अस्वस्थ मनाच्या नोंदी टिपणारा काव्यसंग्रह : आगंतुकाची स्वगते
● अस्वस्थ मनाच्या नोंदी टिपणारा काव्यसंग्रह : 'आगंतुकाची स्वगते'
प्रा. डॉ. अनंता सूर
अस्वस्थता हा मानवी मनातील एक संवेदनशील घटक आहे. त्यामुळे या अस्वस्थतेतून निर्मिती जन्म घेत असते. निर्मिती अर्थात साहित्यकृती. कलावंतांच्या मनात अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीचे अथवा घटनांचे वादळ थैमान घालू लागते त्यावेळी त्याची तीव्रता कमी करणे हाच कलावंतासमोर एक पर्याय असतो. तो शब्दांच्या रूपाने कविता, कादंबरी, कथा व अन्य साहित्यकृतींच्या माध्यमातून कागदावर जन्म घेत नाही तोपर्यंत कलावंतांना समाधान मिळत नाही. त्यामुळे साहित्यकृतीचा जन्म हाच मुळात गर्भवती मातेच्या कुशीतून आलेल्या बाळासम असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कवीमित्र कैलास दौंड यांची कवितासुद्धा याच अस्वस्थतेतून प्रसवलेली असल्यामुळे तिला समाजवास्तव, शेतीमाती, सखोल चिंतनशील अनुभव, बदलत जाणारे जीवन, खेड्यातील सामान्य मानवाचे जगणे आणि संघर्ष, गावगाड्यातील राजकीय वातावरण या सारख्या अनेकांगी कंगोऱ्यातून पहावे लागते. कारण या सगळ्या जाणिवांच्या मुळाशी कवीमनाची घुसमट असलेली अस्वस्थ जाणीव आहे.
'उसाच्या कविता' , 'वसाण' , 'भोग सरू दे उन्हाचा' , ' अंधाराचा गाव माझा' या चार काव्यसंग्रहानंतर कवी कैलास दौंड यांचा 'आगंतुकाचीी स्वगते ' हा पाचवा काव्यसंग्रह ग्रामीण जीवनाशी बालपणापासून कवीमनाची नाळ जुळलेली असल्यामुळे अतिशय बारकाव्यांनिशी ते शब्दातून वास्तव जगणे मांडतात. ग्रामीण परिसरातील वेदना- संवेदनेच्या गाभ्यापर्यंत जाऊन जगण्यातील तीव्रता मांडतात. खोल डोहात उतरावे तसे जागतिकीकरणाच्या रेट्यात सापडलेल्या मानवी जगण्याचे उध्दवस्तीकरण रेखाटतात. त्यामुळे दौंड यांची कविता अस्वस्थ मनातील नोंदीचा प्रदीर्घ आलेख ठरते. ग्रामीण कवितेच्या प्रांतातही एक उल्लेखनीय आणि सशक्त कवी म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे.
ग्रामीण समाजव्यवस्थेतील शेतकरी हा अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील घटक ठरल्याचे दिसते. सरकार कोणतेही असो परंतु पिचल्या जातो तो हाच काबाडाचा धनी. कधी तो निसर्गाकडून, कधी सावकाराकडून तर कधी सरकारी धोरणाचा तो बळी पडतो. शेतकऱ्यांच्या प्रेतांवरचे लोणी खाणारे संधीसाधू कवीला दिसतात; तसे कर्ज, सबसिड्या, वीजबिल माफी, खत- बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना मिळणारं परमिट घेता- घेता शेतकऱ्याची अवस्था पंख कापलेल्या पक्षासारखी होते. त्याच्या अशा जगण्यातील बेहालपणा पाहून कवी अस्वस्थ होऊन जातो. आणि स्पष्ट भूमिका घेऊन सांगू लागतो.
' शेती करायची असेल तर,
ते बिंबवत असलेल्या गोष्टी नीट समजून घे
आणि
दाखव जगाला की सुचवण्यापेक्षा वाचवणं
किती महत्त्वाचं असतं ते! ( पृष्ठ ११)
शेतीच्या व्यवसायाचे शास्त्र समजून घेण्यासाठी पहिल्यांदा सरकारी ध्येयधोरणे समजून घ्यावी लागतात. कारण जी आशा- अपेक्षा घेऊन आपण घाम गाळतो त्या घामाचे चीज होत नाही हा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे या जागतिकीकरणाच्या रेट्यात शेती कशी वाचवता येईल यासाठी प्रयत्नशील बनायला हवे. कारण अलिकडे तर माणसाच्या नियतीच बदलत चालल्याय. विश्वासाने कुणाच्या खांद्यावर हात ठेवून सन्मानाने जगावं अशी माणसंच शिल्लक राहिली नाही. गर्व, स्वार्थ, संधिसाधू, द्वेष यांसारख्या अवगुणांनी माणूस पोखरत चाललाय. शिवाय जाती-धर्माच्या भावनेतून भेदभावाची इमारत अधिक मजबूत केली जाते अशावेळी कवीला पाऊस झाडांचा निस्वार्थी गुणधर्म आठवतो.
माणसाच्या गर्दीत माणसेच हरवत चालणारं हे भयाण वास्तव कभी अनुभवतो. माणसाचे मन दिवसेंदिवस खुजे होत असल्यामुळे माणुसकीचा ओलावाच निघून गेल्याची जाणीव ते मांडतात. पिकांनाच वेढून राहणाऱ्या कुसळ गवतासारखी माणसाच्या मनातील वाईट प्रवृत्तीची जळमटे अलिकडे एकसारखी वाढत चाललीत. अशावेळी आपण वेळीच सावध होण्याची गरज आहे. त्याला काडी लावून जाळले नाही तर ती आपलं अस्तित्वच नाहीसं करण्याची भीती आहे ही बाब दर्शवितात.
पाण्यानं मातीचा शोध घेत घेत खोलवर रुजत जावं परंतु नदिच्या पाण्याला माणुसकीची ओल गवसू नये असे विरोधाभासी वातावरण कवीच्या दृष्टीला चौफेर दिसते. जी गाव, शिवारं बालपणी दूरवर हिरवीगार दिसायची तिथं आता कंपन्या आल्यामुळे शेत्यांचं ऊद्ध्वस्तीकरण झालं. मालकांच्या खिशात काही काळासाठी पैसा तर आला परंतु शेतीचे रूपांतर हायवेत झालं. ज्या मातीनं पिकवलेल्या अन्नातून आपल्या कित्येक पिढ्या जगल्या त्याच मातीपासून हळूहळू आपण पारखे नव्हे तर पोरकेच होत चाललोय याची सल कवीमनात आहे. तरीसुद्धा या मातीशिवाय कुणाही जीवाला सुख मिळणार नाही तर या मातीतून, तिच्या कणाकणामधूनच नवी सुखदायी सर्जनशीलता प्रसवते हा एक आशावाद जागा होतो. कधी पोष्टमन आल्यानं गावाचं 'खेडेपण' जागंअसल्याचं वास्तव कवीला दिसते तर कधी गावात राजकारण आल्यानं जातीजातीत वाटले गेलेले माणसाचे फिसकटलेले रंग दिसतात.
'हा आपला तो त्याचा
हवे तसे वाटले जातात
भरून घ्यायला थैली मग
म्होरकेही धावून येतात.' (पृष्ठ १३)
या अलिकडच्या वास्तव सत्याची ओळख कवी करून देतो. निवडणुकीच्या कालखंडात गटातटांच्या मिरवणुका निघतात आणि वैरत्वाला पुन्हा फाटे फुटतात. वैरत्व विसरून कधीतरी ही एक होतील अशा निष्कर्षाप्रत कवी येतोही. परंतु, दुसरीकडे याच खेड्यात शेतीच्या वादातून बहिण- भावाचे संबंध कसे तोडले जातात याचे चित्र कवी 'खातेफोड' मध्ये मांडतो. भाऊ बहिणीला कागदावर सह्या मागतो आणि नातेसंबंधात ताणतणाव वाढतो हेही सत्य वाचकासमोर ठेवतो. रक्ताच्या संबंधातील दुरावा दिवसेंदिवस कसा वाढत आहे हे तर कवी दर्शवितोच परंतु म्हातार्याशिवाय म्हातारीच्या आयुष्याची कशी वाताहत होते, तीचा या घरादारात आणि रानमातीत कसा प्राण पेरला आहे याचेही जड अंतकरणाने चित्रण करतांना दिसतो. आज ज्याला आपण कृषिकेंद्रित समाजव्यवस्था म्हणतो तिला तडे जात आहेत.
दुष्काळ आणि शेतीच्या व्यवसायाकडे पाहण्याच्या नकारात्मक दृष्टिकोनाचा परिणाम जीवनावर होत आहे. शेतीतील जमिनीत पिकापेक्षा कुसळच माजल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावोगावी निर्माण झालेल्या भीषण वास्तवाला कवी नजरेआड करू इच्छित नाही. सुखानेच दुःखालाही पाठंगुळी टांगून ठेवावे असे नवे आजचे भौतिकमय जगणे वाट्याला येत आहे. कष्टणारा झिजतो मात्र त्याचा लाभ घेणारी माणसं दुसरीच असतात. त्यामुळे
' वाढत चाललेय द्रुत लयीत कोलाहलाचे तांडव
गर्दीत कुठंच कसं कुणी माणूस दिसत नाही. ' (पृष्ठ - ९६)
असा हा दोलायमान काळ कवीला विदग्ध करून सोडतो. त्यामुळे माणसांच्या जत्रेतही जीवाला विश्रांती घेण्यासाठी थांबावेसे वाटत नाही इतका जीवच जिवापासून पारखा होत चाललाय. ऋतूंचे संदर्भ बदलत जावे तसे माणसाच्या मनातील नीतिमत्तेचे संदर्भही बदलतात. अशावेळी अस्तित्वाचा तळ शोधण्याशिवाय पर्याय नसतो. काळोखातून उजेडाचा शोध घेण्याची प्रक्रिया इथूनच कवीला सुचते.
माणसातील माणुसकी शोधणाऱ्या समाजसुधारकांवर कवी भाष्य करताना दिसतो. यांमध्ये गाडगे बाबा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कर्तृत्वाला ते नतमस्तक होतात. कारण त्यांच्या कर्तुत्वानेच या देशाचा नवा इतिहास आकाराला आला आहे. त्यामुळेच सागरापरी आईची माया आणि नभापरी बापाची छाया झालेले कर्मवीर, मानवी मनामनातील युद्ध आपल्या शांतप्रिय बोलण्याने मिटविणारे बुद्ध , सुकणाऱ्या लाख कळ्यांना जगण्याचा श्वास देणारे बाबासाहेब आणि खापराला ज्ञानवाही करून आपल्या वैचारिकरूपी खराट्याने मानवी मनाची स्वच्छता करणारे गाडगेबाबा हे कवींच्या विश्वव्यापी विचारांचा विषय बनतात. कारण त्यांचे विचार शस्त्र , अस्र आणि युद्धाच्या विचारांना सारून मानवतेचा जयघोष करण्याची उत्साही प्रेरणा देतात. देश आणि प्रांताच्या सीमा भेदून मानवतेची गाणी गाण्याची प्रेरणा बनतात. माणूस ज्यावेळी काळजातून वेदनेची भाषा बोलू लागतो त्यावेळी कोटी दुःखितांचे बीजे त्यामध्ये सामावलेली असतात. त्या दुःखितांच्या वेदनांना आभाळाएवढ्या श्वासांची संवेदना प्राप्त झालेली असते. मानव्यतेची झालर हाच तिचा मुख्य कणा बनतो.
माणूस शेती आणि झाडाचे आदिम नाते कवीने ' पडीत ठेवलं वावर तर' या कवितेमध्ये भावगर्भ आणि तितकेच चिंतनशीलपणे उलगडून दाखवले आहे. माणसाच्या बकाल भुकेची कवी कारणमीमांसा सांगतो-
'माणसं आणि स्वतःपासून ज्याची
तुटत जातात पाळेमुळे
त्याला कोणती भासणार सुखे
भेटणार आहेत कशामुळे.' (पृष्ठ ४२)
असा प्रश्न कवीमन यावेळी उपस्थित करते त्यावेळी झाड आणि जमिनीच्या आंतरिक नाते बंधाची सांगडही स्पष्ट करतात. झाडांना सावली देण्याचं तत्वज्ञान असं सांगावं लागत नाही तसंच जमिनीलाही तिच्या गुणधर्माची बांधिलकी पटवून देण्याची गरज नसते. परंतु यापासून मात्र माणूस बराच दूर आहे. तो स्वतःच्याच विश्वात गुरफटून गेला आणि जंगल, जमीन, जल आणि जागतिकीकरणाच्या प्रवाहापासून दूर गेला. परिणामी सुखाच्या खऱ्या कल्पनेपासूनच तो दुरावला याची कवीला खंत वाटते.
कवीच्या जीवनाला समजून घेण्याच्या आणि जगण्याच्या भूमिका अगदी स्पष्ट आहेत . 'माझे गाणे' , ' शब्द ' , ' माझ्या शब्दास ' , 'या विश्वातील माणसांना' आणि 'शोधतो मी' सारख्या काव्यातून मनातील विचार, भावना, भविष्यातील आशा-आकांक्षा, मानवतेची जाणीव, समता, सत्य यांचे सामर्थ्यगाण कवी गातो. आपले गाणे मानवतेचे असावे हा ध्येयध्यास उरी बाळगून माणुसकी आणि चैतन्यासोबतच आनंदाचेही दान सृष्टीला देण्याची भाषा करतो. अनाथांना मातृत्व आणि देणाऱ्यांना दातृत्व देण्यासोबतच निखळ निरागस हास्याचे समतावादी सत्याचे गाणे निर्माण करण्याची प्रतिक्षा कवी करतो. कारण कवी या सृष्टीच्या कणाकणात नवा आशावाद पेरण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे स्वतःचे दुःख उगाळीत बसण्यापेक्षा त्यावर उपाय सुचवून जगण्याला अर्थ देऊ पाहतात. साऱ्यांच्या संगतीने दुःखाचा आवंढा गिळीत श्वासाला आभाळाएवढा करण्याची भाषा वापरतात या भाषेत -
'नवतेचे आणि नवतेजाचे
सृष्टी मधल्या सामर्थ्याचे
भूमी होऊनी जगण्याचे
माझे गाणे व्यापकतेचे .' (पृष्ठ ४३)
म्हणणारा एक भक्कम आत्मविश्वास आहे. नदी आटली म्हणून ज्याप्रमाणे जगण्याचे प्रवाहीपण संपत नाही त्याप्रमाणे आशावादी जगले की, आपोआपच जीवनाला दिशा मिळत जाते. मार्ग सुचतात आणि नात्यांच्या जत्रेतून व्यथेला सारीत प्रकाशाचा नवनवीन मार्ग गवसत जातो .
निसर्गातील वृक्षवेलींचा एक अनामिक लळा कवी काळजाच्या कुप्पीत जपतांना दिसतात. परंतु अलिकडे या निसर्गाचे, वृक्षाचे कत्तलीकरण जागतिकीकरणाच्या आणि सडक योजनेच्या नावाखाली होताना दिसते. कधीकाळी कवीची पावलं गावाकडं वळतात त्यावेळी चिंचेची झाडं, हलकं वारं, माणसाचं हळुवार बोलणं, सकाळ-संध्याकाळ देवळासमोर जमा होणं हे सारं आठवतं आणि मन मात्र खिन्न होतं. रस्त्याच्या कडेला झुरणीला लागलेली बाभूळीचे कवीला दिसते ते केवळ दुःख!
'आजूबाजूच्या पळस, पांगिरा अन् कडुनिंबाला
जेव्हा येत असतो बहर
कोणत्या दुःखाचे ही बाभूळ भोगत असते
अनाम जहर! ( पृष्ठ ८८)
अर्थात हे बाभळीचे दुखणे मानवनिर्मित आहे. पैशापोटी माणसं शेत्या घेऊन डोंगर, नाले, रस्ते खोदत गेले आणि त्याठिकाणी मोठमोठ्या कारखान्यांची उभारणी झाली. ज्या बाभळीखाली कधीकाळी शेळ्या-मेंढ्या पाला आणि शेंगा खायला यायची, शेतकरी जोडपं दुपारी सावलीत कुटखा खायचे तो आता इतिहासजमा झाला या भावनेने कवी उद्विग्न होतो. स्वार्थाच्या हव्यासी रणगाड्यांनी हिरव्यागार डोंगराचे नांगर टाकून विद्रुपीकरण केले. त्यामुळे माणसाची अवस्था आता शेतातील बुजगावण्यासारखी झाली. विश्वास ठेवण्यासारखा माणूस राहिलेला नाही.
कवीचं नियतकालिकाच्या संपादकाशी वर्गणीदाराच्या रुपाने असलेलं एक अनामिक नातं पाहायला मिळतं. एकीकडे कवीची वर्गणी भरण्यासाठी असलेली हतबलता आणि दुसरीकडे नियतकालिकं छापण्यासाठी संपादकाची चाललेली धडपड यांचा ताळमेळच बसत नाही याचेही चित्रण येते. सुख-दुःखाचे ऋतू भोगून घेतल्याशिवाय आणि आपल्या नशिबी असलेले दुःख मागून घेतल्याशिवाय या जीवनातून सुटका होणार नाही याची जाणीव कवीला आहे. परंतु या दुःखाच्याही पल्याड आशा आहे.
'सारी झडतील पाने
पुन्हा फुटेल पालवी
खुलतील शुभ्र फुले
गंध टाळून मायावी.' (पृष्ठ ८१)
ही शुभ्र फुले उद्याच्या चैतन्यमय भविष्याची नांदी आहे. रात्र उजाळून पक्षी ज्याप्रमाणे अथांग आकाशात झेप घेतात आणि आयुष्याची नक्षी या काळ्या-निळ्या आभाळभर रेखाटतात तसे जगणे कवीमनाला अपेक्षित आहे. त्यासाठीच कवी आगंतुकपणे धडपडतो आहे. त्यामुळे त्यांच्या या कविता म्हणजेच एकप्रकारे अगतिक मनाची स्वागतेच आहेत असे म्हणायला मुळीच हरकत नाही.
आजूबाजूच्या निराशावादी वास्तवातूनही आशेचा किरण शोधीत जाणारी कैलास दौंड यांची कविता आहे. त्यांच्या कवितेतील प्रतिमा ग्रामीण समाजव्यवस्थेशी बांधीलकी जपणाऱ्याच नाहीत तर त्यावातावरणाशी एकरूप झालेल्या आहेत. वाट्याला आलेलं आयुष्य आणि जगतांना जीवाचा चाललेला कासाविसपणा यातून कवीमन धाव घेऊ लागते. मतलबी नातेसंबंधही माणुसकीचा धर्म विसरून स्वार्थाची भाषा बोलू लागतात. घरातच आपल्या वाट्याला पाहुण्यासारखे जगणे येते. अशा या असंख्य आठवणचा पदर कैलास दौंड यांनी 'आगंतुकाची स्वगते 'मधून वाचकासमोर काव्याच्या रूपाने मांडला आहे. त्यामुळे त्यांची कविता वाचकाला बालपणीच्या गावाची आठवण करून देते एवढे मात्र निश्चित. ग्रामवास्तवाचे जगणे मांडण्यात कवी यशस्वी ठरले आहेत असे म्हणायला हरकत नाही.
• आगंतुकाची स्वगते : कवितासंग्रह
• कवी : डॉ. कैलास दौंड
• प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे
•प्रथमावृत्ती - १२जानेवारी२०२१
• पृष्ठे ९६ • मूल्य ११० ₹
• मुखपृष्ठ : प्रमोदकुमार अणेराव.
~~
डॉ. अनंता सूर
(भ्रमणध्वनी ९४२१७७५४८८)
कल्पना मार्बलमागे, छोरीया लेआउट,
गणेशपुर (वणी, तालुका वणी
जिल्हा यवतमाळ पिन - ४४५३०४
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा