कविता
□ निसर्ग आणि माणूस
पक्षी उडतात म्हणजे
ते स्वच्छंदी असतात
असं मात्र नाही.
रोजचं अन्न, पाणी
पिलांसाठी चारा
भाग पाडतो पक्ष्यांना उडायला.
जिथं किमान जगता येईल महिनाभर
असं ठिकाण शोधायचं असतं त्यांना मिळालं तर .
म्हणून पक्षी घेताहेत
क्षितिज दिशेने भरार्‍या .
झाडावेलींची फुलं
भुरळ घालतात मनाला
रंगानं, गंधानं
कुणी ऐकतं का त्यांचं गाऱ्हाणं?
कित्येक फुलं नुसतीच पडतात गळून
फळ होण्याशिवाय
शेतात मोडून पडलेल्या कास्तकारासारखे .
माणसं रडतात , लढतात
म्हणजे ती जीवनाला भीतात ,भिडतात
असंही नाही म्हणता येत.
पहाणार्‍याला काय?
पक्षी दिसतात स्वच्छंदी मोर दिसतो आनंदी
फुले भासतात सुकुमार
अन् जंगल तर मनमोहक!
कुणी भिडतच नाही आरपार त्यांच्या जगण्याला;
माणसाबाबदही तसचं होतं नेहमी
समजून घेतांना -
हसतो तो आनंदी आणि रडतो तो दुःखी किती
वरवरचे पाहत असतो आपण .
ज्याची त्यालाच भोगावी लागते सल
ज्याला त्यालाच करावी लागते उकलं
मातीचा वास एकाला करतो उत्तेजित
अन् दुसर्‍याला चिंताक्रांत.
पक्ष्यांना, झाडावेलींना, फुलापानांना
कसं दिसत असेल माणसाचं जगणं?
मग ते सारे पहातात का माणसाला
जशी माणसं पाहतात त्यांना?
मग ती का लावत नाहीत
माणसांच्या जगण्याला घोर?
जशी माणसं लावतात त्यांच्या ,
की ती आहेत खरेच माणसापेक्षा थोर!
==========
डाॅ. कैलास दौंड kailasdaund@gmail.com मो. 9850608611

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर