सामाजिक कविता
कविता
*ज्ञानोबा, चोखोबा, गोरोबा, तुकोबा*
ज्ञानोबा, चोखोबा, गोरोबा, तुकोबा
या तुम्ही सारे या तुमच्याशी चर्चा करायचीय मला .
मी बोलवत नाहीये तूम्हाला
मला तुमच्या कळपात सामील करावं
म्हणून,
तुमच्या प्रभावळीत येऊ द्या म्हणून
किंवा - मला जाणूनही घ्यायची नाहीये तुमच्या लोकप्रियतेची क्लृप्ती
अथवा तुमच्या शिफारशीवर मिळवायची ही नाही
एखादी अकादमी, वतन, वृत्ती. ..
तुम्ही मिरवलेली मराठीची पताका कुठे दिलीत ठेऊन?
ती सापडत नाहीये आता
शोधा शोध करूनही हाताशी येत नाही गाथा आम्हीच झाडत आहोत एकमेकांना लाथा. .. ज्ञानोबा, चोखोबा , गोरोबा, तुकोबा
तुम्ही गेलात तसेच जुन्या जुन्यांनी निघून खूप खूप प्रगती केलीय आम्ही मागून
आता सारं जग दाराशी आलयं
हे विश्व एक घर बणू लागलय
माझं मन पुन्हा पुन्हा तूमच्याकडं पाहतय प्रवाहाचं पाणी कळत नाही पण वाहतय, ज्ञानोबा, चोखोबा, गोरोबा, तुकोबा
तुमचा म्हणे सगळ्यांचा झेंडा सारखाच होता,
मोर्चाचा मार्गही एकच होता,
सालातुन दोनदोनदा तुम्ही एकत्रच मोर्चाला जात होता
तुमचा सगळाच कारभार अजबच होता - स्वतःच्या पोळीवर तुप ओढायचं सोडून
तुम्ही जगासाठी भांडत होता.
स्वतःला नव्हतं धड घर तरी विश्वाचं घर बनवु पाहत होता;
तुमच्या मोर्चात कधी कधी शेख महंमदही दिसत होता.
ज्ञानोबा, चोखोबा, गोरोबा, तुकोबा जनाई, मुक्ताई सोयरा अन् बहिणाई
या पहा आमची नवलाई, या आमच्या झेंड्याचे रंग पहा घोषणांचे ढंग पहा
या व्हा आमच्यात सामिल, खुशाल घोषणा नारे द्या.
काळासोबत पुढं जाणं की मागं जाणं म्हणजे प्रवास
गोंधळल्यागत होतोय बिलगलेला हव्यास. मग चला धरू हातात हात अन् उभारू रिंगण व्यापून टाकू अवघे अंगण!
जिकडे दिसेल मार्ग तिकडे जाऊ खुशाल धावत
एक ठेऊ मनात मात्र, मानवतेचा झेंडा फडकत.
##
*डाॅ.कैलास रायभान दौंड*
मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी
जि. अहमदनगर पीन ४१४१०२
मो. ९८५०६०८६११
EMAIL -kailasdaund@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा