'मातीचे अत्तर

 


•'मातीचे अत्तर' : निसर्गरूपाचे विलोभनीय दर्शन घडवणारा हायकू संग्रह.
                              डाॅ. कैलास दौंड.

'मातीचे अत्तर' नावाचा राजन पोळ यांचा नवाकोरा हायकू संग्रह नुकताच संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. एकुणच
जपानचा हायकू आता मराठी मातीत बर्‍यापैकी बाळसे धरू लागलेला आहे. तो देखणा आणि भावतरल होत होत नेमक्या अक्षरातही अवतरत आहे. अल्पाक्षरत्व हे तसे एकूणच कवितेचे व्यवच्छेदक लक्षण मानले गेले असले तरी सद्ध्याच्या पसरट आणि गद्यात्म स्वरूपाच्या कवितेमुळे रसिकवाचकांनी कवितेकडे पाठ फिरवल्याचेही कधीकधी नजरेस येते. तर यमक, छंद आणि लघूगुरू यांच्या तांत्रिकतेत अडकलेली व बर्‍यापैकी वाढत असलेली बहुतांश मराठी गझल आपला प्रभाव आणि परिणाम दाखवू शकत नाही. अर्थात मोजकी व सकस गझल लिहिणारी चार सहा नावेच मराठीतील उत्तम गझलकार म्हणून ओळखली जातात. मध्यंतरी 'चारोळी' काव्यप्रकाराने युवावर्गाला भूरळ घातली होती. 'हायकू' हा त्याही पेक्षा लहान काव्यप्रकार आहे. तीनच ओळीचा. त्यातही पहील्या व तिसर्‍या ओळीत पाचच अक्षरे व दुसर्‍या ओळीत सात अक्षरे असे अत्यंत आटोपशीर प्राजक्त फुलासारखे देखणे रूप लाभलेला हायकू मराठीतही तितकाच लोभस ठरला आहे. मराठीत स्व. शिरीष पै, श्याम खरे, दयासागर बन्ने, राजन पोळ, तरूजा भोसले, प्रभाकर साळेगावकर आदींनी केलेले हायकू लेखन लक्षात राहणारे आहे.
     'मातीचे अत्तर' मधील हायकू विविध भावना आणि प्रसंगांचे, निसर्गाचे एक सुंदर चित्र उभे करतात. दृश्यात्मकता हा देखील हायकू चा महत्त्वाचा विशेष. तोही इथे जपलेला दिसतो. पाऊस, प्रतिक्षा, प्रिती, भक्ती, निसर्ग, भय, सौंदर्य, वात्सल्य, अतिवृष्टी, दुष्काळ, शेती, शेतकरी, ऋतू चित्रण, वास्तव दर्शन आणि हायकूंची निर्मिती अशा विविध विषयांना स्पर्शून भावात्म प्रत्यय देणारे हायकू या संग्रहात भेटतात. उत्कट क्षणांना टिकणारे हायकू दीर्घकाळ ओठावर राहतात.
         'पाऊस' हा सार्‍याच चराचरांच्या आस्तित्वाचा प्राणभूत घटक. त्याची विविध रूपे सर्वांनाच भूरळ घालतात. कवींना तर जरा अधिकच! पावसाची चाहुल लागताच मनात पाऊसकाळ उगवतो आणि राजन पोळ नावाचा हायकू कार लिहीतो :
काळ्या ढगांनी
व्यापलंय आभाळ
पाऊसकाळ.
आणि जेव्हा पाऊस थेंब धरेवर पडू लागतात आणि मृदगंध अवतरू लागतो तेव्हा तो लिहीतो :
पाऊस थेंब
मातीमध्ये लपला
अत्तर झाला.
कधीकधी याच पाऊसक्षणाला लागूनच कुणाचा संभाव्य विरह व्याकूळ करू पाहतो अशावेळी एक देखणा हायकू कवीकडून लिहून होतो तो असा :
माझ्या डोळ्यात
साठलाय पाऊस
नको जाऊस.
प्रितीभावना आणि कविता यांचे अनाम नाते आपल्याला माहिती असते. ' मातीचे अत्तर' मध्ये  प्रितीभाव उजागर करणारे अनेक भावकोमल हायकू आहेत. उदा :
चिंब भिजलो
पहिल्या पावसात
हातात हात.
पावसात हातात हात घेणे असो की, ओल्या वाळूवरील पाऊलठसे पाहणे असो. हे जेव्हा हायकू रूपात येते तेव्हा अधिक देखणे होत असल्याचा प्रत्यय इथे जागोजागी येत राहतो. जसे -
पाऊल ठसे
ओल्या वाळूवर
तू गेल्यावर.
किंवा
नको तू जाऊ
डोळे भरून आले
प्रेम मी केले.
तिने केसात माळलेला सुगंधी केवडा, घरासमोर असलेला लाल फुलांचा गोड गुलमोहर आणि सौंदर्यवतीची नखशिखांत अदाकारी व तिच्या सोबत सुगंध ' हायकू' मधून अधिकच हवाहवासा होत जातो. हे सत्य की काव्यात्म भास? असा प्रश्न पडतो. राजन पोळ सहजच लिहून जातात:  
आरसपानी
सौंदर्य तुझे खास
नुसते भास.
     वात्सल्य भावना ही प्रतिभावनेचेच एक रूप. आई आणि तिचे लेकरू यांच्यातील नैसर्गिक ओढ, माया यातुन वाहत असते. त्या मायेत माणूस वाढत असतो. राजन पोळ यांच्या कवी मनाला वात्सल्य भावनेने खुणावले नसेल तरच नवल! त्यांनी लिहीलंय.
साखरमाया
आईची माझ्यावर
आभाळ छाया.
किंवा दुसरा हायकू पहा:
रोज मनात
आईची आठवण
पाणी डोळ्यात
साद घालणारी गावाकडील रक्ताची नाती वात्सल्यभाव जागवतात. भक्तीभाव हा माणसाच्या श्रद्धेचा विषय.
फुले वाहिली
देवाच्या देव्हार्यात
सुगंधी हात.
या सुगंधी हाताने देवाला फूल वाहिले जाते. ते सुगंधी असेल याची काळजी घेतली जाते. कृष्णकमळ पाहून कवीला ते देवाचे फूल आहे असे वाटते आणि कवी पुढील हायकू लिहीतो-
कृष्णकमळ
बेधुंद सुवासाचे
फूल देवाचे.
देव हा अनेकांच्या श्रद्धेचा विषय. पंडरीच्या
विठ्ठलाच्या संबंधाने ही काही हायकू या संग्रहात आहेत. त्यातून सशक्त भक्तीभाव दिसतो.
टाळ मृदंग
हरिनाम गजर
मुखी अभंग.
हा हायकू मनाला लीलया भिडणारा आणि स्मरणात राहणारा असाच आहे.
मानवी जीवनात भीती या भावनेचेही बरेच प्राबल्य असते. साप हा शब्द उच्चारताच भिती दाटून येते. कविने हा क्षण हायकूत फार उत्कटतेने टिपला आहे तो असा :
पिवळा जर्द
साप सळसळला
काटा अंगाला.
निसर्ग चित्रण करणे, निसर्गातील विशिष्ट क्षण पकडणे हा तर हायकूचा स्थायीभावच. मातीचे अत्तर मधून याचा प्रत्यय येतो.
लुकलुकले
काजवे अंधारात
चांदनरात.
किंवा
बाभळ उभी
फुले पिवळशार
काट्यांचा भार.
या सोबतच मातीतून फुटणारे हिरवे कोंब, आंब्याच्या झाडाला लगडलेले आंबे, काळ्या ढगांच्या धावणार्‍या सावल्या, आसमंताला भिडत आभाळ होणारे धुरांचे लोट , मृत्यूच्या वाटा ठरणाऱ्या भयकारी त्सुनामी लाटा, चंदेरी वाट मागे ठेवत जाणारी गोगलगाय, नभाशी खेळत सैरभैर उडणारे पक्षी, पठारावरील गंध फुलांची मखमली चादर, दूरवर दिसणारे भासमान क्षितिज आणि त्यावरील रंगोधळण, रम्य प्रभात,विलोभनीय सूर्यास्त,  घाईघाईने पळणारे ढग असे निसर्गातील नानाविध क्षण राजन पोळ हायकू मधून अधिक देखणेपणाने पकडतात. अशावेळी हे हायकू पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात. सौंदर्य हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. त्याचा साक्षात्कार घडवणारा हा हायकू पहा :
लाल पाकळ्या
फुललाय गुलाब
काय रुबाब!
ऋतूचक्रातील विविध ॠतू निसर्गरूपाला नवलाई बहाल करतात. या रूपांची भूरळ कवींना पडणे स्वाभाविक समजले जाते. त्याची तरल संवेदनशीलता ही नवलाई टिपते. वर्षा, वसंत, शिशिर,ग्रीष्म अशा ॠतूंचे दृष्य मातीचे अत्तर मधील काही हायकूतून प्रत्ययकारी रितीने आलेले पहावयास मिळते. उदा. -
'आला श्रावण /रान झालं हिरवं /अगदी नवं.'
'आला वसंत /बदललाय ऋतू/ येशील ना तू?'
शिशिर ऋतू /झाडांची पानगळ /पक्ष्यांना झळ.'
'नको रुसवा/ वसंत ऋतू आला/सोड अबोला.' 'दारी सजलं /मखमली तोरण/ दसरा सण.'
हे हायकू त्यादृष्टीने महत्वाचे आहेत.
                   ॠतूंच्या बदलाचा शेतीवर पर्यायाने लोकजीवनावर मोठा परिणाम होत असतो.  आपली शेती मोसमी पावसाची. पाऊस पडला तर खूपच पडणार. नाही पडला तर दुष्काळच. त्यामुळे अतिवृष्टी आणि दुष्काळ हे शेतकर्‍याचे मोठे शत्रूच जणू. भोवतालाचे सजग भान असणाऱ्या हायकूकारांच्या नजरेतून हे क्षण सुटणे कसे शक्य आहे?  अतिवृष्टीचे क्षण कवीने शब्दात कसे पकडलेत ते पहा :
'कुठे साठवू/पाऊस हा सगळा/दाटला गळा.'
आणि
'माझी आसवं/पावसात लपली/ नाही दिसली.'
जसे अतिवृष्टीने पिकाचे नुकसान होऊन डोळ्यात आसवे येतात तसेच दुष्काळात डोळे पाणी शोधत राहतात. रानातील पिके माना टाकतात. सारी शेतजमीन भेगाळून जाते. रणरणत्या उन्हामुळे पक्षी सुद्धा झाडावरून उडून जातात. ही सारी दृश्यात्मकता कवी प्रभावीपणे हायकूत पकडतो ती अशी :
'ऊस वाळला/ उभ्या रानामधला/जीव जळला'
'नाही पाऊस /भेगाळली भुई/चिंतेत आई.'
'उडाले पक्षी/ झाले मोकळे झाड/ किती ओसाड.'
हे तीनही हायकू दुष्काळाचे रूप भिन्न रितीने दाखवतात ते विशेष. एकूणच शेतकरी बर्‍याचदा तोट्यातच असतो. हाती काही उरतच नाही. सहाजिकच कवीला हायकू स्फूरतो :
  'राब राबला
   शेतकरी शेतात
   शून्य हातात.'
असे असले तरी त्याचे म्हणून काही समाधानाचे क्षणही त्याच्या जीवनात असतात. पीक चांगले आले की तो आनंदतो. तो आनंद
'हिरवेगार
भुईमुगाचे रान
भुईचे दान.'
या हायकूतून कवी व्यक्त करतो. तर शेतावरून धावणारी गंधभारली झुळूक हायकू होऊन अवतरते ती पुढील प्रमाणे :
मंद झुळूक
भाताच्या शेतातून
वास घेऊन.
शेतीतील पिके चांगली आली की मग सण, उत्सव देखील आनंदायी होतात. उत्साही बनतात. लोकजीवन आनंदी होते.
'ढोल लेझीम/ मावळतीला सांज /वाजते झांज.'
असा हायकू त्याची साक्ष देतो. आपल्या आनंदाचा दुसर्‍यांना होणारा त्रास पाहून कवी मन दुःखी होते. 
'पतंगबाजी
आभाळभर नक्षी
घायाळ पक्षी.'
  काही हायकू तून कवीची  हायकू विषयक भूमिका व्यक्त होतांना दिसते. हायकू निर्मितीचा क्षण जणू समाधीक्षणच असतो या भावनेतून कवी राजन पोळ पुढील हायकू लिहीतात.
  हायकू माझे
  काळजातले मन
  समाधिक्षण.
एकूणच हायकू लेखनाची प्रक्रिया उत्कट, साधी आणि सरळ आणि भावानुभवाशी निगडीत आहे.
'शब्द लिहिले /सहज कागदावर /हायकू झाले.'
किंवा
'हायकू माझा/ पावसात लिहिला/नवीन झाला.'
यावरून त्याचा प्रत्यय येतो. 'मातीचे अत्तर' मधील हायकू 'मराठी हायकू' ची उंची वाढवणारे आहेत. मराठी वाचकांना यामुळे सकस आणि भावोत्कट हायकू वाचायला मिळतील. या संग्रहाचे मुखपृष्ठ नयन बारहाते यांनी खूप सुंदर केले आहे. कवीची शब्दावरची हुकूमत पक्की असल्याचे हायकू वाचतांना सतत जाणवत राहते. काही शब्दांचा पुन्हा पुन्हा  होणारा वापर, आशयाची समानता असे काही हायकू वाचतांना जाणवते परंतू त्याचे प्रमाण अगदीच अपवादात्मक म्हणता येईल असे आहे.   हा हायकू संग्रह वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास वाटतो. ज्यांना मराठी हायकू समजून घ्यायचा आहे आणि उत्तम हायकू वाचायचे आहेत त्यांना 'मातीचे अत्तर' नक्कीच आवडेल.
• मातीचे अत्तर : हायकू संग्रह.
• कवी: राजन पोळ.
• प्रकाशक : संवेदना प्रकाशन, पुणे ३३
• पृष्ठे~ ८८ • मूल्य -१२५₹
• प्रथमावृत्ती : २२ ऑगस्ट २०२०
• मुखपृष्ठ : नयन बारहाते.
~~~~
~~~~
डाॅ. कैलास दौंड
kailasdaund@gmail.com
Mo 9850608611.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर