भूमीनीष्ठ शिक्षणयोगी : प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे
भूमीनिष्ठ शिक्षणयोगी : प्राचार्य डॉ. जी.पी.ढाकणे.
पाथर्डीच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक पटलावरील बाबुजी आव्हाड महाविद्यालय हे अत्यंत महत्त्वाचे नाव. एखाद्या महानगरात शोभावे असे हे महाविद्यालय विस्तृत , प्रशस्त आणि सुंदर तर आहेच पण ही सुंदरता वाढवण्यात येथील गुणी प्राध्यापकांचा मोठा वाटा आहे. 1966 साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाला(जनता महाविद्यालय हे आधीचे नाव.) आरंभापासूनच उत्कृष्ट प्राचार्य लाभले. यामागे कॉ. बाबुजी आव्हाड मामा यांची दूरदृष्टी निश्चितच दिसून येते.गेल्या दिड तपापासून या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळणारे प्राचार्य डॉ. जी.पी.ढाकणे (गंगाधर पंढरीनाथ ढाकणे) 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने हा लेख.
प्राचार्य डॉ जी.पी.ढाकणे यांचा जन्म 1962चा.शेवगाव तालुक्यातील मुर्शदपूर तथा धावणवाडी हे त्यांचे गाव.याच गावात त्यांचे चौथी पर्यंतचे शिक्षण झाले.विद्यालयीन शिक्षण शेवगाव येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी अहमदगरच्या महाविद्यालयात घेतले. या सर्व शिक्षणात प्रथम क्रमांक त्यांनी कधी सोडला नाही. 1987 या वर्षी ते एम.ए.इ़ग्लिश उत्तीर्ण होणारे महाविद्यालयातील एकमेव विद्यार्थी होते. गावखेड्यातील पार्श्वभूमी असल्यामूळे कुठल्याही परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची तयारी होतीच.
त्यानंतर अल्पावधीतच त्यांनी लोणारच्या संत भगवानबाबा महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य करायला सुरुवात केली. आपले कुशल अध्यापन आणि विद्यार्थ्यांना समजावून घेण्याच्या वृत्तीमुळे विद्यार्थी व पालकप्रिय प्राध्यापक असा लौकिक त्यांनी मिळवला. माणसे जोडण्याच्या सवयीमुळे त्यांचा लोकसंग्रहही मोठा आहे.
पुढे पाथर्डीच्या बाबुजी आव्हाड महाविद्यालयात प्राचार्यपदावर काम करण्याची संधी लाभल्याने 1 मे 2006 पासून ते प्राचार्य पदावर रूजू झाले. तेव्हापासून 31 मे 2024 पर्यंतच्या 18 वर्षाच्या काळात प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे यांनी महाविद्यालयाचा लौकीक वाढवत असतांनाच पाथर्डी शहरातील सांस्कृतिक आणि साहित्यविषयक चळवळीत भरीव योगदान दिले. नम्र स्वभाव,इतरांचे ऐकूण घेऊन मगच आपले मत किंवा निर्णय देण्याची सवय यामुळे लोकांत सहजपणे मिसळणे त्यांना जमते. त्यामूळेच प्रा. डॉ.ढाकणे पाथर्डीला प्राचार्य म्हणून जाणार कळल्यावर लगेचच लोणारच्या विद्यार्थी व पालकांनी गिल्डा मंगल कार्यालयात त्यांचा उत्स्फूर्तपणे नागरी सत्कार केला.
पाथर्डीत आल्यावर ढाकणे सरांनी महाविद्यालय व संस्थेसाठी भरीव कार्य केले. कला व वाणिज्य शाखा असलेल्या या नामांकित महाविद्यालयात त्यांनी विज्ञान व संगणक विज्ञान शाखा स्थापन करण्यात पुढाकार घेतला. दक्षिण नगर मधील एक महत्त्वाचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची ओळख त्यांनी अधिक ठळक केली. स्व. बाबुजी आव्हाड यांच्या पुतळ्याची स्थापना, बाबुजींच्या नावाने व्याख्यानमाला, बाबुजी विषयक ग्रंथ निर्मिती , दर्जेदार वार्षिक नियतकालिक निर्मिती, पुस्तक प्रदर्शन, ग्रंथालय समृद्धीकरण , क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांमधील विद्यार्थी सहभाग वाढविणे, इतिहास परीषदेची शाखा सुरू करणे,महाविद्यालयासाठी भौतिक सुविधा इत्यादी निर्माण करण्यासाठी त्यांनी डोळस योगदान दिले. हे करतांना शहरातील साहित्य , सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळीत सक्रिय योगदान दिले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाथर्डी शाखेचे ते संस्थापक उपाध्यक्ष आहेत. आणि शब्दगंधच्या शाखेचे ते मार्गदर्शक आहेत.हे करत असताना संघटनात्मक कार्यातही ते सक्रिय राहीले. प्राचार्य फोरम संघटनेत ते गेल्या 16 वर्षापासून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत.पुणे विभागातील ग्रामीण भागातील महाविद्यालयात गटविमा त्यांच्याच पुढाकाराने सुरू झाला. गेल्या अठरा वर्षात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा संशोधकांनी पीएचडी पदवी आणि दहा जणांनी एमफिल पदवी संपादन केली. त्यांनी लिहीलेल्या 'घालमेल' कादंबरीसह त्यांच्या चार साहित्यकृती प्रकाशित झाल्यात. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा! यानंतर सार्वजनिक जीवनातील त्यांचा वावर वाढावा ही समाजहितैषी अपेक्षा!
~~~
डॉ कैलास दौंड
(प्रसिद्ध साहित्यिक)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा