विचार सूत्र देणारे बालसाहित्य : 'माझे गाणे आनंदाचे' आणि 'जाणिवांची फुले.' : डॉ. मीरा शेंडगे (सोलापूर)

विचार सूत्र देणारे बालसाहित्य : 'माझे गाणे आनंदाचे' आणि 'जाणिवांची फुले.'     • डॉ. मीरा शेंडगे (सोलापूर)

      अवघड लिहिणं सोपं पण सोपं लिहिणं अवघड असते. तसेच काहीसे बालसाहित्याचे आहे. बालसाहित्य लिहिणे हे तुलनेने अवघड समजले जाते. खरं तर बाल साहित्य लिहिणे, उपलब्ध होणे हे बालकाची अजाण पिढी घडवण्यासाठी आवश्यक आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत आजी-आजोबा हे संस्काराचे, ज्ञानाचे प्रमुख केंद्र होते. नकळत मुलांचे भावनिक, बौद्धिक, मानसिक भरणपोषण व्हायचे.
आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ही जबाबदारी पुस्तकांवर व बालसाहित्यिकांवर येऊन पडली.  गेली दोन दशके डॉ. कैलास दौंड लिहीत आहेत. आता 'माझे गाणे आनंदाचे' ( बालकविता संग्रह) व 'जाणिवांची फुले' (बाल कथासंग्रह) हा संस्कारक्षम लघु कथा संग्रह अर्थात बालांसाठी त्यांनी आवर्जून प्रकाशित केला आहे. खरं तर सकस ग्रामीण साहित्य लिहिणारे डॉ. कैलास दौंड आवर्जून बालकांसाठी लिहितात हे कौतुकास्पद आहे. ते स्वतः शिक्षक असल्याने प्रत्यक्ष अध्यापनाच्या वेळी मूल्यांच्या ज्या पूर्वज्ञानावर आधारित आपण शिकवत असतो त्या पूर्वज्ञानाचा अभाव किंवा संकल्पना मुलांमध्ये रुजाव्यात म्हणून त्यांनी अत्यंत सजगपणे दोनही छोटेखानी पुस्तकाची निर्मिती केली आहे. बालकविता मध्ये जिज्ञासा, गेयता, लयबद्धता, अद्भुत रम्यता, कुतूहल, निसर्ग, भवतालाविषयीचे आकलन, त्याच्याशी संवेदन पावणे या व अशा बाबी त्यांच्या सर्वच सदतीस कवितांमधून जाणवतात. पाऊस, उन्हाळा, स्वच्छता, सूर्योदय, पहाट, स्वप्नातील शाळा, पक्षी या आणि अशा सर्वच कविता आशयघन, लयकारी  आहेत. सहज गुणगुणता येतील अशी शब्दरचना या कवितांना लाभली आहे.
    ' माळराणी हिरवे दोस्त
     गवतावरी बागडू मस्त.'
          किंवा
      'कुणासाठी काहीतरी
      मला सुद्धा करायचयं
      देशासाठी लोकांसाठी
      मला सुद्धा उरायचयं. '

    अशा निसर्गप्रेम, सामाजिक आशय, शाळा, घर, नातेसंबंध यावर आधारित 'माझे गाणे आनंदाचे' हा बालकाव्य संग्रह आहे.
        ' जाणिवांची फुले' हा एकूण सोळा बाललघुकथांचा संग्रह आहे. यातील काही कथा 'अलक' पेक्षा थोडासाच मोठा घाट असलेले आहेत. हसत खेळत मुलांच्या मनावर सुविचारांचे संस्कार व्हावेत या सद्हेतूने हा बालकथा संग्रह आकाराला आला आहे हे नव्याने सांगायला नको.
          समाजात विसंगती आहे. दारिद्र्य, गरिबी, हिंसा याचे जागोजागी दर्शन समाजात वावरत असताना लहानग्यांना सहज घडते. अशा वेळी अभद्र बाजूला ठेवून भद्र गोष्टींचे, सुंदरतेचे दर्शन सहज घडावे. मुलांचे निकोप दृष्टीकोन तयार व्हावेत, त्यांची सुदृढ मानसिक जडणघडण तयार व्हावी या तळमळीतून 'पशुपक्ष्यांची पाणपोई', 'पहिलं काम', 'अभ्यासाची पद्धत', 'पुस्तकवाल्या काकूंची गोष्ट' अशा कथांचे लेखन आले आहे. अवगुण हे वाईट समजुन, सदगुणाची पाठराखण करताना मुलांनी प्रामाणिक व्हावे, धाडसी व्हावे, कनवाळू व्हावे, संवेदनशीलता जपत जगावे या गुणांची पेरणी होण्याच्या दृष्टिकोनातून 'फुटकी पाटी', 'घाटेवाडीची शूर सोनाली', 'आंब्याचा वाढदिवस' अशा कथातून लेखक संस्काराची बिजे रोवतो.
     साधी शब्दरचना कथेची, आकर्षक सुरुवात, कथेचा छोटा नि सुबक घाट, पाल्हाळीकतेला,   प्रचारकीथाटाला फाटा देत सहज संवादातून सुंदर कथा या संग्रहातून वाचायला मिळतात. प्रत्येक कथा काही ना काही विचार सूत्र देऊन जाते हे विशेष.
            गावाकडची पार्श्वभूमी, नदी, डोंगर, फुलझाडे,फळझाडे, शिक्षक, शेजारचे प्रेमळ लोक, मित्र- मैत्रिणी असे संदर्भ या बालकथांना आहेत. यामुळे या कथांना साधेपणाचे एक वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. शिवाय शहरी वातावरणापासून वेगळ्या कथां या समृद्ध जीवनाचे प्रतीकही वाटतात. आपल्या लहानग्यांना सहज वाचता याव्यात इतक्या सोप्या, सहज, ओघवत्या कथन शैलीतल्या या कथांचा 'जाणिवांची फुले' हा संग्रह निश्चितच घरी असावा असे वाटते.
• माझे गाणे आनंदाचे (बालकवितासंग्रह)
• कवी - डॉ. कैलास दौंड
• अनुराधा प्रकाशन, पैठण. (९४२३४५५२७२) •मूल्य ५० रुपये.

•जाणीवांची फुले( बाल कथासंग्रह)
•लेखक - डॉ. कैलास दौंड
• इसाप प्रकाशन, नांदेड (९८९००९९५४)
•मूल्य १०० रुपये.
~~~~~~~~~
डॉ. मीरा शेंडगे
     सोलापूर
भ्रमणध्वनी:७५८८३७१९३३.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर