परिक्षण /करपलं रान सारं

*करपलं रान सारं : शेतकऱ्यांच्या  जगण्याची कविता.*
                   डाॅ. कैलास रायभान दौंड.

'करपलं रान सारं' हा कवी प्रभाकर शेळके यांचा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. हा त्याचा पहिलाच कवितासंग्रह असला तरी शेळके यांच्या कविता कविसंमेलनातुन त्यांच्या प्रभावी वाचनामुळे रसिकांना परिचित आहेत. या संग्रहातून भेटणारी कविता शेतकर्‍यांच्या शब्दातच त्यांची सुखदु:खे मांडणारी आहे. पावसाची आणि मानवी भावजीवनाची मनोज्ञ रूपेही या कवितातून भेटीस येतात. ही कविता कष्टणाऱ्या शेतकऱ्यांचं दुःखमय जगणं मांडणारी आणि त्या भोवतीचं सामाजिक जीवन अधोरेखित करणारी तर आहेच त्याचबरोबर ती लोभस प्रितीभाव व्यक्त करणारी आणि स्त्रीच्या जगण्याला स्पर्शून जाणारी देखील आहे. प्रभाकर शेळके हे मनस्वी कवी आहेत म्हणूनच लावणी सारखा प्रकारही ते सामाजिक जाणिवेने आणि काव्यात्म ताकदीने हाताळताना दिसतात. आज घडीला इतक्या प्रचंड प्रमाणात कविता लिहीली जात असताना वाचकांच्या मनाचा ताबा घेणारी, त्याला मोहन पाडणारी, गुणगुणायला लावणारी,वाचकांना आपलीशी वाटणारी कविता कोठे आहे? या प्रश्नाला उत्तर देणारी कविता या संग्रहातील 'बाई एक चरक ,'क्षितिज' ,'घंटा  झाल्यावर ,'रानभिलोरी' यासारख्या कवितांच्या रूपाने समोर येते.
         व्याज, कर्ज, पाण्याचा अभाव, विजेचा अभाव आणि आलेच थोडेफार पीक तर भावाचा अभाव यामुळे सारी कुणबीक आरबाळल्यावाणी झाली आहे ;अशावेळी कवी शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोरपीस व्हावे अशी इच्छा बाळगतो आणि 'कुणबी जगाचा पोशिंदा 'या कवितेत लिहितो -

'माती हिरवी रूजून, वाटे सुखाची ही नांदी
नको कासरा लोंबता, येड्या बाभळीची फांदी
बांध नव्याच जोमानं, हुशारीच्या चारगाठी
अशी होऊ दे खस्सर , तुही मरणाची मिठी '

पाण्यासाठी टँकरची वाट पहावी लागण्याच्या काळात गावाच्या  डोळ्यात आभाळ येणं स्वाभाविकच ठरावं असं हे नेहमीचेच जगणे देखील कवी 'झळाया कवितेच्या' या कवितेत प्रभावीपणाने व्यक्त करतो .कर्जाचा बुरूज, मोलामाघाच्या बीयाखंताचा खर्च आणि त्यानंतर पडणारी निसर्गाची तसेच सरकारची बखाड बघून कवी अत्यंत अस्वस्थ होतो; तो लिहितो -

'आता बदलत्या ऋतुचे
काळजावर घाव झेलावेत का?
बेईमान ऋतूंशी इमान राखावं. '

सगळं जगणच रस्त्यात मांडल्यागत झालेलं.अशाही दिवसात गावाला गावपण देणारा 'राळेगणचा महात्मा' आशेचा किरण जागवून जातो. घरोघरची आजी तिच्या श्रद्धा आणि अनुभव याच्या बळावर काही सांगू पाहते. पशुधन, त्यांचा चारापाणी यांच्याशी समृद्धीचं गणित जोडू पाहते. ते समजून न घेता नगदी पिकांच्या नादाने दुःख वाढतच जाते या तिच्या बोलाचा प्रत्यय येत जातो. चिंतेने कुरूप झालेल्या जीवाला हुरूप उरत नाही हेच खरे. सर्वांग व्यथेचा स्विकार करून आयुष्याचं खळं उनगलं की थोडी मुंग्यांना पंख फुटावेत अशी चंचल 'चाहूल' लागते. कविला ती मरणचाहूल वाटते.
     आपल्या पुढची पिढी तरी थोडी सुखात वाढावी असे कोणाला वाटणार नाही? 'बापाचं आभाळ 'या कवितेत ग्रामीण जगण्याचा प्रतिनिधी ठरेल असा बाप भेटतो. 'पोराच्या भविष्यासाठी गावकुसाची माती उफणत तो कपाळावर रक्ताचा पाऊस गोंदतो.' तर 'चिंध्या ' कवितेत आईच्या कष्टमय जगण्यावरच आपलं सुखमय जगणं वाढलं आहे याची कृतज्ञ जाणीव भेटते. आजच्या तरूणांच्या अगतिकचे , बेकारीचे , दिशेच्या शोधात असणारे जगणेही एक दोन कवितेमधून व्यक्त होते. 'बेकारीचा अभंग 'त्यादृष्टीने पाहण्यासारखा आहे.
या कवितासंग्रहातील स्री जीवनाशी निगडीत कवितांचा एक भावस्पर्शी प्रांत आहे. या कवितासंग्रहाचा तो विशेष ठरावा. स्री जीवनाचं थबथबतं दुःख भावस्पर्शी शब्दात मांडताना 'बाई एक चरक ' या कवितेत कवी लिहितो :-

'बाई देहाचे वारूळ, तिथे वासनांचे नाग
मादी दुःखाची पखाल, ओल्या ममतेची जाग.'

तर 'नवतीचे आभाळ 'या कवितेत अंगणातल्या रांगोळीत स्वप्नांच्या कशिद्याचे आभाळ रेखणारी नवतरूणी आता इथल्या व्यवस्थेचे आभाळ पेलण्यासाठी समर्थ होतांना दिसते.
      'मह्या फाटक्या वहीत 'या कवितेत फाटक्या वहीत प्रितीच्या मोरपंखी आठवणी जपणारं कविमन भेटतं.  तसचं 'घंटी झाल्यावर 'या कवितेत शाळा सुटल्यावर बालवयीनांना होणारा आनंद ते -

'पाखरांची माय
पांघरते साय
आपलं दुःख सांदीत ठेवून
आभाळाची पान्हवते गाय. '

या शब्दात व्यक्त करतात. कष्टकऱ्यांच्या दुःखाला शब्द देऊ पाहणारा हा कवी शब्दांच्या सुयोग्य वापराबाबत कमालीचा दक्ष आहे. त्याने वापरलेल्या प्रतिमा वाचकांना गुंतवून ठेवणार्‍या आहेत. 'क्षितिज'या कवितेतून याचा प्रत्यय येतो. पुढील ओळी पहा :-

'नवथर देही नाजूक सळसळ
पंचलतेचा चंद्र ढळे
गोड गुपित हे काळोखाचे
शूक्र चांदणी अशी झुरे. '

'करपलं रान सारं 'या कवितासंग्रहात एकूण बासष्ट कविता आहेत कविने इतर अनेक कवी करतात तशी विभाग पाडून कवितेची मांडणी केली नाही ते बरेच झाले अन्यथा कविता म्हणजे दुकानातल्या कप्प्यात ठेवलेल्या वस्तुगत भासल्या असत्या. कवितेचे विभागावर वर्गीकरण करणे हे समीक्षक अभ्यासकांचे काम असते. सहाजिकच नैसर्गिकरीतीने कवितांची मांडणी करणारे शेळके अभिनंदनास पात्र ठरतात.  या संग्रहातील  कवितांमधून दुःख, सुखाचे अनुभव मिळतात. कवितेची भाषा साधी आणि सुगम्य आहे. सरदार जाधव यांनी चितारलेले मुखपृष्ठ शेतकर्‍याच्या कष्टमय जगण्याचा प्रत्यय देणारे आहे. कवितासंग्रहाचे नाव 'करपलं रान सारं 'असं असलं तरी त्यात काही हिरवळही आहे. ती मुखपृष्ठावर दिसली असती तर अधिक समर्पक झाले असते हे मात्र खरे. मराठी काव्यविश्वात या कवितेचे वाचक स्वागत करतील ही आशा आहे.
* करपलं रान सारं : कवितासंग्रह
*कवी : डाॅ. प्रभाकर शेळके
*प्रकाशक :कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद ०१
*प्रथमावृत्ती : एप्रिल २०१७
*पृष्ठे :७२ *मूल्य : ७० रू.
*****************************************
            डाॅ. कैलास दौंड
             मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन. ४१४१०२ मो. ९८५०६०८६११
Email address :kailasdaund@gmail.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर