मकरसंक्रांत शूभेच्छा विशेष

करसंक्रांत हा शूभेच्छा देण्याचा व स्वतःला बदलवण्याचा उत्सव आहे. या दिवशी खरेतर आत्मपरीक्षण करून , सिंहावलोकन करून लोकांनी आपल्याशी जसे वागावे, बोलावे अशी आपली अपेक्षा असते तसे वागायला, बोलायला स्वतः सुरूवात करण्याचा देखील हा भौगोलिक संक्रमण क्षण आहे. त्यामुळे मला दौंड कुटूंबियाकडून आपणास शूभेच्छा देतांना मनस्वी आनंद होत आहे.
संत कबीरांनी बोलण्याची पद्धत सांगीतली आहे ती अशी -'वाणी ऐसी बोलीये । मन का आपा खोय ॥ आप ही  शीतल हो जाय ।औरोंको भी शीतल बनाय ॥'  खरेच आपण असे दररोज बोललो तर बरेच मनोकायिक आजार कमी होतील. समाजस्वास्थ चांगले राहील. आपल्या ज्ञानी पूर्वजांनी 'तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला 'असे म्हटले आहे. त्यामुळेच केवळ  एक दिवसापुरतेच हे असुन उपयोगाचे नाही. तसेच अती तिथे माती असे ठरणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. जसा गोड खाल्याने मधुमेह होऊ शकतो. तसेच अती गोड बोलुन फसवणारांचीही संख्या या जगात कमी नाही. 'प्रश्न एक मनाला, बरे बोलू की खरे बोलू? , असे जेव्हा वाटू लागते तेव्हा सौम्यपणे खरे बोलणे हे गोड बोलणेच ठरते.
तीळ गुळाचा संबंध आत्मिक आनंदाशी आहे. अंतरीचे धावे  स्वभाव बाहेरी या न्यायाने  बोलणे मनाशी संबंधित आहे.
संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग पहा :

'देव तिळीं आला।गोडी गोड जीव झाला॥१॥

साधला हा पर्वकाळ।गेला अंतरीचा मळ॥२॥

पापपुण्य गेलें।एका स्नानेंचि खुंटले ॥३॥

तुका म्हणे वाणी। शुद्ध जनार्दन जनीं ॥४॥'

[शब्दार्थ : तीळी येणे =आपलासा होणे.
पर्वकाळ साधणे =सुसंधी साधणे
पापपुण्य =बरेवाईट
स्नान =शरीर व मनाची शुद्धी.
वाणी =बोलणे, भाषा
शुद्ध =प्रसन्न.
जनी जनार्दनी = लोकात आणि मनात ]
आपल्याला अभंगाचा खरा अर्थ समजावा म्हणून मी योग्य ते शब्दार्थ दिले आहेत . विहित कर्म करताकरता सुयोग्य   बोलण्यामुळेच जीवन बदलू शकते. त्यामुळे जीवनाचा उत्कर्ष होऊ शकतो. माणूस सुद्धा प्राणीच पण भाषा, विवेक आणि प्रयत्न यामुळे तो माणूस झाला आहे. वरील त्रयी मुळे त्याचा मेंदू विकसित झाला.
आपापसातील संबंध स्नेहार्द, मधुर आणि प्रेममयी , मानवी बनवुन स्वत:सह इतरेजनांना आनंदी करण्याची सुरूवात सुरूवात करण्याचा हा उत्सव सूर्याच्या साक्षीने साजरा करू या !
हीच आपणास व आपल्या कुटूंबियास मकर संक्रांतीची हार्दीक शुभेच्छा आहे!
        डाॅ. कैलास दौंड व कुटूंबिय .
         सोनोशी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर