गाव :उब आणि धग


गाव :उब आणि धग (ऑगस्ट 2018) प्रकाशित

□ वृक्ष पूर्वज गावाचे 

गावशिवारातल्या झाडांचही गावाशी पूर्वापार घट्ट नातं असतं. त्या नात्यांची मूळ गावाच्या भूमीत खोलवर रुजलेली असतात . थेट माणसांच्या नात्यांना झाडांची नाती भीडलेली असतात. दूर देशी गेलेल्या माणसाला आपल्या आवडत्या गावातील झाडांच्या आणि त्यासंबंधाच्या आठवणी आवर्जुन येत असतात. इतकचं काय कडेवरल्या लहानग्याच्या भेटीला येणारा चांदोमामा देखील लिंबोनीच्या झाडाआडूनच येत असतो. गावचं गावपण झाडांनीच सुशोभित होतं. कधी माणूस आणि झाडांचं हे  नातं विसरून विकासाच्या नावाखाली कृतघ्नपणाची अविवेकी कुर्‍हाड झाडांवर भयाण आदळू लागते. खरेतर त्या कुठारीने आपण गावपणाच्या मुळावरच घाव घालत असतो. त्यामुळेच एकेकाळी हिरवीगार असणारी गावं आज उघडी -बोडखी झालीत. गाववैभवाचे वारसदार ठरणारी कवठ, आंबा नि चिंचेची झाडं गावाचा अविभाज्य भाग असतं. त्यांना बिलगुन असलेल्या दंतकथा, भयकथा आणि दैवतकथा यांच्या बरोबरीने लौकीककथा यामुळे झाडांचा रुबाब वाढलेला असे. लोकांच्या मनामनात त्या त्या झाडांचं व्यक्तीमत्व वास्तव्यास असे. गावा शिवातील झाडाचे वय, भव्य आकार त्यामुळे एक विशिष्टपणाचं वर्तुळच त्याभोवती असायचं.
     धारागिरी नावाच्या मनोऱ्या सारख्या दिसणार्‍या डोंगराच्या पूर्वेकडील एका घळीतून उगम पावलेल्या छोट्याशा ओढ्याकाठची आंबेराई तिच्या गर्दपणामूळे गावातच काय पण शीवालगतच्या तीन -चार गावात प्रसिद्ध होती. पाच ते सहा महिने ओढ्यातून  वाहणारी पाण्याची निर्मळ धार. लहान मोठ्या काटेरी झुडूपांची आणि झाडांची ओढ्यात पडणारी सावली यामुळे हवा आणि पाणी दोन्हीही गारेगार असायचे.
      आंबेराई मधल्या हरेक आंब्याला स्वतःची खास ओळख होती. त्यांचं म्हणून प्रत्येकाचं वेगळं 'वृक्षमत्व' होतं. अगदी पानांच्या हिरवेपणातही गर्द - फिक्या अशा भिन्न रंगछटा होत्या. पाडांच्या, कैऱ्यांच्या दिवसात तर हे वेगळेपण चटकन नजरेत भरे. गावातील मारुतीला असलेल्या रंगासारखा शेंदरी आंबा दूरवरूनच पोरासोरांना खुणावत असे. काळ्या आंबा पाडी लागला तरी त्याचा रंग उजळत नसे . चवीला मात्र तो चांगल्या रंगांच्या आंब्यालाही मागे टाकी. हळदुल्या रंगाच्या चिमण्या सारख्या कैर्‍या असणारा हळद्या. या आंब्याच्या कैर्‍याच इतक्या गोड की आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भाकरी सोबत कैरी खायची म्हटलं तरी ती हळद्याचीच असणार. पाडी लागल्यावर हळदपिवळ्या रंगांचे अनेक पक्षी झाडावर बसलेत असं वाटायचं. पळशा आंब्याच्या कैर्‍यांचा रंगच असा दिसायचा की पळसाच्या पानांचा भास व्हावा. या आंबेराईत 'गोटी' नावाचीच तीन झाडे होती. तरीही त्यातील वेगळेपण जपण्यासाठी 'भदाडी गोटी', 'गोधाडी गोटी' आणि 'सिंदाडातली गोटी' या विशेषनामानं त्यांची बारशी झालेली होती. सिंदाडातली गोटी चैत्राच्या शेवटी अशी काही केशरी - पिवळी होई की लांबूनच माणसाला झाडाखाली जावे वाटे. वार्‍याच्या झोतासरशी दोन तीन 'पाड' हमखास खाली पडणार म्हणजे पडणार. 'काय भुललाशी वरलीया रंगा?' सारखे दिसायला एवढा देखणा असणारा हा वाण तोंडात घातल्यावर दात आंबणार म्हणजे आंबणारच! भदाडी गोटी आणि सिंदाडातली गोटी या  झाडांना गोटी का म्हणतात? असा  प्रश्न त्यांची मोठ्या आकाराची फळे पाहून पडे. तरी या व अशा अनेक आम्रतरूमध्ये  थोरवी होती ती 'कळशा'आंब्याची. पक्ष्यांचा राजा जसा मोर तसा फळांचा राजा आंबा तर 'कळशा ' देखील या आंबेराईतील राजाच होता. निम्या अधिक मुळ्या ओढ्याच्या अंगाने उघड्या पडल्या होत्या. चार माणसांच्याही कवळीत बसणार नाही एवढे मोठे खोड उंचच उंच गेलेल्या फांद्यांचा डोलारा सांभाळत होते. वयोमानाने शे दिडशे वर्ष कधीच पूर्ण केलेली असतील. त्यामुळे एक ढिसाळ बाज त्याच्या सर्वांगाला व्यापून होता. वार्‍या वावधानात एखादी फांदी हमखासच मोडून पडायची. असं असलं तरी फाल्गुन - चैत्रात अंगोपांगी आलेल्या तौरामुळे ते बहरून यायचे. वैशाखात कैर्‍या मोठ्या व्हायच्या .त्या सोललेल्या नारळाच्या आकाराच्या कैर्‍या पाहणाऱ्याला विस्मयचकित करीत. आंबटपणामुळे या कैर्‍यांच्या वाटेला अगदी लहान मुले देखील जात नसत. मात्र पाडी लागल्यावर या कळशाच्या कैर्‍या वयात आल्यागत उजळू लागत . त्यांची गोडी वाढू लागे. बरं या सगळ्याच आंबेराईत बारा जणांचे बारा वाटे. त्यामुळे मज्जावाचा प्रश्न नव्हता. सहाजिकच वर्दळ देखील असायचीच.
    पावसाळ्यात आंबे सरत आणि  'जांभुळ आख्यान ' रंगे. नांदुर वाटाच्या पडक्या विहीरीजवळच्या 'रायजांभळी ' खाली पोरं हमखास जात पण त्याही पेक्षा डोंगरवाटाच्या जांभळीचा गाजावाजा जास्त असे. फिक्कट हिरव्या पानांची ही दोन झाडं जांभळाच्या झुपक्यांनी काळीसावळी होऊ बघायची. अशीच गत गावखोरीच्या नदीकाठच्या जांभळाच्या झाडांचीही असायची. डिसेंबर जानेवारीत रानमळ्यातल्या बोरी बोरांनी लगडून जायच्या. हलकासा पिवळा रंग असलेल्या या बोरी मधुर आणि पिठुळ चवीबद्दल  प्रसिद्ध होत्या. शिवारातल्या कवठ, चिंचा देखील आपपली ओळख सांभाळून होत्या. रानवाटेवर लागणारी वडाची झाडं इतकी पालेदार होती की अंधारवड हेच नाव त्यांना लोकांनी बहाल केलेले होते. रस्त्याने जाणाऱ्या एकट्या दूकट्या माणसांना देखील या वडाच्या फांद्यात एखादा चोर तर लपून बसला नसेल ना? अशी शंका येउन भीती वाटे. जिथे जिथे भीती वाटे तिथे तिथे देवाची स्थापना करून माणसांनी आधार निर्माण केला होताच म्हणा . जशी उन्हाळ्यात गुरे -वासरे भर दुपारी झापळझाडाच्या खाली थांबत. तिथेच बसत, रवंथ करत आणि उन्हं उतरणीला लागली की सावलीतून बाहेर पडत वाळल्या गवतकाड्या धुंडाळू लागत. तशीच पावसाळ्यात येणाऱ्या पावसाला शिरावर आनंदाने झेलून घेत ही झाडं आडोशाला येणाऱ्या माणसाला गुरावासरांना अभय देत. पानापानावर पडणारे थेंब, त्यांचा आवेग, त्यांचा मारा सगळं सहन करत हलकेसे निथळते थेंब आपल्या अंगाखांद्यावरून भूईभेटीला पाठवणारी वृक्षराजी हा मोठाच अलंकार आहे.
पावसाळ्यात गुराख्यांची खूप तारांबळ होई. कधीकधी आभाळ भरून येई आणि पाऊसच येत नसे. तर कधी तो जोरात येई पण निवारा जवळ नसे. अशावेळी डोंगरातील लहानसहान झुडुपे मदतीला धावत येत. झाडोर्याच्या आडोशाला गुराखी बसत आणि पावसाचा मारा चुकवत ओले चिंब होऊन जात. अंग भीजलेली गुरं, झाडं आणि गुराखी थंडीने कुडकुडत.  गावच्या डोंगरावरून गुराख्यानं गावावर नजर फिरवली की अवघं गाव झाडात हरवल्यागत दिसायचं. दूरदूर नजर पोहचे. एरवी न दिसणारे दुरचे डोंगर देखील पावसानंतर दिसू लागतं. काळोखी झाडी मनाची एक वेगळीच स्थिती होई.
         आता नारळाच्या वरची कपटे काढून आतल्या करवंटीचे डोळे उघडे पाडावेत तसे गावाभवतीचे वृक्षराजीचे कवच माणूस काढून घेतो आहे. हात करवतीची जागा विद्युत करवतीने घेतली आहे. औताच्या दांडीसाठी फांदी तोडतांना चारदा विचार करणारा भला माणूस बाधावरील तरण्या झाडाचा सौदा करतो आहे.  गावातील सिमेंटच्या रस्त्याला भेटायला डांबरी रस्ते गावात आले. एस. टी. ची बसगाडी गावात येऊ लागली त्यालाही पाव शतकाहुन अधिक काळ उलटलाय. तारांच्या जाळ्यातुन गाव शिवारात वीज अवतरल्याचा काळही तोच. त्यापाठोपाठ आले ते सुसाट वेगाने धावत सुटलेले जागतिकीकरण! माणूस पूर्वी कधी नव्हे ते स्वकेंद्रीत आणि आप्पलपोटा होऊ पाहतोय. त्यातही पोटभरण्याची लढाई तीव्र होत चालल्याने  त्याची दृष्टी गुढघ्याएवढ्या स्वार्थाशीच खिळते आहे . जरा दूरवर बघायचे कष्टही नाही घेत तो. म्हणून तर पूर्वजांनी जीवापाड वाढवलेली, जपलेली झाडं तो चार पैशापायी मागचा पुढचा विचार न करता खुशाल तोडतो आहे, विकतो आहे . दरसाल शिवारात थोडी थोडी वृक्षांची कत्तल होते. वृक्षहत्या थांबवायला कुणीच पुढे येत नाही. वृक्षाला जीव आहे, ते संवेदनशील आहेत. हे फक्त ज्ञान पुस्तकापुरतेच सिमीत झाल्याचे दिसते. लाकूड -घनफळ आणि किंमत ही भाषा झाडांना रोज ऐकवली जाते. झाडावर प्रेम करणारी माणसं आणि कोंबडीवर प्रेम करणारी माणसं सारखीच की काय? असा प्रश्न पडतो.  डोंगर -रानं कशी बोडक्यानं उन्हाला माथ्यावर घेताहेत. हिरवेपणाच विरळ होत चाललाय दुसरं काय? रस्त्याकडेने होणारी वृक्षांची कापाकाप बघून काळजाला पीळ पडतो. दगडासारख्या काळजाची धाडसी माणसं ट्रॅकरात कायद्याच्या टोपात मोरपीस खोचून लाकडं भरतात तेव्हा हा गाव आपला आहे याची मनोमन चिड येते आणि शरमही वाटते. वृक्षवल्ली आणि वनचरांना आपले नातेवाईक, आप्त मानणाऱ्या संतांच्या भूमीतीलच असं विसंगत वागणं पाह्यलं की समाज शिकला पण शहाणा झाला नाही , वृक्षाप्रती तो कृतज्ञ राहीला नाही.  याचंही वैषम्य वाटल्या खेरीज राहत नाही.
    अशाच एका रात्री अंथरुणावर पडलो होतो. कसलासा विचार मनात सुरू होता. वाढत्या बेचैनीने झोप येत नव्हती. त्यातच बाहेरच्या कडुनिंबाच्या झाडावर कोणा पक्ष्याची फडफड चालल्याचा आवाज आला. त्या पाठोपाठ पाखराच्या आर्त ओरडण्याचाही आवाज आला. मी कुस बदलून कानोसा घेऊ लागलो. तोच पुन्हा तशीच फडफड आणि तेच आर्त ओरडणे. मी अस्वस्थ झालो. का ओरडत असावेत एवढ्या गहिऱ्या  रात्री हे पक्षी? एखादा नागराज तर गेला नसेल ना त्यांच्या घरट्या पोत. त्याच्या पासुन पिलांचा किंवा अंड्याचा जीव वाचवण्यासाठीच तर त्या पक्ष्याचा शेवटचा प्रयत्न चाललेला नसेल ना? पुन्हा - पुन्हा होणाऱ्या पंखाच्या आणि त्या पक्ष्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने मनात धडकी भरली. आता रात्र त्याच्यासाठी काळरात्र ठरत असेल या जाणिवेने मी अंथरुणावर तळमळत होतो. धड काही करूही शकत नाही आणि तो आवाज ...त्याची ती अगतिकता ऐकुही शकत नाही. नकळत माझी नजर शेजारी झोपलेल्या पत्नीकडे गेली. दोन चिली -पिल्ली तिच्या कुशीत निर्धास्तपणे झोपी गेली होती. वाटले किती निरागस काळ असतो लहानपणातला. उगीच नाही म्हणत ' बालपणीचा काळ सुखाचा.'  मी मनानेच लहान झालो. आणि माझ्या बालपणाचे ते दिवस आठवले , डोळ्यासमोर साक्षात झाले. झाडावरील त्या अनाम पक्ष्याच्या पंखांचे भयावह फडफडणे आणि त्याचे ते भयव्याकुळ आर्त ओरडणेही अनेक शंका मनात ठेऊन थांबले होते.
         झाडं पंक्ष्याची आणि काही प्राण्यांचीही आश्रयस्थाने आहेत. झाडेच नाहीशी केली आणि सारी जमीन, डोंगर, माळ उघडे बोडके झाले की मग या पक्ष्यांना आणि प्राण्यांना कोण कुशीत घेणार? त्यांची केविलवाणी अवस्थातरी कोण पाहणार? झाडं म्हणजे सृष्टीच्या घरातील वडीलधारी मंडळी ! त्यांचं प्रेम मिळालं नाही तर सारं घरचं कोमेजेल. लहान झाडेही मोठ्या झाडाच्या सानिध्यानं खूप सहजपणानं वाढतात. सृष्टीचा खेळ सुसह्य होण्यासाठी झाडात जीव गुंतला पाहिजे. त्यासाठी झाडं हवीत.
          खेळावरून आठवलं. लहानपण ज्याचे त्याला प्रियच असते. कधीकधी गरीबा घरच्या मुलांच्या वाट्याला अधिक समृद्ध अनुभव येण्याचा देखील काळ हळूहळू पुढे  सरकत येतो. ज्याने एकेकाळी आम्हाला आपल्यात सामावून घेतले होते. बाजारातून आणलेल्या खाऊच्या पुड्याचा दोरा पकडण्यासाठी लहानग्यांची चढाओढ लागे. कधी दिवाळीच्या दिवसात नवा 'कटदोरा' मिळे. त्याला लागुनच दोरा गुंडाळलेली एक गोटी मिळे. हा दोरा आणि काडेपेट्यांच्या मदतीनं फोन तयार होई.  तर कधी कडब्याच्या धाटाच्या बैलगाड्या तयार केल्या जात. कधी चांदण्या रात्री 'एक पाय उन्हात, चांदनबनात' असा शिवाशिवीचा खेळ रंगे. उन्हाळ्यात ज्वारीच्या खळ्याच्या पाळूला घुगऱ्या खायला मिळत. कधी सुट्टीच्या दिवशी शेतातील हिवराच्या झाडावरील भुंगे धरायला मजा येई. अनेक लहानपोरं तर केवळ एक काठी दोन्ही पायाच्या मध्ये पकडून गाडीगाडी म्हणत धावत सुटत; गाडी चालवल्याचा आनंद घेत. शाळेच्या सुट्ट्या जणू नदीकाठानं हुदंडण्यासाठी आणि आंब्याच्या नि जांभळीच्या झाडावर सुरपारंब्या खेळण्यासाठीच असाव्यात इतकं घट्ट नातं या खेळाशी जमायचं.
          आज डोंगर -माळ पाहीला की पूर्वी तेथे असणाऱ्या झाडांच्या अनेक आठवणी मनात दाटतात. मोठमोठी झाडं गेलीत. नवीन दरवर्षी लावली जातात पण बऱ्याचदा नुसती लावलीच जातात. जपली,वाढवली जात नाहीत. दरवर्षी जून उजाडला की आपल्याकडे वृक्षलागवडची लगबग सुरू होते. डोंगरमाथ्यावर, सार्वजनिक ठिकाणी खड्डे खोदले जातात. वेगवेगळ्या व्यवस्थापनांना वृक्षारोपणाचे उद्दीष्ट ठरवून दिले जाते. बाजारातही रोपवाटीकेवाले आंबा, फणस, पेरू, नारळ, चिकू अशा फळझाडांची रोपे घेऊन येतात. शेतकरी आणि हौशी वृक्षप्रेमी अशी रोपे हमखास घेतात. अशी झाडे वाढतांना पाहुन ती ती कुटुंबे आनंदून जातात. सार्वजनीक झाडांचं मात्र एवढं कोडकौतुक नसते. म्हणून दरसाल त्याच त्या जागेवर वृक्षारोपण करण्याचा घोशा लावला जातो. 'झाड माझे मी झाडाचा' ही भावना वाढेल तो दिन भाग्याचा.  
    आपल्या मुलाबाळांना निरामय निसर्गाच्या कुशीतलं जगणं द्यायच आहे. त्यांना एक चैतन्यदायी वृक्ष सहवास द्यायचा आहे. निसर्ग संस्कार द्यायचा आहे. गावाशीरावातील वृक्षांची भेट घडवून आणायची आहे. गावाच्या आस्तीत्वात जसा नदीचा वाटा आहे तसाच वृक्षवेलींचाही आहे. वृक्ष हे गावाचे पूर्वज आहेत. पूर्वजांची पूनर्भेट खूप मायेची, प्रेमाची असणार आहे. त्यांच्या छायेचा, मायेचा हात अंगावरून फिरावासा वाटत राहते. ही पहा, समोरून शाळकरी मुलांनी काढलेली वृक्षदिंडी येते आहे. .पालखीत बसवलेले कोवळे रोप त्यांच्या सारखेच आनंदून गेले आहे. दिंडीतील प्रत्येक निसर्गाच्या वारकऱ्यांना थोडा हात देऊयात. त्यांची संवेदना अशीच ताजी ठेवण्यासाठी प्रयत्नरत राहुयात. धरेची हिरवेपण मनामनात उतरवूया!
=======================
        
     
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर