कवी विचार मंच, शेगाव आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण. अध्यक्ष डाॅ. कैलास दौंड
[ कवी विचार मंच, शेगाव आयोजित कोकमठाण(शिर्डी), येथे २ जून रोजी झालेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण. अध्यक्ष - डॉ. कैलास दौंड ]
काव्य रसिक बंधू भगीनींनो नमस्कार,
कवी विचार मंच ,शेगाव आयोजित या कोकमठाणच्या भूमीत संपन्न होत असलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आपणाशी संवाद साधतांना मनस्वी आनंद होत आहे. याचे कारण म्हणजे कवितेच्या एका समान धाग्याने आपण गुंफले गेलो आहोत.
भाषेत जेव्हा गद्य नव्हते तेव्हा पद्य अस्तित्वात होते हे आपल्याला प्राचीन ग्रंथातून प्रचितीस येते. माणसाच्या हृदयाला सहज जाऊन भिडणारी, त्याच्या मनाशी, अंतर्मनाशी संवाद करणारी कविता ही एक मनस्वी अभिव्यक्ती आहे. कवी विचार मंच, शेगाव अशा अभिव्यक्तीशी निष्ठावान असलेला काव्य समुह आहे. म्हणून ओळीने तीन उत्कृष्ट साहित्य संमेलनाचे आयोजन करणारा, प्रातिनिधिक संग्रह प्रकाशित करणारा, दर्जेदार साहित्यकृतींना आणि निष्ठावंतांना गौरविणारा हा मंच आजच्या काळातील माय मराठीच्या कंठातील तेजस्वी आभूषण आहे.
आधुनिक मराठी कवितेच्या अगदी आरंभ काळापासून कवींच्या समूहाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. रविकिरण मंडळाची कविता ही अशाच प्रकारचा कविता लेखन मध्यवर्ती ठेऊन एकत्र आलेला गट होता. Sun tea clab हे त्याचे दुसरे नाव. १९२० ते १९३५ हा त्याचा कार्यकाल. यातुन माय मराठीला सुंदर आणि गेय जानपदगीते म्हणता येतील अशी लोभस कविता मिळाली. कवी गिरीश , माधव ज्युलियन, वि. द. घाटे,मनोरमाबाई रानडे, श्री. बा. रानडे, द. ल. गोखले, ग. त्र्यं. माडखोलकर हे सगळे रविकिरण मंडळाचे कवी होत. त्यांनी मराठी कवितेला घराघरात पोहोचविले. रविकिरण मंडळाचे अनुकरण करत चंद्रकिरण मंडळ, धृव मंडळ, लॄकिरण मंडळ अशी आणखी काही मंडळे त्याकाळी अन्यत्र कविता लेखनासाठी स्थापन झाली.
या अशाच निर्मितीक्षम समुहाचे काल सुसंगत रूप म्हणजे 'कवी विचार मंच, शेगाव ' ही संस्था , म्हणजे कवींचा समुह आहे. फेसबुक,व्हॉटस्अप या समाज माध्यमाचा अत्यंत सदुपयोग करत आणि स्वयंअनुशासन पाळत हा (group) गट बहरला आहे. कविता, गझल, हास्य कविता यांची निर्मिती, काव्यचर्चा, विविध काव्य स्पर्धांची रेलचेल या ठिकाणी होते आहे. ही कौतुकाची बाब आहे. समाजमाध्यमाचा साहित्याभिमुख समाज निर्मितीसाठी होत असलेला हा वापर समाजाला एक दिशा देणारा आहे. वाचन संस्कृती वाढवणारा आहे आणि निकोप समाज निर्मितीमध्ये हातभार लावणाराही आहे. या समुहाचे संस्थापक अध्यक्ष कवी शिवशंकर चिकटे व इतर सर्व सदस्यांचे हे काम मला अतिशय महत्त्वाचे वाटते. मराठी भाषा संवर्धनाचे देखील हे कार्य आहे. आज मराठी साहित्य जगतात कंपूशाहीचे पीक आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर कवी विचार मंचचे काम परस्पर संवादाचे आणि कविता लेखनाला प्रेरणा देणारे असून महत्वाचे आहे.
या मंचचे अध्यक्ष शिवशंकर चिकटे यांच्या बद्दल जेव्हा मी चित्रकार आणि कवी अरविंद शेलार यांच्याकडून ऐकले तेव्हा मला लेफ्टनंट कर्नल किर्तीकर अध्यक्ष असलेल्या जळगावातील त्या प्रसिद्ध कविसंमेलनाची आठवण झाली. लेफ्टनंट कर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी १९०७ मध्ये बालकवींच्या(१८९० ~१९१८) कवितेला जगासमोर आणता आले. तश्याच प्रकारे 'कवी विचार मंच' च्या माध्यमातून शिवशंकर चिकटे नवे कवी, कवयत्री, गझलकार माय मराठीच्या क्षितिजावर प्रकाशमान व्हावेत यासाठी आनंदाने प्रयत्न करत आहेत. ही सुंदर गोष्ट आहे.
मुळात कवी किंवा कुठलाही कलावंत त्याच्या कलेची निर्मिती कशासाठी करतो? याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा साहित्याच्या मम्मटाने सांगितलेल्या यश,अर्थप्राप्ती, व्यवहारज्ञान,अशुभनिवारण,कांतासंमित उपदेश, उच्च आनंद या प्राचीन व डाॅ. स. रा. गाडगीळ आणि अ. वा. कुलकर्णी यांनी सांगितलेल्या आधुनिक प्रयोजनांची चर्चा होत राहते. मनोरंजन, विरेचन, अनुभव समृद्धी, स्व -रूप निष्ठा ही अ. वा. कुलकर्णी यांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने तर स. रा. गाडगीळांनी या व्यतिरीक्त शुद्ध आनंद व आत्मविष्कार, परतत्वस्पर्श अशी आणखी काही प्रयोजने सांगितलीत. मात्र माणसाचे माणूस असणे हे साहित्यादी सर्वच कलांनी सुंदर आणि लोभसवाणे केलेले आहे, हे सर्वाधिक महत्वाचे आहे. त्या दृष्टीने जनकल्याण आणि लोकभावनेचे अविष्करण ही आणखी नवी प्रयोजने म्हणावी लागतील . माणसाच्या संवेदना जीवंत ठेवण्यासाठी, त्याचे माणूसपण अबाधित राखण्यासाठी कोणती ना कोणती कला त्याला अंगीकारावी लागते. संस्कृत पंडीत भृतुर्हरी(इ. स. पू. सहावे शतक) त्याच्या 'नीतीशतक' या ग्रंथातील एक नीती सांगतांना लिहितो की,
'साहित्य, संगीत, कला विहीन: , साक्षात पशु पुच्छ विषाण विहीन: ||'
तृणम न खाद्न्नपि जीवमान: , तद भाग देयम परम पशुनाम ||'म्हणजे
ज्या मनुष्याला साहित्य , संगीत किंवा कोणतीही दुसरी कला अवगत नाही, तो साक्षात शेपटी आणि शिंगे नसलेल्या जनावरासारखा आहे. फरक इतकाच आहे की, तो गवत न खाता अन्न खातो . अशा माणसाची गणना मोठ्या पशूंच्या श्रेणीत केली पाहिजे. कलाविहीन असलेल्या मनुष्याचे जगणे हे पशूपातळीवर जाणारे ठरते .
कविता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कविता कोठे नाही? आनंद, दुःख,प्रेम, विरह, खेद, खंत, वात्सल्य, कारूण्य, दैन्य,वेदना अशा कोणत्याही भावोत्कट समयी कविता असतेच सोबतीला. मानवी जीवनात अपूर्णतेची जाणीव सतत होत असते, त्याला परीपूर्णतेची ओढ असते, जीवनात काही भौतिक आणि आत्मिक आनंद देणार्या गोष्टी मिळाल्या की काहीतरी विशेष मिळाल्याचा आनंद होतो. कधी कधी काही गोष्टी आपली इच्छा नसतांना आपल्या जवळून निघून जातात, काहीतरी हरवल्याची खंत वाढवून जातात तर कधी हुरहूर लावून जातात. अशा वेळी माणसाच्या मदतीला शब्दच धाऊन येतात. त्या शब्दांना उत्कटतेची आणि लयीची जोड लाभली की कविता निर्माण होते. कवितेचा माणसाला आधार वाटू लागतो. अशी कविता इतरांनाही त्या कवीच्या भावनेशी तादात्म्य पावायला भाग पाडते. आपणही शब्दांशी जोडले जातो. माझी एक कविता आहे शब्दा विषयीची.
शब्द माझे सोबती
जे जोजावती मला
शब्द माझ्यासाठी
बांधती श्रावण झुला.
शब्द अधरी येती
वेदना वाटुनी घेती
शब्द दाटूनी येता
सुख सांगत जाती.
मी शब्दांचा वेडा
तसा शब्द पिपासू
शब्दांनीच जगण्याचा
अर्थ बघतो तपासू.
तर बा. सि. मर्ढेकर यांनी त्यांच्या प्रसिद्ध कवितेत मागणे मागीतले आहे -
भंगू दे काठीण्य माझे
आम्ल जाऊ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे.
कवी कशासाठी लिहीतो कविता? स्वानंदासाठी,चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी,वाईटाच्या अंतासाठी. मग हे घडते का सारे त्याच्या कविता लिहीण्याने? तर हे घडण्याच्या शक्यता निर्माण होतात! आशावाद वाढीस लागतो, पर्यायाने जीवन जगण्यासाठी उर्जा मिळते. खरा कवी शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहत असतो. काय आहेत संतांचे अभंग? काय आहेत विविध धर्मग्रंथ? रामायण काय आहे? महाभारत काय आहे? वेद, श्रुती, स्मृती काय आहेत? तर माणसाला बळ पुरवणारे ते काव्यग्रंथ आहेत. आधुनिक कवितेने सामाजिक आणि भावनिक जाणिवा सजग ठेवत हेच बळ वाचक, रसिक , अभ्यासक यांना पुरवलेले आहे असे आपणास खात्रीने म्हणता येईल.
लेखक आणि कवी नसणारा माणूस हा सामान्य आणि परखड व्यवहारिक भाषेत बोलत असतो. तर कलावंत हा कलेच्या माध्यमातून, प्रतिमा आणि प्रतिकांतून बोलत असतो. जेव्हा तोही सामान्य कला विहीन माणसासारखा व्यक्त होतो तेव्हा ती उथळ अभिव्यक्ती ठरते. हे देखील कवी आणि कलावंतांनी ध्यानी घेतले पाहिजे. कलावंत हा सामान्य माणूसच असतो पण त्याच्या गुणात्मक अभिव्यक्तीने तो विशेष म्हणून ओळखला जातो.
दर्जेदार कवितेच्या निर्मितीसाठी कवीची वैचारीक भूमिका स्पष्ट होणे आवश्यक असते. कारण कविता हा आत्म्याचा आवाज असतो. त्यातील विसंगती कवीच्या प्रामणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे करते. आजच्या काळात वैचारिक भूमिका पक्की नसणारे अनेक कवी आपल्याला अवती भवती दिसतात. कधी पुरोगामी तर कधी प्रतिगामी भूमिका कवितेतून व्यक्त करणारे कवी पाहिले की त्यांच्या वैचारिक गोंधळलेपणाची किव वाटू लागते. कधीकधी हे गोंधळलेपण भाबडेपणाच्या पातळीवर देखील उतरते. आपल्या निर्मिती मागच्या प्रेरणा आणि आपली भूमिका कलावंताला समजली पाहिजे. ती त्याने समजून घेतली पाहिजे. वर्चस्ववादी विचारधारेचे असण्यापेक्षा मानवतावादी असणे नेहमीच चांगले. माणूसकी हाच खऱ्या कलावंतांचा धर्म असतो. पूर्वासूरींनी लिहून ठेवले आहे -
'एक मागतो माणूसकी मी
पुरे एवढी भिक्षा
काळ येतसे मागावूनी
पहावया सत्व परीक्षा.'
कवीला त्यासाठी आपल्या मनाला प्रश्न विचारण्याची सवय जडली पाहीजे. आणि मुख्य म्हणजे कलावंताला स्वतःचे व्यक्तीमत्व आणि कल समजला तर अभिव्यक्ती अधिक चांगली आणि 'स्व'शी प्रामाणिक होऊ शकते. सुदैवाने 'कवी विचार मंच' च्या (Facebook page) पृष्ठावरील कविता पाहिल्या असता मनाला समाधान मिळते. तेथे भेटलेल्या कवितांमधून दोनच उदाहरणे समोर ठेवतो -
"घामास मी माझ्या स्वस्तात विकल्यावर
नावाजले शहरी, गावातले दाने " (शिवकवी ईश्वर मते)
"दबा धरूनी बसले
डोळे काही वाटेवर
वार करतात असा
नि उठे व्रण उरावर "(अदीत्य जाधव)
अशा अभिव्यक्तीतून कवींची बांधिलकी स्पष्ट होते.
कवीच्या मनात आणि त्याच्या सभोवतालात जेव्हा सुयोग्य परिस्थिती असते तेव्हाही कवी कविता लेखन करतच असतो. कवीच्या चित्तवृत्ती सदैव जाग्या असतात. तरल संवेदनशीलता त्याला लाभलेली असते. ती विकसितही करता येते.
कलेच्या बाबतीत प्रतिकूल परिस्थितीत चांगल्या कलाकृती निर्माण होतात. जेव्हा अभिव्यक्तीवर बंधने येतात तेव्हा कलावंत आपली निष्ठा आणि सर्वस्व पणाला लावून कलाकृती निर्माण करत असतो. बंधनातही कला फुलल्याची कितीतरी उदाहरणे जगात सापडतात. कलावंत जोवर असमाधानी असतो तोवरच चांगल्या कलाकृतीच्या निर्मितीची शक्यता अधिक असते.
कवी ,गझलकार व ललित लेखक यांनी अन्य कलावंताप्रमाणे निर्मिती करतांना निरनिराळे प्रयोग अवश्य केले पाहिजेत. आधीच्या कवींनी केलेल्या रचनेच्या प्रयोगांचे फलित म्हणजे विविध वृत्ते, अलंकार, छंद यांची कवितेला मिळालेली देण होय. कवींनी सुरूवातीच्या काळात चांगल्या कवितेच्या अनुकरणाचा आधार घेतला तरी पुढे तो सोडून देऊन लेखन सूरूच ठेवले की मग आपली स्वतःची शैली सापडू लागते. कोणाच्याही चांगल्या कवितेचे, चांगल्या गझलेचे स्वागत करून तिचा आस्वाद घेतला पाहीजे. लिहीणार्याने चांगले वाचक असलेच पाहिजे. आणि चांगला श्रोता सुद्धा असले पाहीजे. स्वतःला समृद्ध करण्याचा तो एक सर्वांना जमेल असा खात्रीचा मार्ग आहे. म्हणून प्राचीन, मध्ययुगीन संताची आणि शाहिरांची, पंडीतांची कविता वाचली पाहिजे. आधुनिक काळातील केशवसुत, बालकवी, भा. रा. तांबे,मर्ढेकर,ना. घ. देशपांडे , नारायण सुर्वे, शांता शेळके, इंदिरा संत यांच्या पासून तर थेट संतोष कोकाटे, अरविंद शेलार , राम गायकवाड यांच्यापर्यंतच्या कवींची कविता मिळवून वाचली पाहीजे.
जाता जाता आणखी एका मुद्द्याला स्पर्श करतो,'साहित्यिक, कवी व इतर कलावंत यांची संमेलने व्हावीत की न व्हावीत?' आणि 'निर्मितीक्षम कलावंतांच्या संमेलनाचे फलित काय?'
तर अशी साहित्य संमेलने ही काळाची गरज आहे. येथे समान जाणीवेची माणसे भेटतात. नव्या कविता,गझलांचा आस्वाद घेता येतो. विचारांची, कल्पनांची देवाण-घेवाण होते. निखळ साहित्यानंद मिळतो, निर्मितीसाठी एकांत आवश्यक असला तरी संमेलनातून त्यासाठी उर्जा मिळते. म्हणून सर्वांच्या कविता, गझल लेखणांचे स्वागत करणाऱ्या कवी विचार मंच या संस्थेच्या अशा उपक्रमाचे निश्चितच मराठी साहित्यविश्व कौतुक करेल. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तुम्ही माझ्या सारख्या सामान्य कवीला बहाल केलेत, मला कवितेच्या संबंधाने विचार मांडण्याची संधी दिलीत. आपण हे विचार ऐकून घेतलेत त्याबद्दल मी आभारी आहे. या संमेलनाच्या नेटक्या संयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष कवी शिवशंकर चिकटे त्याचबरोबर कवी राम गायकवाड आणि कवी, चित्रकार अरविंद शेलार, या सत्राच्या सुत्रसंचालिका व मंचच्या उपाध्यक्षा कवयत्री राधिका देशपांडे यांच्या सह सर्वच सदस्य आणि पदाधिकारी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद!
( कोकमठाण (शिर्डी) येथे दिनांक २ मे २०१९रोजी होत असलेल्या कवी विचार मंच, शेगाव बहुउद्देशीय संस्था अकोला आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण. )
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
डॉ . कैलास दौंड
9850608611 kailasdaund@gmail.com
[डाॅ. कैलास रायभान दौंड : हे कवी, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. ते मराठीतील दखलपात्र साहित्यिक आहेत . ]

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा