HOLI! होळी आली! बालकविता.

   होळी आली. 

   होळी आली जवळ जराशी
   वाढू लागले ऊन रे
   डोंगर दऱ्या मधुनी आताशी
   घुमू लागली धून रे! 

   वाळून गेले गवत अवघे
   पाणगळही झाली रे
   मृगजळाचे घोडे पळती
   भुलून सारे भान रे! 
   
   पळस, पांगिरा, काटेसावर
   लाल फुलांचा जाळ रे
   वासाचा हा दरवळ नुसता
   सुवास रानोमाळ रे! 

   कोण वदले या माळाशी
   होळी आली म्हणूनी रे? 
   फाग उधळीत अंगावरती
   झाडे अवघी लाल रे! 

  चला खेळूया आनंदाने
  रंग होळीचे छान रे
  सृष्टी सगळी ऐका गाते
  नव रंगांचे गाण रे! 

        © डॉ. कैलास दौंड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर