निबंध स्पर्धा

माझी मराठी, माझा अभिमान. 

माता, मातृभूमी आणि मातृभाषा स्वर्गापेक्षाही सुंदर असतात. माझ्या मराठी भाषेचा गोडवा हा अमृताशी पैज जिंकणारा आहे. आईच्या दुधाबरोबरच मातृभाषेचे संस्कार होत असतात. मराठी भाषेचे तसेच संस्कार मराठी बोलणाऱ्या लोकांवर होतात. इथल्या दऱ्याखोऱ्यातून आणि ग्राम तसेच नागर संस्कृतीतून बोलली जाणारी माझी मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. आईची ममता, पित्याची जबाबदारी, समाजाचे संस्कार आणि भूमीची सहनशीलता घेऊन येणारी माझी मराठी भाषा मराठी मनाला समृद्ध करते. 
     ही मराठी भाषा शतकानुशतके चालत आलेल्या लोककथा आणि लोकगीतातून प्रवाही झालेली आहे. श्रवणबेळगोळ, नाणेघाट आणि अक्षीच्या शिलालेखातून तिने अमीट
 ठसा उमटवला आहे. शाहिरांच्या पोवाड्यांनी, संतांच्या अभंग, भारुडे आणि गवळणी तसेच ग्रंथांनी ती समृद्ध झालेली आहे. ती नवरसांनी युक्त असून माणसांना जोडणारी आहे. माझी मराठी समतेचा जयघोष करणारी असून ती जाती, धर्म, पंथ यावरून कोणताही भेदभाव तिच्या लेकरांमध्ये करत नाही. जिचा मोह परदेशातून आलेल्या लोकांनाही होऊन त्यांनीही मराठी शिकण्याची प्रेरणा घेतली. फादर स्टीफन यांनी मराठी भाषेतच ख्रिस्त पुराण लिहिले. संत नामदेव, चक्रधर  ,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बहिणाई, मुक्ताबाई सारख्या संत कवी कवयित्री पासून तर आधुनिक काळातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, वि. स. खांडेकर, केशवसुत, कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, यांच्यासारख्या अनेक लेखक कवींच्या लेखणीतून तिने मानवतेचा संदेश आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन लोकांना दिला आहे. माझी मराठी भाषा जगातील प्रमुख भाषा असून, भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर तर ती बोलली जातेच त्याच बरोबर जगातील अनेक देशात मराठी भाषा बोलणारे लोक आढळतात हे माझ्या मराठी भाषेचे सर्वव्यापीपण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे यांच्यापासून ते राम शेवाळकरांपर्यंत अनेक वक्त्यांनी मराठी भाषेचा जयघोष केला आहे.
  माझी मराठी भाषा ही हृदयाची भाषा आहे. ती शौर्याची देखील भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेच्या वेळी जी प्रतिज्ञा केली ती सुद्धा मराठीतच! 'हर हर महादेव' ची घोषणा दिली ती देखील मराठीतच.छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे पोवाडे तिच्यातून ऐकू येतात. महाराष्ट्रीयन संस्कृतीची ओळख मराठी अधिक गडद करते. तिच्यातून आपल्याला आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात. तिने देवनागरी लिपी अंगीकारलेली आहे. प्रारंभीच्या काळात मोडी लिपीचा अंगीकार तीने केला होता, त्यानंतर तिने सुगम देवनागरी लिपीचा अंगीकार केला.
   आजच्या बदलत्या काळातही भ्रमणध्वनी, आंतरजाल आणि समाज माध्यमे यावरून मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. कुठल्याही माध्यमांमधून व्यक्त होण्याचे सामर्थ्य माझ्या मराठी भाषेत आहे. मला याचा अभिमान वाटतो की माझी मराठी भाषा ज्ञानभाषा देखील आहे. ती पुढील पिढीपर्यंत, अनंत काळापर्यंत प्रवाही राहील याची मला खात्री आहे. कवीवर्य सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे,
     'लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी 
     जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी'
या उक्तीचा प्रत्येक मराठी माणसास प्रत्यय येत असतो. सोबतच मराठी भाषिकांनी मनोमनी एक गोष्ट बिंबवली पाहिजे ती म्हणजे ही की, 
    'माझ्या मराठी भाषेचा 
    मी ही इवलासा दूत
    दशदिशा हिंडतांना 
    हाती धरणार पोत.'
सर्वांना संदेश देतांना एवढेच सांगेन की , माझी मराठी माझा अभिमान!
~~~

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर