प्रा. शिवाजी देवबा पाटील यांचा नवा कवितासंग्रह :तरूणस्फूर्ती
ग्रामगीतेशी घट्ट नाते सांगणारा कवितासंग्रह :तरूणस्फूर्ती
-----------------------------------------------------
डाॅ. कैलास दौंड
9850608611
kailasdaund@gmail.com
प्रा. शिवाजी देवबा पाटील यांनी तरूणांना प्रेरणा आणि शिकवण देण्यासाठी लिहिलेला तरूणस्फूर्ती हा मौलिक कवितासंग्रह आहे. या संग्रहात जवळपास सत्तर कविता आहेत. या सर्वच कवितांमधून कवीने तरूणाईशी संवाद साधत अनुभवाचे चार शब्द अधिकारवाणीने सांगितले आहेत. अलीकडील काळात आपली जबाबदारी समजून अशी निरपेक्ष शिकवण देणारी ही एकमेव कविता आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एरवी आपण प्रतिमा आणि प्रतिकांनी भरलेली शब्दबंबाळ आणि अर्थनिर्णय न होणारी कविता पहात वाचत असतो त्या पाश्वभूमीवर ही साधी, सरळ, निर्मळ आणि मोहक कविता ऊठून दिसते. शिवाय ही कविता जगाच्या उणेपणाचा बाऊ न करता तरूणांना प्रेरणा, शिकवण देऊन, चांगल्या जगण्याचा मार्ग दाखवते. त्यामुळे समीक्षकांच्या नजरेतून उपयोजित कविता ठरेल हे खरे परंतू म्हणून या कवितेचे मौलिक असणे हे तसूभरही कमी होणार नाही. कारण संतांचे अभंग आणि तुकडोजी महाराजांची ग्रामगीता उपदेशपर असूनही त्यांची वाड़मयीन महत्ता जशी अबाधित राहते तसेच या कवितेचे आहे. तोच भाव या कवितेचाही आहे.
शिवाजी पाटील यांचे बाल आणि कुमारांसह सर्वासाठी लिहिलेले एकोणवीस कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यात तरूणस्फूर्ती या कवितासंग्रहाने मौलिक भर घातली आहे. या कविता मधून जीवनाचे विविध आयाम ते तरूणांना सांगतात, समजावतात आणि तेही सहज सोप्या भाषेत. अशावेळी त्यांच्याठायी वसलेला शिक्षक, प्राध्यापक शब्दाशब्दातून पाझरत असल्याचे जाणवते.
तरुणांनी नाउमेद न होता,आळसाला थारा न देता प्रयत्न करीत रहावे हे सांगताना ते म्हणतात -
"स्वतःच्या कमाईत स्वतःचा स्वार्थ
राष्ट्रास मदत होई साधे परमार्थ "
केवळ स्वार्थातून परमार्थच नाही तर देशाच्या लाख मोलाच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी क्रांतिवीर व्हायलाही ते सांगतात .प्रार्थना नावाच्या एका कवितेत जातीपातीचे उच्चाटन करून एकोप्याने नांदायला शिकवतात.
तरूणाईला काॅलेज जीवन हे आपल्या जडणघडणीचे, व्यक्तीमत्व निर्मितीचे केंद्र असल्याचे सांगून हे रम्य काॅलेज जीवन एक जीवनपर्व असल्याची जाणीव कवी करून देतात. ध्येय ठरवुन प्रयत्न करायला प्रोत्साहन देतात. त्यासाठी त्याला अभ्यासाबरोबरच व्यायाम करायला सांगतात. हुंड्याचा बैल होण्याऐवजी माणसाची , माणूसपणाची जाणीव करून देणे तो महत्त्वाचे समजतो. विद्येचा विनय हवाच हे ही कवी आत्मियतेने सांगतो. एकजूटीचे महत्त्व पटवतो. आपल्या स्वभावात स्वाभिमान, बंधुभाव, स्वदेशाभिमान हे असलेच पाहिजे हे सांगताना खोटा तोरा आणि अभिमान मात्र नसावा हे देखील कवीने 'असावा -नसावा 'या कवितेत सांगितले आहे. अंनत फंदी च्या फटक्याची आठवण व्हावी अशीच ही कविता आहे. उद्योगी असणाऱ्या आणि संकटसमयी एकत्र येण्याचा मुंगीचा आदर्श कवी पुढे ठेवतो. आत्मविश्वास आणि त्याग हे महान गुण आहेत.त्याच्या जोडीला समतेचीही साथ हवीच.
जीवनाची सत्व परिक्षा एकाग्रतेने अभ्यास करून पास व्हावी, आई -बाबा जे सांगतील ते ऐकावे व त्याप्रमाणे वागावे. स्वतः मृदू वागून, मधूर भाषा राहून सगळ्यांची हृदये जिंकून टाकावीत. वेळ आणि प्रयत्न यांची सांगड घालून वेळेचा महिमा जपावा. कुसंगत टाळून सन्मित्र जोडावेत. तेच संकटात साथ देत असतात. अभ्यास आणि खेळ यांचा सुयोग्य मेळ घालावा. हे सांगून काटकसरीचे महत्त्व सांगतांना कवी सहज लिहून जातो -
' जो असेल मितव्ययी /तो आयुष्यात पुढेच जाई /खर्चिक जीवनात मागे राही '
ज्ञान आणि धन याचा विचार करता ज्ञान श्रेष्ठ ठरते म्हणून ज्ञानासाठी धन खर्च करावे असेही कवी सांगतो. व्यसनाधीन न होण्याचा आग्रह धरतो. तो लिहितो
'जाता मादक द्रव्याचे आहारी /आजार, दुःखच येते संसारी /सोडून द्या सारी व्यसनं /जीवन जगा निरोगी छान /'
वर्तमान जीवन, विद्यार्जन, निसर्गाकडून प्रेरणा घेणे -शिकणे, क्षणाक्षणाने ज्ञान संचय करून ते मातृभूमीला अर्पण करण्याचा उच्च विचारही कवी देवबा शिवाजी पाटील करतात. ग्रंथाचे व व्यायामाचे महत्त्व तर ते सांगतातच पण अनोळखी वाटेचे धोके सांगून वाट जपून चालायला सांगतात. कालचक्र कधीही थांबत नसल्यामुळे वक्तशीरपणा सांभाळायला सांगतात. 'प्रत्येकाने 'ही कविता तर युवकाचे गीत व्हावे या योग्यतेची आहे. ती अशी :प्रत्येकाने ठेवावा /स्वधर्माचा मान /परधर्माचा अपमान /करू नये. याच कवितेतून जाती धर्मा वरून कोणाचा अनादर करू नये, स्वदेशाभिमान प्रत्येकाने बाळगावा आणि जे स्वदेशाशी गद्दार होतील त्यांना शासन करावे हे ही सांगतात .
दिवाळी -संक्रांत असे सण खूप काही शिकवत असतात. तिळगूळ या कवितेतील काही ओळी पहा 'जात निराळी /धर्म वेगळे /असता एकी शक्ती वाढे. '
प्रत्येक कवितेतून काहीना काही मौलिक शिकवण हे या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. सोपी आणि सहज भाषा यामुळे या कविता आकलन सुलभ आहेत. एक दोन ठिकाणी स्वतःचा स्वार्थ असे अर्थाची द्विरुक्ती होणारे शब्दप्रयोग दिसतात पण त्याला अपवाद म्हणता येईल. चांगुलपणाची शिकवण देणाऱ्या या कविता कोणालाही भूरळ घालतील अशाच आहेत.या संग्रहातील कविता आत्ममग्न न संवादी आहे. त्यामूळेच या संग्रहाच्या पानापानातून कवीची तरूणांबद्दलची तळमळ, त्यांना घडवण्याची कटिबद्धता जाणवत राहते
आजचे तरूण दिशाहीन आणि संस्कार हीन झाले आहेत असे म्हणणारे पदोपदी भेटतात पण तरूणस्फूर्ती नावाचा काव्यरूपी संस्कार दीप तरूणांच्या हाती देणारे देवबा पाटील हे सद्यकाळातील एकमेव मराठी कवी ठरतात.कौशल पाटील यांनी केलेले मुखपृष्ठ देखील वेधक आहे.
*तरूणस्फूर्ती :कवितासंग्रह *कवी :प्रा. शिवाजी देवबा पाटील.
*प्रकाशक :महाजन ब्रदर्स, पुणे ३०
*प्रथमावृत्ती :२८ जून २०१७
*मूल्य :११० रू, पृष्ठे :८०
****************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा