उसाच्या कविता
https://drive.google.com/file/d/1KLrnesFZ8f_wAbZKlDOVeEf1bh39I-di/view?usp=drivesdk
□ उसाच्या कविता : स्थलांतरीत कष्टकऱ्यांच्या प्रत्ययकारी कविता.
प्राचार्य डॉ. दादा मरकड
श्री. हरिहरेश्वर महाविद्यालय
कोरडगाव जि. अहमदनगर पीन ४१४१०२
भ्रमणध्वनी :९८५००५७3७१
_______________________________________
मराठीमध्ये कामगार किंवा मजूरांच्या भावजीवनांचे चित्रण असणाऱ्या कवितासंग्रहाची संख्या अत्यल्प आहे. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेतून हे भावजीवन प्राधान्याने समोर आलेले आहे. कैलास दौंड हे नाव समकालीन मराठी कवितेत महत्त्वाचे नाव आहे. 'उसाच्या कविता ' हा त्यांचा उसतोडणी कामगारांच्या जीवनानुभवाचे चित्रण असणारा कवितासंग्रह. २००१ मध्ये प्रथम प्रकाशित झाला. त्याची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. केवळ बेचाळीस कविता असणारा हा संग्रह दुर्लक्षित कामगारांच्या जीवनानुभवाचे चित्रण करणारा मराठीतील पहिला कवितासंग्रह म्हणून सुरूवातीपासून लक्षवेधी ठरला आहे. प्राचार्य वसंत बिरादार यांची आस्वादक प्रस्तावना आणि चित्रकार दिलीप दारव्हेकर यांची दोन रेखाटने तसेच शितल गोरे यांचे देखणे मुखपृष्ठ ,द. ता. भोसले यांची मर्मग्राही पाठराखण. त्यामुळे 'उसाच्या कविता ' आणखी वेधक झाल्या आहेत.
ऊसतोडणी कामगार, त्याचे कष्टमय जगणे, त्याच्या पत्नीचे त्याला साथ देत, कष्टाशी सामना करत संसार सावरणे . आहे त्या व्यवस्थेला अगतिकतेने स्वीकारणे. त्यातही काही सहजीवनातील प्रीती भावाचे क्षण जगुन घेणे. यासह भोवतालचे जग आणि स्वतःचे जपलेले भावजीवन याचे मनोज्ञ दर्शन या कवितांमधून दिसते. कवीने ऊस आणि त्याची तोडणी करणाऱ्या कामगाराचा अतुट अनुबंध शब्दात मांडलाय तो असा :
'तू तोडतोस तरी पण
तुला मात्र ते कुरवाळतात
पोटच्या मुलासारखे
कदाचित
तुझ्या सारखाच त्यालाही
आता
विद्रोह सोसत नसावा.'(पृष्ठ-१३)
असा हा ऊस हाच तोडणी कामगारांचा जगण्याचा आधार बणतो. त्यामुळेच तो साला सालाला नवा ॠतू पिऊन हात पाजळण्याची वाट पाहत बसतो. जेव्हा गावातून कामगार ऊस तोडणीच्या कामासाठी बेगाव होतात तेव्हा जणू उघड्या नागड्या देहावर सहकाराचे घाव सोसायलाच ते सिद्ध होत असतात. मात्र याही वेळी गावात काही साव साळसूदपणे थांबलेले असतात याकडे कवी लक्ष वेधतो.
उसाच्या फडातील काम दिवस रात्रीची तमा न करता सुरूच असते. जणू ते सवयीचे झालेले असते. या कामातून मिळणारा तुटपुंजा पैसा अभावांची पूर्तता करू शकत नाही. त्यातही 'उचल' नावाने आगावू रक्कम घेतलेली असते तीच फिटता फिटत नाही. ही जन्मोजन्मीची उचल कशी फिटावी ही चिंता त्याला लागून असते. हे सततचे काम मोटारीचा भोंगा वाजला की स्थलांतराची चाहुल लागावी असे असते. आपल्या सहधर्माचारीणीचे प्रेम हाच एकमेव जीवनाधार बणून राहतो. त्यातून :
'फिरला हात माझा तूझ्या कुंतलातून
सखे आज आला पाषाण कंठ दाटून.'(पृष्ठ २१)
यातून 'मनात उजेडण्याची खंत ' लागते.
कधी कोप्या पेटण्यासारख्या नैसर्गिक आपत्ती देखील येतात. तर कधी दिवाळसणाला देखील लुटलं जातं. कधी कधी रोगराई देखील येते. कवी लिहीतो -'इथल्या हर एक /सणाला /दुःखाचा स्पर्श आहे. (पृष्ठ -५७)
हे कमी की काय म्हणून कधी मुकादम वाईट इच्छा धरून असतो तर कधी ट्रकचा ड्रायव्हर प्रहर रात्र उलटल्यावर कोणा कोणाला उठवत असतो. कधी कधी रस्त्याकडेच्या कोप्याजवळ दिवसा दुपारी आंघोळ करणाऱ्या स्रीयांकडे मोटारसायकलस्वारांच्या नजरा विजेचे गोळे फेकत असतात. अशावेळी या कामगारांच्या 'जगणे निश्चित करण्यासाठी /हाताच्या वळतात मुठी (पृष्ठ -५४)
ऊसतोडणी कामगार थंडीत शेकत बसण्याऐवजी हातात कोयता घेतो. पाषाण मुर्तीतला देव लोप पावलेला आहे याची त्याची खात्री होते. फार पूर्वी मनात फुललेल्या स्वातंत्र्याच्या आशा प्रत्यक्षात अवतरल्याच नाहीत. 'तोच सूर्य नभात ' या कवितेत कवी लिहीतो -'फुलल्या होत्या मनात, स्वातंत्र्याच्या आशा
दशके किती लोटली, तेथेच त्या तशा' किंवा
'रोज पेटती येथे, ज्योती उद्घाटनाच्या
वाती नच पेटती, भिंतीत झोपडीच्या.'(पृष्ठ -२७)
अशा वास्तवाला भिडत जगणारा माणूस कष्टाच्या ओव्या देखील गातो हे 'काही ओव्या' या कवितेतून दिसतो. 'गोधडी','माणसे ','मी कवितेच्या गावात आलो ','घाव ','हाळी','कोप्या','सलगी ' या वास्तवावर भाष्य करणाऱ्या व विचार करायला भाग पाडणार्या कविता. तर 'अवर्षणाचे गाणे ','आभाळगाणं','अजून पाऊस झाला नाही', 'न कोसळणारा पाऊस' या पावसाच्या अभावाच्या विभिन्न तर्हा असणाऱ्या 'माझ्या मनात कोसळतो न बरसलेला धुवाॅधार पाऊस' उलगडणार्या कविता.
या कवितासंग्रहातील कवितामधुन जसा एक वीत खळगीसाठी आयुष्यभर कष्टाशी सलगी करणारा आणि अखेरच्या मुक्कामी फाटक्या घोंगडीत जाणारा कामगार दिसतो तसाच 'उसाचं रान /करतय उत्सव / पडलं दव.' अशा मनोवस्थेने जीवनेच्छा टिकवून ठेवणारा त्याचा आश्वासक सुर देखील दिसतो. ही कविता चिंतनशील म्हणूनच महत्त्वाची आणि लक्ष वेधून घेणारी आहे. साधी, सहज सोपी आणि संवादी भाषा हा या कवितेचा आणखी एक विशेष आहे. परिशिष्ट मध्ये ग्रामीण बोलीतील शब्दांचे अर्थ दिल्याने या कविता आकलन सुलभ झाल्या आहेत.
○उसाच्या कविता : कवितासंग्रह.
○कवी :कैलास दौंड
○प्रकाशक :अक्षरवाङमय प्रकाशन, पुणे ४१
○पृष्ठे :६४मूल्य १०० रू.
--------------------------------------------------------------------------
प्राचार्य डाॅ. दादा मरकड
श्री. हरिहरेश्वर महाविद्यालय
कोरडगाव जि. अहमदनगर पीन ४१४१०२
भ्रमणध्वनी :9850057371
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा