नदी रुसली नदी हसली

       • नदी हसली नदी रूसली : सजग करणाऱ्या लोभस कविता.
                                                          डॉ. कैलास दौंड.

प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा 'नदी हसली नदी रूसली' हा बालकवितासंग्रह सर्वार्थाने बालकांचे लक्ष वेधून घेणारा आहे. यात पर्यावरण ,प्रदुषण, निसर्ग, डोंगर, नदी, समुद्र, टीव्ही, शाळा, वाचन इत्यादी कवितेतून नवी जाणीव  देऊन जातात. नदी प्रदुषण ही तर ज्वलंत समस्या.
     'निसर्गाचे सारे नियम माणसांनी मोडले
      शहरातील सांडपाणी नदीमध्ये सोडले. '

                    किंवा
     'रेतीचे तिचे धन चोरांनी चोरुन नेले
      नदीपात्रात खड्डे करुन तिला जखमी केले.'

'अन्नदाता ' कवितेतील शेतकरी स्वत:ला भूमीचा पुत्र म्हणून घेत असतांनाच 'पेरल्याशिवाय उगवत नाही 'हेजीवनाचे सूत्र सांगून जातो. ' विद्यालय गीत' मधून शाळा म्हणजे तीर्थक्षेत्र असल्याचा प्रत्यय येतो.       
     'अक्षरांच्या गमतीजमती', ' आमचा परिपाठ ', 'पुस्तक माझा मित्र' या कविता मुलांना खूप काव्यानंद देतील. तर ' आमच्या गल्लीतली पोरं' मधून भन्नाट मुले भेटतील.
' गल्लीतील पोरांच्या
  आनंदाच्या झुंडी
  थरावर थर लावून
फोडतात दहीहंडी! '

'होडी चालली' या कवितेत सागरतीराची सुंदर सफर घडते. ' चंद्रावरची प्रयोगशाळा' मध्ये अंतराळातील गमती जमती अनुभवायला मिळतो.
       'चंद्रावरच्या सश्यासोबत
       खूप करीन मस्ती
       पृथ्वीवरची गर्दी टाळून
       तिथेच करू वस्ती.'

'सईताई' ही तालासूरात' म्हणावयाची कविता खूपच आनंददायी अनुभव देते.
     ' सईताई  सईताई, किती बाई धाक
      मला नाही धाक, मी करते ताक. '

भीती विरहीत जगण्याचा मंत्र ' आनंदाने जगण्याचा मंत्र' कवितेत भेटतो. 'चिंतोबा' मधील चिंतोबा कल्पनेच्या विश्वात भराऱ्या मारतो. 'शेकरू' कवितेत भीमाशंकरच्या जंगलातील शेकरू खारीचा परिचय होतो.
   ' टुकटुक फिरवते
    गुंजेसारखे डोळे
    पोटभर मटकावते
    पिकलेली फळे '

अशा दुर्मीळ नि लोभस खारीचा अधिवास सुरक्षित राहो! असे सुचनही कवी करतो. तर कासच्या फुललेल्या पठाराची सुंदर सफर ' फुलांचा डोंगर ' मधून घडते.
       'कासच्या पठारावर
       फुलांचे माहेरघर
       फुलांचे ताटवे नि
       फुलांचाच डोंगर. '

या डोंगरात दीपका़ंडी, रानहळदी, नागफणी, शेषगिरी, कीटकभक्षी, भुईचक्र, रानकांदा अशी विविधरंगी उमललेली फुले इंद्रधनुष्यासारखी दिसतात.
        कवितेतील शाळेचा वर्ग तर स्वर्गासारखाच सुंदर होऊन जातो आणि कागद  वेगवेगळी कमाल करतो. कागदाचे उंदीर , ससा, विमान, होडी, फूल, वाघ, घड्याळ सारेच सुंदर तयार होते आणि त्याची गंमतही खूप येते. मोबाईलवर सेल्फी काढण्याचा छंद बरा नव्हे. त्यांना  सेल्फी कवितेतून -
     'ऊठसूट सेल्फीचे काढू नका नाव
     अतिरेक टोकाचा बरा नव्हे राव!'

तर मोबाईलफोनचे दुष्परिणाम ' कर्णपिशाच' कवितेतून समोर येतात. एकूणच 'नदी हसली नदी रूसली' या बालकुमार कवितासंग्रहातील कविता बालकुमार वाचकांना नवा अनुभव देणाऱ्या आहेत. याकवितांची शब्दकळा साधी सोपी अशी आहे. नेमकी आणि लयबद्ध शब्द योजना ,सुंदर मुखपृष्ठ आणि आतील कवितानुरूप आकर्षक चित्रे  या पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालतात. ग्रंथाली प्रकाशनाने हा बालकुमार कवितासंग्रह आकर्षक स्वरूपात प्रसिद्ध केला आहे.
•नदी रुसली नदी हसली' : बालकुमार कवितासंग्रह
•कवी : डॉ. सुरेश सावंत
•प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई
•पृष्ठे :६४ मूल्य :१२०रु.
• प्रथमावृत्ती : ५ मार्च २०२०
~~~~~
~~~~~

डॉ. कैलास दौंड
kailasdaund@gmail.com
9850608611

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर