील शास्रज्ञांना त्या काठी सदृश्य प्राण्याला घेऊन निघायचे होते. त्या प्राण्यांसाठी त्यांनी एक विशेष पिंजरा आणला होता. तो दीड मीटर लांब आणि चपट्या आकाराचा होता. या पिंजर्‍यात त्यांनी ती काठी सावधपणे उचलून टाकली. जरावेळाने पथक निघुन गेले. दूरवरच्या एका मोठ्या शहरात त्यांचे सरकारी कार्यालय होते.
     पथक निघुन गेल्यानंतर पाचव्या दिवशी 'प्रो. सदाशिव शंकरन यांना जंगलात सापडलेली आणि प्रो. आकाशानंद पोकळे यांनी संशोधनासाठी त्यांच्या घरी आणलेली 'पांढरी काठी' म्हणजे परग्रहावरील सजीव असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर या प्राण्याच्या सखोल अभ्यासाने परग्रहावरील जीवसृष्टीची बरीच रहस्ये उलगडणार असल्याचे' संस्थेच्या वतीने दूरदर्शनवरून व वृत्तपत्रातून जाहीर करण्यात आले. या प्राण्याचे नामकरण 'सदाकाश ' असे केल्याचेही संस्थेने जाहीर केले. प्रो. सदाशिव शंकरन यांना मात्र आनंद व्यक्त करावे की दुःख हे कळत नव्हते.(समाप्त) ●
       डॉ.कैलास दौंड ,मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन ४१४१०२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर