खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी

बालसाहित्यात कुठला तरी एकच रस असावा असा अट्टाहास बालसाहित्याचे फार काही भले करणारा खचितच नाही. मुळात बालसाहित्य वाचनीय हवे. बालकांच्या ज्या वयोगटासाठी ते लिहीलेले आहे त्या वयोगटातील बालकांच्या भावविश्वाशी आणि मनोवृत्तीशी तादात्म्य पावणारे ते असावे. 
'खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी' हा बालकथासंग्रह एक जानेवारी २५ रोजी छापून उपलब्ध होईल. हे माझे बालसाहित्याचे चौथे पुस्तक आहे. बत्तीस वर्षाचा बालकांचा सहवास, त्यांच्या अनुभवविश्वाच्या, विचारविश्वाच्या आणि परीसरविश्वाच्या परीचयाचा कस बालसाहित्य लेखनात लागला आहे. या बालकथासंग्रहातील बालकथा किशोर मासिक, गोवनवार्ताचे हुप्पा हुय्या दिवाळी अंक, लाडोबा मासिक इत्यादी मधून पूर्वप्रकाशित असून बालवाचकांपर्यंत  सुट्या सुट्या स्वरूपात गेलेल्या आहेत.
     साहित्य चपराकचे घनश्याम पाटील तथा आमचे दादा यांनी बालवाचकांसाठी लाडोबा मासिक सुरू करून बालवाचकांसाठी मराठीत अत्यल्प असलेल्या नियतकालीकात मौलिक योगदान देणे सुरू केले. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून 'लाडोबा' प्रकाशन सुरू करायचे नक्की केले. त्यासाठी पहिले पुस्तक म्हणून ' खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी' या पुस्तकाची निवड केली. परवा हे पुस्तक छपाईला गेले. तो दिवस देखील खासच होता. घनश्याम दादा आणि ज्योती वहीनी यांच्या विवाहाचा हा तिसरा वाढदिवस!
     आपल्याकडे रंगीत चित्रे आणि आर्ट पेपरवर छपाई करून मोजक्याच प्रतींची आवृत्ती काढण्याचा रिवाज अलिकडील काळात बालसाहित्यात आला आहे. या एकुणच प्रकारामुळे मूळ लेखनाला चित्रे पुरक ठरण्याऐवजी ती आशयावर स्वार होतांना दिसतात. या पुस्तकाच्या किमतीही मध्यमवर्गीय बालवाचकांच्याही आवाक्यात नसतात. या पार्श्वभूमीवर कृष्णधवल पण आशयानुरूप मोजकीच चित्रे समाविष्ट करून जास्तीत जास्त बाल वाचकांपर्यंत बालसाहित्य पोहचवण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत आहे.
    लाडोबाची पुस्तके जगभरातील वाचकांना सहजपणे उपलब्ध व्हावीत याकरिता ebook स्वरूपात 'खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी' आजच उपलब्ध झाले आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपल्याला त्यांच्यापर्यंत जाता येईल.
https://chaprak.com/2024/12/kharutaiche-jangal/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर