कथान्वय

दुर्मिळ निसर्ग रूपे आणि लोककथा
     आपल्या पर्यावरणात प्रचंड प्रकारची विविधता आहे. ही विविधता जशी जीवसृष्टीच्या बाबतीत आहे तशीच ती भौगोलिक दृष्ट्या देखील आहे. कुठे पेमगिरी सारख्या गावात विस्तीर्ण असे वडाचे झाड दिसते. तर कुठे उंच उंच कळसुबाई सारखे शिखर दिसते ! कुठे प्रचंड खोल दऱ्या , कुठे नागफणी सारखे कडे. कुठे रांजण खडकातून वाहणारी नदी तर कुठे जिवंत पाण्याचा झरा यासारखी कितीतरी विभिन्न भूरूपे आपल्याला वेगवेगळ्या भागात पहावयास मिळतात. या आणि अशा भूरूपांना पाहून माणसाला त्या भूरूपाच्या निर्मिती विषयी कल्पना कराव्याशा वाटल्या असणार. अशी भूरूपे भव्यदिव्य आणि जवळपास एकमेव ठरतील अशी असल्याने कुठल्या तरी देव देवतेच्या चमत्काराशिवाय ती निर्माण झाली असणे शक्य नाही असे सामान्य माणसाला वाटणे स्वाभाविक होते. पूर्वीच्या काळी शिक्षणाचा अभाव आणि सुविधेची उणीव असल्याने ही भूरूपे कशी निर्माण झाली याबद्दल फारशी माहिती नसल्याने माणसांनी ज्या कल्पना केल्या, त्या वास्तवदर्शी नसल्या तरी लोकमनाचे प्रतिनिधित्व घडवणाऱ्या होत्या. त्या रंजक देखील होत्या. माणसांनी निसर्गातील अशा दुर्मिळ रूपांशी आपल्या श्रद्धा व भावनांना जोडत दैनंदिन ऋणानुबंध निर्माण केलेले होते. त्यातून निर्माण झालेल्या लोककथा देखील खूप लोकप्रिय झाल्या. कधीकधी तर या लोककथांनाच सत्य समजले जाण्याचे प्रकारही घडत असत. आपल्याकडे जिथे जिथे गरम पाण्याचे कुंड(झरे) आहेत. त्या त्या ठिकाणी त्या झऱ्याच्या निर्मिती विषयी लोककथा अस्तित्वात असल्याचे दिसते.
          दुर्मिळ निसर्ग दृश्यांना पाहून काहीतरी विशेष वाटल्याने आणि लोकमनाला अशा दृश्यांचे अपार कुतूहल असल्याने, नवलाई वाटत असल्याने लोकप्रतिभेने या दृश्याला जोडणाऱ्या काही काल्पनिकरीत्या तयार केलेल्या लोककथा ग्रामीण आणि डोंगराळ भागात सर्वत्र आढळतात. एखाद्या काल्पनिक घटनांमुळे ही निसर्ग दृश्य तयार झालीत असे भासवण्याचा प्रयत्न या लोकथांनी केला. कालांतराने या लोककथा इतक्या लोकप्रिय झाल्या की लोककथेत सांगितल्याप्रमाणेच ही निसर्ग दृश्य तयार झाली असावीत अशी श्रद्धा व विश्वास ठेवणारे लोकमन देखील तयार झाले.
             शेवगाव तालुक्यात नागलवाडी नावाचे एक डोंगरात वसलेले गाव आहे. गावाजवळ एक खोल दरी असून तिथे शंकराचे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणाला लोक काशीकेदार या नावाने ओळखतात. या ठिकाणी येण्यासाठी पूर्व आणि पश्चिम अशा दोन बाजूंनी वाटा होत्या. पश्चिम बाजूंनी उतरताना काही चिंचेची झाडे होती. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडांची खोडे पिळ पडल्यागत वाढलेली होती. उतारावर वाढल्यामुळे आणि दरीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे चिंचेच्या वाढणाऱ्या खोडांना हेलकावे बसून त्यांना पिळ पडला असावा. एरवी  सपाट भूभागावर कुठल्याही चिंचेच्या खोडाला अशा प्रकारचा पीळ दिसत नव्हता. त्यामुळे माणसाला या झाडांचे विशेष वाटले. याचा संबंध लोकमनाने लोककथेतून सीतामाईच्या नहाण्यासी आणि केस पिळत  जाण्याशी जोडला. अन्यत्र न दिसणारे तातोबाचे मंदिरही या ठिकाणी होते. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणी आहे की ज्यांचा संबंध श्रीराम व सीता वनवासात असताना त्या ठिकाणी राहिले होते असे सांगण्यासाठी केला जातो. काही ठिकाणी डोंगरात उंचावरही जीवंत पाण्याचा झरा असतो. त्यासंबंधानेही लोककथा असतात. याचे कारणही दुर्मिळ निसर्गदृष्य हेच असते.
     लोणार येथील प्रसिद्ध उल्का सरोवर पाहिल्यानंतर प्रथमतः माणूस विस्मयचकीत झाला असणारच. या सरोवराचा आकार, त्यातील पाण्याची चव, पावसाळ्यात पाण्याचा बदलणारा रंग या अशा गोष्टी माणसाचे कुतूहल वाढवणाऱ्या आणि म्हणूनच लोकांच्या कल्पनाशक्तीला श्रद्धा भावाशी जोडणाऱ्या, प्रतिभेला बळ देणाऱ्या ठरल्या. पाण्याच्या खारटपणामुळे येथील लोककथांचा संदर्भ लवणासुरापर्यंत गेला. लवणासुराच्या वधामुळे पाण्याचा रंग लाल झाल्याचे लोककथेत सांगितले गेले. लवणासुराच्या नावावरून लोणार हे नाव अस्तित्वात आल्याचे म्हटले गेले. प्रत्यक्षात लवण म्हणजे मीठ होय.
        अनेक डोंगरकड्यांच्या निर्मिती विषयी देखील लोककथा आहेत. काही नद्यांच्या गुढ वाटणाऱ्या डोहाशीं साती आसरांच्या लोककथा निर्माण झालेल्या असतात. खोलदरीच्या आणि नदीच्याही लोककथा आहेत. पाथर्डी तालुक्यातील वनौषधींनी संपन्न असणाऱ्या वृद्धेश्वरांच्या डोंगराशी संबंधित हा डोंगर सोन्याचा झाल्याची लोककथा नाथ संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहे. सोनोशी कोनोशी भागातील 
सातलिंग्या नावाच्या डोंगरावर मोठ्या आकाराच्या दगडाचे सात  टोक आहेत. इथे सप्तऋषी तपश्चर्येला बसत असत अशी लोककथा आहे. जवळच्याच एका एकसारख्या उंचीच्या आणि लांबट असणाऱ्या डोंगरावर मधेच थोडा उंचवटा असलेली जागा आहे. एखाद्या अजगराने‌ सश्यासारख्या प्राण्याला गिळंकृत केल्यानंतर त्याच्या माने जवळ थोडा उंचवटा यावा यासारखे हे निसर्ग दृश्य पाहून लोकांनी त्याचे नामकरण त्याच कल्पनेने ‘ससम्हांडूळ’ असे खूप प्राचीन काळापासून केलेले आहे. अनेक गावात गावाच्या शिवारात आढळणाऱ्या जुन्या आणि मोठ्या झाडाशी संबंधित काही आख्यायिका आणि लोककथा असतात. काहीशा गुढ आणि विस्मयकारी वाटणाऱ्या निसर्गदृश्याला लोकमनाने लोककथेत गुंफलेले आहे.
~~~


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर