'काव्यफुले' सावित्रीबाई फुले यांचा कवितासंग्रह

   • सावित्रीबाईंच्या क्रांतिकार्याचे प्रतिबिंब : 'काव्यफुले' कवितासंग्रह.
                                         डॉ. कैलास दौंड

     
थोर समाजसेविका, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, पहिल्या शिक्षिका, महाराष्ट्रातील स्रीयांच्या भाग्यविधात्या क्रांतीज्योती सावित्री ज्योतिबा फुले यांचा  'काव्य फुले' हा इ. स. १८५४ मध्ये प्रसिद्ध झालेला पहिला कवितासंग्रह  असून यामध्ये एक्केचाळीस कविता आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या वात्सल्यमय कवीमनाच्या सुंदर रुपाची ओळख 'काव्यफुले' मधुन पटते. पहिलाच कवितासंग्रह असल्यामुळे सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या विचारांची आणि भावविश्वाची ओळख या कविता संग्रहातून  प्रत्ययास येते. समाज शिक्षणाची उत्कट तळमळ असलेल्या सावित्रीबाई यांच्या या कविता प्राधान्याने शिक्षणाकडे वळवणाऱ्या असून या कवितांमधुन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समोर येतात. समाजातील बहुजनांना शिक्षणाची गरज आहे आणि ते त्यांनी आवर्जून घ्यावे ही आंतरिक तळमळ अत्यंतिक आहे. जोतिबांच्या कार्यात साथ देतांना, शिक्षिका म्हणून कार्य करतांना त्यांचे तत्संबंधी चिंतनच 'काव्य फुले' मधून अवतरलेले आहे. कर्त्या सुधारकांची ही कविता आहे त्यामुळे पुस्तकी पांडित्यापेक्षा निरलस साधेपणाने व तितक्याच उत्स्फूर्ततेने येणारी,समाजोद्धाराच्या भावनेने ओथंबलेली कविता इथे भेटते. प्रत्यक्ष 'काव्य फुले' मधील कवितांचा  अनुक्रम पाहिल्यास लक्षात येते की या कवितांची मांडणी त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक केलेली असून त्यांनी  केलेल्या क्रमबद्ध मांडणीत खास सुसूत्रता आहे. प्राधान्यक्रम ठरवतांना त्यांनी विचारांच्या मांडणीला महत्त्व दिलेले आहे. या कवितेतील प्रास्तविका, अर्पणिका मधून त्याच्या प्रयोगशीलतेची कल्पना येते. इतर कविताही छंदात असुन त्यात गेयता आहे.
       पहिली कविता 'प्रास्तविका'  या नावाने असून आपल्या कवितासंग्रहाची प्रस्तावना त्यांनी या कवितेतूनच  केली आहे.
   'अर्पित फुले ही तुम्हा सुगंधी साची
   काव्यात ओवते माळ करूनिया त्यांची
   आहेत मजेची काव्यफुले ती सारी
   वासाने तयाच्या शांति मिळे अंतरी'

          काव्यमय प्रस्तावना हा ही विशेष 'काव्य फुले' या संग्रहासाठी नोंदवता येईल. प्रास्तविका कवितेत तीन कडवे असून मनोरंजक, बुद्धिगम्य, रम्य, सुबोध निति शिक्षण,ज्ञान भावना या कवितासंग्रहातील कवितात असून या संग्रहासाठी साह्यकारी असणाऱ्यांचे आभारही त्यांनी मानलेले आहेत.' या नजराण्याचा स्वीकार करा' असे त्या वाचकांसाठीआवर्जून लिहीतात.
      अर्पणपत्रिकेला 'अर्पणिका' असे सुंदर काव्यात्म नाव देऊन ती वसंतितीलिका वृत्तात असल्याचेही कंसात नोंदवतात. सावित्रीबाईंचे  कवितेपुढे वसंततिलिका, ओवी,अनुष्टुभ,अभंग,अष्ट मात्री,अक्षर छंद,दिंडी,पद्य,इत्यादी नोंदवणे ही महात्मा फुले यांच्या भाषेतील व्याकरणाच्या चुका काढणाराला  एक चपराक असल्याचेच मला वाटते.  ही अर्पणपत्रिका मराठी कवितेतील महत्त्वाची अर्पणपत्रिका म्हणावी लागेल. पहा -   
    'मजवर सकळाची भाव भक्ती विशाला
    हृदय भरूनि येते वाटते हे कशाला
    उपकर कृति आहे भार होई मनाला
    सुजन हितकारांना अर्पिते ही सुमाला '

                            - सावित्री ज्योतिबा
                                 इ.स.१८५४
           तिसरी कविता 'शिव प्रार्थना' ही असून ती ओवी छंदात आहे. त्यानंतरची 'शिवस्तोत्र' नावाची आहे. शंकर हा अज्ञानीस पूर्ण ज्ञान देणारा असल्याची लोकभावना असल्याने त्यांनी त्याला नमस्कार करून प्रार्थना केलेली आहे. याचे कारण तत्कालीन ग्रंथ रचनेत दिसते. लोकांना ज्या प्रकाराची कवने ऐकण्याची, वाचण्याची सवय आहे तशाच प्रकारचे काव्य त्यांच्या समोर ठेऊन नेमका संदेश त्यांनी यशस्वीतेने  दिला आहे तो पाहण्यासारखा आहे.  शिव जणू बहुजनांचा देव, भेदभाव न करणारा, दुष्टांचा संहार करणारा त्यामुळे त्यांनी शिवाचा केलेला उल्लेख औचित्यपूर्ण आहे.
          'नमस्कार तुज शिवप्रभो|| आदि निर्मिक स्वयंभुविभो||
          अज्ञान नष्ट कारी, वर सर्वा लाभो||प्रार्थना ही सावित्रीची||

  'ईशस्तवन' या सात क्रमांकाच्या कवितेतही नीलकंठ शंकराचे स्तवन करून 'विद्या देई ज्ञान इच्छितो' असे मागणे करतांनाच ज्ञानाची आस धरली आहे.
              'शिव प्रार्थना' व 'शिवस्तोत्र' नंतर येणारी 'छत्रपती शिवाजी' यांच्या विषयीचे वेगळेपण दाखवणारी कविता महत्त्वपूर्ण आहे.
      'छत्रपती शिवाजीचे| प्रातःस्मरण करावे
      शूद्रादि अतिशूद्रांचा| प्रभु वंदू मनोभावे
     नळराजा युधिष्ठिर | द्रौपदी ही जनार्दन
     पुण्यश्लोक पुराणात| इतिहासी शिवानन'

इथे छत्रपती शिवाजी महाराज यांना वापरलेले 'शूद्रादि अतिशूद्रांचा प्रभू' हे विशेषण नाविन्यपूर्ण आणि सर्वार्थाने समर्पक आहे.
        जोतिबा महाराष्ट्रातील शिक्षणवाटेवरील सर्वांचीच प्रेरणा. त्यांचे जीवनकार्य जणू दीपस्तंभ. सावित्रीबाई  त्यांना मनोभावे नमस्कार करतात. हा नमस्कार केवळ पती म्हणून नाही तर त्याच्या लोकोद्धारक कार्यामुळे असल्याचे आपल्या ध्यानी येते. ते ज्ञानामृत देणारे आहेत, नवे जीवन देणारे आहेत. ते दीन, शूद्र, अतिशूद्र यांना हाक मारून त्यांच्यात ज्ञानाची ईर्षा देणारे आहेत, उद्धारक आहेत. म्हणून त्यांना त्या मनोभावे नमस्कार करतात. ' जोतिबाचा बोध ' या कवितेत सावित्रीबाई  लिहीतात-
      'महार मांगांची | करते मी सेवा
      आवडीच्या देवा| स्मरूनिया
      सेवा सत्यधर्म | देई समाधान
      ठेवी शांत मन | आपले रे '

अनुभवाने जोतिबा बोध देतात आणि तो मी सावित्री मनात ठेवते. असे सांगून माझ्या जीवनातील जोतिबा 'स्वानंद' असून जणू कळीतला ते मकरंद आहेत. ही निखळ निर्मळ लोभस भावना त्या कवितेतून मांडतात. त्यासोबतच प्रपंचात शांतता आवश्यक असते असे सांगतात. संतांचे कार्य मानवाला उद्धाराची शिकवण देण्याचे .बऱ्याचदा संत कोण हेच ध्यानी येत नाही.  'मानवाचे नाते | ओळखती जे ते ' तेच संत हे सूत्र त्या सा़गतात.
          'काव्यफुले' मधील सामाजिक आशयाची कविता केवळ वर्णनपर नसून ती समोजोद्धाराच्या तळमळीची आणि कळकळीची कविता आहे.  सावित्रीबाई फुले या महात्मा फुले यांच्या सोबत शुद्र समजल्या जाणाऱ्या समाजाच्या उद्धारासाठी समर्पित  कार्य करणारे व्यक्तिमत्त्व होते. शिक्षणाने समाज परिवर्तन होईल असा त्यांचा विश्वास होता. दोन हजार वर्षापासून इथल्या शूद्रांना भू देवाने पछाडले आहे. त्यांची ती अज्ञानी आणि स्वत्व हरवलेली अवस्था पाहून यातून त्यांना बाहेर काढण्याचा सुलभ मार्ग कोणता? हा विचार करून जणू बुद्धीही आटली आहे , अशा स्थितीत सावित्रीबाई 'शूद्रांचे दुखणे' या कवितेत लिहितात :
' शूद्रांना सांगण्या जोगा |आहे शिक्षण मार्ग हा
     शिक्षणाने मनुष्यत्व (येते )| पशुत्व हाटते पहा'

माणसाचे शूद्रत्व हे माणसांनीच त्यावर लादलेले आहे. या पाठीमागे म्हणून मनूची विकृती आहे. त्यातून बाहेर पडण्याचा शिक्षण हाच मार्ग आहे.'मनू म्हणे' या कवितेत सावित्रीबाई मनुने शेती करणाऱ्यांना मठ्ठ समजून ब्राम्हणास शेती करू नका असे सांगुन विषम समाजरचनेचे समर्थन केले आहे असे सांगुन ' विषम रचती। समाजाची रीती। धूर्तांची ही नीती। अमानव ' हे सत्य  नोंदवतात. तर 'ब्रह्मवंत शेती ' कवितेत
'शूद्र करी शेती | म्हणूनिया खाती |
पक्वान्न झोडती| अहं लोक ||

हे वास्तव परखडपणे अधोरेखित करतात. त्याहीपुढे जाऊन 'शूद्र' शब्दाचा खरा अर्थ जनसामांन्याना कवितेतून समजून सांगतात.
'शूद्र या शब्दाचा। नेटिव्ह हा अर्थ
  जेते जे समर्थ। शूद्रा लावी॥

आपले पूर्वज पराक्रमी होते, आपण त्यांचेच वंशज आहेत असे सांगुन शूद्र म्हणवल्या जाणारांना त्या जागे करण्याचा प्रयत्न करतात. 'शूद्रांचे परावलंबन' मध्ये शूद्र आहे त्या स्थितीत समाधानी राहतात, त्यांना ज्ञानाचे डोळे नसतात, स्वर्गीय पुण्याच्या आशेने ते  निर्फळ चाकरी स्विकारतात. याचे कारण म्हणजे : -
     'शूद्र आणि अतिशूद्र। अज्ञानाने पछाडले
      देव धर्म रूढी अर्ची। दारिद्र्याने गळाले '

असे लिहून ज्ञानाची आत्यंतिक गरज अधोरेखित करतात. त्यासाठी 'शिकणेसाठी जागे व्हा' या  कवितेतून त्या शिक्षणाची हाक देतात ते लक्षणीय आहे.
     'ज्ञानदाते इंग्रज आले, विद्या शिकुनि घ्या रे
     ऐसी संधी आली नव्हती हजार वर्षे रे'

अशा ओळीतून त्या हजार वर्षाचा इतिहासच नजरेसमोर आणतात. इंग्रज राजवटीत मनु आणि पेशव्यांनी विद्या घेण्याला लावलेली बंधने उठली आहेत. सहाजिकच शूद्र म्हणून अवहेलना केली गेलेल्यांना ज्ञान, शिक्षण देणारी इंग्रजी मनुष्यत्व देणारी माऊली त्यांना वाटणे साहजिकच आहे. इंग्रजी शिकून जातीभेद मोडा आणि भटजीच्या भारूडाला फेकून द्या असे कवितेतून त्या निर्भयपणे सांगतात. प्रस्तुत संग्रहातील या जीवन जाणीवा प्रगत आहेत.
            काव्यफुले' मधील निसर्ग विषयक कविता या निसर्गकविता वाटत असल्या तरी त्यातुन मानवी जीवन व्यवहारच प्राधान्याने व्यक्त होतात.
'पिवळा चाफा ' नेत्र, नासिका आणि रसिक मनाला तृप्त करून मरून पडतो. 'जाईचे फूल' ही अशीच सुंदर कविता. कवयित्री फुलाला पहात असतांना ते फूलही कवयत्रीला मुरका घेऊन पहात आहे अशी अभिनव कल्पना आहे. मला तोडून जवळ घे असा ते तिला आग्रह करते. त्यावेळी ते सांगते की,
         'रीत जगाची
         कार्य झाल्यावर
         फेकून देई
        मजला हुंगुन. '

यातून मतलबी मनुष्य स्वभाव तर दिसतोच त्याचबरोबर समाजाचा स्री विषयक दृष्टीकोनही दिसतो. 'जाईची कळी' मध्येही सुंदर दिसणाऱ्या कळीच्या रूपकातून मानवी जगणे त्यांनी चितारले आहे.
'नष्ट होऊनी जाय अखेरी
अशीच मानव कळी जाईची'
हा बोध  कवितेतून  जाईच्या  कळीची प्रतिमा वापरून सहजतेने त्या देतात.'गुलाबाचे फूल' ही अशीच आणखी एक कविता. गुलाबाचे फूल आणि कन्हेरीचे फूल एकसारखीच दिसतात पण त्यांच्यात कमालीचा भेद असतो.
'गुलाबासारखा           मानव हा प्राणी
सावित्रीची वाणी        ध्यानी आणा.'

     या शब्दात त्या सामान्य माणसाला स्वत्वाची जाणीव देतात. 'फुलपाखरू आणि फुलाची कळी' या कवितेतून फुलपाखरू आणि कळी या प्रतिमातून भोवतीच्या जगाची 'उच्छृकल' वृत्ती दाखवतात. अशी वृत्ती पाहून कवयित्री स्तिमित होतात. स्रीचे शोषण करणाऱ्यांची  लाज काढत त्या कठोर प्रहार करतात. मानवप्राणी आणि निसर्गसृष्टी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांना त्यांना एकच समजून सृष्टीला मानव लेणे शोभवण्याचे सावित्रीबाई आवाहन करतात. अशावेळी-
  ' सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे
   सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू "वा" रे'

या ओळी खूपच सुंदर भासतात. ही नवनिर्माणाची, नव्या शोषणरहीत शिक्षित समाज निर्माणाची भावनाच खूप सुंदर आहे. ही कसलेल्या कवीची सहजता या कवितेचा विषेश म्हटला पाहीजे. कवयत्रींना एकुणच समोजोद्धाराची तळमळ, समाजाविषयी प्रेम आहे. मातृभूमी विषयी त्या लिहीतात -
       'अशी जन्मभू मला वंदनीय प्रेम तियेवर जडे
         गातसे तिचे गीत चहुकडे ||१||

जणू माझी जन्मभूमी बळीचे कश्यपपूर
आम्ही तयाचे वंशज रडगाणे नच गाणारे. '
असे जन्मभूमीचे ऋण गाता गाताच सावित्रीबाई फुले  'मातीची ओवी 'ही गातात,
'मातीचा महिमा| सांगावा किती हा
मातीचे नाते अहा | शिवारात ||'

माती आणि जन्मभूमी, जन्मभूमीतील माणसे यांच्या उत्थानाची कविता 'काव्यफुले' मध्ये आहे.
सावित्रीबाई फुले यांची सामान्य जनांविषयी मातृत्वाची भावना आहे. शिक्षणानेच या वर्गाचा उद्धार होईल असा त्यांना ठाम विश्वास आहे. अज्ञान, अंधश्रद्धा या मार्गातील अडथळे आहेत. त्यांना ज्ञान मिळाल्यावरच सामान्यजनाचा विकास होईल. 'काव्यफुले' मधील कवितामधून त्यांची प्रबळ मातृत्व भावना व्यक्त होते.
    'प्रातःकाळी करी बाळा | शौचादि मुखमार्जन
     होऊनिया शुचिर्भूत | वंदू माता पिता जन
     विद्या हे धन आहे रे | श्रेष्ठ साऱ्या धनाहूनी
    तिचा साठा जयापाशी| ज्ञानी तो मानती जन'

ही श्रेष्ठ धन नावाची भूपाळी सावित्रीबाई फुले यांनी चालवलेली शाळा नजरेसमोर साक्षात करायला पुरेशी आहे.
      नवस, बोलकी बाहुली या कविता मधील सुबोध व तयास मानव म्हणावे का?,सावित्री व जोतिबा संवाद, सामुदायिक संवाद पद्य  या कवितामधील सामाजिक जाणिवा व त्यामागील आत्मियता तत्कालीन व सद्यकालीन वाचकांनाही अंतर्मुख करतात. काव्यफुले मधील कविता सावित्रीबाई फुले यांना प्रथम आधुनिक कवयत्रीचा मान देण्यास समर्थ असल्याचे दिसते.  'काव्यफुले' मधील कवितांचा अभ्यास करतांना पुर्वासुरींनी या कवितांचे निसर्गविषयक, सामाजिक, प्रार्थनापर, आत्मपर, काव्यविषयक, बोधपर असे वर्गीकरण केले असल्याचे दिसते. मात्र 'काव्यफुले' मधील कवितांचा बोधपरता हाच प्रधानभाव आहे.  त्यामागील तळमळ आणि आत्मियता या कवितांना काव्यरुप द्यायला समर्थ आहे. निसर्गविषयक असणाऱ्या कविताही क्वचित अपवाद वगळता निखळ निसर्गविषयक नाहीत तर मानवाला काही एक नितीबोध देण्यासाठी निसर्ग घटकांची सावित्रीबाई यांनी योजना केलेली आहे आणि आत्मपरता हा तर कवितेचा स्थायीभावच म्हटला पाहीजे. महात्मा फुले यांच्या संबंधातल्या कविता ह्या केवळ पती म्हणून कौटुंबिक व्यक्ती प्रेमाने आलेल्या नसुन त्यांच्या लोकोद्धारक कार्याच्या प्रभावाने आलेल्या आहेत, इतका निखळभाव मराठी कवितेत दुर्दभ आहे.
            आजच्या मराठी कवीं कवयित्रिंना अंतर्मुख व्हायला भाग पाडेल अशीच ही दिशादर्शक कविता आहे. एकुणच मराठी कवितेच्या प्रवासात तिचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.
(संदर्भ : सावित्रीबाई फुले समग्र वाङमय. संपादक : डॉ. मा. गो. माळी.
प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
पाचवी आवृत्ती - जुलै २०११;पृष्ठे ५९ ते ९३.)
~~~~~~
डॉ. कैलास रायभान दौंड
kailasdaund@gmail.com
भ्रमणध्वनी 9850608611
( मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर 414102)
        


 
 

टिप्पण्या

  1. खूपच छान सर ओरीजनल पुस्तके वाचली पाहिजेत म्हणजे या महामानवांनी मांडलेले सत्य विचार समजतील. पण सध्या राजकीय स्वार्थी लोक महामानवांचे विचार मोडून तोडून त्यांच्या राजकारणाच्या हेतूने प्रस्तुत करतात तेव्हा खूप दुःख वाटते.

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार,
    तुमचे मत वास्तव आणि महत्त्वाचे आहे. मला सावित्रीबाई फुले यांच्या कवितासंग्रहावर लेख वाचायला मिळाला नाही म्हणून मी काव्यफुले संग्रहावर लेख लिहीला आहे. तो आणखी विस्तार करता येईल असा आहे. येत्या काळात बावन्न कसी सुबोध रत्नाकर संग्रहावर देखील परीचयात्मक लेख लिहील.
    मनपूर्वक धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर