माझे गाणे आनंदाचे ॥ पुस्तक परीक्षण प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

 पुस्तक परीक्षण 

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर 


-------------------------------------- 


माझे गाणे आनंदाचे 


माझे गाणे आनंदाचे हा कैलास दौंड यांचा बालकवितासंग्रह. शिक्षक असल्यामुळे कैलास दौंड यांना मुलांच्या आवडीनिवडी आणि छंदांची नाडी सापडलेली आहे. कैलास दौंड यांच्या या संग्रहात एकूण ३७ कविता आहेत. या कविता विविध छंदातील आहेत. विशेष म्हणजे मुलांना गुणगुणता याव्यात अशा त्या अल्पाक्षरी आहेत. 

ग्रामीण परिसरात त्यांचे बरेच आयुष्य गेले असल्याने ग्रामीण परिसर झाडे वेली आणि फुले पानांबरोबर पशुपक्षी येणे स्वाभाविक आहे. या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या संग्रहातील प्रत्येक कवितेला पूरक आणि आकर्षक असे चित्र आहे. लहान मुलांच्या मनातील भाव ओळखून त्या पद्धतीचे लेखन करणे तसे कठीण त्यातूनही आजकालच्या नव्या पिढीतील मुलांचे भावविश्व वेगळेच आहे. या संग्रहातील बालनायक किंवा नायिका या मधल्या पिढीतील आहेत. थोडे शहरीकरण होत असतानाच्या या कविता असाव्यात असा अंदाज त्या वाचताना येतो. 

म्हणजे नव्या सहस्रकापूर्वीच्या काही दशकातील वातावरणात वाढलेल्या निरागस मुलामुलींच्य भावविश्वाचे दर्शन घडविणाऱ्या या कविता आहेत. 

माळरानी या पहिल्याच कवितेत माळरानाचे वेधक वर्णन आलेले आहे. माळरानावर काय पाहायला मिळते, तर उनाड वारा आणि बेभान गारा माळरानावरील फुले पाहून आनंदाने नाचणारी बागडणारी मुले दौंड सरांना भुरळ घालतात. माळरानावर लाल चोचीचे रावे (पोपट) आढळतात ते पाहून कुणीतरी झाडांवर दिवे लावून ठेवल्याचा भास होते. 

माळरानी हिरवे रावे 

झाडावरती लावले दिवे

माळरानी हिरवे दोस्त 

गवतावरी बागडू मस्त 

असे कवी आनंदाने गातो. 

सकाळ झाल्यावर अवतीभवती काय काय दिसते हे झाली सकाळ या कवितेतून पाहायला मिळते. 

स्वप्नातील शाळा ही कविता कल्पनारंजन करणारी आहे. या शाळेत काय असतं तर झोपेची पाखर पापण्यांवर गोळा होऊ लागताच तेथे स्वप्नात शाळा भरू लागते या शाळेत 

दप्तर पाठीला बांधून 

शिक्षक शाळेत येतात 

मुलेच त्यांना तिथे 

विषय सारे शिकवतात 

असे विलक्षण चित्र दिसतेय. 

या शाळेतील लाजरी बुजरी हरणं चौखुर उड्या मारतात आणि सरांना म्हणतात या उड्या किती झाल्या ते तुम्हीच मोजा. प्रश्न विचारताच सशाचा घसा दुखू लागतो. ही विलक्षण शाळा कवीला आवडते तो शाळेत रमू लागतो पण एवढ्यात कावळे काव काव करत म्हणतात शाळा सुटली उठा की राव.. 

पहाट या कवितेत वाऱ्यानं परसातला मोगरा झुलू लागतो

 पाखरं शंख फुंकून आयुष्याच्या लढाईला जाऊ लागतात. फुलांना वाटतं देवाच्या चरणी वाहावं परंतु कोणीच त्यांना खुडून नेत नाही म्हणून मग निराशेनं ती गळून पडतात. आईच्या स्पर्शानं अंधार नष्ट होतो. गालावरून मोरपीस फिरल्याचा भास होऊन बाळ आनंदते. 

 थोडं फिरायला जाऊ ही कविता निसर्गाची सहल घडवून आणते. आकाश निरीक्षण या कवितेत मुले रात्री आकाशाचं निरीक्षण करतात आणि नक्षत्रं ओळखू लागतात. आकाशातून पाहताना एकेक गाव मात्र बेटासारखं दिसतं. शिवाशिवीचा खेळ ही कविता लहान मुलांच्या खेळात रमते. 

सहभोजन या कवितेत मुले शाळेत आणलेले आपापले जेवणाचे डबे उघडतात आणि मेनू एकमेकांना दाखवतात. शहरातील मुलांसारखे पिझ्झा, चॉकलेट या डब्यात नाहीत तर मिरचीचा ठेचा, गोड शिरा, चपात्या आणि भेंडीची भाजी असते. राहुलने डबा रिकामाच आणलेला असतो कारण आईला वेळच मिळालेला नसतो. ही मुले आपापल्या डब्यातील जेवण वाटून मिसळून व गोपाळकाला करून खातात अप्पलपोटेपणे आपलेच डबे आपण खात नाहीत. 

आजीचे बोल मधील आजी, आजोबा आणि आई बाबांचे वर्णन प्रेमळ पालकांचे आणि सर्वांनी मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची शिकवण देते. 

परीच्या पंखाची गादी ही स्वप्नरंजनपर कविता आहे. बाबांची सुट्टीमध्ये बाबा आपल्या अपत्यांवर किती प्रेम करतात. ही ग्रामीण भागातील आणि निमशहरी भागातील मुले आणि वडील आहेत. ती वडिलांना बाबा म्हणतात, पप्पा किंवा पापा म्हणत नाहीत. बाबा त्यांना सूरपारंब्या खेळू देतात, झाडांवर चढायला, पोहायला शिकवतात. रानात झोपणारी ही मुले उघड्या डोळ्यांनी आभाळ पाहतात. ही मुले निर्भीड आणि धाडसी आहेत, आईबाबांनी त्यांना तसे घडवले आहे. माझे गाव ही कवितादेखील गावावर प्रेम करणाऱ्या मुलांची आहे. डोंगराच्या कुशीतले हे गाव किती रम्य आहे. खाच खळग्याची वाटदेखील जांभूळवनातून जाते तेथील दाट सावली प्रेम देते. शांत तळ्याच्या काठावरील चाफा जणू पावा वाजवतो.  वाऱ्याने मधुर सुवास सर्वत्र पसरतो. चैत्रातील जत्रेत दुकाने येतात तेथे खेळणी व फुगे मिळवण्याचा आनंद औरच असतो. 

इवले इवले फूल  झाडांशी खेळतात, पाचू पिसारे फुलले, आभाळ आणि फूल आदी कवितांतून निसर्गाचे वर्णन देखणे केले आहे. वाढ बाई वाढ ही झाडं लावा झाडं जगवा आनंद मिळवा हा संदेश देते. आता गट्टी फू सुटू दे या कवितेत मैत्रिणीबरोबरच अबोला सोडून देऊन निखळ मैत्रीचा आनंद कसा मिळवावा हे सांगितले आहे. स्वच्छता या कवितेत स्वच्छतेचा मंत्र हसत खेळत दिला आहे. 

माझे गाणे आनंदाचे ही शीर्षक कविता चैतन्यदायी आहे. आनंददायी आहे. नवतेचे आणि नवतेजाचे गाणे गाणारी आहे. पाणी भरले मेघ पावसाळ्यात कसे आनंददायी दिसतात हे वर्णन त्यात आहे या पावसाबरोबर विजा चमकतात, देणाऱ्याने देत जावे आणि एक दिवस त्याच्याकडून दातृत्वाचे दान घ्यावे असे सांगणाऱ्या विंदा करंदीकरांचा वसा घ्यायला ही कविता सांगते. 

एकंदर या ३७ कविता हसत खेळत उपदेश कऱणाऱ्या आणि मुलांच्या भाषेतच बोलणाऱ्या आहेत. धर्मराज आव्हाड यांचे मुखपृष्ठ देखणे आहे. मुलांचे आनंदाने नाचणे व बागडणे दाखणारे आहे. 

माझे गाणे आनंदाचे 

कैलास दौंड 

पृष्ठे  ४३, मूल्य ५० रुपये

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर