• 'शब्दांची नवलाई' : भाषिकभान समृद्ध करणारा बालकवितासंग्रह.

 


• 'शब्दांची नवलाई' : भाषिकभान समृद्ध  करणारा बालकवितासंग्रह.

                                  •डॉ. कैलास दौंड

       साधारणपणे व्याकरण हा भाषाभ्यासातील रूक्ष घटक. त्याचा रूक्षपणा कमी व्हावा यासाठी कार्यात्मक पद्धतीने व्याकरण शिकवायला सुरुवात केली गेली. व्याकरणातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद व या चारही शब्दजातीचे उपप्रकार तसेच भाषाभ्यासातील वाक्रचार, म्हणी, समुहदर्शक शब्द, प्राणी पक्षी यांच्या घरांची नावे, यमक असलेले शब्द, जोडशब्द, उपमादर्शक शब्द, अलंकारिक शब्द, ध्वनीदर्शक शब्द, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ, समानार्थी शब्द, विरूद्धार्थी शब्द, विरामचिन्हे, पत्रलेखन हे सगळे सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकायला मिळाले तर! कवितेतुनच हे शिकायला नि अनुभवायला मिळाले तर कित्ती धमाल येईल नाही का? ही अनोखी किमया साधली आहे प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी. नुकताच त्यांचा ' शब्दांची नवलाई' हा बालकवितासंग्रह प्रकाशित झाला असुन त्यातील कवितामधुन वरील सर्व संकल्पना अर्थासह आकलनात येतात. मराठीत आधुनिक काळात प्रथमच कवितेतून हे विषय आले आहेत तेही सुलभपणे. त्या अर्थाने या बालकवितासंग्रहातील कविता उपयोजित कविता आहेत तरीही कवी एकनाथ आव्हाड यांची मुरलेली आणि अनुभवी लेखणी या सर्व कवितांना सहजसुंदर आणि उत्स्फुर्ततेचा बाज देण्यात कमालीची यशस्वी झाली आहे. त्यामुळे त्यांनी बालकवितेच्या कक्षा अधिक व्यापक केल्या आहेत असे म्हणणे योग्य ठरेल.
     'शब्दांची नवलाई' मधील 'आई म्हणते' या कवितेतून 'तोंड' या शब्दाचा समावेश असलेले अकरा वाक्प्रचार भेटीस येतात. वाक्प्रचाराचा नकारार्थी वापर कसा करावयाचा याची उदाहरणे देखील या कवितेत सहजपणे कवीने योजलेले आहेत. 'वाक्प्रचाराची  गंमत' या कवितेही वाक्प्रचाराचा शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो हे पहिल्या कडव्यात सांगुन साधारणत: घरात वापरल्या जाणाऱ्या आणि अवयवांशी संबंधीत दहा वाक्प्रचाराचा परीचय कवी आव्हाड  घडवतात व अखेरीस -
   'बाबांच्या बोलण्यात शरीराचे
  अवयव हमखास असतात
   भाषेचे सौंदर्य खुलवून ते
   वाक्प्रचार होऊन बसतात. '
अशी त्यांची महती सांगतात.
' आपला हात जगन्नाथ ' या कवितेत 'हात' या अवयवांशी संबंधीत वाक्प्रचार येतात. 'म्हणी' या तर अनुभवांच्या खाणीच असतात. त्यांच्या सुयोग्य वापरामुळे भाषा चटकदार बनते.  'अनुभवांच्या खाणी' या कवितेत बारा म्हणी अकृत्रिम वाटाव्यात इतक्या सहजतेने कवीने गुंफल्या आहेत.
उदा :
  'शितावरून भाताची
   होत असते परीक्षा
   चोर सोडून संन्याशाला
   देऊ नये शिक्षा.'
आपल्या माय मराठी भाषेचा शब्दसंग्रह विपुल आणि वैविध्यपूर्ण आहे. 'आम्ही दोघे भाऊ ' या कवितेतून जसा विरूद्धार्थी शब्दांचा परीचय घडतो तसाच 'आमच्या बाई...' या कवितेत कवीने वन, आश्चर्य, घर, मुलगा, डोळे, दूध, पाणी, राजा, आनंद, सूर्य, समुद्र, काळजी, काळोख, माता या शब्दांच्या एकाच अर्थाचे शब्द किंवा समानार्थी शब्दांची रंजकतेने ओळख करून दिलेली आहे ती किशोरवयीन वाचकांना आवडेल, पचेल अशीच आहे. 
उदा :
'मुलाला म्हणतात त्या
  सुत, तनय, पुत्र
  डोळ्याला म्हणतात त्या
  नयन, लोचन , नेत्र.'
'प्रकाशगाणे' ही समानार्थी शब्दांची ओळख करून देणारी आणखी एक कविता लोभस कविता आहे. 
      'समुहाचे गाणे ' या कवितेतून जुडी, अढी, मोळी, जाळी, चवड, उतरंड, पुंज, कुंज, ताटवा, थवा, कळप,  चळत अशा समुहदर्शक शब्दांचे दालन खुले होते. 'घरांची नवलाई' ही प्राणी, पक्षी यांच्या घरांचा परीचय करून देणारी छानदार कविता. खूपच सहज वाटावी अशी ही कविता परिसराचे ज्ञान देखील करून देते. ' शब्दांचा साठा' या कवितेतूनही असाच अनुभव येतो. या कवितातून विविध प्राणी व पक्षी यांच्या आवाजाला काय म्हणतात हे बालकिशोर वाचकांना या कवितेतून सहजपणे समजेल.
         यमकाचे शब्द आणि त्यातुन उत्पन्न होणारी नादमयता बालवाचकांना नेहमीच  आवडणारी गोष्ट. 'नवा खेळ' व ' की ची करामत ' या बालकवितेत अनुक्रमे  'डा' अक्षराने शेवट असणारे व 'की'  या अक्षराने शेवट असणारे  'वाकडा' , ' छकडा' , 'चवडा' , ' केवडा' , ' निवाडा' , 'पोवाडा' , 'करडा' , ' सरडा' , 'खरडा ' ,  ' मुरडा' , 'काकडा' , 'चौघडा' आणि 'मालकी' ,  'बोलकी' , 'खिडकी ' , 'मडकी' ,  'गिरकी' ,  'सरकी' , ' ढोलकी' ,  ' डुलकी' , 'नाटकी' ,  ' फाटकी' ,  ' चमकी ' ,' टिमकी' , 'अंगतपंगत ' , 'रंगत ' अशा शब्दांची त्यांच्या अर्थासह लोभस गुंफण कवीने केलेली आहे.
       जोडशब्द व त्यामुळे वाढणारी भाषिक सुंदरता 'शब्दांची लाडीगोडी ' या कवितेत दिसते. तर 'नादमयता' नावाच्या कवितेतून 'ध्वनीदर्शक' शब्दांचा अर्थासह परीचय घडतो.  'अलंकारिक शब्द' हे कानाला ऐकायला गोड वाटतात, ते भाषेला सहजपणे फुलवतात .'अलंकार ' कवितेत कवीने वेगवेगळे  बारा अलंकारिक शब्द अर्थासह व आकलन सुलभ होतील असे गुंफलेले आहेत.
       'उपमा' दर्शक शब्द 'मधासारखी गोड' कवितेतून कवी घेऊन येतो. कुणी मित्र मोरासारखा गर्विष्ठ आहे तर कुणी सशासारखा भित्रा, कुणी फुलपाखरासारखा चंचल आहे तर कुणी मधमाशीसारखा उद्योगी ' ,  कुणी हरणासारखा चपळ आहे तरी या सर्वांची मैत्री 'मधासारखी गोड' आहे हे कवी सांगतो. कर, चरण, जलद,  कात, चिरंजीव अशाएकाच शब्दाचे अनेक अर्थ 'शब्दांची नवलाई ' कवितेतून उलगडतात.
       'विरामचिन्हांचे अर्थ' समजायला व त्यांचे उपयोजन करायला उपयुक्त ठरणारी 'चिन्हांचा खेळ' ही कविता अप्रतिम आहे. या कवितेच्या शेवटी कवी लिहीतो :
  'चिन्ह वगळून वाक्य
  कसे ओंगळवाणे दिसे
  चिन्हांमुळेच वाक्याचा
  अर्थ मनी ठसे! '
'उत्स्फूर्त उद्गार!' ही कविता  उद्गारवाचक शब्दांचा परीचय करून देते.
       'पत्रलेखन' ही एक मोठीच मनस्वी संवाद साधणारी बाब, ती एक कलाही म्हटली जाते. मायना, अभिवादन, शेवट, पत्ता लिहीणे असे यातील सर्वच भाग महत्त्वाचे असतात. ' आईस पत्र ' या सुंदर कवितेतून पत्र लेखनातील अनेक गोष्टी सहजपणे समजतात. घरगुती पत्रात वापरण्याच्या भाषेचा देखील परीचय तिच्यातून होतो.
   कवींची टोपणनावे कुतूहलाचा विषय असतात. गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, केशवकुमार , बी, आरती प्रभू, केशवसुत, बालकवी, अनिल, ग्रेस, संत रामदास अशा कवींच्या मूळ नावाचा सुंदर परीचय 'नावात बरच काही' या कवितेतून घडतो. तर थोर व्यक्तीमत्त्वे व त्यांच्या घोषणा 'बोल बहू अनमोल 'या कवितातून कळतात.
     'भाषिक खेळ'  भाषासमृद्धीसाठी  खूपच उपयुक्त ठरतात.  शब्दसंग्रह वाढवणारी कोडी तर मोठ्यांनाही भूरळ घालतात.'खेळ आला रंगात' या कवितेत अशीच विचार करायला लावणारी कोडी आहेत नि त्यांची उत्तरेही आहेत.
     व्याकरणातील नाम व नामाचे प्रकार सौदाहण उलगडणारी 'नामाचा महिमा' ही कविता ,'गमतीची गोष्ट ' ही मजेशीर प्रसंगातून सर्वनामाची ओळख करून देणारी कविता आहे  आणि  ' वेगळीच ' बात या कवितेतून कवीने विशेषण व विशेषणाच्या प्रकाराची सौदाहण ओळख करून दिली आहे.
क्रियापदाचे प्रकार समजावून सांगणारी 'बाबा म्हणतात ' ही कविता आवडेल अशीच आहे.
    शब्दांची नवलाई ' या बालकवितासंग्रहातील        कवितेची आनंदाने भाषाभ्यास ,एकीकडे भाषिक जडणघडण आणि त्याचवेळी परिसराचे भान, सहज शिकवण देण्याचे कार्य, उपयोजित साहित्यामध्येही सहजता आणि उत्स्फुर्तता ही सांगता येतील. या कविता कवीच्या अनुभव व भाषासमृद्धतेमूळे कुठेही निरस न वाटता उत्सुकता व उत्कंठा वाढणार्‍या  आहेत. कवीने लक्षवेधी पद्धतीने केलेले आहे. उदा :-
' तमा, काळजी, पर्वा, फिकिरीत
  दिवस उद्याचे का बिघडावे?
  प्रिय, आवडते, लाडके बनुनी
  पाखरांपरी सदा बागडावे  '
कवी एकनाथ आव्हाड यांच्या या बालकवितासंग्रहातील कवितांबद्दल लिहितांना प्रसिद्ध बालसाहित्यिक डाॅ. सुरेश सावंत यांनी 'एकनाथ आव्हाड यांनी बालकवितेला पारंपरिक चौकटीतून मुक्त केले आहे, याची साक्ष ' शब्दांची नवलाई ' हा कवितासंग्रह वाचतांना पटते.' असे विधान प्रस्तावनेत केले आहे त्याची यथार्थता या संग्रहातील सर्व बालकविता वाचुन पटते. कवी आव्हाड यांचा हा कवितासंग्रह बाल आणि किशोरवयीन वाचकांच्या पसंतीस तर उतरेलच आणि शिक्षकांचाही तो आवडता ठरेल यात संदेह नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारांनाही तो उपयुक्त ठरणार आहे. कवी एकनाथ आव्हाड यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कवितालेखनाची मराठी साहित्य विश्वाला निश्चितच दखल घ्यावी लागणार आहे. चित्रकार संतोष घोंगडे यांच्या छानदार चित्रांनी 'शब्दांची नवलाई ' हा रॉयल आकारातील बालकवितासंग्रह अंतर्बाह्य सजला आहे.
• शब्दांची नवलाई : बालकवितासंग्रह 

• कवी : एकनाथ आव्हाड 

• प्रकाशक : दिलीपराज, पुणे ३०

• प्रथमावृत्ती : डिसेंबर २०२०
• पृष्ठे : ६४ • मूल्य : १५०₹
~~~
~~~
डाॅ. कैलास रायभान दौंड
मु. सोनोशी पो. कोरडगाव
ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर
पिन ४१४१०२
मो ९८५०६०८६११
Kailasdaund@gmail.com

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर