काजवा
• काजवा : शिक्षणाधिकाऱ्याचे प्रांजळ नि प्रेरक आत्मकथन.
डॉ. कैलास दौंड
'काजवा' हे आत्मकथन शिक्षणाधिकारी पोपट श्रीराम काळे यांच्या संस्कारीत आणि संवेदनशील जडणघडणीची प्रेरणादायी कहाणी आहे. आईवडील ऊसतोडणी कामगार,अत्यंत अभावाची परीस्थिती होती. अशा स्थितीत झालेले शिक्षण, गुणवत्तेने मिळवलेली नोकरी, कुटुंबातील प्रेमळ माणसे, जीवनप्रवासात जपलेली मूल्यनिष्ठा याची याविषयी 'काजवा 'त भरपूर वाचायला मिळते. लेखकाच्या आईवडिलांनी गावातील इतरांप्रमाणेच ऊसतोडणी कामगाराचे जीवन जगलेले असले तरी आपल्या मुलांच्या हाती वही पेन देण्याचे शहाणपण अंगीकारल्यामुळे पोपट काळे यांच्यासारखी मोठी सामाजिक जाणीव असणारे अधिकारी घडले. यासंपूर्ण प्रवासाची हकीकतच 'काजवा' मध्ये अनुभवावयस मिळते. लेखकाचे बालपण, शाळा प्रवेश, शिक्षण व त्याकाळातील ओढताण, उच्च शिक्षण, नोकरी, नोकरीतील नानाविध परीक्षा पाहणारे प्रसंग, त्या त्या प्रसंगात जपलेली सामाजिकता, मानवकेंद्रीत लोकाभिमुख प्रशासन,संपूर्ण कार्यकालात विद्यार्थी उन्नतीला दिलेले प्राधान्य, संकटकाळात शिक्षकांना दिलेले बळ, लेखकाचे साधेपण, प्रामणिकपणा, झळाळून उठणारी सचोटी, शिक्षकांना वाटणारा विश्वास आणि मिळणारी कार्यप्रेरणा हे सगळे लेखक पोपट काळे यांनी सरळपणे आणि प्रांजळपणे नोंदवलेले आहे. प्रत्येक प्रसंगातील प्रवाहीपण वाचकांना भुरळ पाडणारे आहे.
'काजवा' या प्रांजळ आत्मकथनात लेखकाच्या अनुभवास आलेले कितीतरी बरेवाईट प्रसंग येतात. त्या सर्व प्रसंगांना ते निष्कामवृत्तीने सामोरे जातात. त्यांचा कुणा विषयी राग नसतो फक्त परीस्थिती बदलावी यासाठी ते प्रयत्न करतात नि त्यात यशस्वी होतात. हेतूची प्रांजळता, सत्यता आणि कार्यत्परता ही त्यांच्या यशस्वीतेची गुरूकिल्ली आहे. लेखक पोपट श्रीराम काळे यांचा प्रवरानगर येथील शाळा प्रवेशाचा प्रसंग ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शाळा प्रवेशाच्या अडचणीची कल्पना देतो. नंतर लेखक तिथेच 'काजवा 'या आत्मकथनाचा प्रकाशन समारंभ आयोजित करतो हे विशेष आहे. जणू दोन दिवस शाळेत गेल्याची कृतज्ञताच ते व्यक्त करतात.
'काजवा ' मध्ये लेखकाच्या बालपणाविषयी, शैक्षणिक संघर्ष, जडणघडणी विषयी विविध प्रसंग वाचायला मिळतात. ग्रामीण शेतकरी कुटुंबातील होतकरू मुलाच्या वाट्याला आलेला संघर्ष ते चांगुलपणामुळे यशस्वी करतात. शिक्षकाची आणि पुढे लवकरच प्रशासकीय नोकरी मिळते. नागरसोगा गावातील प्रशालेतून लेखकाचा प्रशासकीय सेवेचा प्रवास सुरू होतो. इथे लेखकाच्या जीवनातील दुसरा महत्त्वाचा भाग सुरू होतो. तो त्यांनी अधिक लोकाभिमुख केला आहे. मायाळू आणि कार्यप्रेरणा देत जबाबदारीची जाणीव वाढवणारे कठोरपण लेखकाच्या ठाई आहे. अर्थात हे कठोरपण ठामपणामध्ये परावर्तित होणारे आहे! शिक्षकांनाही कुणी अधिकारी आपली आपली आत्मियतेने विचारपूस करत आहे , आपले मत विचारत आहे ही आत्मसन्मान वाढवणारी बाब असल्याने सतत कार्यप्रेरणा देत कार्य करून घेणारा अधिकारीही हवाहवासा वाटतो.
त्यांनी अनेक लहानमोठी आव्हाने त्यांनी नावाण्यपूर्ण प्रयोगशीलतेच्या वाटा चोखाळत पार केले. वंचिताच्या शिक्षणासाठीसाठी स्वतः पायपीट केली, वंचिताचा शोध घेण्याचा, त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. कल्पकता, कार्यत्परता, कार्यक्षमता आणि गुणवत्ता असेल तर पैशाची गरज देखील पूर्ण होते. बोगस पटाची पडताळणी, कॉपीमुक्ती, टायपिंग परीक्षेतील बोगसगीरी, ती चलावी म्हणून दाखवली गेलेली आमिषे याला श्री. काळे पुरून उरतात ते त्यांच्या ठाम मूल्यनिष्ठेमुळेच.
'काजवा' आत्मकथनाची भाषा ओघवती, साधी प्रमाणभाषा आहे. लेखकाची निवेदन शैली प्रभावी असुन नानाविध प्रसंग उभे करणारी वर्णनशैलीही विशेष आहे. लेखकाने कुठेही आत्मप्रौढी मिरवण्याचा प्रयत्न केलेला नसुन विविध प्रसंगात समोर येणाऱ्यांना त्यांचा आत्मसन्मान जपत खऱ्या समाजहिताचा सुंदर मार्ग निर्देशीत केलेला आहे. त्यांच्या मनात कुणाविषयीही राग दिसत नाही तर आपल्याला शक्य तेवढा चांगुलपणा पेरावा, शिक्षणमार्ग मूल्यनिष्ठेने विकसित करावा, त्याला सहाय्यभूत असणाऱ्या शिक्षकांच्या मनात विश्वास निर्माण करावा हा त्यांचा दृष्टीकोन दिसतो. शिक्षणक्षेत्रातील अधिकारी, शिक्षक, समाजसेवक यांची आत्मकथने अभावानेच प्रसिद्ध होत असल्याने 'काजवा'चे मोल अधिक आहे. हे आत्मकथन अधिकारी, शिक्षक व या क्षेत्रात नवीन काही करू पाहणाऱ्यांना प्रेरणा व दिशा देणारे ठरेल कारण यात केवळ आदर्शाची प्रेरणा नसुन कर्तव्याची पार्श्वभूमी मुख्य आहे.
~~~~
•काजवा : आत्मकथन
•लेखक : पोपट श्रीराम काळे
•प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे
•प्रथमावृत्ती : जून २०२२
•पृष्ठे : मूल्ये :
~~~~~~
डॉ. कैलास दौंड
मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर 414102
kailasdauns@gmail.com
Mo: 9850608611
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा