न पोहोचलेल्या पत्रांचे मनस्वी उत्तर
प्रख्यात मराठी कादंबरीकार,कथाकार आणि कवी बाबाराव मुसळे सरांनी त्यांना न पोहोचलेल्या पत्रांना लिहीलेले हे उत्तर आहे.
या उत्तरात त्यांनी पूर्वीचे पत्र ते आत्ताची ईसाधने या दरम्यानचे संक्रमण फार सुंदर रितीने उलगाडले आहे. शिवाय लहान मुलांप्रतीची त्यांची संवेदनशीलता देखील या पत्रातून ठळकपणे जाणवते. शाळकरी मुलींच्या पत्राला(की जी अजून त्यांच्या हातीही पडलेली नाहीत.) त्यांनी दिलेले उत्तर सर्वच मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे.
. मी(डॉ. कैलास रायभान दौंड , पदवीधर प्राथमिक शिक्षक) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडाळवाडी पो.ता.पाथर्डी जी.अहमदनगर या माझ्या शाळेतील इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गाला पत्रलेखन शिकवतांना विद्यार्थ्यांना प्रत्यक्षानूभव देण्यासाठी पाठ्यपुस्तकात पाठ,कविता असणाऱ्या लेखक ,कवींना पत्र लिहीण्याचा उपक्रम घेतला.आणि ती पत्रे पाठवली. हा लेख 'जीवन शिक्षण 'मासिकासाठी पाठवला होता. त्यानंतर मला संपादक मंडळातील सदस्यांनी फोन करून लेखक , कवींच्या प्रतिसादाबद्दल विचारले. कुणाचाही प्रतिसाद प्राप्त नव्हता म्हणून मी विद्यार्थ्यांनी पत्र पाठवलेल्या त्या सर्वांना व्हॉट्सॲपवर पत्र मिळालेत का? ते विचारले. काहींना पत्रे पोहचली होती.तर काहींना नव्हती. जेष्ठ लेखक बाबाराव मुसळे सरांना देखील पोहचली नव्हती.त्यांना व्हॉट्सॲपवर पत्राचे फोटो पाठवले. त्यानंतर त्यांनी तातडीने पुढील पत्र पाठवले.[पत्र पाठवण्यासाठी आजच्या काळात पोष्टाचा वापर करण्याऐवजी इमेलचा वापर करणे सोपे, खात्रीशीर आणि वेळेची बचत करणारे ठरते. याचा प्रत्यय आला.] आदरणीय बाबाराव मुसळे सरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे.
डॉ. कैलास दौंड
बाबाराव मुसळे लिहितात
~~~~~
कादंबरीकार ,कवी, ललित लेखक डॉक्टर कैलास दौंड यांच्या शाळेतील दोन मुलींनी मला पोस्ट कार्डे पाठविली होती. पण ती अजून मिळाली नाहीत. दौंडांनी मला विचारणा केली.मी मिळाली नसल्याचे लक्षात आणून दिले. आणि त्यांनी मला त्यांचे फोटो पाठवले .त्यावरून मी त्या दोन मुलींना लिहिलेले हे पत्र खाली देत आहे.
~~~~~~
कुमारी साक्षी आणि पूजा, तुमची दोघींची खूप जुनी पत्रे मला अजूनही पोस्टाने मिळाली नाहीत. बरे झाले सुप्रसिद्ध कादंबरीकार ,कवी ,ललित लेखक, समीक्षक आमचे मित्र , पाहुणे डॉक्टर कैलास दौंडसरांनी तुमच्या पत्रांबद्दल मला विचारणा केली. जर त्यांनी विचारले नसते तर तुम्ही मला पत्रे पाठविली याची मला कधीच कल्पना आली नसती . अमक्याटमक्या लेखकाला आपण पत्रे पाठवूनही त्याने त्यांची उत्तरे दिली नव्हती ही गोष्ट आयुष्यभर तुमच्या मनातही सलत राहिली असती. आणि नाहकच माझ्याबद्दल तुमच्या म नाराजी निर्माण झाली असती.तुम्ही मला आवर्जून पाठविलेल्या पत्रांबद्दल तुम्हा दोघींचे मनापासून कौतुक करतो .
खरंतर पत्र ही गोष्ट आता फार जुनी झाली आहे. आता मोबाईलमुळे सगळ्या गोष्टी आपल्या बोटाच्या क्लिकवर आलेल्या आहेत . पत्रांपेक्षा मोबाईलवर बोलणे या गोष्टीला आपण पहिला क्रम देत असतो .आमच्याकाळी बोलणे ही गोष्ट फार दुर्मिळ होती . टेलिफोन होते. पण त्यासाठी शहरातल्या पोस्टात जावे लागे. आधी ज्ला फोन करायचा त्याची नोंद करावी लागे. आणि मग कुठे पाच-सहा दिवसांनी आपला नंबर लागायचा .तेही वेळेवर कळले तर ठीक. नाहीतर लागलेला नंबर जायचा. पुढे पुढे मग गावातही फोन आले .तसा फोन मी पहिल्यांदा आमच्या गावात घेतला होता. तेही मागे पडून आता मोबाईल आले. त्याकाळी तारही करता येत असे. पण तार आली की ती कशासाठी आली, त्यात काय लिहिलेलं आहे हे समजून घेण्याआधीच घरातली माणसं रडायला लागायची. कारण त्या काळात एखादा माणूस मेला तरच तार येते अशी लोकांची भावना असायची .आता ते सगळे जुने झाले .आता मोबाईलवर बोलण्याबरोबरच मेल करूध मजकुर कळवता येतो . तर व्हाट्सअप , मेसेज, फेसबुकवरून लिहिता येते.
किती तंत्र बदललं ?मला नक्की आठवते की मी जेव्हा आठव्या नवव्या वर्गात माझ्या गावाजवळच्या अनसिंग येथील प दी जैन विद्यालयात शिकत होतो तेव्हा माझ्या मोठ्या भावांना साहेबराव मुसळे यांना अधून मधून पोस्ट कार्ड पाठवायचो. त्यावेळी पोस्ट कार्ड पोस्टात जाऊन आणावं लागे. आमच्या गावी तेव्हा आणि आताही पोस्ट नव्हते /नाही .अनसिंगच्या आमच्या शाळेपासून तेथील पोस्टही खूप दूर होते .म्हणजे अंतराचा विचार जर केला तर दीड किलोमीटर जाणे ,दीड किलोमीटर येणे .तरीही मी ते करायचो.नंतर ते पोस्ट ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जवळ आले. मी पुढे लेखक झालो आणि मग अनेकांशी पत्रव्यवहार सुरू झाला .पोस्टकार्ड लिहायला कमी जागा देते. शिवाय एखादी गोष्ट आपल्याला मोठ्या प्रमाणात लिहायची असेल तर ते अपुरे पडते मग त्याकाळी अंतरदेशीयपत्रे हा एक प्रकार होता .हे पत्र फोल्डिंग म्हणजे घड्या करून पाठवायचे असे. त्याच्यामध्ये खूप मोकळी जागा असायची. या पत्राचा मी वापर करू लागलो. पण काही गोष्टी अशा असतात ती पत्र, आंतरदेशीयपत्रापेक्षाही आपल्याला जागा जास्त हवी असते .किंवा दुसरा मुद्दा असा की आपल्याला जे लिहायचे आहे ते इतर कोणी वाचू नये आपल्याला याला कळवायचे त्यानेच फक्त वाचले पाहिजे असे जेव्हा वाटे. तेव्हा मग पाकिटाचा वापर करू लागलो. पाकीट हे बंद असे .त्यामुळे त्यातला मजकूर कोणाला वाचता येत नव्हता. पत्र, अंतर देशीयपत्र ही त्या मानाने मोकळी असायची. पाकिटातून कविता,कथा पाठविणे शक्य होत असे . हे मी अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 2015 16 पर्यंत करत होतो .मग माझ्याकडे टॅबलेट आला ,अँड्रॉइड मोबाईलल आला ,आता लॅपटॉप आहे त्यामुळे आता मी क्वचितच पोस्टात जातो .फक्त काही पार्सल करायचे असेल तरच .पोस्टालाही आता कुरिअर हा पर्याय निघाला आहे म्हणजे पोस्ट ही गोष्ट आता जवळजवळ माझ्या वापरातून बंद झाली आहे. अशा या काळात तुमच्या पोस्टकार्डाला मी आता मोबाईलवरून उत्तर देत आहे .अगदी घरात आरामात बसून.
मुलींनो ,तुमच्या भाग्याचा मला हेवा वाटतो .त्याचे कारण असे की तुमच्या नशिबाने तुम्हाला शिकवायला महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध लेखक लाभले आहेत. त्यांची भाषणे कविता ऐकण्यासाठी लोक त्यांना बाहेरगावी मानधन देऊन बोलावत असतात. तुम्हाला मात्र विनासायास त्यांचे बोलणे दररोज ऐकता येते. मला माझ्या शाळेच्या जीवनात प्रत्यक्ष फक्त एकच लेखक पाहायला भेटला होता .ते म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. तेही एका साहित्य संमेलनासाठी पुसदला जात होते .त्याच साहित्य संमेलनासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री आमच्या पुसदचेच वसंतराव नाईक हे आमच्या वाशिम -पुसद रोडने कारने जाणार होते .आमच्या शाळेत तशी सूचना देण्यात आली म्हणून आम्ही त्यांना भेटण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या पिंपळगाव डाक बंगला येथील बसस् टॉप वर थांबलो असता काही वेळाने एक कार आली .ती डाक बंगल्याकडे वळली .आम्हाला वाटले ते मुख्यमंत्रीच असावेत म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो .तर ते आचार्य प्र के अत्रे होते. लेखक कसा असतो ,कसा दिसतो, कसा बोलतो ,कसा राहतो ही त्याकाळी आमच्यासाठी फार कुतूहलाची गोष्ट होती .आताही तशी अनेक शाळांमध्ये मुलांना या गोष्टीचे कुतुहल आहेच कारण त्यांनी प्रत्यक्ष लेखक पाहिलेला नसतो मीच वर्ग सहावाच्या बालभारती मधील 'बाकी वीस रुपयांचं काय ?'या धड्यानिमित्त अनेक शाळांमध्ये प्रत्यक्ष गेलो .जेथे गेलो नाही तेथे मोबाईल ,व्हिडिओवरून मुलांशी संपर्क साधला तेव्हा मी मुलांना विचारत असतो ,'तुम्ही याआधी लेखक पाहिला का?' मुले नाही म्हणतात. मग सांगा, तुम्हाला दररोज एक लेखक शिकवायला असतो. म्हणजे तुमचे भाग्य थोर नाही का? तुमच्या सरांच्या कविता ,कथा ,कादंबरी माझ्याप्रमाणेच बालभारती किंवा कॉलेजच्या अभ्यासक्रमाला आहेत. त्यांची 'गोधडी' नावाची कविता बालभारतीच्या पुस्तकात आहे हे तुम्हाला माहीतच आहे .असा एक लेखक तुमच्या भाग्याने तुमच्या नेहमी जवळ असतो. त्यांच्या शिकवण्याचा अवश्य जास्तीत जास्त फायदा घ्या. त्यांच्यासारखे कवी, लेखक बना .आणि त्यांचे ,शाळेचे ,पालकांचे, गावाचे नाव मोठे करा .कवी ,लेखक बनता आले नाही तरी दुसरे काहीतरी असे बना की ज्यामुळे या सगळ्यांची मान उंच राहील. त्यासाठी झटून अभ्यास करावा लागेल .आहे तयारी?
वर्गातल्या बाकी मुलांनाही माझा आशीर्वाद कळवा. तुम्हा दोघींना किंवा ज्या कोण्या मुलांना माझ्याशी संपर्क करायचा असेल त्यांच्यासाठी माझा मोबाईल नंबर देतो. मला तुम्ही कधीही फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर -93 25 0 44 210.
तुमचाच पाठ्यपुस्तकातील एक लेखक-
बाबाराव मुसळे /मोबाईल नंबर 93 25 0 44 210
To(प्रति),
कुमारी साक्षी विठ्ठल हंडाळ
आणि पूजा बबन हंडाळ
जिल्हा परिषद प्रायमरी शाळा हंडाळवाडी
पोस्ट तालुका पाथर्डी
जिल्हा नगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा