अनुभवातून शिक्षण देणाऱ्या : सुजाता नवनाथ पुरी

अनुभवातून शिक्षण देणाऱ्या : सुजाता नवनाथ पुरी 

सुजाता नवनाथ पुरी या श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून २००० मध्ये सेवेत रुजू झाल्या. मुस्लिम बहुल भागातील गरीबीने गांजलेल्या परिस्थितीतील पालकांची मुले इथल्या शाळेत येत असत. इथे त्यांनी जवळपास चौदा वर्षे सेवा दिली. येथील महिला पालकांना एकत्र करून त्यांच्यासाठी बचत गट निर्मितीची प्रेरणा त्यांनी दिली. यातून महिला पालकांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. नगरपालिका क्षेत्रातील महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्य महिलांना कायद्याचे बहुमोल असे मार्गदर्शन सुजाता पुरी यांनी तज्ञांमार्फत मिळवून दिले. त्याच काळात त्यांची ‘महिला संघटन’ या विषयावर आकाशवाणीवर मुलाखतही प्रसारित झाली. हे सगळे करण्यामागे महिलांमधील आर्थिक आणि सामाजिक जाणिवांची समृद्धी झाली तर त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाप्रती त्या अधिक सजग होतील ही डोळस भावना होती.
     नगरपालिका शाळेत पटसंख्ये अभावी अतिरिक्त ठरल्यानंतर सुजाता पुरी यांची सेवा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली. श्रीरामपूर जवळील अशोकनगर शाळेत पदस्थापना मिळाल्या नंतर त्यांच्या कामाला अधिक वाव मिळाला. दुसरीच्या विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षेस बसून, मेहनत घेऊन त्यांना उत्तम यशापर्तंत नेले. नंतर चार वर्षांनी नगर तालुक्यात त्यांची बदली झाली आणि आता सात वर्षांपासून त्या वडगाव गुप्ता या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. इथे विविध उपक्रम आणि खेळ, कला याद्वारे आनंददायी अध्यापन त्या करतात. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रम यांच्या माध्यमातून जिल्हास्तरापर्यंत पोहोचले. 
       छोट्या छोट्या प्रयोगातून मुलांना परिणामकारकतेने अध्ययन अनुभव देणे त्यांना आवडते व ही सहजता विद्यार्थ्यांनाही हवीहवीशी वाटते. ‘पाणी वाचवणे’ ही काळाची गरज आहे. हा घटक समजावून देताना त्यांनी विद्यार्थ्यांना गावातील नळाच्या तोट्या जर गळक्या असतील तर किती पाणी वाया जाईल याचा हिशोब समजण्यासाठी त्यांनी प्रयोग केला. लिटरच्या पाण्याला बाटलीला छिद्र केल्यानंतर तिच्यात पाणी भरून पाच मिनिटाचा घड्याळी वेळ लावून थेंब थेंब गळणारे पाणी आणि वेळ मोजून विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त केले की, पाच मिनिटात जर इतके पाणी वाया जात असेल तर गावातील गळणाऱ्या प्रत्येक नळाच्या तोटीतून किती पाणी वाया जाते? असे जीवनाभिमुख सामान्य ज्ञान त्या प्रत्यक्ष अनुभवातून देतात. अर्थातच अनुभवातून मिळालेले ज्ञान हे टिकाऊ असते. 
        मुखवट्यांच्या माध्यमातून नाट्यीकरणाने शिकविणे, गणितासाठी मापनाची वेगवेगळी साधने उपलब्ध करून वापर करायला लावणे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी ‘माझी वाचन हंडी’ हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला. ‘ फुलांचे प्रदर्शन भरवून’ फुलांची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती व सर्जनाची देत कविता लिहिण्यास प्रेरणा देण्याचा उपक्रम त्या राबवतात. शिक्षणात लोकसहभाग वाढविण्यासाठी त्यांनी जवळजवळ दहा लाख रुपयाच्या भौतिक सुविधा शाळेत उपलब्ध करून घेतल्यात.त्यात सात हजार लिटरची पिण्याच्या पाण्याची टाकी. सौर यंत्रणा, आपल्या वर्गासाठी इंटरॅक्टिव्ह बोर्ड, वर्गातील भिंतींची रंगरंगोटी तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह्या,दप्तरे मिळवून देणे. इत्यादी कामे लोकसहभागातून केलीत. स्वतःच्या वर्गाला वर्षातून तीनदा शालेय साहित्य स्वखर्चातून त्या देतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच संवेदनशील माणूस बनवण्याचे ध्येय ठेवत त्या उपक्रमांची आखणी करतात. 
     
 तालुकास्तरीय विद्यार्थ्यांच्या कविता लेखन स्पर्धांचे आयोजन , विद्यार्थ्यांचे हस्तलिखित मासिके तयार करणे याबरोबरच महिला आणि पालक यांच्यासाठी प्रबोधनात्मक व्याख्यानेही त्या देतात. शाळेमध्ये सुसज्ज ग्रंथालयाचे सुयोग्य व्यवस्थापन त्या करतात आणि ग्रंथालयासाठी मदत मिळवतात. विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार कळावेत यासाठी ‘बचत बँक’ हा उपक्रम त्या वर्गासाठी राबवतात. बँकेचे कामकाज कसे चालते हे त्यातून विद्यार्थ्यांना कळते. वाढदिवसासाठी केक व फुले यावर पैसे खर्च करण्याऐवजी आपल्या आवडीचे पुस्तक आणून वाचण्यास व शाळेला भेट देण्यास सुजाता पुरी मॅडम सांगतात.
    शिस्तपालन हा यशस्वी जीवनाचा पाया असल्याने त्या पालकांनाही समजावतात. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना फळांची नावे मराठी आणि इंग्रजीतून माहित व्हावीत म्हणून स्वतः बाजारातून फळे नेऊन ती विद्यार्थ्यांना वाटून नावांचा व बोलण्याचा,लेखनाचा सराव करून घेतात. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना संध्याकाळी दररोज चंद्राचे निरीक्षण करून एका वहीत नमूद करावयास सांगितल्यावर वेगवेगळ्या मराठी तिथींची माहिती या उपक्रमातून त्या विद्यार्थ्यांना देतात. त्यांचे
‘शिकू आनंदे’ या कार्यक्रमात पाठाचे ऑनलाईन सादरीकरण व बालभारती पुणे येथे क्लासरूममध्ये पाठाचे सादरीकरण महाराष्ट्रभर उपलब्ध झाले. उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी मानव विकास विभागातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार आणि इतरही अनेक संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार सुजाता पुरी यांना प्राप्त झालेत. त्या उच्च विद्या विभूषित असून ‘भटक्या विमुक्तांचा समाजशास्त्रीय अभ्यास’ विषयात पीएचडी करत आहेत. ‘ऋतू अंतरीचे’ हा कवितासंग्रह आणि ‘वाटेवरच्या मशाली’ हा त्यांचा लेखसंग्रह प्रकाशित आहे.
~~~~~~~
सुजाता पुरी : +91 84214 26337
(लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर