जमाना बदलल्याचे चिन्हं, दुसरं काय?
जमाना बदलल्याचं चिन्ह, दुसरं काय? : नेटकी कविता.
डाॅ. कैलास रायभान दौंड
कवी प्रकाश रामचंद्र क्षीरसागर 'सागर' यांची कविता तिच्यातील निसर्गसन्मुखता आणि भावविभोरता यामुळे मराठी काव्य रसिकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. नुकताच त्यांचा 'जमाना बदलल्याचे चिन्हं, दुसरं काय? 'नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. गोव्यातील माणूस आणि निसर्ग यांच्या अतुल भाववीणीची कविता या कविता संग्रहातून वाचकांसमोर येते. आजच्या गद्याळलेल्या तथाकथित बर्या कवितेच्या पाश्र्वभूमीवर ही कविता तिच्यातील काव्यगुणांनी हिरव्या पालवीवर उमललेल्या इवल्याश्या रंगीत फुलासारखी चित्तवेधक आहे. या कवितासंग्रहातील कविता 'झाडं, निसर्ग आणि,शेती ', 'गेय कविता ','मुक्तछंद आणि मी विषयक काही कविता ','स्री जाणिवेच्या कविता' अशा विविध काव्यबंधातून वाचक समीक्षकांच्या भेटीस येते.
झाड, निसर्ग, शेती :निसर्ग हा मानवी अस्तित्वासाठी महत्त्वाचा घटक तर झाडं हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे माणूस आणि झाडं यातील अनुबंध सनातन आहे. मात्र अलिकडे माणूस झाडांशी माणसासारखा वाचतांना दिसत नाही. कवी 'झाडं आणि माणसं ' या कवितेत या संबंधाने भाष्य करतांना भुई ची अगतिकता मांडतो .ती अशी:-
'भुई मात्र दोन्ही पुत्रांकडे तितक्याच वात्सल्याने पाहते
तेव्हा झाडं शहारतात आणि माणसं निर्ढावतात.' (पृष्ठ ११)
कवीला झाडं, निसर्ग, झरा, वारा, पाणी या बद्दल अतिव आस्था आहे. जेव्हा या प्रिय वस्तूवर हात उचलण्याची वेळ येते ,त्या वेळेला सैतान अंगात घुसल्याचे कवी समजतो. दुर्दैवाने असे प्रसंग पहावे लागतात. सैतानाचा संचार झालेले जीव जीव घुसमटून टाकतात, हेच खरे! धूळ माखलेल्या झाडांची आणि डोंगर कपारीतून उसळणार्या झ-याची भाषा कवी संवेदनातून समजून घेतो. निसर्ग घटकाची वेदना, छळवणूक आणि क्रौर्याने वागणारा माणूस या विभागातील कवितेतून सतत समोर येत राहतात. अर्थातच कवीची अस्वस्थता वाचकांच्या हृदयात अलगत उतरत जाते. माणूस अविचारी वागून स्वतःचे नुकसान करून घेतो. कवी लिहितो :-
' भुईला भार होणारी माणसं
भुई तोलणारी झाडं तोडतात
अन् कळत नकळत आपलेच आयुष्य खुडतात.'(पृष्ठ १७)
किंवा अशीच भावना व्यक्त करण्यासाठी लिहिलेल्या आणखी काव्यपंक्ती पहा :-
'झाडांचे असे आभाळ
खुज्या माणसांच्या कवेत मुळीच नाही मावत.' (पृष्ठ १८)
माणूस निसर्गात वाढतो आणि निसर्ग सन्मुख जगून, निसर्गाशी समरस होतो. मिळून जातो. जांभळाच्या दिवसामध्ये झाडाखाली पडून फुलणारी, मातीत मिळणारी जांभळे पाहून कवी त्यांच्या चिरडल्या गेलेल्या दुःखाशी समरस होतो. हे जांभळाचे फळ म्हणत असेल की 'माझ्यातुनच उद्याचे झाड फुटणार आहे.' असा संपृक्त सर्जनशील विचार करतो 'पदरव माणसाचा घात करतो जीवाला.' अशी एकुणच निसर्गातील मानवेतर सजीव निर्जीवाची भावना झालेली आहे. झाडांची, पानांची भाषा फक्त वार्यालाच कळते , वार्याचेच मौन दवातून पाझरते. माणसांना मात्र कायम वादच लागतो. माणसाची असुरी वृत्ती, वखवखलेली भूक खूपच घातक आहे.
'झाडे व मुली वयात आल्या की
माणसांच्या नजरा वखवखू लागतात
त्या नजरांनीच ती लागतात सुकू.' (पृष्ठ ३९)
या निसर्ग भावनांशी समरस होणाऱ्या देखण्या कविते नंतर येतात त्या गेय कविता. गेय कविता : या कविता देखील निसर्ग सन्मुखच आहेत. एकुणच क्षीरसागर यांची कविता झाडे, पाऊस, गंध यात रमते आणि प्रदुषणाने गुदमरते, माणसांच्या विपरीत वागण्यांनी छळली जाते. प्रत्येक भावनांच प्रकट होतांना ही निसर्ग रूपातच होते.
उदाहरणार्थ अतिशय लोभस रूपातल्या नदीकिनारी या कवितेच्या ओळी पहा:-
'तुझ्या डोळ्यात
दाटते भय सांगति लाटा
नदीकिनारी॥'(पृष्ठ ४४)
कविता गुणगुणायला लावनारा वाङमय प्रकार.' सुखाची मुजोरी ',' मायेचा नाही फिरला 'या गुणगुणाव्याशा कविता. 'आभाळाचे गाणे जगणे' ही कविता निसर्गाप्रती समर्पण करण्याच्या वृत्तीचे मनोज्ञ दर्शन घडवणारी कविता आहे. 'उभ्या जीवाचे पुष्प मोगरी बनलो 'ही कवीची भावना आहे.
'आषाढस्य् प्रथम दिवसे' म्हणत कालिदासाने अजरामर मेघदूत लिहिले. अजूनही आषाढाच्या निसर्ग रूपांनी कवींना लुभावणे सोडलेले नाही. क्षीरसागर यांची 'आषाढ गाणी ' ही कविता मुळातून पाहावी.
'आषाढ आला घन दूरुन आले
तव आठवाने मन भरून आले'( पृष्ठ ५३)
कवीला बदलत्या काळानुसार माणसाने स्वीकारलेले अमानुषपण कवीला असह्य करणारे आहे म्हणूनच ते उत्कट कवितेला जन्म देणारे देखील आहे. 'गेले कुठे? ','इतके सारे घाईत 'या कविता त्याची साक्ष देतात. मात्र कवीच्या अंतर्यामी आहे ते लोभस निसर्गाचे रूपडे. उदा:' हा किनारा ' या कवितेतील ओळी पहा :
'हा किनारा सांजवेळी ओलावतो
अन् नदीला पार नेण्या बोलावतो .'(पृष्ठ ४६)
लोभस आणि स्वर विभोर कविता या विभागात भेटते.
मुक्तछंद आणि मी विषयक काही कविता:या विभागातील कवितेत कवीच्या मुक्त चिंतनाच्या कविता येतात. कवीला भोवतालच्या गर्दीत एकटेपणाची भीती वाटते. 'आणि मी दचकलो 'या कवितेत कवीने गोव्यातील सांस्कृतिक संघर्ष दाखवला आहे.'मला काय त्याचे?' या वृत्तीचा माणसाने सहजपणाने केलेला स्विकार 'चालायचच' या कवितेत दिसतो.
'चालायचं म्हणून आता किती दिवस चालायचं? '(पृष्ठ ६९)
माणसाचं पूर्वीचं जगणं आणि आताचं जगणं यातली तफावत मांडली आहे.ही तफावत अस्वस्थता वाढवणारी आहे. प्रस्तुत संग्रहातील बहुतांश कवितेच्या मुळाशी हीच असल्याचे दिसते. स्री जाणिवेच्या कविता 'जमाना बदलल्याचे चिन्हं, दुसरं काय? 'या कवितासंग्रहातील अखेरच्या भागात समाविष्ट आहेत. यात मुख्यत्वे स्रीचे सर्जकत्व , तीचे दुयमत्व आणि राबवणूक केंद्रस्थानी आहे. कवीचे स्री दाक्षिण्य या कवितांमधून येते. आयुष्याच्या विस्कटलेल्या पदावरील वैतागलेल्या आणि घराघरात भेटणाऱ्या स्त्रीचे प्रातिनिधिक चित्रण या कवितेतून येते .रांधणं, वाढणं, रांगोळी काढणं एवढ्या पुरताचं तिचा घरावर हक्क असतो. तिच्या सुख -दु:खाची मनस्वी भावना कवितेत येते ती अशी :
' सुपातले हसतं जात्यातल्यांना
पण त्यांच्या गावी नसे भरडून घेण्याची वेदना '
किंवा
'तिच्या पदरातलं सुख घरंगळे
तेव्हा सुखाला वाटलं दुःख काढतय गळे '
या सगळ्या जगण्यात' ती 'अंकुरते सुख पुन्हा रुजते.' प्रकाश रामचंद्र क्षीरसागर 'सागर 'यांची कविता जगण्याच्या संवेदनशील पैलूला लीलया हात घालते. या कवितासंग्रहातील कवितेचे विशेष सांगतांना निसर्गसन्मुखता, सहजता, माणूस आणि निसर्ग, निसर्गातील झाडे, पाणी यांच्या लयीसी एकरूपता या वैशिष्ट्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. माणुसपणाची मागणी करणारी ही कविता आहे. साधी सोपी आणि हृदयाची भाषा बोलणारी ही कविता काव्यरसिकांना निश्चितच आवडेल. प्रसिद्ध चित्रकार दिलीप दार्व्हेकर यांनी समर्पक मुखपृष्ठ चितारलेले असून गोवा सरकारच्या लेखकाला प्रकाशनार्थ अनुदान या योजनेंतर्गत अनुदानही प्राप्त आहे. ________________________________ जमाना बदलल्याचं चिन्ह, दुसरं काय? :
कवितासंग्रह.
कवी :प्रकाश रामचंद्र क्षीरसागर 'सागर'
प्रकाशक : माधव राघव प्रकाशन ,ताळगाव, गोवा.
प्रकाशन वर्ष :२०१७-१८
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा