बालकवितांची मेजवानी : पाखरमाया आणि जंगल दंगल
○ बालकवितांची मेजवानी : 'पाखरमाया' आणि 'जंगल दंगल'.
डाॅ. कैलास दौंड
आज कधी नव्हे ती माणसाला निसर्गाच्या सहवासाची आवश्यकता भासू लागली आहे. निसर्गातील नानाविध प्राणी, पक्षी, हिरवाईने नटलेली जंगले, नद्या आणि त्याची विविध रूपे मनाला मोहवितात. निसर्गरूपाचा संस्कार लहानपणीच झाल्यास त्या मनात संवेदनशीलता वाढीस लागते. निसर्गाशी बालमनाचे नाते जुळावे आणि हे नाते अकृत्रिम असावे इतके की निसर्ग घटक आपल्या नात्यातीलच आहेत असे वाटावे. यासाठी बालमनाला आवडतील, गुणगुणाव्याशा वाटतील अशा कवितांचे दोन कवितासंग्रह नुकतेच प्रकाशित झालेत. 'पाखरमाया ' आणि ' जंगल दंगल' ही त्यांची नावे. कवी आहेत श्री. शिवाजी चाळक.
'अर्घ्य' या कवितासंग्रहातील कवितांमुळे व शिवांजली साहित्यपीठ संस्थेमूळे मोठ्यांना कवी शिवाजी चाळक यांचे नाव परिचित आहे. तर आता पाखरमाया आणि जंगल दंगल या यशोदीप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या बालकवितासंग्रहामूळे बालवाचकांच्याही हे नाव नक्कीच ओळखीचे होईल याची खात्री आहे.
कवी श्री. शिवाजी चाळक यांचा 'पाखरमाया' हा बालकवितासंग्रह ३० डिसेंबर १९ ला प्रकाशित झाला. आणि त्यानंतर अवघ्या चाळीस दिवसातच 'जंगल दंगल' हा बालकवितासंग्रह देखील प्रकाशित झाला आहे. बालवाचकांच्या हाती काहीतरी चांगले, त्यांना आवडेलसे आणि संस्कारक्षम काही द्यावे हात चाळक यांचा उद्देश या पुस्तकांमूळे बर्यापैकी यशस्वी झालेला आहे. ही दोन्हीही पुस्तके अतिशय कल्पकतेने सजवलेली असुन प्रतिप खेतमर यांच्या कलानिर्देशनाने आशयानुरूप बहुरंगी चित्रांनी नटलेली आहेत. साहित्यिका मंदा खांडगे आणि कवयत्री आसावरी काकडे यांच्या वेधक आणि कवितांची बलस्थाने दाखवणार्या प्रस्तावना अनुक्रमे 'पाखरमाया' आणि ' जंगल दंगल' यांना लाभल्या आहेत.
कवी श्री. शिवाजी चाळक यांचा ' पाखरमाया' हा बालकवितासंग्रह हातात घेताच झाडावरील घरट्यातील पक्षी आणि त्याची पिल्ले आणि झाडाखाली असणारे विविध प्राणी, पक्षी, फुले, वेली आणि निसर्गाचे पुस्तक वाचणारी मुले अशा चित्राच्या मुखपृष्ठावर लक्ष खिळून राहते. 'आपल्या वृत्तीमध्ये बालपण जपत असलेल्या सर्वांना 'ते या कविता समर्पित करतात. या बालकवितासंग्रहात सोळा कविता असुन त्यात सूर्य सकाळ, संध्याकाळ, आला आला रे पाऊस, पाखरमाया , अंधाचा हत्ती अशा निसर्गरूपाचे दर्शन घडवणार्या कवितेसोबतच सुंदर माझी शाळा, किल्ला, बिबट्याचा प्रश्न , मामाचा गाव , गावाकडे, उन्हाळ्याची सुट्टी, नंदीबैल, वीज, प्रश्न, बाबा, द्या ना वेळ अशा माणुस अनुभूती देणार्या कविता आहेत. त्यातुन सहजपणे बालविश्वात प्रवेशकरण्याची आणि त्यांच्याशी समरस होण्याची चाळक यांची वृत्ती दिसते.
श्री. शिवाजी चाळक यांची बालकविता लय, ताल, स्वरांनी सुंदर आणि लहानमुलांना काही शिकवणारी आहे. 'सूर्य' या कवितेत -
' पूर्वेची लाली
पश्चिमेला गेली
घरी जा आता
संध्याकाळ झाली.'
असे म्हणतात ते केवळ अपूर्व आहे. कृतज्ञता शिकवणारे आहे. निसर्गरूपाची काळजी घेणारे आहे. त्यात कल्पकता आहे आणि माणूसभावाचे आरोपनही आहे. सकाळ या कवितेत सकाळच्या वेळची लगबग दिसते तर सुंदर माझी शाळा या कवितेतून पक्ष्यांच्या ताना ऐकायला मिळणारी सुंदर शाळा आहे. नवनिर्मिती करणे हे जणू शिक्षणाचे ध्येय. मातीचा किल्ला बनवल्या शिवाय दिवाळीची धम्माल पूर्ण होत नाही. 'किल्ला ' कवितेतील मुले असा किल्ला तयार करतात व म्हणतात -
' त्यावर लावू
पणती छान
आनंदाला
येई उधाण..'
पाळीव प्राण्यांचा लहानांना जसा लळा लागतो तसेच त्यांना जंगली प्राण्यांचे देखील कुतूहल आणि आकर्षण असते. अलिकडे तर जंगल तोडीमूळे बिबटे थेटच मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. 'बिबट्याचा प्रश्न ' या कवितेत -
' जंगले तोडली
तळी आटली
राहायला आम्हा
जागा कुठली? '
असा प्रश्न बिबटय़ा विचारतो आहे. तर ' पाखरमाया ' कवितेतील कष्टाळू पाखरं माणसासाठी आदर्श ठरतात. जीवन कितीही गतिमान झालेले असले तरी अजुन बालकांना मामाच्या गावाचे आकर्षण आहे. जर हे गाव शेत शिवाराशी संबंधीत खेडेगाव असेल तर हे आकर्षण अधिकच वाढते. 'मामाचा गाव ' बहरलेला डोंगरगाव भेटीला येतो. शहर आणि गाव यातील भेद बालकांच्या भावविश्वाला वेगवेगळे अनुभव देतो. त्यामुळे शहरातील बालकांना गावाची ओढ लागते. 'गावाकडे ' कसे चैतन्य असते ते कवी शिवाजी चाळक कवितेत मांडताना सहजच लिहून जातात -
' गोठ्यात हंबरती
गायी आणि गुरे
दावणीत चारा
शांत होई सारे. '
'उन्हाळ्याची सुट्टी' कवितेतील अनुभवही काहीसा असाच आहे.
' माठातले पाणी
पिऊ गार गार
लिंबू - साखरेने
शक्ती येई फार '
तर 'नंदीबैल' कवितेत नंदीबैलाची ओळख मुलांना होतो. 'वीज' या कवितेत वीजे बद्दल कुतूहल निर्माण तर होतेच पण नकळतपणे कवी मुलांच्या मनातील भारनियमनाच्या प्रश्न देखील मांडतो. पहा -
' असे कसे तिचे
वागणे आहे अजब
अभ्यासाच्या वेळी
कुठे होते गायब? '
बालकांना असलेले आजोबा आणि आजीचे आकर्षण 'प्रश्न ' कवितेत दिसते. अगदी आजी आजोबा लवकर भेटावेत यासाठी
' नाही जर भेटले
तर मॉलमध्ये जाऊ
नाहीतर त्यापेक्षा
ऑनलाईन घेऊ "
बाल वयात पाऊस हा तर आनंदाचा परमोच्च बिंदू असतो. 'लहानगे पावसात / नाही ऐकत कोणाचे / पाय आपटून दोन्ही / थेंब झेलती पावसाचे " हे सगळे खरेच पण आईचा आवाज येताच सगळ्यांना पळून जात कोपर्यात लपून बसावे लागते. 'अंधाचा हत्ती ' या कवितेतून कवी चाळक एका पारंपरिक कथेला वेगळाच पैलू देतात तो असा -
' प्राण्याची रूपे
अंधांना किती
डोळस म्हणती
एकच हत्ती '
आई बाबांनी आपल्याला वेळ द्यावा, आपल्याशी बोलावे, कधी खेळू लागावे असे त्यांना वाटते. पण एका मुलाच्या बाबांना कामामुळे घरी थांबताच येत नाही. अशावेळी ' बाबा द्या ना वेळ' कवितेत ते मुल म्हणते -
' माझ्यासाठी काढा ना
बाबा कधीतरी वेळ
आपण दोघे मिळून
खूप खेळू खेळ. '
संध्याकाळ ' ही खेड्यातील सांजवेळ सजीवंत करणारी कविता. गोष्टी ऐकत ऐकत आजीच्या मांडीवर झोपी जाण्यात कोण आनंद असेल तो भोगल्या शिवाय कळणार नाही.
' आजीच्या गोष्टी
असतात नामी
मांडीवर तिच्या
झोपतो आम्ही. '
अशा छानदार, ग्रामीणत्वाचा स्पर्श असणाऱ्या सोळा कविता या 'पाखरमाया ' बालकविता संग्रहात भेटतात. या कविता विविध नियतकालिकातून पूर्व प्रकाशित झालेल्या आहेत. डाॅ. मंदा खांडगे यांची छानदार प्रस्तावनाही 'पाखरमाया' ला लाभलेली आहे.
'जंगल दंगल ' हा लगोलग ८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रकाशित झालेला शिवाजी चाळक यांचा दुसरा बालकविता संग्रह. यशोदीप प्रकाशनाचीच ही सुंदर निर्मिती. पुस्तकातील चित्रांनी जंगल दृष्यरूपास येते आणि कवितांचा आशय देखील परीणामकारक होतो. एकुण अठरा कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. कपिला, मासा, पोपट, राखणदार, मनीमाऊ, चिऊताई, माकडाची करामत, खारूताई, ससा, वाघोबा, गरिबाची गाय, मोर अशा बालकांना माहित असलेल्या प्राणी आणि पक्षी यांच्या कविता इथे बालकांना खुणावतात. जंगलसभा १ आणि २ व पाखरांची शाळा १ व २ या चार कवितामधुन माणुस आणि प्राणी व पक्षी यांचा अनुबंध साक्षात होतो. बालमानसाच्या जडणघडणीत परिसराचा फारच मोठा वाटा असतो. अनुवंश आणि परिस्थिती हे तर बुद्धीवर परिणाम करणारे घटक असल्याचे मानशास्रानेही सांगुन टाकलेले आहे.
लहानमुलांना दूध पिणे आवडते. त्यामुळे दूध देणार्या गाई, शेळ्या अशा प्राण्यांचेही त्याला कौतुक नि कुतूहल असते. एकाच गाईचे दूध पिणारे वासरू आणि मुल यांच्यातही एक निरागस भावबंध निर्माण झालेला दिसतो.
'वासरू आणि मी
सोबत खेळतो छान
कुरवाळत बसतो
त्याचे सुंदर कान '
या 'कपिला' कवितेतील ओळी एक सुंदर चित्र डोळ्यासमोर उभे करतात. तसेच चित्र 'गरिबाची गाय ' या कवितेतून देखील उभे राहते.
' तिच्याजवळ जाते
लाडं लाडं आई
चोळून घेण्याची
शेळीला घाई. '
काही प्राणी, पक्षी बघुन बालमनाला प्रश्न पडतात. प्रश्न पडणे हा त्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असतो. पडणारे प्रश्न त्याच्या अनुभव विश्वावर आधारीत असतात खरे पण त्यामुळे त्याचे अनुभव विश्व विस्तारत असते. 'मासा ' या कवितेत माशाचे निरीक्षण केल्यावर तो आईच्या कुशीत कधी झोपत असेल? , त्याला बहीणभाऊ किती असतील? , पाण्यामध्ये त्याला कोण खाऊ देत असेल? असे अनेक बालसुलभ प्रश्न पडतात. असाच प्रश्न 'चिऊताई' या कवितेत देखील आहे.
' घरट्यात तुझ्या
पिल्ले किती
एकटे त्यांना
नसते का भीती? '
'पोपट ' या कवितेत पोपटाचा हिरवा रंग कवीने खुप सुंदर कल्पना केली आहे. ती अशी -
'मिठू मिठू पोपट
बोलण्यात दंग
पानांतून चोरतोस
पोपटी पोपटी रंग '
माणसाने निसर्गसंपदेचा उपभोग घेत असतांनाच आपल्या हव्यासापोटी वृक्षतोड केली, जंगलांना आगी लावल्या, त्यामुळे जंगलातील जैवविविधता धोक्यात आली. अशा पार्श्वभूमीवर जंगलातल्या प्राण्यांनी 'जंगलसभा' घेतली. सभेत प्रत्येकाला म्हणने मांडावयाचे असल्याने ही सभा १ व २ अशा दोन भागात झाली.
'सभेचा विषय
जगायचे कसे?
चिंतेने सगळे
झाले वेडेपिसे '
हा सभेचा मुख्य विषय आहे. यात साप, नाग, खोकड, हत्ती, पाखरे, मगर, कासव, हरीण, वाघोबा सगळे जण आपापले प्रश्न मांडतात. कारणांचा शोध घेतात आणि -
' कोल्ह्याने घेतली
एकमुख संधी
जंगलात माणसाला
कायमची बंदी. '
या निष्कर्षाप्रत येऊन सभा संपते. मला वाटते बालवयातच पर्यावरण स्नेही होण्याची सुंदर शिकवण या कवितेतून मिळते. त्याचा परीणाम म्हणून जंगल संपन्न होईल आणि आनंदमयी ' पाखरांची शाळा ' भरेल.
' सुताराने शिकवले
बनवायला घर
चिटुकली चिमणी
शिकवायला हजर. '
सर्वच कविता यमक, लय आणि ताल असणाऱ्या आहेत. शब्दकळा सहज आणि सोपी आहे. चित्रांमुळे कवितांना सुंदर साज चढला आहे. निसर्ग संस्कार घडवणारी सुंदर कविता असा शिवाजी चाळक यांच्या पाखरमाया आणि जंगल दंगल या दोन्ही बालकवितासंग्रहाचा उल्लेख करणे उचित ठरते. रॉयल आकारातील ही दोन्ही पुस्तके बालवाचकांच्या पसंतीस नककीच उतरतील. दोन्ही पुस्तके पालकांनी आवर्जून लहानग्यांच्या हाती द्यावीत अशी आहेत.
• पाखरमाया : बालकवितासंग्रह.
• प्रथमावृत्ती : ३० डिसेंबर २०१९
• जंगल दंगल : बालकवितासंग्रह
• प्रथमावृत्ती : ८ फेब्रुवारी २०२०
• दोन्ही पुस्तकाचे प्रकाशक : यशोदीप, पुणे.
• पृष्ठे ३२ प्रत्येकी. • मूल्य : १०० .प्रत्येकी.
~~~~~~
डाॅ. कैलास रायभान दौंड
मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी
जिल्हा अहमदनगर पिन ४१४१०२
Kailasdaund@gmail.com
Mo 9850608611.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा