पं. यादवराज फड यांच्या मैफिलीने रसिकांचे कान तृप्त.

पं. यादवराज फड यांच्या मैफिलीने रसिकांचे कान तृप्त.

 पाथर्डी - किराणा घराण्याचे प्रतिभावंत गायक पं. यादवराज फड यांनी आपल्या रंजक गायनाने रसिकांच्या काना - मनाची तृप्ती केली. अत्यंत सुरेल आवाज, दमदार आलापी आणि तिन्ही सप्तकात लिलया फिरणारा मुलायम आवाजाने रसिकांना मोहिनी घातली. वारकरी संप्रदायातील एक निष्ठावंत गायक, श्रीक्षेत्र गहिनीनाथगड संस्थानचे मानकरी असलेल्या ह. भ. प. पुंडलिक महाराज दौंड यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त सोनोशी येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी पं. यादवराज फड यांची  मैफिल रंगली. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक " पंचपदीने " केली. त्यात ईश स्तवन, जय जय राम कृष्ण हरि, रूप पहाता लोचनी आणि जय जय विठ्ठल रखुमाई या रचनांचा समावेश होता. पुण्यस्मरणाचे औचित्य साधुन तशा अर्थाच्या रचना पं. यादवराज फड यांनी सादर केल्या, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा ,याजसाठी केला होता अट्टहास, चाले हे शरीर कोणाचीये सत्ते इत्यादी  रचनांनी रंग भरला. लोक आग्रहास्तव इंद्रायणी काठी  देवाची आळंदी हे अजरामर भक्ती गीत ही सादर केले. कान्होबा तुझी घोंगडी चांगली ही गौळण आणि पायाच्या प्रसादे या भैरवीतील रचनेने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी भीमराव दौंड यांनी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा अभंग गाऊन आपल्या वडिलांना  श्रध्दांजली वाहिली. तबला शेखर दरवडे हार्मोनियम मकरंद खरवंडीकर यांनी अतिशय पोषक आणि कार्यक्रमाची रंगत वाढवणारी साथसंगत केली. दिनांक २ मे रोजी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमास सोनोशी आणि पंचक्रोशीतील लोकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर