आई ,मी पुस्तक होईन : बालकवितासंग्रह परीक्षण
•जगण्याचे भान देणारा कवितासंग्रह 'आई मी पुस्तक होईन' उत्तम सदाकाळ
'आई मी पुस्तक होईन' हा डॉ. कैलास दौंड यांचा नवाकोरा बालकवितासंग्रह नुकताच हाती पडला. बघताक्षणी कवितासंग्रहाने लक्ष वेधून घेतले. कवितासंग्रहाचे शिर्षकच एक अनोखी ध्येयदिशा दाखविणारे आहे. पुस्तक होवून जगाला सुजाण करणाऱ्या बालमनाचे ते प्रतिबिंब मला कवितासंग्रहात डोकावण्यास अधिर करत होते,हे ही तितकेच खरे! त्यातच हा बालकविता संग्रह डॉ. कैलास दौंड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलाय ही गोष्टही कवितांचा आस्वाद घ्यायला माझ्या मनाला उत्सूक करत होती.
डॉ. कैलास दौंड म्हणजे साहित्य क्षेत्रातले प्रतिष्ठा लाभलेले सुपरिचित नाव. त्यांच्या सर्वांगसुंदर व बहुआयामी लेखनाने वाचक, समिक्षक व अभ्यासक या सर्वांवर गारुड केलेले आहे.
डॉ. कैलास दौंड यांची 'गोधडी' ही कविता इयत्ता आठवीच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. यावरूनच त्यांच्या लेखणीचे महत्व आपल्या लक्षात येईल. पण डॉ.कैलास दौंड यांची साहित्य भरारी इथेच थांबत नाही. त्यांची “कापूसकाळ” ही कादंबरी मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. याचप्रमाणे “डव्ह” ही कविता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमासाठी निवडली गेलीय. कर्नाटक विद्यापीठानेही एम.ए. मराठी अभ्यासक्रमासाठी “उसाच्या कविता" या कवितासंग्रहाचा समावेश केलाय.
अशा सुप्रसिद्ध साहित्यीकाचा हा बालकवितासंग्रह खास बालदोस्तांच्या भेटीला आलाय ; त्यामुळे लहानांबरोबर थोरांनीही हा बालकवितासंग्रह वाचून आपले जीवन सुसंस्कारी बनवावे. यातील कविता फक्त वाचायच्याच नाहीत तर त्या अनुभवायच्या सुद्धा आहेत. त्यातील संस्कार, संदेश आपल्या जीवनात अंगिकारायचे सुद्धा आहेत.
“आई मी पुस्तक होईन” हा बालकवितासंग्रह सौरव प्रकाशन, औरंगाबाद यांनी प्रकाशित केला असून या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ व आतील आशयसमृद्ध रेखाटने बुद्धभूषण लोंढे यांनी केली आहेत. या कवितासंग्रहात एकूण ४८ कविता असून सर्वच कविता अतिशय साध्या सोप्या भाषेत, ताल व लयबद्ध मांडणी करत लिहिलेल्या आहेत. या बालकवितासंग्रहाची पाठराखण प्रसिद्ध कवी,गीतकार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख दासू वैद्य यांनी केली आहे.
या बालकवितासंग्रहातील सुरुवातीची कविता आपल्याला घेवून जाते थेट गावखेड्यातील रानात. 'आहे माझे रान' शिर्षक असणारी ही कविता रानाचे मनोहारी वर्णन करते. रानातील कष्टांचे दुःख मांडताना त्यातून फुलणाऱ्या मोत्यांचे सुखही सक्षमपणे वाचकासमोर मांडताना म्हणतात,
गहू हरबरा
आलाय फुलून
कष्टाचं दुःख हे
गेलय विरून
'महान स्वप्न' या कवितेत कवी चांदोमामाच्या पाठीवर बसून केलेल्या सुंदर सफरीची मजा सांगताना शेवटी झालेली फजिती सुंदरपणे कवितेत व्यक्त करताना म्हणतात,
अवचित मग खाली बघता
तोल गेला माझा पुरता
पडलो पडलो ओरडलो मी
सकाळ झाली जागा हो,आई म्हणाली
यानंतर आपल्या समोर येते ती कवितासंग्रहाचे शीर्षक असणारी कविता 'आई मी पुस्तक होईन’. पुस्तक होवून साऱ्या जगास निर्मळता व निरागसता वाटण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या मुलाचे मनोगत या कवितेतून व्यक्त झालेय. आशयाच्या दृष्टीने अतिशय सकस असणारी ही कविता सर्वांना ज्ञान देईल.सोबतच जगण्याचे भानसुद्धा देईल.
सर्वांनी पुस्तकाशी मैत्री करावी म्हणून कवी एका कडव्यात म्हणतात,
आई मी पुस्तक होईन
हसत खेळत ज्ञान देईल
धरतील जे मैत्री माझी
जगण्याचे मी भान देईन
पाऊस म्हणजे अवघ्या जगाचा श्वास,शेतकऱ्यांचा भाग्यविधाता. पाऊस नसेल तर शेतकरी उध्वस्त होतो. शेतकरी मोडून पडला तर जग भांबावून जाते. म्हणून शेतकरी आणि पाऊस जीवन साखळीचे महत्त्वाचे घटक आहेत. 'गावकुशी सांजवेळ' या कवितेतून कवी पावसाच्या येण्याचा आशावाद व्यक्त करताना म्हणतात,
पेरलेल्या बियाण्याला
अंकुरण्या झाली घाई
भरलेल्या ढगातून
पाणी येईल गं आई
कविचा हा आशावाद आणि निसर्गाची कृपा पावसाला मायेचा पाझर फोडते; आणि कवितेतून पाऊस सांजवेळेच्या भेटीसाठी धरणीवर झिम्माड बरसू लागतो.
ढग भरून आले नि
झाला आभाळात गाळ
पावसाला आतुरली
गावकुशी सांजवेळ
या बालकवितासंग्रहातून कवी डॉ.कैलास दौंड यांनी बालमनाची विविध स्वप्ने,त्यांच्या इच्छा,आकांक्षा,त्यांच्या सभोवतालच्या निसर्गातील अनेक गोष्टींचा कवितेत समावेश करून कविता अधिक जिवंत व संस्कारसापेक्ष केली आहे.
या कवितासंग्रहात 'खरंच सांगा,सांगा मजला’ पक्षाचा लॉलीपॉप,मधुकर, रंग, रांगोळी, चिमणी, पोपट, इवल्या बाळाचे ,फुलदाणी यासारख्या कविता बालसुलभ मनाचे संस्कारी प्रतिबिंब अधोरेखित करतात.
'पूर' या कवितेत कवी म्हणतात,
आईच्या डोळ्यात आलं पाणी
पाऊस वागला वैऱ्यावाणी
असा पाऊस नको गं आई
माणसाला तो लुटून नेई
जगणे बेहाल करणारा असा पाऊस, असा विध्वंसक पूर नको.आईला रडायला लावणारा असा बेबंद पाऊस नको; असे म्हणणारा कवितेतील मुलगा हळुवारपणे आपल्या मनात जागा होतो;आणि नकळत आपले डोळे पाणावतात.
पावसाचे महत्व, पाण्याची गरज हे विषय घेवून कवी अनेक कविता बालवाचकासमोर सादर करतात. त्यात प्रामुख्याने तळ्याचं पाणी, तीर्थरूप ढगास,जंगलातले तळं,पडला पाऊस,यासारख्या कविता अपेक्षित उद्दीष्टपूर्ती करतात.
या बालकवितासंग्रहात हायकू या काव्य प्रकाराचाही डॉ. कैलास दौंड यांनी नाविन्यपूर्ण वापर केलाय. बालकवितेत हायकूची ही पायवट डॉ.कैलास दौंड यांनी निर्माण केलीय आणि ती सर्वांच्या मनात पटकन रुळेलसुद्धा असे मला खात्रीने वाटते.
डॉ. कैलास दौंड 'सकाळचे हायकू' या कवितेत,सकाळचे अनोख्या पद्धतीने चित्रण करताना म्हणतात,
उगवतीचे
हे दृश्य मनोहर
रम्य सुंदर
अशा समयी
कामास लागू चला
हा मार्ग भला
अशा प्रकारे 'आई मी पुस्तक होईन' हा बालकविता संग्रह
आपणास मनोरंजन,ज्ञान आणि जगण्याचे भान देतो. यातील प्रत्येक कवितेत निसर्गाची विविध रुपे आपल्या भेटीला येतात; आाणि नकळतपणे जगण्याचा योग्य मार्ग दाखवून जातात.
‘गावाकडची मुले’ हे या कवितासंग्रहातील सुंदर गीतकाव्य आहे. लय, ताल, ठेका धरायला लावणारे गावखेड्यातील मुलांचे हे गाणे अवघ्या बालमनांचे व्हावे इतके ते सुंदर आहे. खरे तर अभ्यासक्रमात अशा आशयसंपन्न व सहज गुणगुणता येणाऱ्या कविता हव्यात. या कवितेतील एका कडव्यात कवी म्हणतात,
झाडे,वेली,पशु,पाखरे सगळे आमुचे आप्त
निसर्गाची निर्मळभाषा असते आम्हा प्राप्त
त्या भाषेला सवे घेवूनी, चला फुलवू जीवन मळे
गावाकडची मुले,आम्ही गावाकडची मुले
निसर्गाच्या विविध रूपांचा कवितेत मुक्त वापर करणारे डॉ. कैलास दौंड शालेय जीवनातील अनुभवांचा आणि राष्ट्रपुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा संदेशही अनेक कवितांमधून देतात .शिवबा,सुभाषबाबू, सावित्रीबाई फुले,बालदिन, बापूजी,राजमाता जिजाऊ यासारखा कविता बालमनावर संस्कारमूल्ये रुजविण्यासाठी उपयुक्त ठरतील अशाच आहेत.
'चला मुलांनो शाळेला, नकाशा,पुस्तकाकडे वळा व माझी झेडपीची शाळा यासारख्या कविता मुलांच्या मनात शाळेचे उत्साही वातावरण उभे करतात. आणि जीवन जगण्याचे शिक्षणही देतात.
एकंदर 'आई मी पुस्तक होईन' हा सर्वांगसुंदर बालकवितासंग्रह सर्वांनाच मनापासून आवडेल याची मला खात्री आहे. डॉ.कैलास दौंड यांनी कादंबरी,कथा,कविता या क्षेत्रातून बालकवितेच्या क्षेत्रात केलेले पदार्पण यशदायी व लक्ष वेधून घेणारे आहे. त्यांचा हा दुसरा बालकवितासंग्रह साहित्य क्षेत्रात लवकरच आपली वेगळी ओळख निर्माण करणार यात शंका नाही.
बालवाचकांसाठी अत्यंत सुंदर बालकवितासंग्रह दिल्याबद्दल डॉ.कैलास दौंड यांचे मनापासून धन्यवाद. त्यांच्या पुढील साहित्य प्रवासास अनेक शुभेच्छा !
■ आई मी पुस्तक होईन (बालकविता संग्रह)
■ कवी- डॉ.कैलास दौंड
■ सौरव प्रकाशन,औरंगाबाद
■ मुखपृष्ठ - बुद्धभूषण लोंढे
■ पृष्ठ - ७२
■ किंमत -१२० रु
****
- उत्तम सदाकाळ
शिवजन्मभूमी, जुन्नर
१९ नोव्हेंबर २०२३
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा