बालकथा


   •  कापसाची मुलगी 


 दिवाळी होऊन पंधरादि झालते. शेतात कपाशीची बोंड उलारली होती. यंदा पाऊस बरा झाल्याने पाने देखील हिरवीगार होती. डोक्यावर चटकणारं उनं वाढत होतं. कुढं मुढं कापूस वेचणीला सुरूवात झालेली होती. कमरेला मिळेल त्या धुडक्याची ओटी बाधून हिरव्या रानातील पांढरा कापूस वेचणाऱ्या बाया अगदी कपाशीच्या बियाण्याच्या पिशवी वरील चित्रासारख्या दिसत होत्या. अंगावर पडणारं उन, लागणारी तहान आणि बोटांच्या शेंड्याला टोचणाऱ्या कपाशीच्या नकट्या, हातावर ओरबडणारे काड्यांचे ओरखडे मात्र कुणाचही लक्ष वेधून घेत नव्हते. कारण हे काम चपाटीनं करायच काम होतं. आपापल्या रानातील कापूस वेचण्याचं जुगाड जो तो जमवत होता आणि रोजंदारीनं कापूस वेचायला जायचं म्हटलं तरी आठ रूपये किलोचा भाव असायचा. गावातील बरेच जण शनिवार - रविवार कडे डोळे लाऊन बसलेले होते. कारण शनिवारी दुपारी आणि रविवारी शाळेला असणारी सुट्टी. या दिवशी बऱ्याच घरची शाळकरी मुलं कापूस वेचायला जायची. तर काही घरचाच कापूस वेचायची. त्यातही काही बऱ्या घरची मुलं सुट्टीतही कापूस वेचायलाही जात नसत‌ . काही आईबाप स्वतः रोज कष्ट करत असुनही आपल्या लेकरांनी चांगला अभ्यास करावा,चांगले शिक्षण घ्यावे आणि पुढे चांगले जीवन त्यांच्या वाट्याला यावे या इच्छेपोटी लेकरांना सुट्टीतही कापूस वेचायला नेत नव्हते.अशाच पालकापैकी होते सुभद्राबाई आणि तुकाराम.

                 सुभद्राबाई आणि तुकाराम यांना दोन‌ एकर कोरडवाहू शेती होती. त्यात ते एखाद्या वर्षी बाजरी , ज्वारी तर एखाद्या वर्षी कपाशीचे पीक घेत असत.यंदाही शेतात कपाशीचे पीक होते. ते वेचनीलाही आलेले होते. त्यांची कामाची लगबग चाललेली होती.ती लगबग‌ बघून त्यांच्या सीमा आणि रामा या शाळकरी मुलांना वाटे की, आपणही एखाद्या रविवारी शेतात जाऊन आई वडिलांना मदत करावी. पण त्यांनी तसे विचारले की आई वडील म्हणत " बाळांंनो तुमचा शाळेतील अभ्यास करा. काम करायला आम्ही आहोत ना!" त्याचे कारणही तसेच होते.कारण ते दोघेही शाळेत खूप हुशार होते.सीमाचा तिसरीत आणि रामाचा चौथीत पहिलाच नंबर होता.

             जानेवारीची पाच तारीख होती. शाळेत सरांनी सहलीची सुचना सांगितली. सहल कोकणात जाणार होती. सहलीत समुद्रकिनारा, जलदुर्ग आणि आणखी काही ठिकाणे पाहावयास मिळणार होती. सहलीसाठी प्रत्येकी चारशे रुपये फी ठेवलेली होती. सीमा आणि रामाला वाटले आपल्याला घरून सहलीला पाठवतात की नाही कुणास ठाऊक? पण आई वडिलांना सांगून तर पाहू.म्हणून त्यांनी संध्याकाळी आईवडील घरी आल्यावर सांगायचे ठरवले. 

                 शाळेतून घरी आल्यावर सीमा आणि रामा आईवडील शेतातून घरी येण्याची वाट पाहत होते . थोड्याच वेळात ते शेतातून घरी परतले. हातपाय धुवून झाल्यावर आईने चहा बनवला. सीमाने तो वडिलांना दिला. आईने सीमा आणि रामाला थोडा चहा दिला आणि मग स्वतःला बशीत ओतून घेतला. मग रामा म्हणाला," दादा,आमची सहल कोकणात जाणार आहे यंदा. " वडीलांना ते दादा म्हणत.

  "चारशे रुपये वर्गणी ठेवलीय प्रत्येकाला." सीमा म्हणाली.

 "आता या पोरांना सहलीला जायचे असेल. हजारेक रूपये तरी लागतील दोघांना." आई वडीलांना ऐकू जाईलसे म्हणाली. "बरं.. ते कपड्यांसाठी ठेवलेल्या पैशातील पैसे देऊ त्यांना !" वडील म्हणाले.

           वडिलांनी स्वतःच्या कपड्यांसाठी ठेवलेले पैसे मुलांच्या सहलीसाठी द्यावयाचे ठरवले. पैसे मिळणार म्हणून सीमा व रामा आनंदले. दुसऱ्या दिवशी वडिलांनी शाळेत येऊन शिक्षकांना पैसे दिले. सहलीची माहिती घेतली. ठरल्याप्रमाणे सहल गेली.मुलांना वेगवेगळी ठिकाणे पहायला मिळाली. त्यांना खुप मजा आली. सीमाने आईसाठी एक छोटी पर्स विकत घेतली होती.तर रामाने वडिलांसाठी छानदार उन्हापासून संरक्षण म्हणून हॅट विकत घेतली. घरी आल्यावर त्यांनी आणलेल्या वस्तू पाहून आई वडिलांना आनंद झाला. 

       दुसऱ्या दिवशी शाळेत जातांना रामा सीमाला म्हणाला "दिदी, आपल्याला दादांनी‌ व आईने त्यांच्या कपड्यांसाठी ठेवलेले पैसे दिले आहेत.आता त्यांना लवकर कपडे घेता येणार नाहीत. कापूस विकल्याशिवाय ते कपडे घेणार नाहीत."

  "हो रे भाऊ.  आता आपण काय करायचे?" सीमा म्हणाली.

मग थोड्यावेळ दोघेही शांतपणे शाळेचा रस्ता चालू लागले. शाळेतही त्यांच्या मनात तोच विचार चालू होता. शाळा सुटल्यावर सीमाने रामाला गाठले. "भाऊ,आपण कापूस वेचायला जाऊ का रे?" सीमा म्हणाली.

"का बरे?" रामाने विचारले.

"अरे आपण कापूस वेचून पैसे जमवू व त्याचे दादाला व आईला कपडे घेऊ." सीमा म्हणाली.

यावर दोघांनी काही चर्चा केली.नंतरच्या शनिवारी दुपारी ते घरी अभ्यास करत होते. तेव्हा त्यांच्या घरामागील शेतात शेतकरी कापूस वेचत होता. दोघेही तेथे गेले. "कापूस वेचायला किती रूपये किलो आहे?" रामाने विचारले.

"दहा रूपये ,येता का वेचायला." शेतकरी म्हणाला.

 मग ठरले. मग शनिवारी दोघांनी मिळून एकवीस किलो आणि रविवारी तीस किलो कापूस वेचला. अशा प्रकारे त्यांनी , पाचशे दहा रूपये मिळवले.‌ आणि आईवडील शेतातून घरी यायच्या आगोदर घरी येऊन झाडलोट करून अभ्यास करत बसले.‌ त्यानंतरच्या शनिवारी आणि रविवारी देखील त्यांनी तसेच केले.

          मग एके दिवशी सायंकाळी आईवडील शेतातून घरी आल्यावर आणि चहा वगैरे घेऊन झाल्यावर त्यांनी सीमा व रामाच्या अभ्यासाची चौकशी केली. तो उत्तम होता. मग सीमा म्हणाली,"दादा, आम्ही तुम्हाला एक भेट देणार आहोत."

"ती काय बॉ?" दादा म्हणाले. यावेळी आई आपल्या लेकरांकडे कौतुकाने पाहू लागली. सीमाने रामाला खुणावले,तसा रामा मांडणीकडे गेला आणि मांडणीतील एक डबा खाली घेऊन उघडला.त्यातुन एक कागदाची पुडी त्याने बाहेर काढली व सीमाकडे दिली. सीमाने ती उलगडवून त्यातून त्यांनी ठेवलेले पैसे काढले व दादांच्या हातावर ठेवले. 

    "कुणी दिले हे पैसे?" वडिलांनी आश्चर्याने विचारले. 

  "दादा आणि आई, तुम्ही तुमच्या कपड्यांसाठी ठेवलेले पैसे आमच्या सहलीसाठी भरले. त्यामुळे आमची सहल मजेत झाली पण तुम्ही कपडे कधी घेणार?" सीमाने बोलतांना रामाकडे पाहीले.

  "मग आम्ही मागच्या व या आठवड्यात काहीवेळ शेजारच्या काकांच्या शेतात कापूस वेचून हे पैसे जमवले आहेत.तुम्हाला कपडे घेण्यासाठी." रामाने सांगितले.

"आरे पण काही गरज होती का हे करायची,अभ्यास सोडून?" बाबा म्हणाले.

आईच्याही डोळ्यात पाणी तरळले. 

"ही कल्पना सीमा दिदीची होती." रामा म्हणाला.

"हो ही पोर खरीखुरी कापसाची पोर!मऊ मऊ मायेची." बाबा म्हणाले नि आईने सीमाला आपल्या जवळ ओढून पोटाशी घट्ट पकडले. " खुप अभ्यास करा बाळांनो!" आई म्हणाली.

~~~~

डॉ.कैलास दौंड

मु.सोनोशी पो.कोरडगाव ता.पाथर्डी जि.अहमदनगर . पिन ४१४१०२

ईमेल: kailasdaund@gmail.com

भ्रमणध्वनी:९८५०६०८६११


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर