गोष्टींतून कबीर : बालकुमारांसाठी सुंदर संस्कारकथा
• गोष्टींतून कबीर : बालकुमारांसाठी सुंदर संस्कारकथा.
डॉ.कैलास दौंड
मराठी बालकुमार साहित्यामध्ये कथांचा मोठा खजिना दडलेला आहे. अगदी पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीती, अकबर बिरबल यांच्या कथा आणि तोंडोतोंडी चालत आलेल्या, सर्वदूर प्रचलित असणाऱ्या लोककथा यांनी बाल-किशोर आणि कुमार अशा विभिन्न वयोगटातील बालकांच्या भावविश्वांचे भरणपोषण केलेले आहे.
आजच्या मराठी बालसाहित्यातही अनेक साहित्यिक आपल्या अनुभव समृद्ध लेखणीने नव्या नव्या बालकथांचे लेखन करत आहेत.
'गोष्टींतून कबीर' नावाचा संजीवनी बोकील यांचा संस्कारकथासंग्रह दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी नुकताच प्रकाशित केला आहे. या पुस्तकातून संजीवनी बोकील यांनी दहा कथांचा मेवा(आणि ठेवा सुद्धा)किशोरवयीन आणि कुमारवयीन मुलांच्या हाती दिला आहे.
संजीवनी बोकील या प्रथितयश बालसाहित्यिक व शिक्षिका आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कसलेली लेखणी आणि अनुभवाचा कसदारपणा आपसुकच आहे. 'गोष्टींतून कबीर' या पुस्तकांमधील कथांचे वैशिष्ट्य हे आहे की, या कथा शालेय जीवनातील कोणत्याही विद्यार्थ्यांच्या अनुभव कक्षेत येतील अशाच आहेत. बोधकथांना जसे तात्पर्य असते आणि त्या तात्पर्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक तात्पर्य त्या कथेतून बालवाचक शोधत असतो तसेच या पुस्तकातील सर्व गोष्टीं मधून लेखिका संजीवनी बोकील यांनी जे तात्पर्य मांडलेले आहे ; ते तात्पर्य संत कबीर यांचा सुयोग्य दोहा प्रस्तुत करून मांडले आहे. किशोरवयीन वाचकांना आणखीही काही तात्पर्य या गोष्टींतून नक्की सापडेल. या गोष्टी वाचत असताना वाचक त्यात सहजपणे रंगून जातो. कथांमधील एखादा प्रसंग अगदी हृदयाला भिडून जातो. कथांच्या अखेरीस येणारा दोहा कथेतून मिळालेली जाण आणि समज आणखी सखोल करत जातो. या दोह्याचा मराठीत अर्थ दिल्यामुळे त्याचा मथितार्थ सहजपणे समजून येतो. मूळ दोहा बालकुमार वाचकांना समजावा यासाठी त्या दोह्यातील काही शब्दांचे अर्थही देतात.
एक गोष्ट प्राधान्याने सांगावी ती अशी आहे की, लेखिकेला गोष्ट आधी सुचली असावी की कथा लिहिण्यासाठी दोहा आधी आठवला असावा असा प्रश्न पडावा इतक्या ताकदीच्या या कथा आहेत. अलीकडे कुणी कुणी अशा गोष्टीना 'मूल्यांचे टॅपिंग केलेल्या कथा' असे म्हणू लागलेले दिसतात. मात्र अशा कथा जीवनोपयोगी असतात हेच खरे. लेखनकला ही केवळ कलेसाठी वापरण्यापेक्षा जीवनासाठी वापरली तर ती अधिक उपयुक्त आणि परिणामकारक ठरते. याचा प्रत्यय या पुस्तकातील गोष्टींमधून येतो.
'गुरुदेवो महेश्वरा' ही या पुस्तकातील पहिली गोष्ट मागच्या पिढीतील लहानू गुरुजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कार्यक्षम आणि निष्ठावान शिक्षकांच्या निरोप समारंभातील प्रसंगाची आहे. या कार्यक्रमाला गुरुवरील प्रेमामुळे त्यांचा चंद्रशेखर नावाचा नुकताच न्यायाधीशपदी निवड झालेला विद्यार्थी आत्मीयतेने येतो आणि त्याच्या शालेय अनुभवांनी विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतो.
'कुंभाराचा हात' या दुसऱ्या कथेत सुभाष नावाच्या होतकरू विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा होण्यामागील हकीकत येते. सुभाष त्याला ह्तलिखितातील हस्ताक्षरासाठी मिळालेल्या बक्षिसाचे श्रेय त्याच्यासाठी मेहनत घेतलेल्या काळे सरांच्या आठवणी सजग करत त्यांना देतो.
'सहवास चंदनाचा' या तिसऱ्या कथेत चांगली माणसे आपल्या सहवासातील माणसांनाही चांगुलपणाने वागायला शिकवतात. तर 'लोखंडाचे होई सोने' या कथेमध्ये परदेशामध्ये नोकरी करणारा निलेश श्री.चिंचोरे सरांच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना त्याची त्याच्या वडिलांच्या पश्चात आजोबांच्या सहवासात झालेली जडणघडण उलगडून दाखवतो. त्याच्या परोपकारी आणि सदाचारी वृत्तीचे श्रेय तो त्याच्या आजोबांना देतो. काही दिवसांनी त्या शाळेचे रंग रूप त्याच्या योगदानाने बदलून जाते.
'बिन सावलीचे झाड' या कथेत मारुती खेडेकरसारख्या प्रामाणिक आणि निष्ठावंत कामगाराला विजय सेठ सारखे मालक थोडीशीही मदत करू शकत नाहीत असा हृद्य प्रसंग येतो. 'सुकलेल्या फांदीवरचे फळ' या किशोरकथेमध्ये शेफाली आणि सरिता या भिन्न स्वभावाच्या खेळाडू मुलींची वृत्ती दाखवली आहे. नम्रपणे वागणारी आणि शिक्षकांकडून दिलेल्या सर्व सूचना पाळणारी, शंका विचारून स्वतः सुधारणा करून घेणारी सरिता विजयी ठरते ; तर त्या विरुद्ध स्वभाव असणारी शेफाली खेळाच्या क्षेत्रातून बाहेर जाते.
'ये रे ये रे फुलांमध्ये' आजीला व्याख्यानानंतर भेट मिळालेल्या कृष्णकमळाच्या रोपाला फूल येण्याची वाट पाहणारी चैत्राली भेटते. आजी तिच्या कौशल्याने चैत्रालीला त्या रोपाला थोडे मोठे होऊ देण्याचा धीर धरायला सांगते. 'काट्यांना उत्तर फुलांनी' ही सुद्धा अशीच एक सुंदर कथा आहे. शाळेतून घरी आलेल्या उमेशला समीरची आई घरात बोलवून समीर बरोबर जेवू घालते आणि त्यामुळे समीर सोबत बोलण्याची, वागण्याची उमेशची वृत्ती सुधारते.
'लागे सुगंध अत्तराचा' या गोष्टीत कार्यक्रमानिमित्त घरी आलेल्या स्वामीजींची दिनचर्या आणि वर्तणूक पाहून मयुरेशच्या जीवनामध्येही कार्यक्षमता व नवनिर्मिती करण्याची सवय वाढीस लागते. तर 'काय भुललासी वरलिया रंगा' या शेवटच्या कथेत श्रीराम राक्षे नावाचे शिक्षक मोठ्या शहरातील विद्यालयांमध्ये बदली होऊन जातात . तेव्हा प्रारंभी त्यांच्या पेहरावावर हसणाऱ्या विद्यार्थ्यांना ते त्यांच्या वक्तृत्व कौशल्याने कसे जिंकून घेतात ते रंगवले आहे.
वरील प्रमाणे प्रत्येक कथेतील ठळक प्रसंग सांगता येतील. या कथा खुलल्या आहेत त्या संजीवनी बोकील यांच्या निवेदन, वर्णन आणि प्रसंग जिवंत करण्याच्या लक्षणीय कौशल्यामुळे. यामध्ये त्यांनी वापरलेली भाषा सहज सुलभ आणि आजच्या बालकुमार वयोगटाला साजेशीच आहे. कथांमधील संवाददेखील प्रत्ययकारी झाले आहेत. प्रत्येक कथेसाठी त्यांनी कोणता दोहा निवडला आहे? प्रत्येक गोष्टीत आणखी कोणकोणत्या गमती जमती आहेत? प्रत्येक गोष्टीत आणखी कोणता परिसर आहे? हे समजून घेण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी 'गोष्टींतून कबीर' हे पुस्तक बालवाचकांनी अवश्य वाचायलाच हवे असेच आहे . आणि हो या प्रत्येक गोष्टीसाठी चित्रकार संतोष घोंगडे यांनी खूप सुंदर सुंदर चित्रे काढली आहेत. त्यामुळे हे रॉयल आकारातील पुस्तक सुंदर आणि आकर्षक झाले आहे. हे पुस्तक कुमार व किशोरवयीन वाचकांच्या नक्कीच पसंतीला उतरेल यात शंका नाही.
• गोष्टींतून कबीर : संस्कारकथा
• लेखिका : संजीवनी बोकील
• प्रकाशक : दिलीप राज प्रकाशन, पुणे
• प्रथमावृत्ती : 16 जून 2024
• पृष्ठे : 72 , मूल्य : 230₹
~~~~~
डॉ कैलास दौंड
मु.सोनोशी, पो.कोरडगाव, ता.पाथर्डी
जिल्हा.अहमदनगर
पिन 414182
Email id - kailasdaund@gmail.com
Mo 9850608611
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा