#स्त्री मनाचे पदर उलगडणारी

#स्त्री मनाचे पदर उलगडणारी कविता :आभाळ अंतरीचे#
                                     
                        @ डॉ.कैलास दौंड@

       'आभाळ अंतरीचे' हा सौ.विद्या बयास-ठाकुर यांचा पहिलाच कविता संग्रह नुकताच नांदेडच्या निर्मल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या संग्रहामधील कवितांमधून स्त्रीच्या भावजगताचे अनेक पदर दृग्गोच्चर होत जातात.साधेपणातून उत्कट काव्यानुभूति या कवितांमधून येते.आपल्याकडे लिहीली जाणारी कविता ही एका विशीष्ट समाजगटाची कविता असते त्यामुळेच ती स्वतःच स्वतःला मर्यादा घालून घेते पण ' आभाळ अंतरीचे ' मधील कविता व्यापक आहे.या कवितांमधून एका मध्यमवर्गिय जाणिवेचा बोध होत असला तरी हा वर्ग किंवा गट व्यापक आणि काव्यास्वादक असल्याने या कविता संग्रहातील कवितांना विस्तृत परिघ लाभला आहे.
        ' आभाळ अंतरीचे' या सौ.विद्या बयास-ठाकुर यांच्या कविता संग्रहात एकोणसाठ कवितांचा समावेश आहे.आपल्याकडे काही कवी स्वतःच आपल्या कवितांचे कविता संग्रहात विभाग पाडून त्यांना नावे देताना दिसतात .पण कवयित्रीने प्रस्तुत कविता संग्रहात तसे केलेले नाही.हे मला खूप महत्वाचे वाटते.याचे कारण असे की कविता लिहीणाराच्या किंवा लिहीणारीच्या ठायी संश्लेषक प्रतिभा असते.त्यातून नवनिर्मीती होत राहते तर समिक्षकाच्या ठायी विश्लेषक प्रतिभा असते.( असे मानले जाते ).म्हणजे संग्रहातील कवितांचे काही विभाग अभ्यासासाठी करावयाचे असल्यास ते समिक्षकांनी /अभ्यासकांनी करावेत पण जेंव्हा कविता लिहीणारी व्यक्तीच असे करू लागते तेंव्हा ती विश्लेषक प्रतिभाचा वापरू लागते.विश्लेषक प्रतिभा वापरू लागले की मग त्याच व्यक्तीला संश्लेषक प्रतिभा ताकदीने वापरता येत नसल्याची कवितेत अनेक उदाहरणे मिळतात.
         'आभाळ अंतरीचे' मधील कवितांची काव्यास्वाद आणि अभ्यासाच्या सोयीने विभागणी करावयाची झाल्यास ती स्वजाणिवेच्या आत्मनिष्ठ कविता ,प्रितीरंगाच्या कविता आणि नातेसंबंधांच्या कविता अशा तीन भागात करणे क्रमप्राप्त ठरते.या संग्रहामधील सर्वच कवितांमधून कवयित्रीची जीवनाला समरसून सामोरे जाण्याची वृत्ती प्रकट होते.तिने घेतलेले संवेदनशिल अनुभव आणि या अनुभवाच्या अनुषंगाने अंतरंगात उमटलेले काव्यात्मभाव झंकार या कवितासंग्रहातील अनेक कवितांमधून जागोजाग भेटत राहतात.
        स्वजाणिवेच्या कवितेकडे पाहिल्यास स्त्रीमनाला स्वतःच्या शक्तीचे स्त्रोत शोधताना थकवा येतो ,पंख दुखू लागतात,अंग भरून येतं मग वडाच्या झाडाखाली विसावसं वाटतं.तरी हा विसावा क्षणभराचाच आहे.'फिनिक्स' या कवितेत सुरूवातीलाच कवयित्री लिहीते,

   " मी एक फिनिक्स,राखेआड दडलेला
     किती ही गाडलं तरी पुन्हापुन्हा उडणारा"

ही उमेद कायम ठेवून जगणारी स्त्री या समाजात कायमच असायला हवी.तिच्या ठायी हत्तीचं बळ आहे पण ती ते पुरूषासमोर वापरत नाही.त्यामुळे तिला वेठीला धरून स्त्रीभृणाच्याच हत्या घडवल्या जातात.कवयित्री 'मायमाऊली' कवितेत लिहीते-

"झुंजुमुंजु होण्याआधी
रात नको होऊ देऊ
गर्भातल्या अंधारात माझा
घात नको होऊ देऊ"

असं हे जगताना तिला येणारे आत्मभान लक्षणिय आहे.अनेक अनुत्तरित प्रश्न तिला छळत राहतात तरीही ती स्वतःला बेभान होऊन भरारी घ्यायला सांगते.अनेक युगांची गुलामी बाई जेंव्हा संपवून टाकते तेंव्हा थोडेफार वादळ उठणारच असे ही ती स्वतःला समजावून समाजाला सांगते -

"एखादी स्त्री मुक्त होताना
समाज इतका का अस्वस्थ होतो
बाईच्या देहात सुद्धा
एक स्वतंत्र आत्मा वसतो"

स्त्री जीवनच रिकाम्या पोकळीसारखं आणि सोबत निबीड अंधार.तरी सुद्धा हार न मानता, न डगमगता जीवनास्वाद घ्यायला सांगणारी कविता या विभागात भेटते.'तुझा माझा जीवनवाद' ही देखील अशीच एक कविता.
या कवितासंग्रहातील अनेक कविता या प्रीतीरंगाच्या विलोभनीय भावछटा दाखवणार्‍या आहेत.या कविता उत्कट ,लोभस आणि तगमगीच्या ही आहेत.कब्जा ,मागणी ,जोडीदार,झींग,शिकायत,जीवन,वसंतोत्सव,सहवास या काही कविता त्याची साक्ष देतात..प्रीतीरंगात रंगणारी सखी तिच्या प्रेयसाचा शोध अवघ्या आसमंतात घेत राहते त्याचवेळी तो तर थेट तिच्या अंतरंगात खोल खोल उतरलेला असतो.एक अनाम असोशी,तृप्ततेची ओढ.त्यात ही तो सागरासारखा शांत ,स्तब्ध,धीरगंभीर असतो तर ती नदीसारखी अवखळ नी चंचल.ही उत्कटता कवितेतून व्यक्त होते ती अशी -

   " तुझ्या वात्सल्याचा पाऊस
    असाच अखंड बरसत राहू दे
    मी कधीची तहानलेली
    मला चिंबचिंब होऊ दे "

स्वातंत्र्य तर सर्वांनाच हवे असते.पण आपल्या जोडीदाराच्या हातात प्रेमाने आपल्या जीवनाचा दोर सोपवायला ही ती जीवापाड सांभाळायच्या अटीवर मागेपुढे पहात नाही.नात्याची बांधीलकी देखील या कवितेत दिसते कशी ते पहा,

    "उंच आकाशी उडताना ही
     माझा दोर तुझ्या हाती
     सांभाळशील ना जीवापाड
      मी एक पणती मिणमिणती " ( जोडीदार)

असा स्वतःचा दोर आपल्या जोडीदाराच्या हाती देऊ करतानाच रोज नव्या प्रश्नांना सामोरे जाताना तुझी सोबत हवी असे सांगणारी नायिका 'झिंग' या कवितेत भेटते.तर 'शिकायत' कवितेत ती माझ्या ह्रदयातली कळ तुझ्या पर्यंत का बरे पोहचत नाही असे विचारून खंत व्यक्त करते.शेवटी जीवन हे स्मरणात रमणारेच असते असेही ती 'जीवन' या कवितेतून समजावते.कवी केशवसुत यांच्या ' प्रीती मिळेल का बाजारी ? ' या कवितेची आठवण व्हावी अशी ' वसंतोत्सव ' ही एक महत्त्वाची कविता मुळातून वाचण्यासारखी असली तरी पुढील ओळी लक्ष वेधून घेतात -

      " प्रेम मिळायला नशीब लागते
       शोधू जाता मिळत नाही
       जीवनातला हा वसंतोत्सव
       अनुभवल्याशिवाय कळत नाही "

याच प्रकारच्या कवितांत सामील होइल अशी ' सहवास ' ही कविता ही महत्वपुर्ण अशीच आहे.
' आभाळ अंतरीचे ' मधील तिसर्या प्रकारच्या ज्या कविता आहेत त्या नातेसंबंधाचे दर्शन घडवणार्या कविता होत.या कवितांमधून कधी तुटणार्या नात्यांची जखम सलते.मुलगा सणाला आईच्या भेटीला येण्याऐवजी बायकोसोबत तिच्या माहेरी जातो.त्यामुळे आईचा ' अपेक्षाभंग ' होतो खरा पण तिचा जावई जेंव्हा तिला ' मम्मी' म्हणून हाक मारतो तेंव्हा ती सुखावते.स्त्रीयांच्या अधिकाराची भाषा अशा नाती तुटण्याच्या दिवसांत अस्वस्थ करते.अस्वस्थता पुढील ओळींत लक्षणियरित्या जाणवते -

' स्त्रीच्या अधिकाराबद्दल बोलताना
  जीभ जराशी अडखळते
  अमृतासाठी लावलेले झाड
  विषारी फळांनी कसे लगडते ? '

   आईच्या नात्याच्या संबंधाने ' माय ' , ' आई ' या ही कविता आहेत. ' सय ' कवितेत माय मुलीला शिकवण देत राहते तर ' झूल ' कवितेत ' कधी कधी छळत राहणारी नाती भेटतात '.' व्यथा ' नावाच्या कवितेत पतीपत्नीच्या नात्यातील अनुबंध व्यक्त झालेले आहेत.पत्नी नवर्याच्या एका नजरेला ही पारखी झालेली ती बाहेरच्या जगापासून ही त्याच्यासाठीच स्वतःला तोडून घेते.ती नवर्याच्या मोठेपणाची शान राखते पण सतत छळली ,जाळली जाते
तरीही त्याला त्याच्या उणिवांसह सोसत राहते.शेवटी न राहवून ' तू सप्तपदीच्या पवित्र वचनांना कधीतरी जागणार आहेस का ? ' असा प्रश्न उपस्थीत करते.अशी विविधांगी ,भावविभोर ,उत्कट ,अस्वस्थ आणि आश्वस्त कविता या संग्रहात भेटते.कवितेची भाषा आकलन सुलभ आणि काव्यात्म अनुभूती देणारी आहे .कवयित्रीचा हा पहिलाच काव्य संग्रह असून ही खूप सकस कविता त्यात भेटतात.' मित्र' ,निर्वाण' ' प्रेम' ,'ऑनलाईन ' ,' मिनाकुमारी' या कविता मात्र वरवरच्या वाटतात.
        ' आभाळ अंतरीचे 'या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी चितारले असून झाडाच्या जीर्ण पानांतील विरळ होत चाललेली जाळी आणि त्यात विहरणारा अनाम पक्षी त्यात दिसते.पानांच्या जाळीसारखेच अंतरंग दाखवणारे प्रतिकात्मक आणि प्रत्ययकारी मुखपृष्ठ कवितांच्या आशयाशी संवादी असून पुस्तकाचे सौंदर्य वाढवणारे आहे.या कवितासंग्रहाच्या निमीत्ताने आजच्या मराठी कवितेला एक चांगला ' कवितासंग्रह ' मिळालेला आहे व एक आश्वासक कवयित्री सुद्धा.वाचक या कवितांचे खूप स्वागत करतील असे वाटते.
* आभाळ अंतरीचे : ( कविता संग्रह )सौ.विद्या बयास-ठाकुर
* प्रकाशक : निर्मल प्रकाशन ,नांदेड४३१६०५
* प्रथमावृत्ती : १ मे २०१५
* मुल्य : ८० रूपए.
                                            
                      *****
                  डॉ.कैलास दौड
                   मु.सोनोशी पो.कोरडगाव
...                ता.पाथर्डी जि.अहमदनगर
                  पिन : ४१४१०२
                   मो.९८५०६०८६११

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर