गाव :उब आणि धग

गाव : ऊब आणि धग (लेखांक पाचवा डिसेंबर १८ साठी) ● गावाच्या नदीचे अवखळ पाणी पाऊसपाण्याची काळजी आणि आगोठ साधल्यावर होणारा आनंद ही शेतकर्‍यांच्या सुखाची चरमसीमा. सारे दरवर्षी घडणारेच, सवयीचे आणि अंगवळणी पडलेलेही पण तितकेच नवीन वाटणारेही! पाऊस पडो की न पडो तरी नक्षत्रे आणि त्यांना लाभलेली वाहने यावरून पर्जन्याच्या रूपाचे अंदाज लावण्यातही शेतकर्‍यांच्या हात कोणी धरणार नाही. पाऊसपाण्यानं शिवार भिजावा , धरत्रीला अभिषेक घडावा, त्या अभिषेकाच्या अगणित जलधारांचे जलौघ बणून प्रवाही व्हावेत. त्यांचे खळाळ राना-शिवारात निनादावेत नि त्या वाहत्या पाण्याच्या चाहुलीने रानावनातील जीव आपापली तृष्णा शमवण्यासाठी नदीवर येवोत. नदीच्या काठावर लोकवस्ती वाढीस लागो, माणसांचे जीवन सुखकर होवो एक नवी संस्कृती उदकाचेनी मिसे वाढीस लागो. असा आशीर्वाद देण्यासाठी कोणी भाग्यवंत लाभला नाही तरी गावाला हे सारं द्यायला निसर्ग काही थांबला नाही. त्याच्याशी एकरूप होऊन जगणार्‍या शेतकर्‍यांची भाषा त्यालाच नाही तर आणखी कोणाला कळणार! गावाला बराचसा डोंगर आहे. त्या डोंगराला गावाच्या बाजूने उतार आहे. काही झाडेही या डोंगरावर वाढलेली आहेत. पावसाळ्यात 'ढगांचे हुरूळे' या डोंगराच्या माथ्यावर सैरभैर होते. त्याच्याने पाऊस पडतो. डोंगर माळावर पाऊस पडायला लागला की केवळ सजीवसृष्टीलाच आनंद होतो असे नाही तर मग त्यात वारा सुद्धा नाचायला लागतो, पाऊस मग देहभान हरपतो. त्याच्या पडण्याने पाण्यासवे मातीही प्रवाही होते. त्यायोगाने लाल -तांबूस रंग घेऊन पाण्याचे खळाळ डोंगरावरून धावत सुटतात. छोट्या छोट्या ओढ्यात मिळत एक दुसर्‍याशी दोस्ती करतात. छोटे ओढे एकमेकांना भेटतात आणि नदीत रुपांतरीत होतात . हे सारे वाहत जाणारे चैतन्य, खळाळणारे लोभस चैतन्य सारेच चित्रमय सौंदर्य. ..!पण तरीही पावसाळ्यापुरतेच क्षणकाल टिकणारे! तेवढ्या अल्पकाळात का होईना पण आपला अंगभूत अमृताचा गुण ते आजुबाजुला मुक्तपणाने उधळत राहते , त्यायोगाने नदीकाठी हिरवळ वाढीस लागते. हा जीवंतपणा मनाला भुरळ घालतो पण हे सारे अल्पकालीक! चैतन्याला अल्पायुष्याचा शाप असावा असे. पावसाळ्यात हरीत आणि नंदनवन पण ॠतू बदलताच पाण्यासाठी वणवण! हे वाहत जाणारं चैतन्य काही काळापुरतं थांबुन नाही का ठेवता येणार? गावातून बाहेर जाणाऱ्या सत्वासारखं हे चैतन्यही प्रवाहात वाहुन जातं. निसर्गाने उदार हाताने गावाला दिलेलं पाणी नदीतून खळाळत निघुन जातं. लहान मोठी माणसं पूर बघायला नदीकाठी येतात. निसर्गाच्या चमत्काराचा आणि रौद्रभीषण सौंदर्याचा थक्क होऊन अनुभव घेतात. पाण्यासोबत गावातली माती देखील वेगाने वाहुन जाते. मातीचा रंग पाण्याच्या सोबतीने वेगवान होतो .अशावेळी गावाचे सुख अभंग तरी कसे राहणार? गावातुन मौलिक असलेले पाणी आणि माती जर अशी प्रवाही होऊन निघुन गेली तर गावात नापिक माळाखेरीज दुसरं काय उरणार? मग वाटतं - ' गावाच्या नदीचे।अवखळ पाणी॥ लाभो भगीरथ । उगमाजवळी॥' आसपासच्या गावात या बाबतीतलं शहाणपण थोडं लवकर पोहचलय. त्यांनी डोंगरातून येणारे छोटे छोटे ओहोळ अडवलेत. ओढ्यांना बंधारे बांधलेत. धावणार्‍या पाण्याला त्यांनी चालायला लावलं नि चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवलं. मग हे पाणी शिवारात मुरलं. विहिरी तळ्यात रमलं. जिथे सताड उन्हाळा पडायचा तिथं उन्हाळ्यातही बुडखीला पाणी दिसू लागलं. भाजीपाला पिकू लागला. एक दुसर्‍याच्या का होईना पण शेतात हिरवं दिसू लागलं. माणसाचं पोटासाठी गाव सोडून जाणं कमी झालं. आपल्याही गावात नाही का असे होणार? आपलंही गाव वाहुन जाणाऱ्या पाण्याबाबत जागं होणार का? आपण त्या बाबत मिळुन विचार नाही का करणार? दरवर्षातल्या उन्हाळ्यात गावच्या माणसाच्या मनात चांगला विचार येतो. कुणी एक दुसर्‍याशी बोलतात देखील. मग गावातल्या कोणकोणत्या ठिकाणी पाणी अडवला येईल याचाही विचार होतो. कधीकधी चर्चेतच एखाद्या जागेला माणसं कडाडून विरोध करतात आणि मग चर्चा थांबते .कधी गावात पाण्याचं टँकर यायला उशीर झाला की पुन्हा एकदा अशीच चर्चा सुरू होते. माणसं स्वतः हुन शक्यतो काही करीत नाहीत. अनेक अभियानं आणि स्पर्धा आल्या . गावाच्या बाहेरूनच त्या गेल्या. यांना दिशा सापडतच नाही. प्रत्येकालाच वाटतं हे कुणीतरी करायला हवं. सरकारनं केलं तर फारच चांगलं आणि पाणी अडवतांना तो बांध आपल्या शेताजवळ नसला तर अधिक चांगलं. कमी जास्त पाणी वाहुन शेताचं नुकसान होऊ नये म्हणून सारे दक्ष . गावाच्या नदीचे हे अवखळ पाणी धरून ठेवण्यासाठी गावात एखादा भगीरथ जन्माला येणार की नाही? आला तर त्याला स्वतःची ओळख पटणार की नाही? की तोही पोटाण्याच्या ओढीनं 'उचल' घेऊन स्थलांतर करणार? सारं चित्र आशा निराशेच्या सीमेवरचं ! गावातल्या माणसाला किमान प्यायला तरी पाणी मिळावे म्हणून माणसे कासावीस होतात. सरकारला आणि गावच्या म्होरक्यांना हजारदा शिव्या शाप देतात. तरी त्यांच्या शापानं ढोरं काही मरत नाहीत. काही वयस्क माणसं निसर्ग नियमानुसार टँकरचं पाणी प्यायला तयार नाहीत. त्यांना उन्हाळ्यात मैलोंमैल अंतरावरून पाणी आणावं लागतं. बादलीनं विहिरीच्या तळाशी असलेलं पाणी ओढावं लागत. ते पाहून आपण आता लवकरच महासत्ता होणार या स्वप्नाबाबत संदेह निर्माण होऊ लागतो . हिवाळा संपत आलाय. नदीची धार खंडलीय. आजूबाजूच्या झुडूपांनी माना टाकायला सुरूवात केली. सिताफळाची पानगळ सुरू झालीय. नदीपात्रात पाचोळा उडतोय. रानातली माती वारा उफाणतोय. माणसं भांबावलीत. कुठेतरी रोजगारासाठी सरकारी कामं सुरू होतील. माणसं कामावर हजेरी लावतील. अंगावरलं काम असलं तर कष्ट करतील. डोंगरात झाडे लावण्यासाठी दरवर्षीप्रमाणे नवीन खड्डे खणतील. सारे सोपस्कार होतील. माणसं खरचं खूप काम करतात. माझ्या गावच्या नदीला भगीरथ लाभण्याची मला स्वप्न पडू लागतात. असा भगीरथ कुठून बाहेरून येऊन आपलं जगणं समृद्ध करील अशी आशा धरणं म्हणजे सततच्या दुष्काळाला निमंत्रण देण्यासारखं आहे. आपणच सगळ्यांनी मिळून भगीरथाचे वारसदार व्हावं आणि शक्य ते काम करावं लागेल. बरं हे फक्त पाणी आणि माती यापुरतं मर्यादीत कसं समजावं? गावातील पाणी वाहून जातं. त्यासोबत मातीही वाहुन जाते हे तर खरचं . शिक्षित तरूणांच्या माध्यमातून गावातली बौद्धीक संपदा देखील बाहेरच जाते. तीला गावात पुरेसा वाव नाही हे मान्य करूनही या बौद्धीक संपदेचा गावाला उपयोग व्हायलाच हवा ही अपेक्षा उरतेच. हे पाणीदार तरूण हीच गावाची आशा आहे. गावातल्या छोट्याशा शाळेतून कितीतरी पाणीदार भगीरथ गावोगाव, शहरोशहरी पाठवलेत. काही गावीच चाचपडत ठेवलेत. आपल्या रोजच्या जगण्याच्या ओढग्रस्तीत करायलाच हवं असं ग्रामजागराचं काम स्मरणातून गेलंय की काय अशी शंका येते. या विचारात असतांनाच गावातील शाळेची आठवण मनपटलावर तरळून गेली. 'गावाकाठच्या झाडीत, आहे ओळखीची खूण माझी इवलीशी शाळा, मला बोलिते अजून.' गावातील ज्या काही गोष्टीचा ठसा मनावर उमटलेला असतो अशा गोष्टीत 'शाळा 'हमखासच असते. खूप खूप संस्कारक्षम असणारं इवलं इवलं विकसित होत जाणारं वय शाळा नावाच्या गोष्टीशी निगडीत असतं. त्यामुळे प्रसंगपरत्वे कधीनाकधी माणसाला शाळेची आठवण आल्या शिवाय राहत नाही. शाळकरी वयातील वर्गमित्र मोठेपणी कधीही भेटोत आणि कुठेही भेटोत त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात तोच बालपणीचा निरागस मित्रभाव दिसतो. गावाला एका धाग्यात जोडणाऱ्या ज्या घटना आणि स्थळे असतात त्यातील शाळा हे एक तसे महत्त्वाचे स्थळ! पूर्वी शाळेला प्रत्येक वर्गाला बसण्यासाठी एक खोली असे गणित नव्हते. दोन खोल्यातच सातवी पर्यंतच असणारी शाळा चाले. त्यामुळे सहाजिकच गावातील सार्वजनिक देवळात शाळेचे काही वर्ग भरत. पै. पैसा जमा करून एखादी वर्ग खोली बांधावी असा विचार त्यावेळीच काय आजही गावात सहसा कुणाच्या मनातही येत नाही. मात्र गावातल्या देवळात किंवा चावडीत वर्ग भरायला लोकांची हरकत नसे . कधी कधी तर चक्क झाडाखाली शाळा भरत असतं. ही गावोगावी सर्रास दिसणारी शिक्षणकेंद्रे .इमारतीपेक्षा आहे त्या परिस्थितीत शिकवण्यावर व शिकण्यावर भर असायचा. बरे गुरूजीही फार काही उच्च शिक्षित वगैरे होते असेही नव्हते. पण त्यांची तळमळ आणि कर्तव्य भावनाच एवढी प्रबळ असे की आपल्या समोरील मुलाला शाळेतील सर्व विषयांचे ज्ञान मिळाले पाहिजे. यासाठी त्यांची सतत धडपड असायची. तथाकथित बालमानसशास्राचे शिक्षकांना पुस्तकी ज्ञान असेल किंवा नसेलही त्यामुळे घोकंपट्टी, पाढे पाठांतर, कविता पाठांतर वाचन, लेखन या सार्‍या बाबी 'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम ' या न्यायाने चालत. छडी दरवेळीच 'छमछम ' वाजत होती असे नाही तर कधी 'रपरप' ,'सपसप' देखील वाजत असल्याने विद्या 'घमघम' घमघमाट करीत थोडीच येणार? लकडी शिवाय मकडी वठणीवर येत नाही हेच या पद्धतीचे तत्व! त्यामुळे छडीच्या धाकाने कधी कधी म्हणण्याऐवजी बर्‍याचदा विद्यार्थी घामाघूम होत. यावर विरजन म्हणून दुपारच्याला खेळाचा तास होई. एकदा दुपारची मधली सुट्टी झाली होती. त्यात आम्ही पळापळीचा खेळ सुरू केलेला होता. सगळ्यात पुढे दत्तू पळत होता आणि त्याला पकडायला आम्ही मागे धावत होतो. तो काही हाती लागत नव्हता. गावाच्या मध्यभागी असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कोपऱ्यावर मी दत्तुच्या जवळ आलो असतांना त्याने असा काही चकवा दिला की तो पळून गेला आणि मी मात्र त्या भिंतीच्या कोपर्‍यावर आदळलो. डोक्याला दगडाचा कोना लागुन खोक पडली. रक्त येऊ लागल्याने सोबतची मुले घाबरली. आता घरी जाणे किंवा शाळेत जाणे सारखेच धोकादायक वाटू लागले. एका मित्राला त्याच्या घरी 'आयोडीन ' असल्याची आठवण आली व तो मला घेऊन तेथून जराशा अंतरावर असणाऱ्या त्यांच्या घरी निघाला. सोबत मित्रांचा घोळका होताच. काही जणांनी तर थेट शाळेत जाऊन गुरुजींना माझे डोके फुटल्याचे सांगितले होते. मित्राची आई घरीच होती तिने मांडीवर घेऊन माझे हळूवार डोके पुसले. मग कापसाच्या बोळ्यावर थोडी आयोडीन घेऊन तो बोळा जखमेवर ठेवला. 'थांब ऽ आता गार पडेल! ' असं आश्वासन देऊन तिने जुन्या साडीची एक धांदी फाडून त्या जखमेवर येईल अशी माझ्या डोक्याला बांधली. आता शाळेत गेल्यावर गुरूजी मारतील असे वाटत होते पण त्यांनी तसे न करता फक्त विचारपूस केली. अशा अनेकानेक आठवणी शाळेच्या संबंधाने मनात येतातच. शाळेतील खेळ, वर्षातून एखादी जवळची सहल , परीक्षा , इत्यादी. ..इत्यादी आठवणी. क्लासमेंट नावाचे अजब नाते सर्वत्र वाढलेले पहावयास मिळते. गावातली एखादी व्यक्ती कुठे नोकरी धंद्याला लागली किंवा एखाद्या क्षेत्रात विशेष मोठी झाली म्हणजे गावातील त्याच्या वयाचे अनेक लोक तो आपला क्लासमेंट असल्याचे अभिमानाने सांगु लागतात. त्यातुन दोन गोष्टी आपोआपच सांगण्याचा प्रयत्न बहुधा असतो. एक म्हणजे त्या व्यक्तीशी आपली खूप मैत्री आहे आणि दुसरे म्हणजे आपणही काही कमी हुशार नाही. तसं असुनही क्लासमेंट नावाचे नाते खूप जवळचे आणि बहुतेकवेळा अगदीच निरपेक्ष, त्यामुळे खूपच टिकावू देखील असे. शाळकरी वयात गावाचं दर्शन फार सुंदर घडते. नको त्या गोष्टी माहितीही झालेल्या नसतात. गाव कमालीच एकसंघ वाटतं .सगळीच मोठी माणसे हुशार वाटतात. गावात खूपच समजदारी आहे असं वाटत राहतं . आपला गाव खूपच चांगला आहे आणि गावातील दैवत गावाच्या बर्‍या-वाईट व्यवहारावर लक्ष ठेऊन आहे असे वाटते. प्रत्येकाला या देवतांची भीती आणि आदर वाटतो. घरातील मोठ्या माणसांबद्दल विश्वास तर वाटतोच पण त्यांना कोणतीच गोष्ट अशक्य नाही असेही या वयात वाटत राहते. शाळेतले खेळ आणि सुट्ट्या शाळेप्रती आणि शिक्षकाप्रती आपली आपुलकी वाढवतात. शिक्षकही असे सर्वज्ञ वाटतात की जगातल्या प्रत्येक गोष्टीचे त्यांना ज्ञान असल्याचा गैरसमज होतो. पुढे पुढे हा गैरसमज विरत जाऊन वास्तवाचे भान आले तरी त्यांच्या बद्दलचा आदरभाव कायम राहतो. बालपणाचे संस्कारक्षम आणि विविधांगी अनुभव ग्रहण करण्याचे क्षण पुढे आयुष्यभर माणसाची सोबत करतात. म्हणून मोठेपणीही बाहेरगावी गेलेली व्यक्ती जेव्हा गावात परतले तेव्हा कळत नकळत गावाकाठच्या झाडीत लपलेल्या शाळा नावाच्या हिरव्या खुणेची नक्कीच आठवण येते. एखाद्या माळावर श्रमदान करणारा गाव पाहिला की गावाविषयीच्या हजार आठवणी जाग्या होतात. आता गावाला भगीरथ नक्कीच भेटेल,गावचं पाणी गावाच्या उपयोगासाठी गावच्याच शिवारात वळवलं जाईल याची क्षणभर आशा वाटू लागते इतकच! ==================== डॉ.कैलास दौंड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर