आभाळाचा फळा : बालकवितांचा प्रसन्न अनुभव .
डाॅ . कैलास दौंड
एकनाथ आव्हाड हे आजच्या बालसाहित्यातील आघाडीचे नाव. अनेक बालवाचक त्यांच्या पुस्तकांची वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी आव्हाडांचा 'आभाळाचा फळा' हा नवा आणि देखणा बालकवितांचा संग्रह अलिकडेच प्रकाशित झालाय. संपूर्ण बहुरंगी असणारा हा कवितासंग्रह बालमनाला विविधांगी प्रसन्नतेचा अनुभव देणारा आहे. या पुस्तकात आशयानुरूप चित्रांचा वापर असल्याने हा काव्यखजिना आकर्षक आणि बालवाचकांचे चित्त आकर्षून घेणारा तर झाला आहेच परंतू त्याच बरोबर त्यांच्या अनुभव विश्वाशी निगडीत काव्यानूभवाने त्यांना भावसमृद्ध करणारा देखील झाला आहे.
लहान मुले दिवसभर या ना विचारात गढलेली असतात. त्यामुळे त्यांना पडणारी स्वप्नेही अजब आणि चमत्कारिक अशीच असतात. 'मंगळावरची मजा 'या पहिल्याच कवितेत स्वप्नातच यानातून मंगळावर गेलेला मुलगा भेटतो. या काल्पनिक पण आवडणार्या कवितेमुळे बालवाचक सहाजिकच वाचनात गुंतून पुढील पृष्ठ सहजपणे उलगडतो आणि त्याच्या पुढील काव्यखजिना अधिकच विस्तारत जातो.
बालकांचे वय हे संस्कारक्षम, त्याच्या आवडी आणि निवडी प्रौढांहुन भिन्न. त्यांच्या अनुभव विश्वात लीलया डोकावण्याचे सामर्थ्य एकनाथ आव्हाड यांना लाभले असल्याचे 'आभाळाचा फळा 'मधील कविता वाचून लक्षात येते. प्रौढत्वी नीज शैशवास जपण्याचा बाणा सांभाळल्याने पानोपानी मुलांना भावतील अशा सुसंस्कार करणाऱ्या, विनोदामूळे गंमत वाटणार्या , पर्यावरणाप्रती सजग करणाऱ्या, देश प्रेम, देशभक्ती वाढवणाऱ्या तसेच भाषिक भान वाढवणाऱ्या, कविता या संग्रहात प्राधान्याने भेटतात. सण, उत्सव, परंपरा यांची ओळख घडवणार्या कविताही 'आभाळाचा फळा' मधून भेटतात. एकूणच या कवितासंग्रहातून बालवाचकांच्या व्यक्तीमत्व विकासाच्या विविध पैलूंचे आभाळच खुले केले असल्याचे दिसते.
केवळ मनोरंजन हा बालसाहित्याचा उद्देश असू शकत नाही. जीवनाला सामोरे जाता येण्यासाठी हवी असणारी सजग वैचारीकता, निसर्गसंन्मुख मानवतेची जडणघडण हा साहित्याचा हेतू बालसाहित्याला जाणीवपूर्वक बहाल करणारे एकनाथ आव्हाड या कवितासंग्रहात पानोपानी भेटतात. वाचनातून नाविण्याची अनुभूती देणार्या, काहीतरी शिकवणाऱ्या कवितांमध्ये 'आभाळाचा फळा', 'आई बोलते छान', 'माझी शाळा', 'स्वागत नव वर्षाचे', 'सुमाची हुशारी' , 'एकजूट', 'माझे आजोबा','प्रकाश गाणे',' पाखरासाठी फुलवू या बागा', 'गुगल वर सारे काही' या कविता लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. यातून मिळणारी शिकवणूक आणि तिचे स्वरूप पाहण्यासाठी 'स्वागत नववर्षाचे' या कवितेतील सुरूवातीचे एक कडवे पहा :
'गावू नवीन गाणी
बोलू मधाळ वाणी
बंधुता मानवतेची
सांगू नवी कहाणी '
किंवा 'माझी शाळा' या कवितेतील पुढील ओळी पहा :
'अशी ही माझी शाळा
मज प्रेमाने घडविते
माझीच नव्याने मजला
ती ओळख करून देते '
गेयता, वाचन सुलभता आणि यमकांनी युक्त असणारीही कविता आहे.
माणूस हा निसर्गाचाच एक जबाबदार घटक आहे. निसर्गाची ओळख करून देणार्या ,निसर्गसन्मुख बनवणाऱ्या काही कविता 'आभाळाचा फळा' ची लज्जत वाढवतात. त्यात 'कळ्यांची झाली फुले', 'खरचं सांगतो दोस्तांनो', 'मामाचा गाव', 'वाद संवाद', 'हिरवा श्रावण' या कवितांचा समावेश होतो .
विनोद हा तर आबालवृद्धांना हसायला भाग पाडणारा वाड़मय प्रकार .बाल -किशोर मुलांना विनोद खूप आवडतो. त्यातही तो स्वाभाविक आणि प्रसंगजन्य असेल तर लज्जत आणखी वाढते. कविता वाचत असताना सहजच गालावर हास्याचे फुल उमलावे अशाही कवितांचा समावेश 'आभाळाचा फळा' मधील कवितांच्या व्यापकतेत भरच घालतात . 'शोधलं की सापडतं', 'उंदराची फजिती', 'चांगलीच खोड जिरली', 'गमतीची गोष्ट', 'थापाड्या दामू', 'हुशार पोर' या कवितांमधून विनोदाचा अस्सल अनुभव बालवाचकांना मिळेल.
भाषिक जडणघडणीचा काळ हा बालवयाचाच असतो. वाचनातून लेखनाने भाषिक विकास घडत असतो.
या संग्रहात 'अलंकार', 'आई बोलते छान', 'गमतीची गोष्ट' , 'उत्स्फुर्त उद्गार' या कविता सहजपणे भाषिक जाण आणि भान वाढवणाऱ्या आहेत. आपली संस्कृती सण आणि उत्सव यामधून प्रतिबिंबित होत असते. 'संक्रांतीचे गाणे','दिवाळीची मजा', 'रंगपंचमी' या कविता त्यादृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. सगळे शिक्षण आणि संस्कार मानवतेत आणि देशभक्तीत विरून गेले पाहिजेत असे म्हणतात. 'प्रिय हा भारत देश' ही देशप्रेमाची शिकवण देणारी कविता आणि 'आमचा परिपाठ' ही जबाबदारीची आणि समतेच्या संस्काराची पेरणी करणारी कविता देखील 'आभाळाचा फळा' मध्येच भेटते.
एकूणच 'आभाळाचा फळा' हा अलिकडच्या काळातील बालसाहित्यात महत्त्वाचा ठरेल असाच कवितासंग्रह आहे .या कविता नादमयता आणि ताल बद्धता असणाऱ्या आणि मुद्दामच पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत.
'सुट्टीचे दिवस हे
पंख लाऊन येतात
आनंदाची बाग आमची
फुलवून जातात '
अशा समृद्ध अनुभवाच्याही या कविता आहेत. इतका छानदार कवितासंग्रह मराठी बाल वाचकांसाठी लिहिल्याबद्दल कवी एकनाथ आव्हाड यांना धन्यवाद द्यायला हवेत. संजय माने या चित्रकाराने चितारलेल्या मुखपृष्ठ व आतील चित्रामुळे आभाळाचा फळा अधिक रंगीत आणि लोभस झाला आहे.
आभाळाचा फळा : बाल कवितासंग्रह.
कवी :एकनाथ आव्हाड.
प्रथमावृत्ती :डिसेंबर २०१६.
प्रकाशक :जे. के. मिडिया , मुंबई ५०.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा