● उद्ध्वस्त खेडी आणि पडीक शेतीचं आक्रंदन : 'आगंतुकाची स्वगते' । • प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (गोवा)
पुस्तक परीक्षण
● उद्ध्वस्त खेडी आणि पडीक शेतीचं आक्रंदन : 'आगंतुकाची स्वगते'
• प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (गोवा)
कैलास दौंड यांचा 'आगंतुकाची स्वगते' हा कवितासंग्रह ग्रामीण भागाचे प्रतिबिंब आहे. शेतकरी आणि त्यांच्या व्यथा वर्णन करणाऱ्या कविता त्यांनी 'उसाच्या कविता' , 'वसाण' , 'भोग सरू दे उन्हाचा' व 'अंधाराचा गाव माझा' या संग्रहातून मांडल्या आहेतच. 'आगंतुकाची स्वगते' या संग्रहात शेती, शेतकरी आणि सामान्य माणूस केंद्रित कविता आहेत.
'सल आणि ओल' या विभागातील पहिलीच कविता 'वाचवणं महत्त्वाचं' शेतकऱ्यांच्या दुःखानं हृदय पिळवटून टाकते. शेतकऱ्याला सरकार, तथाकथित बुद्धिवादी आणि आंदोलकही त्याला सुचवत असतात, या सुचनांतून शेतीवरचा पर्यायानं सरकारच्या डोक्यावरचा भार कमी करायला सुचवणारे सगळेच असतात. आत्महत्या केली तर लाखभर रुपये कुटुंबाला मिळतील, कर्ज, सबसिड्या, वीजबिलमाफी , खत बियाणांची मुबलकता ही सगळी आमीषं त्याला जगण्याची की मरणाची दिशा दाखवतात. 'तू पेरले तरी तुझ्या हातात काय येणार आहे ? छदामही नाही!' असा इशारा ही कविता देते. शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून जगाला कवी सांगतो की , 'सुचवण्यापेक्षा वाचवणं किती महत्त्वाचं असतं ते.'
'गाव थोडं सरतंय' ही कविता विकासाच्या नावाखाली गावाची झालेली पडझड दाखवून कालचा पाटील आज बलुतेदाराच्या कपबशा धूत आहेत. माणसं जात (मरत) आहेत. गाव बदलला आहे याचे भान देते. 'जाग जरासा आता ' ही कविता अष्टाक्षरी छंदात आहे. भूमिपुत्राच्या व्यथा ती सांगते. कांद्याचे भाव घसरतात, दलाल शेतकऱ्याला लुचतात, गुरांच्या छावणीतही कुणी मलिदा खातो, हे सत्य ही कविता सांगते तर 'सल' या कवितेत कवीने पाखरांची सल वर्णन करताना 'उधाणल्या उरसात मन का उदास?' असे म्हणत हा कवी 'सल हुंबराची काय कळते कुणास?' असा सवाल करतो.
'शहाणे सुरते', 'भग्न चिरेबंद ' , 'आता तरी' या कवितांतून कवीने उद्ध्वस्त होत जाणारे खेडे चित्रित केले आहे. 'आता तरी' ही अशीच अंतर्मुख करणारी कविता -
'असा कोणता वाण
उपजला आहे
तुझ्या शेतात
की,
साऱ्या पिकालाच वेढून राह्यलेय
हे कुसळ गवत. '
असं सांगणारी ही कविता मातीत आपण किती दिवस कुसळं वाढू देणार आहोत? असे विचारते आणि हे गवत आता तरी जाळशील की नाही?, असा प्रश्न करते. कवीला यातून सूचित करायचे आहे की, आपल्या मनात कुविचारांची जळमटे वाढली आहेत, समाजात दुही पसरवणारे कंटक आहेत, त्यांना तू पोसू नकोस, त्यांना धडा शिकव असा आग्रह कवी धरतो.
'निंदताना ओल थोडी जशी लागते हाताला
माती घुसळून घेते लाख अनोख्या गोताला'
ही कविता गझलेच्या अंगाने जाणारी आहे. उपजावु (सुपीक) जमीन पडीक पाडून त्याचे प्लॉट करणारी आजची पिढी शेतीवर प्रेम करीत नसल्याची खंत व्यक्त करते. मातीविना कुणाला सुख मिळणार नाही. हे लक्षात घ्यावे कारण सर्जनाचे सुख ओल्या मातीच्या कणाला असते.
'पथक' या कवितेत 'दुष्काळाची पाहणी करायला आलं आहे रानात पथक ' असं म्हणताना सरकारी अधिकारी किती निर्ढावलेले असतात, हे दाखवते. 'आशा' ही कविता सद्यःस्थितीतील विषमतेवर भाष्य करते. आता दूधदुभते कमी होऊन पिशवीतील आणि भुकटीचे दूध मिळते. गुरे आता शो-पीस होऊन त्यांना किंमत उरणार नाही. नेटकरी माणसे माणसांपासून दुरावतील ही भीती कवी व्यक्त करतो. 'असे उजाडले रान' ही कविता रानाची (जमिनीची) सर्जनशीलता नष्ट होत आहे. परंतु तरीदेखील काही भूमिपुत्र शेती कसत आहेत. ही आशा कवी व्यक्त करतो.
'आशावाद' या कवितेत शेतकरी आपल्या शेतीवर किती प्रेम करतो. त्याचा प्रत्येक श्वास हा शेती पिकवण्यासाठी खर्च होतो. कष्ट करण्याची त्याची जिद्द, दुष्काळात देखील आज ना उद्या पाऊसपाणी होईल हा आशावाद चिवट आहे. त्याला कुणाचेही आशीर्वाद व खोटी आश्वासने नकोत (मेळावे घेणारे कोरडी आश्वासनेच देतात याची त्याला चीड आहे.) 'दगडाची गाणी' ही अभंग छंदातील कविता कोरड्या नदीची भयावहता दाखवते. 'जुन्या जाणत्या' या आणि 'दगडाची गाणी' या कवितांतून नाती किती कमकुवत बनत चालली आहेत, त्याची भीषणता दाखवतो.
'पडीक ठेवलं वावर तर' रान पडीक ठेवलं तरी देखील शेजारी रान कोरत असतात. एकेक तास नांगर आपल्या वावरात घालतात आणि एकेक फूट जमीन बांध कोरून दुसऱ्याची जमीन हडप एखादा कोणी करीत असेल तरी शेजाऱ्याचा जीव घ्यायचा नसतो. आपली जमीन वहीत करण्याची तजवीज केली तर शेजारी बांध कशाला कोरतील? कारण शेती कसणाऱ्याचं लक्ष सतत असतं. पडीक वावराकडं मालकाचं लक्ष नसतं. या कवितेतून कवी 'शेती पडीक ठेवू नका वहीत करा सतत पेरणी व मशागत करा 'असा संदेश देतो.
'नदीकाठ' या दुसऱ्या विभागात 'माझे गाणे' या कवितेतून माणुसकीचे, अनाथांच्या मातृत्वाचे, देणाऱ्यांच्या दातृत्वाचे, पाणी भरल्या मेघाचे असल्याचे कवी सांगून सकारात्मक दृष्टीकोन बाळगतो. 'तुझ्या वृक्षाच्या छायेत' या कवितेत आपल्याला बुद्ध भेटावा, ज्ञान मिळावे. समृद्धीचे झाड मिळावे. मनातील भ्रांती दूर व्हावी अशी प्रार्थना कवी करतो. 'महामानवा' ही कविता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करणारी तर 'गाडगेबाबा' हा अभंग गाडगेबाबांना समर्पित आहे. या विभागातील कविता सद्गुणांची पेरणी करणाऱ्या आहेत. त्या दृष्टीने 'मोकळे होतसे गाणे', 'या विश्वातील माणसांना', 'आज' इत्यादी कविता अभ्यासण्याजोग्या आहेत.
'दिस- मास' या तिसऱ्या विभागातील कविता वाचकांना विचारप्रवण करतात. या विभागातील 'हा गाव तुझा नाही' ही कविता पोटापाण्यासाठी किंवा इतर कारणाने बऱ्याच दिवसांसाठी गावापासून दूर गेलेल्या लोकांच्या भावना व्यक्त करते. त्या मधल्या दिवसांत गावात झालेले बदल, जुन्या गल्ली बोळांचे रुंदीकरण पाहून आपण भलत्याच ठिकाणी तर आलो नाही ना? असा भ्रम प्रत्येकाला वाटतो. माणसांचे स्वभावही बदललेले असतात. कधी काळी आपला असलेला गाव आपल्याला परका होतो. 'सुई दोरा ' कवितेत '
'भोवतालाला गेले आहेत लाख तडे
आणि मी निघालोय
सुई दोरा घेऊन त्यांना सांधण्यासाठी
जी सुई दिलीय माझ्या आजीने माझ्या हाती.
हजार हातांनी शिवत जावे
आणि उदासलेले आभाळ सांधून घ्यावे.'
असे कवी म्हणतो. नाती आता बांधलेली राहिली नाहीत, याची खंत तो करतो.
या विभागात 'माणसापेक्षा थोर' ही कविता पक्ष्यांचं रुपक घेऊन रचलेली आहे. पक्षी स्वच्छंदी दिसतात ,मोर दिसतो परंतु या साऱ्यांचं जगणं आता तितकसं सुखी राहिलं नाही, असे भाष्य करते. मातीचा वास एकाला उत्तेजित करतो तर दुसऱ्याला चिंताक्रांत करतो असं का होतं, याचा शोध ही कविता घेत राहते.
'हे मोर्चे नाहीत' ही कविता सद्यःस्थितीवर कोरडे ओढते. मोर्चातील वास्तव आणि विस्तव प्रकट करणारी ही कविता. मोर्चे नव्हेत तर हे आदिम टोळ्या आहेत असे कवी म्हणतो. या मोर्चात समाजकंटक कधी घुसतील आणि विध्वंस करतील याचा नेम नाही, अशी भीती कवी व्यक्त करतो.
'दस दिशा हिंडताना, कित्येक पिढ्या गमावल्यावर, युगाच्या अस्वस्थतेला', 'दवाखान्यातून', 'मतलबी' आदी कवितांतून ही भीती अधिकच प्रखर झालेली दिसते.
'माणूस गेला तेव्हा' ही कविता गेय आहे. ती थोडी गझलेच्या अंगाने जाते. 'गावाकडे जावे' ही कविता 'ढेकळाच्या रानामधी, भरे श्रमाचा बाजार' असा टाहो फोडते. शेतकरी चांगला गहू पिकवूनही कर्जाच्या विळख्यात सापडल्याने चांगले धान्य विकूनसुद्धा त्याला रेशनचा माल खावा लागतो. तरीदेखील गावात अजून भक्ती शाबूत आहे. भजन - कीर्तने होत असतात. कधी उदास झालं तर गावाकडं जावं असं कवी म्हणतो.
येणारा काळ आगंतुकच असतो. त्या काळाच्या उदरात फक्त भीतीचे काहूरच आहे, सध्याची स्थिती पाहता ते खरेही वाटते तरी देखील काही कवितांतून कवीने आशावाद बाळगला आहे. एकंदरीत सर्वच कविता या विचारप्रवण करणाऱ्या आहेत. परखडपणे वस्तुस्थिती मांडणाऱ्या या कविता आहेत.
• आगंतुकाची स्वगते : कैलास दौंड
• प्रकाशक: चपराक , पुणे.
• मुखपृष्ठ – प्रमोदकुमार अणेराव
•पृष्ठे - ९६ •मूल्य ११० रुपये
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा