प्रेरक कथा
☆मृत्युंजय स्वप्नाची पूर्तता ! ________________
☆ डाॅ. कैलास दौंड
भारतीय तरूणांना सैन्यात भरती होण्याचे फारच आकर्षण आहे. इथला सह्याद्री पर्वत आणि छत्रपती शिवाजी राजेंच्या धाडसाच्या आणि पराक्रमांच्या कथा तरूणांच्या मना-मनात ठसलेल्या आहेत. भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी देशभक्तांनी दिलेले बलिदान अजून ताजेच आहे. त्यामुळे आजही सैन्यात जाऊन भारतमातेच्या रक्षणार्थ सज्ज असणाऱ्या युवकांची महाराष्ट्राला कमी नाही. सैन्यात जाऊन शौर्य गाजवावे, मातृभूमीची सेवा करावी असे स्वप्न पहाणारी तरूणाई गावोगावी दिसते.
पोगरवाडी हे असेच एक सातारा जिल्ह्यातील गाव. येथील युवकही याला अपवाद नाहीत. चैतन्यदायी हवा ,साद घालणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा, रक्तात मुळचाच असलेला स्वाभिमानी बाणा सळसळत्या तारूण्याला सैन्यात भरती होण्यासाठी खुणावतो. पोगरवाडीतील शहीद कर्नल संतोष महाडिक या शूर देशभक्ताच्या कुटूंबियांच्या असीम त्यागाची ही प्रेरणादायी गाथा आहे. संतोष हा बालपणापासूनच खूप हुशार आणि चुणचुणीत मुलगा होता.भारतीय सैन्याचा त्याला खूप अभिमान वाटे.आपणही सैन्यात जाऊन देशसेवा करावी, शौर्य गाजवावे असे त्याला वाटे. घोडसवारी, मुष्टियुद्ध आणि गिर्यारोहण याची आवड होती.प्राथमिक वर्गाचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने सातारच्या सैनिक स्कूलमध्ये सहावीच्या वर्गात प्रवेश घेतला. तेथील माध्यमिक शिक्षणानंतर त्याने रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयातून १९९७ साली महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर १९९८ मध्ये संतोष महाडिक सैन्यात भरती झाला . त्याचे सेनादलात जाण्याचे स्वप्न साकार झाले. त्याच्या सळसळत्या चैतन्यमयी तारूण्याला शौर्य गाजवण्यास जणू आकाश मोकळे झाले होते.
सेनादलात शूर सैनिकांना खूप धाडसाची आणि कठिण परिश्रमाची कामे करावे लागतात. कधीकधी नेहमी पेक्षा वेगळी कामे देखील करायला मिळतात. कर्नल संतोषला भारतीय क्रिकेट टिमचे कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला पॅराग्लाइडिंगचे प्रशिक्षण देण्याचा आनंददायी अनुभव देखील आला. अनेक मोहिमांवर प्रमुख म्हणून काम करायला मिळे.२००३ सालातील पूर्वोत्तर भागातील मोहिमेत केलेल्या शौर्यासाठी त्यांना सेना मेडलने सन्मानित केले गेले. काश्मीरमधील काही तरूणांचे आतंकवादाच्या रस्त्यावरून चालने त्यांना अस्वस्थ करीत होते. त्यांना बघुन त्यांच्यातील सुजाण नागरिक अस्वस्थ होत होता. त्यातुन त्यांनी या भरकटलेल्या तरूणांना योग्य मार्गावर आणण्याचेही काम सुरू केले होते. त्यामुळेच त्या तरूणांना कर्नल संतोष बद्दल खूप विश्वास होता. सेना दलातील अधिकार्यांना रोज नव्या नव्या आव्हानांना सामोरे जावे लागते. २०१५ सालच्या नोव्हेंबर मधील प्रसंग ,जम्मू काश्मीर मधील घुसखोराच्या विरोधातील शोध मोहिमेचे नेतृत्व ४१ राष्ट्रीय रायफलचे कमांडिंग ऑफिसर असलेले ३८ वर्षीय कर्नल संतोष महाडिक करत होते. अनेक मोहिमांचा पूर्वानुभव त्यांच्या पाठीशी होता. कुपवाडा जिल्ह्य़ातील हाजी नाका भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील घनदाट वनक्षेत्रात आतंकवादी लपून बसल्याची खबर त्यांना मिळाली होती. लपलेल्या आतंकवाद्यांना शोधण्यासाठी व त्यांचा निःपात करण्यासाठी ही मोहीम चालली होती. तिचे नेतृत्व कर्नल संतोष महाडिक करत होते. दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून ते घायाळ झाले.त्यांना तातडीने हाॅस्पिटल मध्ये नेण्यात आले .१७ नोव्हेंबरची सायंकाळ त्यांच्या कुटुंबियांना दुःखाच्या खाईत लोटनारी ठरली तसीच ती भारतिय सैन्याचा एक अत्यंत शूर कर्नल गमावनारी ही ठरली . जखमी कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले.कर्नल पदावरील अधिकारी हुतात्मा होण्याची अपवादात्मक घटना घडली होती. दरम्यान त्यांच्या सहकाऱ्यांनी आतंकवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊन पळून जायला भाग पाडले.
अत्यंत बेसावधक्षणी असा दुःखद प्रसंग ज्या कुटुंबावर कोसळतो त्या कुटूंबियाच्या दुःखाला पारावार उरत नाही. तरीही शहिद होणारा जवान देशासाठी कामी आला याचा अभिमान उरात आणि आसमंतात भरून उरलेला असतो. अत्यंत कठीण परिक्षा पाहणारा हा काळ असतो. आई, वडील, पत्नी, मुले यांनी त्यांचे सर्वस्व जणू हरवलेले असते. 'अमर रहे, अमर रहे शहिद कर्नल संतोष महाडिक अमर रहे 'या घोषणांनी आसमंत निनादत होता. सैनिकांनी दिलेली मानवंदना , नागरिक, आप्तेष्ट आणि नेत्यांनी केलेले सांत्वन थोडा आधार देऊन जाते.
कॅप्टन संतोष महाडिक शहिद होऊन काही दिवस झाले होते. वीरपत्नी स्वातीनं आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यात भरती करण्याचं नक्की केलं होतं. कर्नल संतोषने कधीकाळी स्वाती सोबत बोलतांना आपल्या दोन्ही मुलांनी आर्मीतच करीअर करावं असा मनोदय व्यक्त केल्याचे स्वातीला स्पष्ट आठवत होते. त्यामुळेच शहिद कर्नल संतोष महाडिक यांची चिता जळत असतांनाच "मी माझ्या दोन्ही मुलांनाही आर्मीतच दाखल करणार आणि आतंकवाद्याचा बदला घेणार."असे उद्गार उत्स्फुर्तपणे तिच्या मुखातून बाहेर पडले होते. हे सगळे कवी कुसुमाग्रज यांच्या
'सरणावरती आज आमची पेटताच प्रेते उठतील त्या ज्वालामधुनी भावी क्रांतीचे नेते.'
या 'गर्जा जयजयकार क्रांतीचा 'या कवितेचे मुर्तरूपच होते जणू! एका शूर सैनिकांची तितकीच धैर्यवान आणि देशप्रेमाने थबथबलेली ,'आपल्या दोन्ही मुलांना सैन्यात पाठवण्याची इच्छा' साकार करण्याचा स्वातीचा निर्धार हा भारतीय शौर्याचा परंपरेचा एक सात्विक आविष्कार होता. अनेकांनी तिला या इच्छेपासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण तिचा निर्धार ढळला नाही उलट आतल्या आत तो दृढ होत गेला.घरात ठेवलेला शहिद वीर कर्नल संतोष यांचा लष्करी गणवेश पाहुन या गणवेशाला पुन्हा चैतन्य देण्याचा विचार तिच्या मनात येई .मुलांना सैन्यात पाठवायचे तर त्यांची वये लहान व शिक्षण सुरू होते.त्यासाठी आगोदर स्वतःच सैन्यात भरती होण्याचे तिने ठरवले . तिचा हा विचार अत्यंत धाडसी आणि अत्युच्च मानसिकतेचा परिपाक होता.
सैन्यात जाण्यासाठी तिला तिचे थोडे अधिक असलेले वय आडवे आले पण तिचा निर्धारच इतका पक्का होता की तिने तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे "मला माझ्या दोन्ही मुलांना सैन्यात पाठवुन माझ्या शहिद पतीचे स्वप्न साकार करायचे आहे. त्यासाठी मी स्वतः सैन्यात भरती होण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आपण मला वयोमर्यादेत सुट द्यावी अशी विनंती केली." स्वातीच्या आगळ्यावेगळ्या नि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या विनंतीने संरक्षण मंत्र्यांना वीरपत्नीच्या धाडसाचे आणि समर्पित भावनेचे कौतुक वाटले. तिच्या या अतुलनिय निर्धारामूळे संरक्षण मंत्र्यांनी सेनाप्रमुख दलवीर सिंह यांना त्यांसंबंधाने शिफारस केली आणि वीरपत्नीच्या इच्छेनुसार सेनाप्रमुखांनी 'सेवा चयन बोर्डा'च्या परीक्षेस बसण्यासाठी स्वातीला परवानगी दिली. सत्तावीस वर्ष वय ही या परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा होती तर स्वातीचे वय बत्तीस वर्ष होते .अभ्यास करून चयन बोर्डाची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर ऑक्टोबर २०१६ चेन्नई मधील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये त्या दाखल झाल्या. ११ महिन्याचे खडतर प्रशिक्षण त्यांनी पुर्ण केले . ९ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांची नियुक्ती आर्मी अर्डिनेस काॅर्प्स (AOC) मध्ये झाली. एके काळी केंद्रीय विद्यालयात शिक्षिका असलेली स्वाती आता 'लेफ्टनंट' झाली. सैन्यात भरती होण्यासाठी तिने स्थिरस्थावर असलेली नोकरीही सोडली होती. इतकेच नव्हे तर ट्रेनिंग यशस्वी होण्यात अडथळा येऊ नये व मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी त्यांनी आपल्या १२ वर्षाच्या कार्तिकीला डेहराडून येथे तर ६ वयाच्या स्वराज यास पाचगणी येथील बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवले होते. तिच्या मुलाखतीत स्वाती म्हणाली," सैन्यात दाखल होऊन पतीची जबाबदारी पूर्ण करू इच्छिते. माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशाच्या नावाचा आहे. " ज्या देशात आपल्या शूर पतीचे देशभक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्यात भरती होणाऱ्या अफाट धाडसांनी भरलेल्या स्रीया आहेत त्या देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. कार्तिकी व स्वराज या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यात भरती करण्याची जिद्द घेऊन स्वतः सैन्यात दाखल होण्याची घटना म्हणजे शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे मृत्युंजय होणे होते आणि ते अनेक पिढ्यांसाठी देखील होते. स्वाती सोबतच सेनादलात दाखल झालेल्या विरपत्नी निधी मिश्रा यांच्या जिद्दीची कहाणी देखील अशीच प्रेरणादायी आहे. त्यांना वंदन करण्यासाठी कुसुमाग्रजांच्या पुढील ओळी सार्थ ठरतात -
'काळोखातुनी विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा '
## ## ========================
डाॅ. कैलास दौंड मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन. ४१४१०२ मो. ९८५०६०८६११ kailasdaund@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा